YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 23:1-28

मत्तय 23:1-28 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

येशू लोकांशी व त्याच्या शिष्यांशी बोलला, तो म्हणाला, “नियमशास्त्राचे शिक्षक व परूशी हे मोशेच्या आसनावर बसले आहेत. म्हणून ते जसे सांगतात तसे तुम्ही करा आणि पाळा. पण तुम्ही त्यांच्या कृतीप्रमाणे तसे करू नका. याचे कारण ते सांगतात पण त्याप्रमाणे करत नाहीत. वाहावयास अवघड असे ओझे ते बांधतात व लोकांच्या खांद्यांवर देतात पण स्वतः ते ओझे उचलायला एक बोटदेखील लावत नाहीत. ते त्यांचे सर्व कामे लोकांनी पाहावे म्हणून करतात कारण ते आपली स्मरणपत्रे रूंद करतात आणि आपल्या झग्यांचे काठ मोठे करतात. मेजवानीच्या ठिकाणी आपल्याला विशेष मानाची जागा मिळावी असे त्यांना वाटते. तसेच यहूद्यांच्या सभास्थानात मोक्याच्या जागी बसायला त्यांना फार आवडते. बाजारातील मुख्य रस्त्याने जाता येता लोकांनी आपल्याला मान द्यावा याची त्यांना फार आवड असते आणि लोकांनी त्यांना ‘रब्बी’ म्हणावे असे त्यांना वाटते. परंतु तुम्ही स्वतःला ‘रब्बी’ म्हणवून घेऊ नका. तुम्ही सर्व एकमेकांचे भाऊ आहात, तुमचा गुरू एकच आहे. आणि जगातील कोणालाही पिता म्हणू नका कारण तुमचा पिता एकच आहे व तो स्वर्गात आहे. तुम्ही स्वतःला मालक म्हणून घेऊ नका. तुमचा मालक ख्रिस्त आहे. तुमच्यातील जो सेवक बनून तुमची सेवा करतो तो तुमच्यात सर्वात मोठा होय. जो स्वतःला मोठा समजेल त्यास कमी लेखले जाईल. स्वतःला लहान समजणारा प्रत्येकजण मोठा गणला जाईल. अहो, परूश्यांनो आणि नियमशास्त्राच्या शिक्षकांनो, तुम्हास हाय, तुम्ही ढोंगी आहात! तुम्ही स्वर्गाच्या राज्याचा रस्ता लोकांसाठी बंद करता, तुम्ही स्वतः तर आत जात नाहीच, पण जे आत जाण्याचा प्रयत्न करतात त्यांनाही आत जाऊ देत नाहीत. अहो परूश्यांनो व नियमशास्त्राच्या शिक्षकांनो, ढोंग्यांनो तुमची केवढी दुर्दशा होणार कारण तुम्ही विधवांची घरे खाऊन टाकता व ढोंगाने लांब लांब प्रार्थना करता; यामुळे तुम्हास अधिक शिक्षा होइल. परूश्यांनो व नियमशास्त्राच्या शिक्षकांनो, तुम्ही दुःखी व्हाल. तुम्ही ढोंगी आहात कारण तुम्ही एक मतानुसारी करण्यासाठी समुद्र व भूमी पालथी घालता आणि तुम्हास