मत्तय 27:57-66
मत्तय 27:57-66 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मग संध्याकाळ झाल्यावर अरिमथाईतील योसेफ नावाचा एक धनवान मनुष्य आला, हाही येशूचा शिष्य होता. त्याने पिलाताकडे जाऊन येशूचे शरीर मागितले. तेव्हा पितालाने ते देण्याची आज्ञा केली. योसेफाने ते शरीर घेऊन तागाच्या स्वच्छ वस्त्रात गुंडाळले; ते त्याने खडकात खोदलेल्या आपल्या नव्या कबरेत ठेवले, एक मोठी धोंड लोटून ती कबरेच्या दाराला लावली आणि तो निघून गेला. पण तेथे कबरेसमोर मग्दालीया मरीया व दुसरी मरीया ह्या बसल्या होत्या. दुसर्या दिवशी म्हणजे तयारीनंतरच्या दिवशी मुख्य याजक व परूशी पिलाताकडे जमून म्हणाले, “महाराज, तो ठक जिवंत असता ‘तीन दिवसांनंतर मी उठेन’ असे म्हणाला होता, ह्याची आम्हांला आठवण आहे. म्हणून तिसर्या दिवसापर्यंत कबरेचा बंदोबस्त करण्यास सांगावे, नाहीतर कदाचित त्याचे शिष्य [रात्री] येऊन त्याला चोरून नेतील व ‘तो मेलेल्यांतून उठला आहे’ असे लोकांना सांगतील; मग शेवटली फसगत पहिल्यापेक्षा वाईट होईल.” पिलात त्यांना म्हणाला, “तुमच्याजवळ पहारा आहे; जा, तुमच्याने होईल तसा बंदोबस्त करा.” मग पहारा बरोबर घेऊन ते गेले आणि त्यांनी धोंडेवर शिक्कामोर्तब करून कबरेचा बंदोबस्त केला.
मत्तय 27:57-66 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
संध्याकाळ झाल्यावर योसेफ नावाचा अरिमथाईचा, एक धनवान मनुष्य तेथे आला. तो येशूचा अनुयायी होता. तो पिलाताकडे गेला आणि त्याने येशूचे शरीर मागितले. तेव्हा पिलाताने ते देण्याचा हुकूम केला. नंतर योसेफाने ते शरीर घेतले आणि स्वच्छ तागाच्या कपड्यात ते गुंडाळले. आणि ते एका खडकात खोदलेल्या नव्या कबरेत ठेवले. नंतर कबरेच्या तोंडावर एक मोठी धोंड लोटून ती कबर बंद केली आणि तो निघून गेला. मग्दालीया नगराची मरीया आणि याकोब व योसेफ यांची आई मरीया कबरेसमोर बसल्या होत्या. त्या दिवसास तयारीचा दिवस म्हणत असत, दुसऱ्या दिवशी मुख्य याजक लोक व परूशी पिलाताकडे गेले. ते म्हणाले, “साहेब, आम्हास आठवण आहे की, तो लबाड जिवंत असताना असे म्हणाला होता की, ‘मी तीन दिवसानी परत जीवनात येईल.’ म्हणून तीन दिवसापर्यंत कबरेवर कडक पहारा ठेवण्याची आज्ञा करा. कारण त्याचे शिष्य येऊन त्याचे शरीर चोरुन नेण्याचा प्रयत्न करतील. मग तो मरणानंतर पुन्हा उठला असे लोकांस सांगतील. ही शेवटची फसवणूक पहिल्यापेक्षा अधिक वाईट होईल.” पिलात म्हणाला, “तुमच्याबरोबर पहारा घ्या, जा आणि कबरेवर कडक पहारा ठेवा.” म्हणून ते गेले आणि कबरेवर कडक पहारा ठेवला. कबरेवर जी धोंड होती तिच्यावर सरकारी शिक्का मारला आणि तेथे पहारा करण्यासाठी शिपाई नेमले.
