मत्तय 21:8-22
मत्तय 21:8-22 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
पुष्कळ लोकांनी आपले अंगरखे वाटेवर अंथरले. दुसऱ्यांनी झाडांच्या फांद्या तोडल्या आणि त्या रस्त्यावर पसरल्या. येशूच्या पुढे चालणारा लोकसुदाय आणि मागे चालणारे. मोठ्याने जयघोष करू लागले, “दाविदाच्या पुत्राला होसान्ना. प्रभूच्या नावाने येणारा धन्यवादित आहे. परम उंचामध्ये होसान्ना!” जेव्हा येशूने यरूशलेम शहरामध्ये प्रवेश केला तेव्हा संपूर्ण शहर गजबजून निघाले व लोक विचारत होते, “हा कोण आहे?” जमावाने उत्तर दिले, “हा गालील प्रांतातील नासरेथ नगरातून आलेला, येशू संदेष्टा आहे.” मग येशूने देवाच्या भवनात प्रवेश केला. तेथे जे लोक विक्री व खरेदी करीत होते त्या सर्वांना बाहेर घालवून दिले. पैश्याचा व्यवहार करणाऱ्यांची मेजे आणि कबुतरे विकणाऱ्यांच्या बैठकी उलथून टाकल्या. तो त्यांना म्हणाला, “असे लिहिले आहे, ‘माझ्या घरास प्रार्थनेचे घर म्हणतील,’ पण तुम्ही त्यास लुटारुंची गुहा केली आहे.” मग आंधळे आणि पांगळे लोक त्याच्याकडे परमेश्वराच्या भवनात आले आणि त्यांना त्याने बरे केले. परंतु जेव्हा मुख्य याजकांना व नियमशास्त्राचे शिक्षक यांनी येशूने केलेल्या आश्चर्यकारक गोष्टी आणि परमेश्वराच्या भवनाच्या आवारात लहान मुलांना, “दाविदाच्या पुत्राला होसान्ना.” अशी घोषणा देताना पाहिले, तेव्हा त्यांना संताप आला. त्यांनी त्यास विचारले, “ही मुले काय म्हणत आहे हे तुम्ही ऐकता ना?” येशूने त्यांना उत्तर दिले, “होय. परंतु तू बालके व तान्हुली यांच्या मुखातून स्तुती पूर्ण करवली आहे. हे तुमच्या वाचण्यात कधी आले नाही काय?” नंतर येशू त्यास सोडून शहराबाहेर बेथानीस गेला. तो रात्रभर तेथे राहिला. दुसऱ्या दिवशी सकाळी तो शहराकडे पुन्हा येत असता त्यास भूक लागली. रस्त्याच्या कडेला त्यास अंजिराचे एक झाड दिसले. ते पाहून तो जवळ गेला. पण पानाशिवाय त्यास एकही अंजीर दिसले नाही. येशू त्या झाडाला म्हणाला, “यापुढे तुला, कधीही फळ न येवो!” आणि ते झाड लगेच वाळून गेले. शिष्यांनी हे पाहिले, तेव्हा त्यांना फार आश्चर्य वाटले. त्यांनी विचारले, “हे अंजिराचे झाड इतक्या लवकर वाळून कसे गेले?” येशू त्यांना म्हणाला, “मी तुम्हास खरे सांगतो, जर तुम्हास विश्वास असेल आणि तुम्ही संशय धरला नाही तर मी जे अंजिराच्या झाडाबाबतीत केले तेच नव्हे, तर या डोंगराला उपटून समुद्रात पड असे म्हणालात तरी ते घडेल. जर तुमचा विश्वास असेल तर जे काही तुम्ही प्रार्थनेत विश्वासाने मागाल ते तुम्हास मिळेल.”