तो मिळाला म्हणजे तुम्ही त्यास आपल्याहून दुप्पट नरकपुत्रासारखे करून टाकता. तुम्हास दुःख होईल. आंधळ्या वाटाड्यांनो, जे तुम्ही म्हणता, जर कोणी परमेश्वराच्या भवनाची शपथ घेतो तर काही नाही; पण जर एखादा त्या भवनातील सोन्याची शपथ घेऊन बोलतो, तर तो बांधलेला आहे. तुम्ही मूर्ख आंधळे आहात. सोने आणि परमेश्वराचे भवन यांपैकी कोणते अधिक महत्त्वाचे आहे? ते सोने किंवा भवन, जे त्या सोन्याला पवित्र बनवते. आणि तुम्ही असे म्हणता. जर एखादा वेदीची शपथ घेतो तर त्यामध्ये काही वावगे नाही. पण जर एखादा वेदीवरील अर्पणाची शपथ घेतो तर तो बांधलेला आहे. तुम्ही आंधळे आहात कारण मोठे काय आहे? ते अर्पण की अर्पणाला पवित्र करणारी वेदी? म्हणून जो वेदीची शपथ घेतो तो त्या वेदीबरोबर त्यावरच्या सर्वांची शपथ घेतो. तसेच जो परमेश्वराच्या भवनाची शपथ घेतो तो भवन व त्यामध्ये राहणाऱ्या देवाची देखील शपथ घेतो. जो स्वर्गाची शपथ घेतो तो देवाच्या आसनाची व त्यावर बसणाऱ्याचीही शपथ घेतो. परूश्यांनो, नियमशास्त्राच्या शिक्षकांनो, तुम्ही दुःखी व्हाल. तुम्ही ढोंगी आहात! तुमचे जे काही आहे त्याचा दशांश तुम्ही देवाला देता; पुदिना, शेप, जिरे यांचा देखील दशांश देता. पण नियमशास्त्राच्या महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे: न्याय, दया व विश्वास या गोष्टी तुम्ही सोडल्या आहेत; पण तुम्ही या करायच्या होत्या आणि त्या सोडावयाच्या नव्हत्या. तुम्ही आंधळे वाटाडे आहात. तुम्ही डास गाळून काढता व उंट गिळून टाकता. अहो परूश्यांनो, नियमशास्त्राच्या शिक्षकांनो, तुम्ही दुःखी व्हाल, तुम्ही ढोंगी आहात! तुम्ही आपल्या ताट व वाट्या बाहेरून साफ करता पण ते आतून अपहार आणि असंयम यांनी त्या आतून भरल्या आहेत. अहो परूश्यांनो, तुम्ही आंधळे आहात! अगोदर तुमची वाटी आतून घासा व धुवा म्हणजे ती बाहेरून देखील खरोखर साफ होईल. अहो परूश्यांनो नियमशास्त्राच्या शिक्षकांनो, तुम्ही दुःखी व्हाल. तुम्ही ढोंगी आहात! रंगसफेदी केलेल्या कबरांसारखे तुम्ही आहात. त्या वरून चांगल्या दिसतात पण आतून मरण पावलेल्या मनुष्यांच्या हाडांनी भरल्या आहेत. तुम्ही सर्व लोकांस बाहेरून नीतिमान दिसता पण तुम्ही आतून ढोंग व दुष्टपणा यांनी भरलेले आहात.

