मत्तय 21:18-46
मत्तय 21:18-46 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
दुसऱ्या दिवशी सकाळी तो शहराकडे पुन्हा येत असता त्यास भूक लागली. रस्त्याच्या कडेला त्यास अंजिराचे एक झाड दिसले. ते पाहून तो जवळ गेला. पण पानाशिवाय त्यास एकही अंजीर दिसले नाही. येशू त्या झाडाला म्हणाला, “यापुढे तुला, कधीही फळ न येवो!” आणि ते झाड लगेच वाळून गेले. शिष्यांनी हे पाहिले, तेव्हा त्यांना फार आश्चर्य वाटले. त्यांनी विचारले, “हे अंजिराचे झाड इतक्या लवकर वाळून कसे गेले?” येशू त्यांना म्हणाला, “मी तुम्हास खरे सांगतो, जर तुम्हास विश्वास असेल आणि तुम्ही संशय धरला नाही तर मी जे अंजिराच्या झाडाबाबतीत केले तेच नव्हे, तर या डोंगराला उपटून समुद्रात पड असे म्हणालात तरी ते घडेल. जर तुमचा विश्वास असेल तर जे काही तुम्ही प्रार्थनेत विश्वासाने मागाल ते तुम्हास मिळेल.” येशू परमेश्वराच्या भवनात गेला, येशू तेथे शिक्षण देत असताना मुख्य याजक लोक व वडीलजन येशूकडे आले. ते येशूला म्हणाले, “तुम्ही कोणत्या अधिकाराने या गोष्टी करता? हा अधिकार तुम्हास कोणी दिला?” येशू म्हणाला, “मीसुद्धा तुम्हास एक प्रश्न विचारतो. जर तुम्ही मला उत्तर दिले तर मी कोणत्या अधिकाराने या गोष्टी करतो, हे मी तुम्हास सांगेन. ‘योहानाचा बाप्तिस्मा कोठून होता? स्वर्गाकडून की मनुष्यांकडून?’” येशूच्या या प्रश्नावर ते चर्चा करू लागले. ते म्हणाले, “योहानाचा बाप्तिस्मा देवाकडून होता असे म्हणावे तर येशू म्हणेल, ‘मग तुम्ही त्याच्यावर विश्वास का ठेवला नाही?’ पण जर तो मनुष्यांकडून होता असे आपण म्हणालो आपल्याला लोकांची भीती आहे कारण योहान हा एक संदेष्टा होता असे ते सर्वजण मानतात.” म्हणून त्यांनी येशूला उत्तर दिले, “आम्हास माहीत नाही.” तेव्हा येशू म्हणाला, “तर मग मी कोणत्या अधिकाराने या गोष्टी करतो, हे मीही तुम्हास सांगणार नाही.” याविषयी तुम्हास काय वाटते ते मला सांगा; “एका मनुष्यास दोन पुत्र होते. तो आपल्या पहिल्या मुलाकडे गेला आणि म्हणाला, ‘माझ्या मुला, आज तू द्राक्षाच्या मळ्यात जा आणि काम कर.’ मुलाने उत्तर दिले, ‘मी जाणार नाही.’ परंतु नंतर त्या मुलाने मन बदलले व तो गेला. नंतर वडील आपल्या दुसऱ्या मुलाकडे गेले आणि म्हटले, ‘माझ्या मुला, आज तू जाऊन माझ्या द्राक्षाच्या मळ्यात काम कर.’ त्या मुलाने उत्तर दिले, ‘होय बाबा, मी जातो.’ पण तो गेला नाही. त्या दोघांपैकी कोणत्या मुलाने वडीलांची आज्ञा पाळली?” ते म्हणाले, “पहिल्या मुलाने.” येशू त्यांना म्हणाला, “मी खरे सांगतो, जकातदार व वेश्या तुमच्या अगोदर स्वर्गाच्या राज्यात जातील. कारण योहान नीतिमत्त्वाच्या मार्गाने तुम्हाकडे आला, परंतु तुम्ही त्यावर विश्वास ठेवला नाही, पण जकातदार व वेश्या यांनी त्यावर विश्वास ठेवला आणि हे तुम्ही पाहिले पण तरी देखील तुम्ही आपले मन बदलण्यास आणि त्यावर विश्वास ठेवण्यास तयार झाला नाही.” “हा दुसरा दाखला ऐकाः एक मनुष्य होता, त्याचे शेत होते. त्याने आपल्या शेतात द्राक्षे लावली. त्याभोवती कुंपण घातले आणि द्राक्षरसाकरिता कुंड तयार केले आणि माळा बांधला, मग त्याने आपला मळा काही शेतकऱ्यांना खंडाने करायला दिला, मग तो दुसऱ्यादेशी निघून गेला. जेव्हा द्राक्षे तोडणीचा हंगाम जवळ आला, तेव्हा त्या मनुष्याने आपला वाटा आणण्याकरिता काही चाकर शेतकऱ्याकडे पाठवले. परंतु शेतकऱ्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. एकाला मार दिला तर दुसऱ्या चाकराला जिवे मारले. नंतर तिसऱ्याला दगडमार करून ठार केले. मग शेतकऱ्यांकडे त्या मनुष्याने आणखी एकदा चाकर पाठवले. पहिल्यापेक्षा त्याने जास्त चाकर पाठवले पण त्या शेतकऱ्यांनी त्यांना तशीच वागणूक दिली. नंतर, त्याने त्याच्या स्वतःच्या मुलाला त्यांच्याकडे पाठवले, तो म्हणाला, ‘निश्चितच ते माझ्या मुलाचा मान राखतील.’ पण जेव्हा शेतकऱ्यांनी त्याच्या मुलाला पाहिले तेव्हा ते एकमेकास म्हणू लागले, ‘हा तर मालकाचा मुलगा आहे. तो वारस आहे. चला आपण त्यास ठार करू व त्याचे वतन घेऊ.’ त्यांनी त्यास धरले व द्राक्षमळ्याच्या बाहेर फेकले व त्यास ठार मारले. मग द्राक्षमळ्याचा मालक परत येईल तेव्हा या शेतकऱ्यांचे काय करील?” यहूदी मुख्य याजक लोक आणि पुढारी म्हणाले, “तो त्या लोकांस खात्रीने मरणदंड देईल कारण ते दुष्ट होते. नंतर तो आपला द्राक्षमळा दुसऱ्यास खंडाने देईल. हंगामाच्या दिवसात जे त्याच्या पिकाची वाटणी देतील, अशांना तो ते देईल.” येशू त्यांना म्हणाला, “तुम्ही शास्त्रलेखात कधी वाचले नाही काय? ‘बांधणाऱ्यांनी नाकारलेला दगड कोनशिला झाला आहे. हे प्रभूने केले आणि आमच्या दृष्टीने हे अद्भूत आहे.’ म्हणून मी तुम्हास सांगतो की, देवाचे राज्य तुमच्याकडून काढून घेण्यात येईल आणि जे राष्ट्र त्यातली फळे देईल त्यास ते दिले जाईल. जो कोणी या दगडावर पडेल, त्याचे तुकडे तुकडे होतील परंतु जर हा दगड कोणावर पडेल तर त्याचा भुगाभुगा होईल.” येशूने सांगितलेले दाखले मुख्य याजकांनी आणि परूश्यांनी ऐकले. येशू त्यांच्याविषयी बोलत आहे हे त्यांनी ओळखले. त्यांना येशूला अटक करायचे होते. पण त्यांना लोकांचे भय वाटत होते, कारण लोक येशूला संदेष्टा मानीत होते.
