मत्तय 26:26-46
मत्तय 26:26-46 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
ते जेवण करीत असताना येशूने भाकर घेतली. तिच्याबद्दल देवाचे उपकार मानले आणि ती मोडली. त्याने ती भाकर आपल्या शिष्यांना दिली. तो म्हणाला, “घ्या, खा. हे माझे शरीर आहे.” नंतर येशूने प्याला घेतला. त्याबद्दल देवाचे उपकार मानले आणि तो त्यांना दिला. येशू म्हणाला, “तुम्ही सर्वांनी यातून प्यावे. कारण हे माझे कराराचे रक्त आहे. हे पुष्कळांच्या पापक्षमेसाठी ओतले जात आहे. परंतु मी तुम्हास सांगतो की, मी आपल्या पित्याच्या राज्यांत तुम्हाबरोबर नवा द्राक्षरस पिईन त्या दिवसापर्यंत द्राक्षाचा हा उपज मी पिणारच नाही.” मग त्यांनी एक स्तोत्रगीत गाईल्यावर ते जैतूनाच्या डोंगरावर निघून गेले. येशूने सांगितले, “आज रात्री माझ्यामुळे, तुम्ही सर्व अडखळाल; कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, ‘मी मेंढपाळाचा वध करीन, कळपातील मेंढरांची दाणादाण होईल.’ पण मी मरणातून उठल्यानंतर, तुमच्या अगोदर गालील प्रांतात जाईन.” पेत्र उत्तर देत म्हणाला, “इतर सर्व जरी आपणाविषयी अडखळले तरी मी कधीही अडखळणार नाही.” येशू त्यास म्हणाला, “मी तुला खरे सांगतो आज रात्री कोंबडा आरवण्यापूर्वी तू तीन वेळा मला नाकारशील.” पेत्र म्हणाला, “मला तुझ्याबरोबर मरावे लागले तरी मी तुला नाकारणार नाही.” आणि इतर शिष्यसुद्धा तसेच म्हणाले. नंतर गेथशेमाने नावाच्या जागी येशू आपल्या शिष्यांसह गेला. येशू त्यांना म्हणाला, “मी थोडा पुढे जाऊन प्रार्थना करीपर्यंत येथेच थांबा.” येशूने पेत्र आणि जब्दीचे दोन पुत्र यांना आपल्याबरोबर यायला सांगितले. यानंतर येशू फार दुःखी व कासावीस होऊ लागला. येशू पेत्राला व जब्दीच्या दोघा पुत्रांना म्हणाला, “माझा जीव फार दुःखीत व मरणप्राय झाला आहे. येथे थांबा व माझ्याबरोबर जागे राहा.” तो थोडे अंतर पुढे गेला आणि जमिनीवर ओणवून प्रार्थना करू लागला, “हे माझ्या पित्या, शक्य झाले तर हा दुःखाचा प्याला माझ्यापुढून जाऊ दे, तथापि, माझ्या इच्छेप्रमाणे नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे.” मग तो शिष्यांकडे परत गेला तेव्हा ते झोपी गेले आहेत असे त्यास आढळले. येशू पेत्राला म्हणाला, “तुम्हा लोकांस माझ्याबरोबर एखादा तासही जागे राहता येत नाही काय? तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागे राहा आणि प्रार्थना करीत राहा. आत्मा खरोखर उत्सुक आहे खरा पण देह अशक्त आहे.” नंतर दुसऱ्यांदा जाऊन येशू प्रार्थना करू लागला, “हे माझ्या पित्या, जर दुःखाचा हा प्याला मी प्याल्याशिवाय टळून जात नाही तर तुझी इच्छा असेल तसे होवो.” नंतर येशू शिष्यांकडे परत गेला तेव्हा त्यास आढळून आले की, त्यांचे डोळे जड झाले होते व ते झोपी गेले आहेत कारण जागे राहणे त्यांना शक्य होत नव्हते. नंतर येशू शिष्यांना पुन्हा सोडून तसाच पुढे गेला आणि तिसऱ्या वेळी प्रार्थना करताना त्याने पुन्हा तेच शब्द बोलून प्रार्थना केली. यानंतर येशू परत शिष्याकडे गेला आणि त्यांना म्हणाला, “तुम्ही अजून झोप आणि विसावाच घेत आहात का? पाहा! मनुष्याचा पुत्र पापी लोकांच्या हाती धरून दिला जात आहे. उठा, चला. पाहा, मला धरून देणारा जवळ आला आहे.”