सामायिक करा
मत्तय 23 वाचा

मत्तय 23:1-28 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

मग येशू लोकसमुदायाला आणि आपल्या शिष्यांना म्हणाले: “नियमशास्त्राचे शिक्षक आणि परूशी मोशेच्या सिंहासनावर बसतात. त्यांच्या सांगण्याप्रमाणे करा, पण ते जे करतात ते आचरण करू नका, कारण ते सांगतात त्याप्रमाणे ते करीत नाहीत. ते जड, अवघड ओझी बांधतात व इतर लोकांच्या खांद्यावर लादतात, परंतु ती हालविण्यास स्वतःचे बोटही लावण्याची त्यांची इच्छा नसते. “जे काही ते करतात ते सर्व लोकांना दाखविण्यासाठी असते: ते वचने लिहिलेल्या चामड्याच्या पट्ट्या लोकांना दिसाव्या म्हणून रुंद करतात, आणि आपल्या झग्यांचे गोंडे लांब करतात. मेजवान्यात मानाची स्थाने आणि सभागृहांमध्ये प्रमुख जागेवर बसणे, हे त्यांना प्रिय आहे. बाजारात लोकांकडून आदरपूर्वक अभिवादन घेणे आणि ‘रब्बी’ संबोधने त्यांना कितीतरी प्रिय आहेत. “परंतु तुम्ही स्वतः ‘रब्बी,’ म्हणून घेऊ नका, कारण तुमचा गुरू एकच आहे आणि तुम्ही सर्व एकमेकांचे भाऊ आहात. आणि या पृथ्वीवर कोणालाही ‘पिता’ म्हणून संबोधू नका, कारण तुम्हाला एकच पिता आहे व ते स्वर्गात आहे. ‘शिक्षण देणारा’ असे स्वतःला म्हणवून घेऊ नका, कारण एकटे ख्रिस्त हेच एक तुमचे ‘मार्गदर्शक’ आहे. जो तुम्हामध्ये सर्वात मोठा होऊ पाहतो त्याने तुमचा सेवक व्हावे. कारण जे स्वतःला उच्च करतात, त्यांना नम्र केले जाईल आणि जे स्वतःला नम्र करतात, ते उंच केले जातील. “अहो परूश्यांनो, आणि नियमशास्त्र शिक्षकांनो, ढोंग्यांनो तुम्हाला धिक्कार असो. कारण तुम्ही लोकांच्या तोंडावर स्वर्गाचे द्वार बंद करिता, आणि स्वतःही प्रवेश करीत नाही, ना जे प्रवेश करू इच्छितात त्यांनाही आत जाऊ देत नाहीत. ते देखाव्यासाठी लांब लांब प्रार्थना करतात आणि विधवांची घरे लुबाडतात. अशा लोकांना कडक शिक्षा होईल. “अहो नियमशास्त्र शिक्षकांनो आणि परूश्यांनो, अहो ढोंग्यांनो, तुम्हाला धिक्कार असो. एका माणसाचे परिवर्तन करण्याकरिता तुम्ही भूमार्गाने आणि जलमार्गाने प्रवास करता आणि जेव्हा त्याचे परिवर्तन होते, तेव्हा तुम्ही त्याला आपल्यापेक्षा दुप्पट प्रमाणात नरकपुत्र करून ठेवता. “आंधळ्या मार्गदर्शकांनो, तुमचा धिक्कार असो! ‘परमेश्वराच्या मंदिराची शपथ घेऊन तुम्ही म्हणता, मंदिराची शपथ मोडली तरी चालेल पण मंदिरातील सोन्याची घेतलेली शपथ कधीही मोडता कामा नये.’ अहो आंधळ्या मूर्खांनो! ते सोने श्रेष्ठ आहे की त्या सोन्याला पवित्र करणारे ते मंदिर श्रेष्ठ आहे? तुम्ही असेही म्हणता, ‘मंदिरातील वेदीची शपथ घेतली आणि ती मोडली तरी चालेल,’ पण वेदीवरील दानाची शपथ घेतली तर तो त्यास बंधनकारक आहे. अहो आंधळ्यांनो, ती देणगी श्रेष्ठ आहे की त्या देणगीला पवित्र करणारी वेदी श्रेष्ठ आहे? लक्षात ठेवा, ज्यावेळी तुम्ही वेदीची शपथ वाहता त्यावेळी वेदीबरोबर वेदीवरील सर्व वस्तुंचीही शपथ वाहता, आणि ज्यावेळी तुम्ही मंदिराची शपथ वाहता त्यावेळी मंदिराबरोबरच मंदिरात राहणार्‍या परमेश्वराचीही शपथ वाहता. ज्यावेळी तुम्ही स्वर्गाची शपथ वाहता त्यावेळी तुम्ही परमेश्वराच्या सिंहासनाची आणि खुद्द परमेश्वराची शपथ वाहता. “तुम्हा परूश्यांचा व नियमशास्त्र शिक्षकांचा धिक्कार असो, अहो ढोंग्यांनो! तुम्ही पुदिना, बडीशेप आणि जिरे या मसाल्यांचा दशांश देता, परंतु न्याय, दया आणि विश्वासूपणा या अत्यंत महत्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करता. या गोष्टी तर तुम्ही कराव्‍यात, पण त्याचबरोबरच ज्या अधिक महत्वाच्या गोष्टी आहेत त्या दुर्लक्षित करू नये. तुम्ही आंधळे मार्गदर्शक! तुम्ही एक चिलट गाळून काढता पण उंट गिळून टाकता. “तुम्हा परूश्यांचा आणि नियमशास्त्र शिक्षकांचा धिक्कार असो, अहो ढोंग्यांनो! तुम्ही आपली ताटवाटी बाहेरून घासून पुसून स्वच्छ करता पण अंतर्भाग लोभ आणि असंयम यांनी भरलेला आहे. आंधळ्या परूश्यांनो! पहिल्यांदा ताटवाटी आतून स्वच्छ करा म्हणजे ती बाहेरून देखील स्वच्छ होतील. “अहो परूश्यांनो आणि नियमशास्त्र शिक्षकांनो, अहो ढोंग्यांनो, तुमचा धिक्कार असो; कारण तुम्ही चुना लावलेल्या कबरांप्रमाणे आहात. त्या बाहेरून सुंदर दिसतात, पण आत मृतांच्या हाडांनी व सर्वप्रकारच्या अशुद्धतेने व दुष्कृत्याने भरलेल्या असतात. त्याचप्रमाणे तुम्ही बाहेरून लोकांना नीतिमान दिसता, पण आतून तुम्ही कबरांसारखे आहात, तुम्ही ढोंगाने आणि दुष्कृत्याने भरलेले आहात.