मत्तय 21:8-22 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
गर्दीमधील काही लोकांनी आपले अंगरखे काढून रस्त्यावर त्यांच्यापुढे पसरले; तर इतर काहींनी झाडांच्या डाहळ्या तोडून त्यांच्यापुढे पसरल्या. मग जमावातील जे लोक त्यांच्यापुढे गेले, ते आणि जे लोक त्यांच्यामागून चालले. ते मोठ्याने ओरडून म्हणाले, “दावीदाच्या पुत्राला होसान्ना!” “प्रभुच्या नावाने येणारा धन्यवादित असो.” “सर्वोच्च स्वर्गात होसान्ना!” येशूंनी यरुशलेममध्ये प्रवेश केला, तेव्हा सर्व शहर जागे झाले आणि त्यांनी विचारले, “हा कोण आहे?” “हे येशू आहेत!” गर्दीतील लोकांनी उत्तर दिले, “गालीलाच्या नासरेथहून आलेले संदेष्टा आहेत.” येशू मंदिराच्या परिसरात गेले आणि तेथे खरेदीविक्री करणार्या सर्वांना त्यांनी बाहेर घालवून दिले. पैशाची अदलाबदल करणार्यांचे तक्ते आणि कबुतरे विकणार्यांची आसने त्यांनी उधळून लावली. ते त्यांना म्हणाले, “असे लिहिले आहे, माझ्या घराला प्रार्थनेचे घर म्हणतील पण तुम्ही याला लुटारूंची गुहा केली आहे.” मग मंदिरात त्यांच्याकडे आंधळे व अपंग लोक आले आणि त्यांनी त्यांना बरे केले. तरी जेव्हा मुख्य याजक आणि नियमशास्त्र शिक्षक यांनी ही अद्भुत कामे पाहिली आणि लहान मुलांना मंदिराच्या परिसरात, “दावीदाच्या पुत्राला होसान्ना!” असे ओरडतांना ऐकले, तेव्हा ते संतापले. त्यांनी येशूंना विचारले, “ही मुले काय म्हणत आहेत, हे तुम्ही ऐकत आहात ना?” “हो,” येशूंनी उत्तर दिले, “ ‘लहान लेकरे व बालके यांच्या करवी हे प्रभू तू आपली स्तुती प्रकट केली आहे,’ हे तुम्ही कधी वाचले नाही काय?” मग ते बेथानीस परत आले आणि रात्रीचा मुक्काम त्यांनी तेथेच केला. अगदी पहाटेच, ते पुन्हा शहराकडे निघाले. रस्त्यात असताना येशूंना भूक लागली. जवळच त्यांना अंजिराचे झाड दिसले. त्यावर काही अंजीर आहेत काय हे पाहण्यास ते झाडाजवळ गेले. त्या झाडावर त्यांना पानांशिवाय काही आढळले नाही. मग ते त्या झाडाला म्हणाले, “यापुढे तुला फळाची प्राप्ती होऊ नये.” आणि तत्काळ ते झाड वाळून गेले. हे पाहून शिष्य आश्चर्यचकित झाले. त्यांनी येशूंना विचारले, “ते अंजिराचे झाड इतक्या लवकर कसे वाळून गेले?” मग येशूंनी त्यांना म्हटले, “मी तुम्हाला सत्य सांगतो की, तुम्ही संशय न धरता विश्वास ठेवाल, तर जे काही अंजिराच्या झाडाबाबत झाले ते तुम्ही सुद्धा कराल, या डोंगराला ‘ऊठ आणि समुद्रात पड,’ असे तुम्ही म्हणालात, तर ही गोष्ट केली जाईल. तुम्ही विश्वास धरून आणि प्रार्थना करून जे काही मागाल, ते तुम्हाला मिळेल.”
मत्तय 21:8-22 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तेव्हा लोकसमुदायातील बहुतेकांनी आपली वस्त्रे वाटेवर पसरली; काही झाडांच्या डाहळ्या तोडत होते व त्या वाटेवर पसरत होते. आणि पुढे चालणारे व मागे चालणारे लोक गजर करत राहिले की, ‘दाविदाच्या पुत्राला होसान्ना!’ ‘परमेश्वराच्या नावाने येणारा तो धन्यवादित!’ ‘ऊर्ध्वलोकी होसान्ना!’ तो यरुशलेमेत आल्यावर सर्व नगर गजबजले व म्हणाले, “हा कोण?” लोकसमुदाय म्हणाले, “गालीलातील नासरेथाहून आलेला हा येशू संदेष्टा आहे.” नंतर येशू देवाच्या मंदिरात गेला आणि मंदिरात जे क्रयविक्रय करत होते त्या सर्वांना त्याने बाहेर घालवून दिले, सराफांचे चौरंग व कबुतरे विकणार्यांच्या बैठका पालथ्या केल्या. तो त्यांना म्हणाला, “‘माझ्या घरास प्रार्थनामंदिर म्हणतील’ असे लिहिले आहे; परंतु तुम्ही ते ‘लुटारूंची गुहा’ करत आहात.” मग आंधळे व लंगडे त्याच्याकडे मंदिरात