YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 28:10-20

मत्तय 28:10-20 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “भिऊ नका, जा, माझ्या भावांना सांगा की त्यांनी गालील प्रांतात जावे. ते तिथे मला पाहतील.” त्या स्त्रिया शिष्यांना सांगण्यासाठी गेल्या. तेव्हा कबरेवरील पहारेकरी शिपायांतील काहीजण नगरात गेले आणि त्यांनी घडलेले सर्व मुख्य याजकांना सांगितले. नंतर याजक जाऊन वडीलजनांना भेटले आणि त्यांनी एक कट रचला. त्यांनी शिपायांना पुष्कळ पैसे देऊन असे म्हणण्यास सांगितले. ते म्हणाले, “लोकांस असे सांगा की, आम्ही रात्री झोपेत असताना येशूचे शिष्य आले आणि त्यांनी त्याचे शरीर चोरुन नेले. हे जर राज्यापालाच्या कानावर गेले तर आम्ही त्याच मन वळवू देऊ आणि तुम्हास काही होऊ देणार नाही.” मग शिपायांनी पैसे घेतले व याजकांनी सांगितले तसे केले आणि ही गोष्ट यहूदी लोकात आजवर बोलण्यात येते. पण अकरा शिष्य गालील प्रांतात येशूने त्यांना सांगितलेल्या डोंगरावर निघून गेले. आणि त्यांनी त्यास बघितले तेव्हा त्यांनी त्याची उपासना केली. पण काहींना संशय आला. तेव्हा येशू त्यांच्याकडे आला आणि म्हणाला, “स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला देण्यात आला आहे. म्हणून तुम्ही जा आणि राष्ट्रांतील लोकांस माझे शिष्य करा. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावाने बाप्तिस्मा द्या. आणि जे काही मी तुम्हास शिकविले आहे ते त्या लोकांस पाळायला शिकवा आणि पाहा, युगाच्या शेवटापर्यंत मी सदोदित तुमच्याबरोबर आहे.”

सामायिक करा
मत्तय 28 वाचा

मत्तय 28:10-20 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

मग येशू त्यांना म्हणाले, “भिऊ नका. माझ्या भावांकडे जा, त्यांना सांगा आणि मला भेटण्यासाठी ताबडतोब गालीलात या. तिथे मी त्यांच्या दृष्टीस पडेन.” त्या स्त्रिया वाटेवर असताना, काही शिपाई महायाजकाकडे गेले आणि काय घडले यासंबंधीचा सर्व वृतांत त्यांनी महायाजकांना सांगितला. यहूदी पुढार्‍यांची सभा बोलाविण्यात आली. त्या सभेत शिपायांना लाच देऊन, त्यांना असे सांगावयास लावले, “रात्री आम्ही झोपेत असताना त्यांच्या शिष्यांनी येऊन त्यांचे शरीर पळवून नेले. राज्यपालांना हे समजले तर भिण्याचे काही कारण नाही. आम्ही तुमच्यावतीने बोलू. सर्वकाही ठीक होईल.” या आश्वासनानंतर शिपायांनी लाच घेतली आणि त्यांना शिकविल्याप्रमाणे त्यांनी सांगितले आणि ही गोष्ट यहूदी लोकांमध्ये पसरली आणि ती आजही प्रचलित आहे. यानंतर येशूंचे अकरा शिष्य गालीलातील ज्या डोंगरावर येशूंनी त्यांना जमावयास सांगितले होते, त्या डोंगरावर गेले. त्यांनी त्यांना पाहिले आणि त्यांची उपासना केली. परंतु काहींनी संशय धरला. मग येशू त्यांच्याजवळ येऊन त्यांना म्हणाले, “स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला देण्यात आलेला आहे. यास्तव सर्व राष्ट्रांमध्ये जाऊन शिष्य बनवा आणि त्यांना पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या; आणि मी तुम्हाला आज्ञा केल्याप्रमाणे त्यांना सर्वकाही पाळावयास शिकवा आणि मी सदैव, युगाच्या अंतापर्यंत तुमच्याबरोबर आहे.”