सामायिक करा
मत्तय 23 वाचा

मत्तय 23:1-28 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

तेव्हा येशू लोकसमुदायांना व आपल्या शिष्यांना म्हणाला, “शास्त्री व परूशी हे मोशेच्या आसनावर बसले आहेत; म्हणून ते जे काही तुम्हांला सांगतील ते सर्व आचरत व पाळत जा; परंतु त्यांच्या कृतीप्रमाणे आचरण करू नका; कारण ते सांगतात पण तसे आचरण करत नाहीत. जड व वाहण्यास अवघड अशी ओझी बांधून ते लोकांच्या खांद्यांवर देतात, परंतु ती काढण्यास ते स्वत: बोटही लावायचे नाहीत. आपली सर्व कामे लोकांनी पाहावीत म्हणून ते ती करतात; ते आपली मंत्रपत्रे रुंद व आपले गोंडे मोठे करतात; जेवणावळीतील श्रेष्ठ स्थाने, सभास्थानातील श्रेष्ठ आसने, बाजारात नमस्कार घेणे व लोकांकडून गुरूजी म्हणवून घेणे त्यांना आवडते. तुम्ही तर आपणांस गुरूजी म्हणवून घेऊ नका; कारण तुमचा एकच गुरू [ख्रिस्त] आहे व तुम्ही सर्व भाऊभाऊ आहात. पृथ्वीवरील कोणाला आपला पिता म्हणू नका, कारण तुमचा पिता एक आहे, तो स्वर्गीय आहे. तसेच आपणांस स्वामी म्हणवून घेऊ नका, कारण तुमचा स्वामी एक आहे, तो ख्रिस्त होय. पण तुमच्यामध्ये जो मोठा असेल त्याने तुमचा सेवक व्हावे. जो कोणी स्वत:ला उंच करील तो नमवला जाईल आणि जो कोणी स्वत:ला नमवील तो उंच केला जाईल. अहो शास्त्र्यांनो, अहो परूश्यांनो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्ही लोकांना स्वर्गाचे राज्य बंद करता; तुम्ही स्वतःही आत जात नाही व आत जाणार्‍यांनाही आत जाऊ देत नाही. [अहो शास्त्र्यांनो व परूश्यांनो, ढोंग्यानो! तुमची केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्ही विधवांची घरे खाऊन टाकता व ढोंगाने लांबलांब प्रार्थना करता; ह्यामुळे तुम्हांला अधिक शिक्षा होईल.] अहो शास्त्र्यांनो, अहो परूश्यांनो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्ही एक मतानुयायी मिळवण्यासाठी समुद्र व भूमी पालथी घालता आणि तो मिळाला म्हणजे तुम्ही त्याला आपणांहून दुप्पट असा नरकपुत्र करता. अहो आंधळ्या वाटाड्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार! तुम्ही म्हणता, ‘कोणी मंदिराची शपथ घेतली तर त्यात काही नाही, परंतु कोणी मंदिराच्या सोन्याची शपथ घेतली तर मात्र तो बांधला जातो.’ अहो मूर्खांनो आणि आंधळ्यांनो, ह्यांतून मोठे कोणते? ते सोने किंवा ज्याच्या योगाने ते सोने पवित्र झाले ते मंदिर? तुम्ही म्हणता, ‘कोणी वेदीची शपथ घेतली तर त्यात काही नाही, परंतु कोणी तिच्यावरील अर्पणाची शपथ घेतली तर तो बांधला जातो.’ अहो मूर्खांनो व आंधळ्यांनो, ह्यांतून मोठे कोणते? अर्पण किंवा अर्पण पवित्र करणारी ती वेदी? म्हणून जो कोणी वेदीची शपथ घेतो तो तिची व तिच्यावर जे काही आहे त्याची शपथ घेतो; आणि जो मंदिराची शपथ घेतो, तो त्याची व त्यात राहणार्‍याची शपथ घेतो; आणि जो स्वर्गाची शपथ घेतो तो देवाच्या राजासनाची व त्याच्यावर बसणार्‍याची शपथ घेतो. अहो शास्त्र्यांनो, अहो परूश्यांनो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार! कारण पुदिना, बडीशेप व जिरे ह्यांचा दशांश तुम्ही देता, आणि नियमशास्त्रातील मुख्य गोष्टी म्हणजे न्याय, दया व विश्वास ह्या तुम्ही सोडल्या आहेत; ह्या करायच्या होत्या, तरी त्या सोडायला पाहिजेत असे नाही. अहो आंधळ्या वाटाड्यांनो, तुम्ही मुरकूट गाळून काढता व उंट गिळून टाकता! अहो शास्त्र्यांनो, अहो परूश्यांनो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार! तुम्ही ताटवाटी बाहेरून साफ करता, पण ती आतून जुलूम व असंयम ह्यांनी भरलेली आहेत. अरे आंधळ्या परूशा, आधी वाटी आतून साफ कर म्हणजे ती बाहेरूनही साफ होईल. अहो शास्त्र्यांनो, अहो परूश्यांनो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्ही चुना लावलेल्या कबरांसारखे आहात; त्या बाहेरून खरोखर सुंदर दिसतात, परंतु आत मेलेल्यांच्या हाडांनी व सर्व प्रकारच्या घाणीने भरलेल्या आहेत. तसे तुम्हीही बाहेरून लोकांना नीतिमान दिसता, परंतु आत ढोंगाने व अनीतीने भरलेले आहात.