मत्तय 27:57-66 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
संध्याकाळ झाली असताना, येशूंचा अनुयायी झालेला, अरिमथिया शहराचा योसेफ नावाचा एक श्रीमंत मनुष्य, पिलाताकडे जाऊन, त्याने येशूंचे शरीर मागितले, आणि पिलाताने ते त्याला देण्यात यावे अशी आज्ञा दिली. योसेफाने येशूंचे शरीर घेतले, एका स्वच्छ तागाच्या वस्त्रात गुंडाळले, आणि खडकात खोदलेल्या आपल्या मालकीच्या एका नव्या कबरेमध्ये ते ठेवले. कबरेच्या दाराशी त्याने एक मोठी शिळा लोटून ठेवली. नंतर तो तेथून निघून गेला. मरीया मग्दालिया आणि दुसरी मरीया या दोघीजणी कबरेसमोर बसल्या होत्या. सणाच्या तयारीच्या दुसर्या दिवशी, वल्हांडण सणाचा पहिला दिवस संपताना, प्रमुख्य याजकवर्ग आणि परूशी लोक पिलाताकडे गेले. “महाराज,” ते म्हणाले, “आम्हाला आठवण आहे की तो लबाड जिवंत असताना म्हणाला होता की, ‘तीन दिवसानंतर मी पुन्हा जिवंत होईन’ यास्तव त्याची कबर तीन दिवसापर्यंत सुरक्षित ठेवण्याचा हुकूम आपण द्यावा. नाही तर त्याचे शिष्य येऊन शरीर चोरून नेतील आणि तो पुन्हा जिवंत झाला आहे, असे लोकांना सांगतील. असे झाले तर ही शेवटली फसवणूक पहिल्यापेक्षा अधिक वाईट होईल.” पिलाताने उत्तर दिले, “सैनिकांना घ्या, तुमच्याने होईल तसा कबरेचा बंदोबस्त करा.” याप्रमाणे ते गेले आणि कबरेवरील शिला शिक्कामोर्तब करून त्यांनी ती सुरक्षित केली. व पहारेकरीही ठेवले.
मत्तय 27:57-66 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
संध्याकाळ झाल्यावर अरिमथाईकर योसेफ नावाचा एक धनवान मनुष्य आला. तो येशूचा शिष्यदेखील होता. त्याने पिलातकडे जाऊन येशूचे शरीर मागितले. पिलातने ते द्यायचा आदेश दिला. म्हणून योसेफने ते शरीर घेऊन तागाचे स्वच्छ कापड त्याच्याभोवती गुंडाळले. ते त्याने स्वतःसाठी खडकात नव्याने खोदलेल्या कबरीत ठेवले. एक मोठी शिळा लोटून ती कबरीच्या दाराला लावली आणि तो निघून गेला. तेथे कबरीसमोर मग्दालिया मरिया व दुसरी मरिया ह्या बसल्या होत्या. दुसऱ्या दिवशी म्हणजेच साबाथच्या दिवशी, मुख्य याजक व परुशी पिलातसमोर जमून म्हणाले, “महाराज, तो लबाड जिवंत होता तेव्हा म्हणाला होता, “तीन दिवसांनंतर मी उठेन’, ह्याची आम्हांला आठवण आहे. म्हणून आपण तिसऱ्या दिवसापर्यंत कबरीचा बंदोबस्त करायला सांगा, नाही तर कदाचित त्याचे शिष्य येऊन त्याला चोरून नेतील व तो मेलेल्यांतून उठला आहे, असे लोकांना सांगतील. मग शेवटची फसगत पहिल्यापेक्षा अधिक वाईट होईल.” पिलात त्यांना म्हणाला, “तुमच्याजवळ पहारेकऱ्यांची तुकडी आहे. जा. तुम्ही शक्य तेवढा बंदोबस्त करा.” तेव्हा तुकडी बरोबर घेऊन ते गेले आणि त्यांनी शिळा शिक्काबंद करून कबरीवर पहारा ठेवला.