आले आणि त्यांना त्याने बरे केले. तेव्हा त्याने केलेले चमत्कार पाहून व दाविदाच्या पुत्राला ‘होसान्ना’ असे मंदिरात गजर करणारी मुले पाहून मुख्य याजक व शास्त्री रागावले; व त्याला म्हणाले, “ही काय म्हणतात हे तू ऐकतोस काय?” येशूने त्यांना म्हटले, “होय; ‘बालके व तान्ही मुले ह्यांच्या मुखांतून तू स्तुती पूर्ण करवली आहे’, हे तुमच्या वाचण्यात कधी आले नाही काय?” नंतर तो त्यांना सोडून नगराबाहेर बेथानीस गेला व तेथे वस्तीस राहिला. मग सकाळी तो परत नगरास येत असता त्याला भूक लागली. आणि वाटेवर अंजिराचे एक झाड होते ते पाहून तो त्याच्याजवळ गेला; पण पानांशिवाय त्याला त्यावर काही मिळाले नाही. मग त्याने त्याला म्हटले, “ह्यापुढे तुला कधीही फळ न येवो.” आणि ते अंजिराचे झाड ताबडतोब वाळून गेले. हे पाहून शिष्यांनी आश्चर्य करून म्हटले, “अंजिराचे झाड लगेच कसे वाळून गेले?” येशूने त्यांना उत्तर दिले, “मी तुम्हांला खचीत सांगतो, तुमच्या ठायी विश्वास असला व तुम्ही संशय धरला नाही, तर अंजिराच्या झाडाला केल्याप्रमाणे तुम्ही कराल, इतकेच नाही, तर ह्या डोंगरालाही ‘तू उपटून समुद्रात टाकला जा’ असे म्हणाल तर तसे होईल. आणि तुम्ही विश्वास धरून प्रार्थनेत जे काही मागाल ते सर्व तुम्हांला मिळेल.”
मत्तय 21:8-22 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
लोकसमुदायातील बहुतेकांनी आपली वस्त्रे रस्त्यावर पसरली. इतर लोकांनी डाहळ्या तोडून आणून त्या रस्त्यावर पसरल्या. पुढे चालणारे व मागून येणारे लोक जयघोष करू लागले, “होसान्ना! दावीदपुत्राचा गौरव असो! प्रभूच्या नावाने येत आहे तो धन्य! ऊर्ध्वलोकी होसान्ना!” तो यरुशलेममध्ये आल्यावर सर्व नगर गजबजले. लोक म्हणाले, “हा कोण आहे?” लोकसमुदाय म्हणाला, “हा येशू आहे - गालीलमधील नासरेथहून आलेला संदेष्टा.” येशू मंदिरात गेला व मंदिरात खरेदीविक्री करणाऱ्यांना त्याने बाहेर घालवून दिले आणि सराफाचे चौरंग व कबुतरे विकणाऱ्यांची आसने उलथून टाकली आणि त्यांना म्हटले, “‘माझ्या मंदिराला प्रार्थनागृह म्हणतील’, असे लिहिले आहे, पण तुम्ही तर ही लुटारूंची गुहा करून टाकली आहे.” तेथे आंधळे व लंगडे त्याच्याकडे मंदिरात आले आणि त्यांना त्याने बरे केले. त्याने केलेले चमत्कार पाहून व “दावीदपुत्राचा गौरव असो!”, असा जयघोष करणारी मुले मंदिरात पाहून मुख्य याजक व शास्त्री संतापले आणि त्याला म्हणाले, “ही मुले काय बोलतात, हे तू ऐकतोस काय?” येशूने त्यांना म्हटले, “हो, “बालके व तान्ही मुले ह्यांच्या मुखांतून तू स्तुती पूर्ण करविली आहेस’, हे तुम्ही कधी वाचले नाही काय?” नंतर तो त्यांना सोडून शहराबाहेर बेथानीस गेला व तेथे तो रात्रभर राहिला. सकाळी येशू परत शहराकडे येत असता त्याला भूक लागली, म्हणून तो वाटेवर असलेल्या अंजिराच्या झाडाजवळ गेला. पण पानांशिवाय त्याला त्यावर काही दिसले नाही. त्याने त्या झाडाला म्हटले, “ह्यापुढे तुला कधी फळ न येवो.” ते अंजिराचे झाड ताबडतोब वाळून गेले! ते पाहून शिष्यांनी आश्चर्य व्यक्त करून म्हटले, “अंजिराचे झाड इतक्या लवकर कसे वाळून गेले?” येशूने त्यांना उत्तर दिले, “मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, तुमच्या ठायी विश्वास असला व तुम्ही संशय धरला नाही, तर ह्या झाडाला मी जे केले, ते तुम्हीही करू शकाल, इतकेच नव्हे तर ह्या डोंगरालाही ‘तू उपटून समुद्रात टाकला जा’, असे म्हणाल तर तसे होईल. तुम्ही विश्वास धरून प्रार्थनेत जे काही मागाल, ते सर्व तुम्हांला मिळेल.”