मत्तय 27:32-44
मत्तय 27:32-44 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
ते बाहेर जात असता त्यांना एक शिमोन कुरनेकर नावाचा मनुष्य भेटला. त्यांनी त्यास धरून त्याचा वधस्तंभ वाहायला लावले. जेव्हा ते गुलगुथा “म्हणजे कवटीची जागा” नावाच्या ठिकाणी आले. तेव्हा त्यांनी त्यास पित्तमिश्रित द्राक्षरस प्यायला दिला. त्याने तो चाखला. पण पिण्यास नकार दिला. त्यांनी त्यास वधस्तंभावर खिळले. नंतर त्यांनी चिठ्ठ्या टाकून येशूचे कपडे आपसात वाटून घेतले. शिपाई तेथे बसून येशूवर पहारा देऊ लागले. आणि “हा यहूद्यांचा राजा येशू आहे” असे लिहिलेले आरोपपत्रक डोक्याच्या वरच्या बाजूला लावले. दोघां चोरांना, एकाला उजवीकडे आणि एकाला डावीकडे असे त्याच्याबरोबर वधस्तंभावर खिळण्यात आले. जे जवळून जात होते ते आपली डोकी हलवून त्याची निंदा करून म्हणू लागले, हे परमेश्वराचे भवन मोडून तीन दिवसात परत उभारणाऱ्या, स्वतःला वाचव जर तू देवाचा पुत्र असलास तर वधस्तंभावरून खाली ये. तसेच मुख्य याजकांसह, नियमशास्त्र शिक्षक व वडीलासह इतरांसारखी त्याची चेष्टा करीत म्हणाले, याने दुसऱ्यांना वाचवले, परंतु तो स्वतःला वाचवू शकत नाही. हा इस्राएलाचा राजा आहे. असेल, त्याने वधस्तंभावरून खाली यावे आणि मग आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू. तो देवावर विश्वास ठेवतो, देवाला तो पाहिजे असेल तर त्याने त्यास वाचवावे कारण तो म्हणत होता, मी देवाचा पुत्र आहे. तसेच त्याच्याबरोबर वधस्तंभावर खिळलेले चोर त्यांनीही त्याची तशीच निंदा केली.
मत्तय 27:32-44 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
ते त्यांना घेऊन क्रूसावर खिळण्याच्या जागेकडे निघाले. वाटेत त्यांना कुरेने गावचा शिमोन नावाचा माणूस भेटला. त्यांनी त्याला जबरदस्तीने क्रूस वाहण्यास भाग पाडले. मग ते गुलगुथा या नावाने ओळखल्या जाणार्या भागात आले. गुलगुथा याचा अर्थ “कवटीची जागा” असा आहे. त्याठिकाणी त्यांना पित्त मिसळलेला द्राक्षारस प्यावयास दिला. परंतु त्यांनी तो चाखून पाहिल्यावर घेतला नाही. येशूंना क्रूसावर खिळल्यानंतर त्यांची वस्त्रे सैनिकांनी चिठ्ठ्या टाकून वाटून घेतली. मग क्रूसावर टांगलेल्या येशूंवर पहारा करीत ते जवळच बसले. त्यांच्या डोक्याच्या वरच्या बाजूला दोषपत्राचा लेख लावण्यात आला होता, त्यावर लिहिले होते: “हा येशू, यहूद्यांचा राजा आहे.” त्यांनी दोन बंडखोरांना त्यांच्याबरोबर क्रूसावर खिळले, एक उजवीकडे आणि दुसरा त्यांच्या डावीकडे होता. जे जवळून जात होते त्यांनी त्यांचा अपमान केला, डोकी हालवीत चेष्टा करू लागले. ते म्हणाले, “तू मंदिर उध्वस्त करून तीन दिवसात पुन्हा बांधणार आहे ना! जर तू परमेश्वराचा पुत्र आहेस, तर क्रूसावरून खाली ये आणि स्वतःचा बचाव कर.” त्याचप्रमाणे प्रमुख याजकवर्ग आणि नियमशास्त्र शिक्षक यांनीही त्यांची थट्टा केली. “त्याने दुसर्यांचे तारण केले,” ते म्हणाले, “पण त्याला स्वतःचा बचाव करता येत नाही. तो इस्राएलाचा राजा आहे! मग त्याला क्रूसावरून खाली उतरून येऊ दे म्हणजे आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू. तो परमेश्वरावर भरवसा ठेवतो. मग परमेश्वराची इच्छा असल्यास त्याने त्याची सुटका करावी, कारण तो म्हणाला होता की, ‘मी परमेश्वराचा पुत्र आहे.’ ” त्यांच्याबरोबर क्रूसावर खिळलेल्या त्या चोरांनीही त्यांचा अपमान केला.