मत्तय 26:26-46 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
भोजन करीत असताना, येशूंनी भाकर घेतली आणि आशीर्वाद मागितल्यावर, ती मोडली आणि आपल्या शिष्यांना दिली. मग ते म्हणाले, “घ्या आणि खा, हे माझे शरीर आहे.” त्यांनी द्राक्षारसाचा प्याला हाती घेतला, व त्याबद्दल आभार मानले आणि मग तो प्याला त्यांना दिला व म्हणाले, “तुम्ही प्रत्येकजण यामधून प्या; हे माझ्या कराराचे रक्त आहे. बहुतांना पापक्षमा मिळावी म्हणून ते पुष्कळांसाठी ओतले जात आहे. मी तुम्हाला सांगतो की, येथून पुढे मी पित्याच्या राज्यात तुम्हाबरोबर नवा द्राक्षारस पिईन त्या दिवसापर्यंत द्राक्षवेलीचा उपज मी पिणार नाही.” मग त्या सर्वांनी मिळून एक गीत गाईले आणि ते जैतुनाच्या डोंगराकडे गेले. मग येशू शिष्यांना म्हणाले, “आज रात्री तुम्ही सर्वजण मला एकट्याला सोडून पळून जाल, कारण धर्मशास्त्रात असे लिहिले आहे की: “ ‘मी मेंढपाळावर प्रहार करीन, आणि कळपातील मेंढरांची पांगापांग होईल.’ परंतु मी पुन्हा जिवंत झाल्यावर, तुमच्या अगोदर गालीलात जाईन आणि तेथे तुम्हाला भेटेन.” यावर पेत्राने त्याला म्हटले, “प्रत्येकजण सोडून गेला, तरी मी तुम्हाला कधीच सोडून जाणार नाही.” येशू म्हणाले मी तुला निश्चित सांगतो, “आज रात्रीच, कोंबडा आरवण्यापूर्वी तू मला तीन वेळा नाकारशील.” परंतु पेत्र जाहीरपणे म्हणाला, “मला तुमच्याबरोबर मरावे लागले, तरी मी तुम्हाला नाकारणार नाही.” आणि बाकीचे सर्व शिष्यही असेच म्हणाले. मग येशू त्यांच्या सर्व शिष्यांसोबत गेथशेमाने नावाच्या ठिकाणी आले, आणि त्यांना ते म्हणाले, “मी पुढे जाऊन प्रार्थना करून येईपर्यंत येथे बसा.” मग त्यांनी पेत्र आणि जब्दीचे दोन पुत्र, याकोब व योहान, यांना बरोबर घेतले आणि ते अस्वस्थ आणि दुःखीकष्टी होऊ लागले. ते त्यांना म्हणाले, “मरणप्राय दुःखाने माझा आत्मा विव्हळ झाला आहे. तुम्ही येथेच थांबा आणि माझ्याबरोबर जागे राहा.” मग थोडे पुढे जाऊन ते भूमीवर पालथे पडून प्रार्थना केली, “हे माझ्या पित्या, शक्य असल्यास हा प्याला माझ्यापासून दूर करा. तरी माझ्या इच्छेप्रमाणे नको तर तुमच्या इच्छेप्रमाणे होवो.” यानंतर ते आपल्या शिष्यांकडे परत आले, पण ते झोपी गेले आहेत असे त्यांना आढळले. पेत्राला त्यांनी म्हटले, “माझ्याबरोबर तुम्हा माणसांना एक तासभरही जागे राहता आले नाही का?” येशू त्यांना म्हणाले “तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून सावध राहा आणि प्रार्थना करा. आत्मा उत्सुक आहे परंतु देह अशक्त आहे.” येशू पुन्हा गेले आणि प्रार्थना केली की, “हे माझ्या पित्या, जर हा प्याला प्याल्याशिवाय दूर करता येणार नसेल, तर तुमच्या इच्छेप्रमाणे होवो.” नंतर ते परत त्यांच्याकडे आले, त्यावेळीही ते झोपी गेलेले आढळले, कारण त्यांचे डोळे जड झाले होते. म्हणून ते प्रार्थना करण्यासाठी परत गेले आणि पुन्हा त्यांनी तेच शब्द उच्चारून प्रार्थना केली. नंतर ते शिष्यांकडे परत आले आणि त्यांना म्हणाले, “तुम्ही अजूनही झोप व विसावा घेत आहात काय? पाहा, वेळ आली आहे आणि मानवपुत्र पापी लोकांच्या हाती धरून दिला जात आहे. उठा, आपण जाऊ! माझा विश्वासघात करणारा आला आहे.”