मत्तय 21:18-46 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
अगदी पहाटेच, ते पुन्हा शहराकडे निघाले. रस्त्यात असताना येशूंना भूक लागली. जवळच त्यांना अंजिराचे झाड दिसले. त्यावर काही अंजीर आहेत काय हे पाहण्यास ते झाडाजवळ गेले. त्या झाडावर त्यांना पानांशिवाय काही आढळले नाही. मग ते त्या झाडाला म्हणाले, “यापुढे तुला फळाची प्राप्ती होऊ नये.” आणि तत्काळ ते झाड वाळून गेले. हे पाहून शिष्य आश्चर्यचकित झाले. त्यांनी येशूंना विचारले, “ते अंजिराचे झाड इतक्या लवकर कसे वाळून गेले?” मग येशूंनी त्यांना म्हटले, “मी तुम्हाला सत्य सांगतो की, तुम्ही संशय न धरता विश्वास ठेवाल, तर जे काही अंजिराच्या झाडाबाबत झाले ते तुम्ही सुद्धा कराल, या डोंगराला ‘ऊठ आणि समुद्रात पड,’ असे तुम्ही म्हणालात, तर ही गोष्ट केली जाईल. तुम्ही विश्वास धरून आणि प्रार्थना करून जे काही मागाल, ते तुम्हाला मिळेल.” येशूंनी मंदिराच्या आवारात प्रवेश केला आणि ते शिकवीत असता मुख्य याजक व यहूदी पुढारी त्यांच्याकडे आले व “कोणत्या अधिकाराने या गोष्टी तुम्ही करत आहात?” व “तुम्हाला हा अधिकार कोणी दिला?” याचा जाब त्यांना विचारू लागले. येशूंनी उत्तर दिले, “मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. त्याचे उत्तर द्या आणि मी हे कोणत्या अधिकाराने करीत आहे, मी तुम्हाला सांगेन. योहानाला बाप्तिस्मा करण्याचा अधिकार कोठून प्राप्त झाला होता, स्वर्गापासून किंवा मनुष्याकडून?” या प्रश्नावर त्यांनी एकमेकांबरोबर चर्चा केली, “योहानाचा बाप्तिस्मा, ‘स्वर्गापासून होता,’ असे आपण म्हणालो, तर ते विचारतील, ‘तर त्यावर तुम्ही विश्वास का ठेवला नाही’? जर आपण म्हणालो, ‘मनुष्यांपासून होता’ तर आम्हाला लोकांची भीती आहे. कारण योहान संदेष्टा होता, असा सर्वांचाच ठाम विश्वास होता.” शेवटी त्यांनी उत्तर दिले, “आम्हाला माहीत नाही.” यावर येशू म्हणाले, “तर मग मीही या गोष्टी कोणत्या अधिकाराने करतो हे तुम्हाला सांगणार नाही. “तुम्हाला काय वाटते? एका मनुष्याला दोन मुले होते. तो मोठ्या मुलाला म्हणाला, ‘मुला आज द्राक्षमळ्यामध्ये जा व काम कर.’ ” मुलगा म्हणाला, “ ‘द्राक्षमळ्यात मी जाणार नाही,’ पण नंतर त्याने आपले मन बदलले आणि तो गेला. “मग पिता धाकट्या मुलालाही तसेच म्हणाला, मुलगा म्हणाला, ‘मी जातो.’ पण तो गेलाच नाही.” मी विचारतो, “या दोन मुलांपैकी कोणत्या मुलाने पित्यास जे पाहिजे होते ते केले?” “वडील मुलाने,” त्या लोकांनी उत्तर दिले. मग येशू आपल्या दाखल्याचा खुलासा करीत म्हणाले, “मी खरे सांगतो, जकातदार लोक आणि वेश्या तुमच्या अगोदर परमेश्वराच्या राज्यात जात आहेत. कारण योहान नीतिमत्वाचा मार्ग दाखवीत तुम्हाकडे आला, पण तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला नाही; उलट जकातदार लोक आणि वेश्यांनी तसे केले. हे प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेले असतानाही, तुम्ही पश्चात्ताप करण्याचे आणि विश्वास ठेवण्याचे नाकारले. “दुसरा एक दाखला ऐका: एका जमीनदाराने एक द्राक्षमळा लावला. त्याच्याभोवती भिंत बांधली, द्राक्षांची मळणी करून त्यांचा रस काढण्याकरिता एक खड्डा खणिला आणि संरक्षणासाठी एक बुरूजही बांधला. मग द्राक्षमळा काही शेतकर्यांना भाड्याने देऊन दुसर्या ठिकाणी रहावयास गेला. हंगामाचे दिवस आल्यावर बागेमध्ये त्यांच्याकडून फळांतून काही मिळावे म्हणून त्याने नोकरांना शेतकर्यांकडे पाठविले. “परंतु शेतकर्यांनी सेवकांना धरले; एकाला मारले, दुसर्याला ठार केले, आणि तिसर्याला दगडमार केला. मग जमीनदाराने त्यांच्याकडे पहिल्या वेळेपेक्षा जास्त नोकर पाठविले. पण त्यांनाही त्यांनी तसेच केले. सर्वात शेवटी, त्याने आपल्या पुत्राला त्यांच्याकडे पाठविले व म्हणाला, ‘ते माझ्या पुत्राचा तरी मान राखतील.’ “पण शेतकर्यांनी जमीनदारांच्या पुत्राला येताना पाहिले, तेव्हा ते आपसात म्हणाले, ‘हा तर वारस आहे. चला, आपण त्याला ठार मारू या आणि त्याचे वतन घेऊ या.’ त्याप्रमाणे त्यांनी त्याला धरले आणि द्राक्षमळ्याच्या बाहेर फेकून दिले आणि त्याचा जीव घेतला. “आता, ज्यावेळी द्राक्षमळ्याचा धनी परत येईल, त्यावेळी तो या शेतकर्यांचे काय करील असे तुम्हाला वाटते?” त्यांनी उत्तर दिले, “तो या दुष्ट लोकांना ठार करील आणि जे त्याला हंगामाच्या वेळी फळ देतील, अशा दुसर्या शेतकर्यांना तो द्राक्षमळा भाड्याने देईल.” येशूंनी त्यांना म्हटले, “धर्मशास्त्रात तुम्ही वाचले नाही का: “ ‘जो दगड बांधणार्यांनी नापसंत केला, तोच कोनशिला झाला आहे; प्रभुने हे केले आहे, आणि आमच्या दृष्टीने हे अद्भुत आहे.’ “यास्तव परमेश्वराचे राज्य तुमच्याकडून काढून घेतले जाईल आणि जे लोक फळ देतील त्यांना दिले जाईल. या खडकावर जे आदळतील त्यांचे तुकडे होतील, परंतु ज्यांच्यावर हा खडक आदळेल त्यांचा भुगा भुगा होईल.” येशू आपल्याविषयीच या गोष्टीमधून बोलत आहेत हे प्रमुख याजक आणि परूशी यांच्या ध्यानात आले, तेव्हा येशूंना अटक करण्याचा काहीतरी मार्ग ते शोधू लागले. पण त्यांना लोकांची भीती वाटत होती, कारण सर्व लोक येशूंना संदेष्टा मानीत होते.
