मत्तय 2:19-23
मत्तय 2:19-23 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
पुढे हेरोद राजा पावल्यावर, पाहा प्रभूचा दूत मिसर देशात योसेफास स्वप्नात दर्शन देऊन म्हणाला, “उठ, बालकास व त्याच्या आईस घेऊन इस्राएल देशास जा, कारण बालकाचा जीव घ्यावयास जे पाहत होते ते मरून गेले आहेत.” तेव्हा तो उठला आणि बालकाला व त्याच्या आईला घेऊन इस्राएल देशात आला. परंतु अर्खेलाव हा आपला पिता हेरोद याच्या जागी यहूदीया प्रांतात राज्य करीत आहे असे ऐकून तो तेथे जाण्यास घाबरला, आणि स्वप्नात देवाने सूचना केल्यानंतर तो गालील प्रांतास निघून गेला, व नासरेथ नावाच्या गावी जाऊन राहिला अशासाठी की, “त्याला नासोरी म्हणतील” हे जे संदेष्ट्यांच्याद्वारे सांगितले होते ते पूर्ण व्हावे.
मत्तय 2:19-23 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
हेरोद मरण पावल्यानंतर, प्रभुच्या दूताने योसेफाला इजिप्तमध्ये पुन्हा स्वप्नातून दर्शन दिले, आणि सांगितले, “ऊठ, बालक व त्याची आई यांना घेऊन इस्राएल देशात परत जा, कारण बालकाचा जीव घेण्यास जे पाहत होते, ते मरण पावले आहेत.” त्याप्रमाणे तो उठला, बालक व त्याची आई यांना घेऊन इस्राएल देशामध्ये परतला, परंतु यहूदी प्रांतात अर्खेलाव त्याचा बाप हेरोदा ऐवजी राज्य करीत आहे हे त्याला समजले, तेव्हा तिकडे जाण्यास त्याला भीती वाटली. मग स्वप्नात अशी त्यांना सूचना मिळाली म्हणून तिकडे न जाता तो गालील प्रांतात गेला. आणि ते नासरेथ या गावात राहिले. संदेष्ट्यांनी केलेले भविष्य पूर्ण झाले ते असे: “त्यांना नासरेथकर म्हणतील.”
मत्तय 2:19-23 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
पुढे हेरोद मरण पावल्यावर, पाहा, प्रभूचा दूत मिसर देशात योसेफाच्या स्वप्नात दर्शन देऊन म्हणाला, “ऊठ, बालकाला व त्याच्या आईला घेऊन इस्राएलाच्या देशास जा, कारण बालकाचा जीव घेण्यास जे पाहत होते ते मरून गेले आहेत.” तेव्हा तो उठला आणि बालकाला व त्याच्या आईला घेऊन इस्राएलाच्या देशास आला. परंतु अर्खेलाव हा आपला बाप हेरोद ह्याच्या जागी यहूदीयात राज्य करत आहे असे ऐकून तो तेथे जाण्यास भ्याला, आणि स्वप्नात सूचना झाल्यामुळे तो गालील प्रांतास निघून गेला, व नासेरथ नावाच्या गावी जाऊन राहिला; अशासाठी की, “त्याला नासोरी म्हणतील” हे जे संदेष्ट्यांच्या द्वारे सांगितले होते ते पूर्ण व्हावे.
मत्तय 2:19-23 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
हेरोद मरण पावल्यावर, प्रभूचा दूत मिसर देशात गेलेल्या योसेफला स्वप्नात दर्शन देऊन म्हणाला, “ऊठ, बाळाला व त्याच्या आईला घेऊन इस्राएल देशास जा कारण बाळाचा जीव घ्यायला जे टपले होते, ते मेले आहेत.” तेव्हा तो उठला आणि बाळाला व त्याच्या आईला घेऊन इस्राएल देशात परत गेला. परंतु अर्खेलाव त्याचे वडील हेरोद ह्याच्या जागी यहुदियात राज्य करत आहे, असे कळल्यावर योसेफ तेथे जाण्यास भ्याला आणि स्वप्नात सूचना मिळाल्याप्रमाणे तो गालील प्रांतात निघून गेला. ‘त्याला नासरेथकर म्हणतील’, हे जे ख्रिस्ताविषयी संदेष्ट्याद्वारे भाकीत करण्यात आले होते, ते पूर्ण व्हावे म्हणून तेथे तो नासरेथ नावाच्या नगरात जाऊन राहिला.