मत्तय 26:26-46 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मग ते भोजन करत असताना येशूने भाकर घेतली व आशीर्वाद देऊन ती मोडली आणि शिष्यांना देऊन म्हटले, “घ्या, खा, हे माझे शरीर आहे.” आणि त्याने प्याला घेतला व उपकारस्तुती करून तो त्यांना दिला व म्हटले, “तुम्ही सर्व ह्यातून प्या. हे माझे [नव्या] ‘कराराचे रक्त’ आहे. हे पापांची क्षमा होण्यासाठी पुष्कळांकरता ओतले जात आहे. मी तुम्हांला सांगतो की, मी आपल्या पित्याच्या राज्यात तुमच्याबरोबर नवा द्राक्षारस पिईपर्यंत येथून पुढे द्राक्षाचा हा उपज पिणारच नाही.” नंतर गीत गाऊन ते जैतुनांच्या डोंगरावर निघून गेले. तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “तुम्ही सर्व ह्याच रात्री माझ्याविषयी अडखळाल; कारण असा शास्त्रलेख आहे की, ‘मी मेंढपाळाला मारीन आणि कळपातल्या मेंढरांची दाणादाण होईल.’ परंतु मी उठवला गेल्यानंतर तुमच्याआधी गालीलात जाईन.” पेत्राने त्याला उत्तर दिले, “आपणाविषयी सर्व अडखळले तरी मी कधीही अडखळणार नाही.” येशूने त्याला म्हटले, “मी तुला खचीत सांगतो, ह्याच रात्री कोंबडा आरवण्यापूर्वी तू तीन वेळा मला नाकारशील.” पेत्र त्याला म्हणाला, “आपणाबरोबर मला मरावे लागले तरी मी आपणाला नाकारणार नाही.” सर्व शिष्यांनीही तसेच म्हटले. नंतर येशू शिष्यांबरोबर गेथशेमाने नावाच्या ठिकाणी आला आणि त्यांना म्हणाला, “मी पुढे जाऊन प्रार्थना करीपर्यंत येथे बसा.” मग त्याने पेत्र व जब्दीचे दोघे मुलगे ह्यांना बरोबर घेतले आणि तो खिन्न व अति कष्टी होऊ लागला. तेव्हा त्याने त्यांना म्हटले, “‘माझा जीव’ मरणप्राय, ‘अति खिन्न झाला आहे,’ तुम्ही येथे थांबा व माझ्याबरोबर जागे राहा.” मग तो थोडासा पुढे जाऊन पालथा पडला आणि त्याने अशी प्रार्थना केली : “हे माझ्या बापा, होईल तर हा प्याला माझ्यावरून टळून जावो; तथापि माझ्या इच्छेप्रमाणे नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे होवो.” मग तो शिष्यांकडे आला आणि ते झोपी गेले आहेत असे पाहून पेत्राला म्हणाला, “हे काय, तुमच्याने घटकाभरही माझ्याबरोबर जागवत नाही? तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागृत राहा व प्रार्थना करा; आत्मा उत्सुक आहे खरा, पण देह अशक्त आहे.” आणखी त्याने दुसर्यांदा जाऊन अशी प्रार्थना केली, “हे माझ्या बापा, हा प्याला मी प्यायल्याशिवाय टळून जात नाही तर तुझ्या इच्छेप्रमाणे होवो.” मग त्याने पुन्हा येऊन ते झोपी गेले आहेत असे पाहिले; कारण त्यांचे डोळे जड झाले होते. नंतर त्यांना सोडून त्याने पुन्हा जाऊन तिसर्यांदा पुन्हा तेच शब्द बोलून प्रार्थना केली. आणि तो आपल्या शिष्यांकडे येऊन त्यांना म्हणाला, “आता झोप व विसावा घ्या, पाहा, घटका जवळ आली आहे, आणि मनुष्याचा पुत्र पापी लोकांच्या हाती धरून दिला जात आहे. उठा, आपण जाऊ; पाहा, मला धरून देणारा जवळ आला आहे.”