मत्तय 21:18-46 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मग सकाळी तो परत नगरास येत असता त्याला भूक लागली. आणि वाटेवर अंजिराचे एक झाड होते ते पाहून तो त्याच्याजवळ गेला; पण पानांशिवाय त्याला त्यावर काही मिळाले नाही. मग त्याने त्याला म्हटले, “ह्यापुढे तुला कधीही फळ न येवो.” आणि ते अंजिराचे झाड ताबडतोब वाळून गेले. हे पाहून शिष्यांनी आश्चर्य करून म्हटले, “अंजिराचे झाड लगेच कसे वाळून गेले?” येशूने त्यांना उत्तर दिले, “मी तुम्हांला खचीत सांगतो, तुमच्या ठायी विश्वास असला व तुम्ही संशय धरला नाही, तर अंजिराच्या झाडाला केल्याप्रमाणे तुम्ही कराल, इतकेच नाही, तर ह्या डोंगरालाही ‘तू उपटून समुद्रात टाकला जा’ असे म्हणाल तर तसे होईल. आणि तुम्ही विश्वास धरून प्रार्थनेत जे काही मागाल ते सर्व तुम्हांला मिळेल.” नंतर तो मंदिरात जाऊन शिक्षण देत असता मुख्य याजक व लोकांचे वडील जन त्याच्याजवळ येऊन म्हणाले, “तुम्ही कोणत्या अधिकाराने हे करता? तुम्हांला हा अधिकार कोणी दिला?” येशूने त्यांना उत्तर दिले, “मीही तुम्हांला एक गोष्ट विचारतो, ती मला सांगाल तर कोणत्या अधिकाराने मी हे करतो ते मीही तुम्हांला सांगेन. योहानाचा बाप्तिस्मा कोठून होता? स्वर्गापासून किंवा माणसांपासून?” तेव्हा ते आपसांत विचार करू लागले की, “‘स्वर्गापासून’ म्हणावे तर हा आपल्याला म्हणेल, ‘मग तुम्ही त्याच्यावर विश्वास का ठेवला नाही?’ बरे, ‘माणसांपासून’ म्हणावे तर आपल्याला लोकांची भीती वाटते, कारण सर्व लोक योहानाला संदेष्टा मानतात.” तेव्हा त्यांनी येशूला उत्तर दिले, “आम्हांला ठाऊक नाही.” तो त्यांना म्हणाला, “तर मग कोणत्या अधिकाराने मी हे करत आहे ते मीही तुम्हांला सांगत नाही. तुम्हांला काय वाटते ते सांगा बरे! एका मनुष्याला दोन मुलगे होते; तो पहिल्याकडे जाऊन म्हणाला, ‘मुला, आज द्राक्षमळ्यात जाऊन काम कर.’ त्याने उत्तर दिले, ‘जातो महाराज;’ पण तो गेला नाही. मग दुसर्याकडे जाऊन त्याने तसेच म्हटले. पण तो म्हणाला, ‘मी नाही जात.’ तरी नंतर त्याला पस्तावा होऊन तो गेला. ह्या दोघांतून कोणी बापाच्या इच्छेप्रमाणे केले?” ते म्हणाले, “दुसर्या मुलाने.” येशूने त्यांना म्हटले, “मी तुम्हांला खचीत सांगतो, जकातदार व कसबिणी तुमच्याआधी देवाच्या राज्यात जातात. कारण योहान नीतीच्या मार्गाने तुमच्याकडे आला आणि तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला नाही; जकातदार व कसबिणी ह्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला; पण हे पाहून तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवावा असा नंतरही तुम्हांला पस्तावा झाला नाही. आणखी एक दाखला ऐकून घ्या : कोणीएक गृहस्थ होता, ‘त्याने द्राक्षमळा लावला, त्याभोवती कुंपण घातले, त्यामध्ये द्राक्षारसासाठी कुंड खणले व माळा बांधला’ आणि तो माळ्यांना खंडाने लावून देऊन आपण परदेशी गेला. नंतर फळांचा हंगाम आल्यावर त्याने आपले फळ घेण्याकरता आपल्या दासांना माळ्यांकडे पाठवले. तेव्हा माळ्यांनी त्याच्या दासांना धरून कोणाला ठोक दिला, कोणाला जिवे मारले व कोणाला धोंडमार केला. त्याने पुन्हा पहिल्यापेक्षा अधिक असे दुसरे दास पाठवले; त्यांच्याशीही ते तसेच वागले. शेवटी ‘माझ्या मुलाचा ते मान राखतील’ असे म्हणून त्याने आपल्या मुलाला त्यांच्याकडे पाठवले. परंतु माळी मुलाला पाहून आपसांत म्हणाले, ‘हा वारस आहे; चला, आपण ह्याला जिवे मारू व ह्याचे वतन घेऊ.’ तेव्हा त्यांनी त्याला धरून द्राक्षमळ्याबाहेर काढून जिवे मारले. तर मग द्राक्षमळ्याचा धनी येईल तेव्हा तो त्या माळ्यांचे काय करील?” ते त्याला म्हणाले, “तो त्या दुष्टांचे हालहाल करून त्यांचा नाश करील आणि जे माळी हंगामी त्याला फळ देतील अशा दुसर्यांकडे तो द्राक्षमळा खंडाने लावून देईल.” येशू त्यांना म्हणाला, ‘जो दगड बांधणार्यांनी नापसंत केला, तोच कोनशिला झाला; हे परमेश्वराकडून झाले, आणि ते आमच्या दृष्टीने आश्चर्यकारक आहे’, असे शास्त्रात तुमच्या वाचण्यात कधी आले नाही काय? म्हणून मी तुम्हांला सांगतो की, देवाचे राज्य तुमच्यापासून काढून घेतले जाईल व जी प्रजा त्याचे फळ देईल तिला ते दिले जाईल. [जो ह्या धोंड्यावर पडेल त्याचा चुराडा होईल, परंतु ज्या कोणावर हा पडेल त्याचा हा भुगाभुगा करून टाकील.]” मुख्य याजक व परूशी त्याचे दाखले ऐकून, हा आमच्याविषयी बोलत आहे असे समजले. ते त्याला धरण्यास पाहत होते, परंतु त्यांना लोकसमुदायाची भीती वाटली; कारण ते त्याला संदेष्टा मानत होते.
मत्तय 21:18-46 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
सकाळी येशू परत शहराकडे येत असता त्याला भूक लागली, म्हणून तो वाटेवर असलेल्या अंजिराच्या झाडाजवळ गेला. पण पानांशिवाय त्याला त्यावर काही दिसले नाही. त्याने त्या झाडाला म्हटले, “ह्यापुढे तुला कधी फळ न येवो.” ते अंजिराचे झाड ताबडतोब वाळून गेले! ते पाहून शिष्यांनी आश्चर्य व्यक्त करून म्हटले, “अंजिराचे झाड इतक्या लवकर कसे वाळून गेले?” येशूने त्यांना उत्तर दिले, “मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, तुमच्या ठायी विश्वास असला व तुम्ही संशय धरला नाही, तर ह्या झाडाला मी जे केले, ते तुम्हीही करू शकाल, इतकेच नव्हे तर ह्या डोंगरालाही ‘तू उपटून समुद्रात टाकला जा’, असे म्हणाल तर तसे होईल. तुम्ही विश्वास धरून प्रार्थनेत जे काही मागाल, ते सर्व तुम्हांला मिळेल.” येशू मंदिरात शिक्षण देत असता मुख्य याजक व लोकांचे वडीलजन त्याच्याजवळ येऊन विचारू लागले, “तुम्ही कोणत्या अधिकाराने ह्या गोष्टी करता? हा अधिकार तुम्हांला कोणी दिला?” येशूने त्यांना उत्तर दिले, “मी तुम्हांला एक प्रश्न विचारतो, त्याचे तुम्ही मला उत्तर दिले तर कोणत्या अधिकाराने मी ह्या गोष्टी करतो, ते मीही तुम्हांला सांगेन. योहानला बाप्तिस्मा देण्याचा अधिकार कोठून मिळाला? देवाकडून की माणसांकडून?” ते आपसात चर्चा करू लागले, “देवाकडून म्हणावे तर तो आपल्याला म्हणेल, “मग तुम्ही त्याच्यावर विश्वास का ठेवला नाही?’ बरे, माणसाकडून म्हणावे, तर आपल्याला लोकांची भीती आहे, कारण सर्व लोक योहानला संदेष्टा मानतात.” तेव्हा त्यांनी येशूला उत्तर दिले, “आम्हांला ठाऊक नाही.” तो त्यांना म्हणाला, “तर मग मी ह्या गोष्टी कोणत्या अधिकाराने करत आहे, ते मीही तुम्हांला सांगणार नाही. तुम्हांला काय वाटते ते सांगा बरे? एका मनुष्याला दोन मुलगे होते. तो मोठ्या मुलाकडे जाऊन म्हणाला, “मुला, आज द्राक्षमळ्यात जाऊन काम कर.’ त्याने उत्तर दिले, “जातो, बाबा.’ पण तो गेला नाही. मग धाकट्या मुलाकडे जाऊन त्या मनुष्याने तसेच म्हटले. तो म्हणाला, “मी नाही जाणार.’ तरी पण नंतर आपला विचार बदलून तो गेला. ह्या दोघांतून कोणी त्याच्या वडिलांच्या इच्छेप्रमाणे केले?” ते म्हणाले, “धाकट्या मुलाने.” येशूने त्यांना म्हटले, “मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, जकातदार व वेश्या तुमच्या आधी देवाच्या राज्यात जात आहेत. कारण योहान नीतिमत्वाच्या मार्गाने तुमच्याकडे आला आणि तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला नाही, पण जकातदार व वेश्या ह्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला; शिवाय हे पाहून तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवायला हवा होता, असा पश्चात्ताप नंतरही तुम्हांला झाला नाही. आणखी एक दाखला ऐकून घ्या. एका गृहस्थाने द्राक्षमळा लावला. त्याभोवती कुंपण घातले. त्यामध्ये द्राक्षारसासाठी कुंड खणले व माळा बांधला. त्यानंतर तो द्राक्षमळा कुळांकडे खंडाने देऊन तो स्वतः परदेशी गेला. फळांचा हंगाम आल्यावर त्याने त्याचे फळ घेण्याकरता आपल्या दासांना कुळांकडे पाठवले. त्यांनी त्याच्या दासांना धरून कोणाला ठोकले, कोणाला ठार मारले व कोणाला धोंडमार केला. पुन्हा त्याने पहिल्यापेक्षा अधिक दास पाठवले. त्यांच्याशीही ते तसेच वागले. ‘माझ्या मुलाचा ते मान राखतील’, असा विचार करून द्राक्षमळ्याच्या मालकाने शेवटी त्याच्या मुलाला त्यांच्याकडे पाठवले. परंतु मुलाला पाहून कुळे आपसात म्हणाली, “हा तर वारस आहे, चला, आपण ह्याला ठार मारू व ह्याचे वतन घेऊ.’ त्यांनी त्याला धरून द्राक्षमळ्याबाहेर काढून ठार मारले. आता हे सांगा, द्राक्षमळ्याचा धनी येईल, तेव्हा तो त्या कुळांचे काय करील?” ते येशूला म्हणाले, “तो त्या दुष्टांचे हालहाल करून त्यांचा नाश करील आणि जी कुळे हंगामाच्या वेळी त्याला फळ देतील, अशा दुसऱ्यांकडे तो द्राक्षमळा खंडाने देईल.” येशू त्यांना म्हणाला, “‘जो दगड बांधकाम करणाऱ्यांनी नापंसत केला, तो कोनशिला झाला. हे परमेश्वराकडून झाले आणि हे आमच्या दृष्टीने आश्चर्यकारक कृत्य आहे!’, असे धर्मशास्त्रात तुम्ही कधी वाचले नाही काय? म्हणून मी तुम्हांला सांगतो, देवाचे राज्य तुमच्याकडून काढून घेतले जाईल व त्याची फळे देणाऱ्या लोकांना ते दिले जाईल. जो ह्या धोंड्यावर पडेल त्याचा चुराडा होईल. परंतु ज्या कुणावर हा पडेल त्याचा हा भुगा करून टाकील.” मुख्य याजक व परुशी ह्यांनी हा दाखला ऐकला तेव्हा तो त्यांना उद्देशून सांगितला होता, हे त्यांच्या ध्यानात आले. तेव्हा ते त्याला धरायला पाहू लागले परंतु त्यांना लोकसमुदायाची भीती वाटली; कारण लोक त्याला संदेष्टा मानत होते.