सामायिक करा
मत्तय 23 वाचा

मत्तय 23:1-28 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

नंतर येशू लोकसमुदायाला व त्याच्या शिष्यांना म्हणाला, “शास्त्री व परुशी मोशेच्या आसनावर बसले आहेत. म्हणून ते जे काही तुम्हांला सांगतात, ते सर्व पाळा व करा, परंतु ते वागतात तसे तुम्ही वागू नका, कारण ते सांगतात तसे ते स्वतः करत नाहीत. जड ओझी बांधून ते लोकांच्या खांद्यावर लादतात परंतु ती वाहायला ते स्वतः बोटही लावत नाहीत. ते त्यांची सर्व कामे लोकांना दिसावीत म्हणून करतात. ते त्यांचे मंत्रपट्टे व त्यांच्या वस्त्रांच्या किनारी रुंद करतात. मेजवानीत मानाच्या जागा व सभास्थानांत राखीव आसने मिळवणे, बाजारात नमस्कार घेणे व लोकांकडून ‘गुरुजी, गुरुजी’, म्हणवून घेणे त्यांना आवडते. तुम्ही मात्र स्वतःला ‘गुरुजी’ म्हणवून घेऊ नका, कारण तुमचा गुरू एक आहे व तुम्ही सर्व बंधू आहात. पृथ्वीवरील कोणाला आपला पिता म्हणू नका, कारण तुमचा पिता एक आहे, तो स्वर्गात आहे. तसेच स्वतःला नेता म्हणवून घेऊ नका, कारण तुमचा नेता एक आहे, तो ख्रिस्त होय. उलट, तुमच्यामध्ये जो सर्वांत थोर असेल, त्याने तुमचा सेवक व्हावे. जो कोणी स्वतःला उच्च करील त्याला नीच केले जाईल आणि जो कोणी स्वतःला नीच करील त्याला उच्च केले जाईल. अहो शास्त्र्यांनो आणि परुश्यांनो, अहो ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार! तुम्ही लोकांना स्वर्गाचे राज्य बंद करता. तुम्ही स्वतः आत जात नाही व जे आत जात आहेत त्यांनाही तुम्ही जाऊ देत नाही. [अहो शास्त्र्यांनो आणि परुश्यांनो, अहो ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार! तुम्ही विधवांची घरे खाऊन टाकता व ढोंगाने लांबलचक प्रार्थना करता. ह्यामुळे तुम्हांला अधिक शिक्षा होईल.] अहो शास्त्र्यांनो आणि परुश्यांनो, अहो ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार! तुम्ही एक शिष्य मिळवण्यासाठी समुद्र व भूमी पालथी घालता आणि तो मिळाला म्हणजे तुम्ही त्याला तुमच्या दुप्पट असा नरकपुत्र बनवता. अहो आंधळ्या वाटाड्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार! तुम्ही म्हणता की, कोणी मंदिराची शपथ घेतली, तर त्यात काही वावगे नाही. परंतु कोणी मंदिराच्या सोन्याची शपथ घेतली, तर मात्र ती त्याला बंधनकारक ठरते. अहो मूर्खानो आणि आंधळ्यांनो, ह्यांतून अधिक महत्त्वपूर्ण कोणते? ते सोने की ज्याच्यामुळे ते पवित्र झाले ते मंदिर? तुम्ही म्हणता की, कोणी वेदीची शपथ घेतली, तर त्यात काही अयोग्य नाही. परंतु कोणी तिच्यावरील अर्पणाची शपथ घेतली तर ती त्याला बंधनकारक ठरते. अहो आंधळ्यांनो, ह्यांतून अधिक महत्त्वपूर्ण कोणते? अर्पण की अर्पण पवित्र करणारी ती वेदी? म्हणून जो कोणी वेदीची शपथ घेतो, तो तिची व तिच्यावर जे काही आहे, त्याची शपथ घेतो. जो मंदिराची शपथ घेतो, तो त्याची व त्यात राहणाऱ्याची शपथ घेतो. जो स्वर्गाची शपथ घेतो, तो परमेश्‍वराच्या राजासनाची व त्याच्यावर बसणाऱ्याची शपथ घेतो. अहो शास्त्र्यांनो आणि परुश्यांनो, अहो ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार! पुदिना, बडीशेप व जिरे ह्यांचा दशांश तुम्ही देता आणि नियमशास्त्रातील मुख्य गोष्टी म्हणजे न्याय, दया व श्रद्धा ह्यांकडे दुर्लक्ष करता. इतर गोष्टींकडे दुर्लक्ष न करता ह्यादेखील तुम्ही करायच्या होत्या. अहो आंधळ्या वाटाड्यांनो, तुम्ही माशी गाळून काढता व उंट गिळून टाकता! अहो शास्त्र्यांनो आणि परुश्यांनो, अहो ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार! तुम्ही ताटवाटी बाहेरून साफ करता, पण आतून ती अत्याचार व असंयम ह्यांनी भरलेली आहे. अरे आंधळ्या परुश्या, प्रथम वाटी आतून साफ कर म्हणजे ती बाहेरूनही साफ होईल. अहो शास्त्र्यांनो आणि परुश्यांनो, अहो ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार! तुम्ही चुना लावलेल्या कबरींसारखे आहात, त्या बाहेरून खरोखर सुंदर दिसतात, परंतु आतून त्या मेलेल्यांच्या हाडांनी व घाणीने भरलेल्या असतात. तसे तुम्हीही बाहेरून लोकांना नीतिमान दिसता, परंतु आतून तुम्ही ढोंगाने व दुष्टपणाने भरलेले आहात.

सामायिक करा
मत्तय 23 वाचा