मत्तय 26:26-46 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
ते भोजन करत असताना येशूने भाकर घेतली, आशीर्वाद देऊन ती मोडली आणि शिष्यांना देऊन म्हटले, “घ्या व खा, हे माझे शरीर आहे.” नंतर त्याने प्याला घेतला व परमेश्वराचे आभार मानून त्यांना तो दिला व म्हटले, “तुम्ही सर्व ह्यातून प्या. हे माझे कराराचे रक्त आहे. हे पापांच्या क्षमेसाठी पुष्कळांकरता ओतले आहे. मी तुम्हांला सांगतो, मी माझ्या पित्याच्या राज्यात तुमच्याबरोबर नवा द्राक्षारस पिईन तोपर्यंत द्राक्षवेलीचा उपज पुन्हा कधीच पिणार नाही.” त्यानंतर एक गीत गाऊन ते ऑलिव्ह डोंगरावर निघून गेले. नंतर येशू त्यांना म्हणाला, “तुम्ही सर्व ह्या रात्री मला सोडून पळून जाल कारण असे लिहिले आहे, “मी मेंढपाळाला मारीन आणि कळपातल्या मेंढरांची दाणादाण होईल.’ परंतु माझ्या पुनरुत्थानानंतर मी तुमच्या आधी गालीलात जाईन.” पेत्राने त्याला उत्तर दिले, “जरी सगळे आपल्याला सोडून गेले, तरी मी आपल्याला कधीच सोडणार नाही.” येशूने त्याला म्हटले, “मी तुला निश्चितपणे सांगतो, ह्याच रात्री कोंबडा आरवण्यापूर्वी तू तीन वेळा मला नाकारशील.” पेत्र येशूला म्हणाला, “आपल्याबरोबर मला मरावे लागले तरीदेखील मी आपल्याला नाकारणार नाही!” इतर सर्व शिष्यांनीही तेच म्हटले. नंतर येशू शिष्यांबरोबर गेथशेमाने नावाच्या ठिकाणी गेला आणि त्यांना म्हणाला, “मी पुढे जाऊन प्रार्थना करीपर्यंत येथे बसा.” त्याने पेत्र व जब्दीचे दोघे मुलगे ह्यांना बरोबर घेतले. तो दुःखी व व्याकूळ होऊ लागला. “माझ्या जिवाला मरणप्राय वेदना होत आहेत. तुम्ही येथे थांबून माझ्याबरोबर जागे राहा”, असे बोलून काहीसे पुढे जाऊन त्याने जमिनीवर लोटांगण घातले व अशी प्रार्थना केली, “हे माझ्या पित्या, शक्य असेल तर हा प्याला माझ्यापासून दूर कर. तरीदेखील माझ्या इच्छेप्रमाणे नव्हे तर तुझ्या इच्छेप्रमाणे होवो.” मग तो शिष्यांकडे आला आणि ते झोपी गेले आहेत, असे पाहून पेत्राला म्हणाला, “काय, घटकाभरही तुम्हांला माझ्याबरोबर जागे राहवले नाही काय? तुम्ही मोहात पडू नये म्हणून जागे राहा व प्रार्थना करा. आत्मा उत्सुक आहे खरा, परंतु देह दुर्बल आहे.” त्याने दुसऱ्यांदा पुढे जाऊन प्रार्थना केली, “हे माझ्या पित्या, मी प्यायल्याशिवाय हा प्याला दूर केला जाणार नसेल, तर तुझ्या इच्छेप्रमाणे होवो.” त्याने पुन्हा येऊन पाहिले, तर ते झोपलेले होते. त्यांचे डोळे फार जड झाले होते. त्यांना सोडून त्याने पुन्हा जाऊन तिसऱ्यांदा तेच शब्द बोलून प्रार्थना केली. त्यानंतर तो त्याच्या शिष्यांकडे येऊन त्यांना म्हणाला, “झोपा आणि विसावा घ्या, पाहा! घटका आली आहे! मनुष्याचा पुत्र पापी माणसांच्या हाती धरून दिला जात आहे. उठा, आपण जाऊ या. पाहा, मला धरून देणारा जवळ येत आहे.”