YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 2:13-21

मत्तय 2:13-21 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

ते गेल्यावर, प्रभूचा दूत योसेफास स्वप्नात दर्शन देऊन म्हणाला, “ऊठ, बालक व त्याची आई यांना घेऊन मिसर देशात पळून जा आणि मी तुला सांगेपर्यंत तेथेच राहा कारण बालकाचा घात करण्यासाठी हेरोद राजा त्याचा शोध करणार आहे.” त्या रात्री तो उठला आणि बालक व त्याची आई यांना घेऊन रातोरात मिसर देशात निघून गेला. तो हेरोदाच्या मरणापर्यंत तेथे राहिला. “मी माझ्या पुत्राला मिसर देशातून बोलावले आहे.” असे जे प्रभूने संदेष्ट्याच्याद्वारे सांगितले ते पूर्ण झाले. तेव्हा ज्ञानी लोकांनी आपणाला फसवले हे पाहून हेरोद राजा अतिशय संतापला आणि जी वेळ त्याने ज्ञानी लोकांपासून नीट विचारून घेतली होती तिच्याप्रमाणे त्याने बेथलेहेमात व आसपासच्या सर्व प्रदेशांत जे दोन वर्षांचे व त्याहून कमी वयाचे पुरूष बालके होते त्या सर्वांना त्याने माणसे पाठवून त्यांच्याकडून जिवे मारले. यिर्मया संदेष्ट्याच्याद्वारे जे सांगितले होते, ते त्यासमयी पूर्ण झाले. ते असेः “रामा येथे रडणे व मोठा आकांत ह्यांचा शब्द ऐकण्यात आला, राहेल आपल्या मुलांकरिता रडत आहे, आणि ती नाहीत म्हणून ती सांत्वन पावेना.” पुढे हेरोद राजा पावल्यावर, पाहा प्रभूचा दूत मिसर देशात योसेफास स्वप्नात दर्शन देऊन म्हणाला, “उठ, बालकास व त्याच्या आईस घेऊन इस्राएल देशास जा, कारण बालकाचा जीव घ्यावयास जे पाहत होते ते मरून गेले आहेत.” तेव्हा तो उठला आणि बालकाला व त्याच्या आईला घेऊन इस्राएल देशात आला.

सामायिक करा
मत्तय 2 वाचा

मत्तय 2:13-21 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

ते गेल्यानंतर, प्रभूचा एक दूताने योसेफाला स्वप्नात दर्शन देऊन म्हटले, “ऊठ! बालकाला आणि त्याच्या आईला घेऊन इजिप्त देशात पळून जा आणि मी तुला सांगेपर्यंत तिथेच राहा, कारण हेरोद बालकाचा शोध करून ठार मारण्याचा कट करीत आहे.” तेव्हा तो उठला, त्याच रात्री योसेफ बालकाला आणि मरीयेला घेऊन इजिप्त देशात निघून गेला. हेरोद राजाचा मृत्यू होईपर्यंत तो तिथेच राहिला आणि अशाप्रकारे, “मी इजिप्तमधून माझ्या पुत्राला बोलाविले!” असे जे प्रभूने आपल्या संदेष्ट्यांच्याद्वारे सांगितले होते, ते भविष्य पूर्ण झाले. शास्त्रज्ञांनी आपल्याला फसविले, हे पाहून हेरोद राजा संतापला आणि शास्त्रज्ञांनी दिलेल्या वेळेनुसार बेथलेहेम आणि आसपासच्या प्रदेशात दोन वर्षे किंवा कमी वय असलेल्या प्रत्येक मुलाला ठार करण्याचा त्याने हुकूम केला. संदेष्टा यिर्मयाह याच्याद्वारे जे सांगितले होते, ती भविष्यवाणी खरी ठरली ती अशी: “रामाह मधून आवाज ऐकू येत आहे, आकांत आणि घोर शोक, राहेल आपल्या लेकरांसाठी रडत आहे. ती सांत्वन पावण्यास नकार देते, कारण ते आता राहिले नाहीत.” हेरोद मरण पावल्यानंतर, प्रभूच्या दूताने योसेफाला इजिप्तमध्ये पुन्हा स्वप्नात दर्शन दिले, आणि सांगितले, “ऊठ, बालक व त्याच्या आईला घेऊन इस्राएल देशात परत जा, कारण बालकाचा जीव घेण्यास जे पाहत होते, ते मरण पावले आहेत.” त्याप्रमाणे तो उठला, बालक व त्याच्या आईला घेऊन इस्राएल देशामध्ये परतला.