मत्तय 27:32-44 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
ते बाहेर जात असता शिमोन नावाचा कोणीएक कुरेनेकर मनुष्य त्यांना आढळला; त्याला त्यांनी त्याचा वधस्तंभ वाहण्याकरता वेठीस धरले. मग गुलगुथा नावाची जागा, म्हणजे कवटीची जागा, येथे येऊन पोचल्यावर त्यांनी त्याला ‘पित्तमिश्रित द्राक्षारस पिण्यास दिला,’ परंतु तो चाखून पाहिल्यावर तो पिईना. त्याला वधस्तंभावर खिळल्यावर ‘त्यांनी चिठ्ठ्या टाकून’ त्याची ‘वस्त्रे वाटून घेतली;’ [जे संदेष्ट्याने सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले; ते असे की, ‘त्यांनी माझी वस्त्रे वाटून घेतली व माझ्या वस्त्रावर चिठ्ठ्या टाकल्या’]. नंतर तेथे बसून ते त्याच्यावर पहारा करत राहिले. त्यांनी त्याच्यावरील दोषारोपाचा लेख त्याच्या डोक्याच्या वर लावला; तो असा : “हा यहूद्यांचा राजा येशू आहे.” त्या वेळी त्यांनी त्याच्याबरोबर दोन लुटारू, एक त्याच्या उजवीकडे व एक डावीकडे असे वधस्तंभावर खिळले. आणि जवळून जाणारेयेणारे ‘डोकी डोलवत’ त्याची अशी निंदा करत होते की, “अरे, मंदिर मोडून तीन दिवसांत बांधणार्या, तू देवाचा पुत्र असलास तर स्वतःचा बचाव कर आणि वधस्तंभावरून खाली उतर.” तसेच मुख्य याजकही, शास्त्री व वडील ह्यांच्याबरोबरीने थट्टा करत म्हणाले, “त्याने दुसर्यांना वाचवले; त्याला स्वतःला वाचवता येत नाही; तो इस्राएलाचा राजा आहे; त्याने आता वधस्तंभावरून खाली उतरावे, म्हणजे आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू. ‘तो देवावर भरवसा ठेवतो; तो त्याला हवा असेल तर त्याने त्याला’ आता ‘सोडवावे’; कारण मी देवाचा पुत्र आहे, असे तो म्हणत असे.” जे लुटारू त्याच्याबरोबर वधस्तंभावर खिळलेले होते त्यांनीही त्याची तशीच निंदा केली.
मत्तय 27:32-44 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
ते बाहेर जात असता शिमोन नावाचा एक कुरेनेकर मनुष्य त्यांना दिसला. त्याला शिपायांनी येशूचा क्रुस वाहायला भाग पाडले. ते गुलगुथा म्हणजे कवटीचे ठिकाण म्हटलेल्या जागी आले. तेथे त्यांनी येशूला विनेगर मिसळलेला द्राक्षारस प्यायला दिला, परंतु तो चाखून पाहिल्यावर त्याने तो घेतला नाही. त्याला क्रुसावर खिळल्यानंतर त्यांनी चिठ्या टाकून त्याचे कपडे वाटून घेतले. नंतर तेथे बसून ते त्याच्यावर पहारा करत राहिले. त्यांनी त्याच्यावरील दोषारोपाचा लेख त्याच्या डोक्यावर लावला तो असा: हा यहुदी लोकांचा राजा येशू आहे. त्या वेळी त्यांनी येशूबरोबर दोन दरोडेखोर क्रुसावर चढवले होते - एक त्याच्या उजवीकडे तर दुसरा त्याच्या डावीकडे. जवळून जाणारे येणारे डोकी हालवत येशूची निंदा करत होते, “अरे, मंदिर मोडून तीन दिवसांत बांधणाऱ्या, तू देवाचा पुत्र असलास, तर स्वतःचा बचाव कर आणि क्रुसावरून खाली उतर.” तसेच मुख्य याजकदेखील शास्त्री व वडीलजन ह्यांच्याबरोबर त्याचा उपहास करत म्हणाले, “त्याने दुसऱ्यांचे तारण केले, त्याला स्वतःला वाचवता येत नाही. तो इस्राएलचा राजा आहे. त्याने आता क्रुसावरून खाली उतरावे म्हणजे आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू. तो देवावर भरवसा ठेवतो. तो त्याला हवा असेल, तर त्याने त्याला आता सोडवावे, कारण ‘मी देवाचा पुत्र आहे’, असे तो म्हणत असे.” जे दरोडेखोर त्याच्याबरोबर क्रुसावर खिळलेले होते, त्यांनीही त्याची अशीच निंदा केली.