मत्तय 25:35-40
मत्तय 25:35-40 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
कारण मी भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला खायला दिले, तान्हेला होतो तेव्हा मला प्यायला पाणी दिले, परका होतो तेव्हा मला घरात घेतले, उघडा होतो तेव्हा मला वस्त्र दिले, आजारी होतो तेव्हा माझ्या भेटीला आलात, बंदिशाळेत होतो तेव्हा तुम्ही माझ्याकडे आलात.’ त्या वेळेस नीतिमान त्याला उत्तर देतील की, ‘प्रभूजी, आम्ही तुम्हांला केव्हा भुकेले पाहून खायला दिले? केव्हा तान्हेले पाहून प्यायला दिले? तुम्हांला परके पाहून केव्हा घरात घेतले? उघडे पाहून केव्हा वस्त्र दिले? आणि तुम्हांला आजारी अथवा बंदिशाळेत पाहून केव्हा आम्ही तुमच्याकडे आलो?’ तेव्हा राजा त्यांना उत्तर देईल, ‘मी तुम्हांला खचीत सांगतो की, ज्या अर्थी तुम्ही ह्या माझ्या कनिष्ठ बंधूंपैकी एकाला केले, त्या अर्थी ते मला केले आहे.’
मत्तय 25:35-40 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
हे तुमचे राज्य आहे, कारण जेव्हा मी भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला खायला दिले. मी तहानेला होतो तेव्हा तुम्ही मला प्यावयास दिले. मी परका होतो आणि तुम्ही मला आत घेतले मी उघडा होतो तेव्हा तुम्ही मला कपडे दिले. मी आजारी होतो, तेव्हा तुम्ही माझी काळजी घेतली. मी तुरूंगात होतो तेव्हा तुम्ही माझ्याकडे आला. मग जे नीतिमान आहेत ते उत्तर देतील, प्रभू आम्ही तुला केव्हा भुकेला व तहानेला पाहिले आणि तुला खायला आणि प्यायला दिले? आम्ही तुला परका म्हणून कधी पाहिले आणि तुला आत घेतले किंवा आम्ही तुला केव्हा उघडे पाहिले व कपडे दिले? आणि तू आजारी असताना आम्ही तुला कधी भेटायला आलो? किंवा तुरूंगात असताना कधी तुझ्याकडे आलो? मग राजा त्यांना उत्तर देईल, मी तुम्हास खरे सांगतो येथे असलेल्या माझ्या बांधवातील अगदी लहानातील एकाला तुम्ही केले, तर ते तुम्ही मलाच केले.
मत्तय 25:35-40 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मी भुकेला होतो आणि तुम्ही मला काही खावयास दिले; मी तान्हेला होतो आणि तुम्ही मला प्यावयास दिले; मी परका होतो आणि तुम्ही मला आत घेतले; मला वस्त्रांची गरज होती, तेव्हा तुम्ही मला वस्त्रे दिली; मी आजारी होतो, तेव्हा तुम्ही माझी काळजी घेतली, तुरुंगात होतो तेव्हा तुम्ही माझी भेट घेतली.’ “त्यावेळी नीतिमान लोक त्याला म्हणतील, ‘प्रभुजी, तुम्ही भुकेले असताना तुम्हाला केव्हा पाहिले आणि अन्न दिले आणि तान्हेले असताना आम्ही तुम्हाला प्यावयाला दिले? तुम्ही परके असताना आम्ही तुम्हाला केव्हा पाहिले आणि घरात घेतले, किंवा तुम्ही वस्त्रहीन असताना तुम्हाला वस्त्रे दिली? तुम्ही आजारी असताना किंवा तुरुंगात असताना, आम्ही केव्हा तुमच्या भेटीला आलो?’ “मग राजा उत्तर देऊन म्हणेल, ‘मी तुम्हाला खचित सांगतो, जे काही ह्या लहानातील माझ्या एकाही भावा-बहिणीसाठी तुम्ही केले ते तुम्ही माझ्यासाठी केले.’
मत्तय 25:35-40 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
कारण मी भुकेला होतो, तेव्हा तुम्ही मला खायला दिले; तान्हेला होतो, तेव्हा मला प्यायला दिले; परका होतो, तेव्हा मला घरात घेतले; उघडा होतो, तेव्हा मला वस्त्र दिले; आजारी होतो, तेव्हा माझी काळजी घेतली; तुरुंगात होतो, तेव्हा तुम्ही मला भेटायला आलात.’ त्या वेळी नीतिमान त्याला विचारतील, “प्रभो, आम्ही कधी तुम्हांला खायला दिले? केव्हा तुम्हांला प्यायला दिले? केव्हा तुम्हांला परके पाहून घरात घेतले? आणि केव्हा तुम्हांला उघडे पाहून वस्त्र दिले? तुमच्या कोणत्या आजारपणात आम्ही काळजी घेतली? आणि कोणत्या तुरुंगात आम्ही तुम्हांला भेटायला आलो?’ राजा त्यांना उत्तर देईल, “मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, ज्याअर्थी तुम्ही ह्या माझ्या कनिष्ठ बंधूंपैकी एकासाठी केले, त्याअर्थी ते माझ्यासाठी केले.’