सामायिक करा
मत्तय 2 वाचा

मत्तय 2:13-21 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

ते गेल्यावर, पाहा, प्रभूचा दूत योसेफास स्वप्नात दर्शन देऊन म्हणाला, “ऊठ, बालक व त्याची आई ह्यांना घेऊन मिसर देशास पळून जा आणि मी तुला सांगेपर्यंत तेथेच राहा; कारण बालकाचा घात करण्यासाठी हेरोद त्याचा शोध करणार आहे.” मग तो उठला आणि बालक व त्याची आई ह्यांना घेऊन रातोरात मिसर देशास निघून गेला; आणि हेरोदाच्या मरणापर्यंत तेथे राहिला; “मी आपल्या पुत्राला मिसर देशातून बोलावले आहे” हे जे प्रभूने संदेष्ट्याच्या द्वारे सांगितले ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले. तेव्हा मागी लोकांनी आपल्याला फसवले हे पाहून हेरोद अतिशय संतापला आणि जी वेळ त्याने मागी लोकांपासून नीट विचारून घेतली होती तिच्याप्रमाणे त्याने बेथलेहेमात व आसपासच्या सर्व प्रदेशांत जी दोन वर्षांची व त्यांहून कमी वयाची बालके होती त्या सर्वांना त्याने माणसे पाठवून त्यांच्याकडून जिवे मारवले. यिर्मया संदेष्ट्याच्या द्वारे जे सांगितले होते, ते त्या समयी पूर्ण झाले. ते असे : “रामा येथे रडणे व मोठा आकांत ह्यांचा शब्द ऐकण्यात आला, राहेल आपल्या मुलांसाठी रडत आहे आणि ती नाहीत म्हणून ती सांत्वन पावेना.” पुढे हेरोद मरण पावल्यावर, पाहा, प्रभूचा दूत मिसर देशात योसेफाच्या स्वप्नात दर्शन देऊन म्हणाला, “ऊठ, बालकाला व त्याच्या आईला घेऊन इस्राएलाच्या देशास जा, कारण बालकाचा जीव घेण्यास जे पाहत होते ते मरून गेले आहेत.” तेव्हा तो उठला आणि बालकाला व त्याच्या आईला घेऊन इस्राएलाच्या देशास आला.

सामायिक करा
मत्तय 2 वाचा

मत्तय 2:13-21 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

ते गेल्यावर प्रभूचा दूत योसेफला स्वप्नात दर्शन देऊन म्हणाला, “ऊठ, मुलाला व त्याच्या आईला घेऊन मिसर देशास पळून जा. मी तुला सांगेपर्यंत तेथेच राहा, कारण बाळाचा घात करण्यासाठी हेरोद त्याचा शोध घेणार आहे.” योसेफ उठला आणि बाळ व त्याची आई ह्यांना घेऊन रातोरात मिसर देशास निघून गेला. हेरोदच्या मृत्यूपर्यंत तो तेथे राहिला. “मी माझ्या पुत्राला मिसर देशातून बोलावले आहे”, हे भाकीत पूर्ण व्हावे म्हणून असे झाले. ज्ञानी लोकांनी आपल्याला फसवले, हे पाहून हेरोद अतिशय संतापला आणि ज्ञानी पुरुषांकडून काळजीपूर्वक विचारून घेतलेल्या वेळेनुसार त्याने बेथलेहेममध्ये व आसपासच्या परिसरात माणसे पाठवली व त्यांच्याकडून जे दोन वर्षांचे व त्याहून कमी वयाचे मुलगे होते त्या सर्वांना ठार मारले. यिर्मया संदेष्ट्याद्वारे जे सांगितले होते, ते त्या समयी पूर्ण झाले. ते असे: राम्हा येथे रडणे व मोठा आकांत ऐकण्यात आला; राहेल आपल्या मुलांकरता रडत आहे आणि ती नाहीत म्हणून काही केल्या तिचे सांत्वन होईना. हेरोद मरण पावल्यावर, प्रभूचा दूत मिसर देशात गेलेल्या योसेफला स्वप्नात दर्शन देऊन म्हणाला, “ऊठ, बाळाला व त्याच्या आईला घेऊन इस्राएल देशास जा कारण बाळाचा जीव घ्यायला जे टपले होते, ते मेले आहेत.” तेव्हा तो उठला आणि बाळाला व त्याच्या आईला घेऊन इस्राएल देशात परत गेला.

सामायिक करा
मत्तय 2 वाचा