सामायिक करा
मत्तय 28 वाचा

मत्तय 28:10-20 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

तेव्हा येशूने त्यांना म्हटले, “भिऊ नका; जा माझ्या भावांना सांगा की, त्यांनी गालीलात जावे; तेथे मी त्यांच्या दृष्टीस पडेन.” त्या जात असता, पाहा, पहारेकर्‍यांतील कित्येकांनी नगरात जाऊन झालेले सर्व वर्तमान मुख्य याजकांना सांगितले. तेव्हा त्यांनी व वडिलांनी मिळून मसलत केली आणि शिपायांना पुष्कळ पैसे देऊन सांगितले की, “‘आम्ही झोपेत असताना त्याच्या शिष्यांनी रात्री येऊन त्याला चोरून नेले,’ असे म्हणा; आणि ही गोष्ट सुभेदाराच्या कानावर गेली तर आम्ही त्याची समजूत घालून तुम्हांला निर्धास्त करू.” मग त्यांनी पैसे घेऊन शिकवल्याप्रमाणे केले; आणि ही जी गोष्ट यहूदी लोकांमध्ये पसरवण्यात आली, ती आजपर्यंत चालू आहे. इकडे अकरा शिष्य गालीलात जो डोंगर येशूने सांगून ठेवला होता त्यावर गेले; आणि त्यांनी त्याला तेथे पाहून नमन केले, तरी कित्येकांना संशय वाटला. तेव्हा येशू जवळ येऊन त्यांच्याशी बोलताना म्हणाला, “स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे. तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांना शिष्य करा; त्यांना पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या; जे काही मी तुम्हांला आज्ञापिले ते सर्व त्यांना पाळण्यास शिकवा; आणि पाहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे.”

सामायिक करा
मत्तय 28 वाचा

मत्तय 28:10-20 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

येशूने त्यांना म्हटले, “भिऊ नका, जा. माझ्या भावांना सांगा की, त्यांनी गालीलमध्ये जावे, तेथे ते मला पाहतील.” त्या स्त्रिया जात असता, पहारेकऱ्यांतील कित्येकांनी शहरात जाऊन झालेले सर्व वर्तमान मुख्य याजकांना सांगितले. त्यांनी व वडीलजनांनी मिळून मसलत केली आणि शिपायांना पुष्कळ पैसे देऊन सांगितले, “‘आम्ही झोपेत असताना त्याच्या शिष्यांनी रात्री येऊन त्याला चोरून नेले’, असे तुम्ही म्हटले पाहिजे. ही गोष्ट राज्यपालांच्या कानांवर गेली तर तुम्ही निर्दोष आहात, अशी आम्ही त्यांची समजूत घालू आणि तुम्हांला संरक्षण देऊ.” त्यांनी पैसे घेतले व त्यांना शिकवल्याप्रमाणे केले. ही जी गोष्ट यहुदी लोकांमध्ये पसरवण्यात आली, ती आजपर्यंत प्रचलित आहे. इकडे येशूचे अकरा शिष्य गालीलातील ज्या डोंगरावर येशूने त्यांना जायला सांगितले होते, त्यावर गेले. त्यांनी त्याला तेथे पाहून त्याची आराधना केली. मात्र त्यांच्यापैकी काही जणांना शंका आली. तेव्हा येशू जवळ येऊन त्यांना म्हणाला, “स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे. म्हणून तुम्ही जा, सर्व राष्ट्रांतील लोकांना माझे शिष्य करा, त्यांना पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. जे काही मी तुम्हांला आज्ञापूर्वक सांगितले आहे, ते सर्व त्यांना पाळायला शिकवा आणि पाहा, युगाच्या अंतापर्यंत मी सर्वदा तुमच्याबरोबर आहे.”

सामायिक करा
मत्तय 28 वाचा