मत्तय 18:1-14
मत्तय 18:1-14 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
त्यावेळेस शिष्य येशूकडे आले आणि त्यांनी विचारले, “स्वर्गाच्या राज्यात सर्वात महान कोण?” तेव्हा त्याने एका लहान बालकाला आपल्याजवळ बोलावून त्यांच्यामध्ये उभे केले, आणि म्हटले, “मी तुम्हास खरे सांगतो, तुमच्यात बदल होऊन तुम्ही बालकासारखे झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही. म्हणून जो कोणी आपणाला या बालकासारखे लीन करतो तोच स्वर्गाच्या राज्यात सर्वाहून महान आहे. आणि जो कोणी अशा एका लहान बालकाला माझ्या नावाने स्वीकारतो, तो मला स्वीकारतो. परंतु जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या या लहानातील एकाला अडखळण आणील त्याच्या गळ्यात जात्याची मोठी तळी बांधून त्यास समुद्राच्या खोल पाण्यात बुडविणे हे त्याच्या हिताचे आहे. अडखळण्याच्या कारणामुळे जगाला धिक्कार असो! तरी अशा काही गोष्टी होत राहणारच, पण जे लोक या अडखळण्याला कारणीभूत होतील त्यांना फार हानीचे ठरेल. जर तुमचा उजवा हात किंवा पाय तुम्हास पाप करण्यासाठी प्रवृत्त करीत असेल तर तो कापून टाका व फेकून द्या. दोन हात व दोन पाय असून सर्वकाळच्या कधीही न विझणाऱ्या अग्नीत तुम्ही टाकले जाण्यापेक्षा व्यंग किंवा लंगडे होऊन सार्वकालिक जीवनात जावे जास्त बरे होईल. जर तुमचा डोळा तुम्हास पाप करण्यासाठी प्रवृत्त करीत असेल तर तो उपटून फेकूनच द्या कारण एकच डोळा असला आणि तुम्हास सार्वकालिक जीवन मिळाले तर ते जास्त बरे आहे. दोन डोळ्यासह तुम्ही नरकात टाकले जाण्यापेक्षा ते जास्त बरे आहे. सावध असा. ही लहान मुले यांना कमी समजू नका कारण मी तुम्हास सांगतो की, स्वर्गात त्यांचे देवदूत माझ्या स्वर्गातील पित्याचे मुख नेहमी पाहतात. आणखी, जे हरवलेले त्यास तारावयास मनुष्याचा पुत्र आला आहे.” जर एखाद्या मनुष्याजवळ शंभर मेंढरे आहेत आणि त्यांच्यापैकी एक मेंढरू हरवले तर तो नव्याण्णव मेंढरे टेकडीवर सोडून देईल आणि ते हरवलेले एक मेंढरू शोधायला जाईल की नाही? आणि जर त्या मनुष्यास हरवलेले मेंढरू सापडले तर त्यास कधीही न हरवलेल्या नव्याण्णव मेंढरांबद्दल वाटणाऱ्या आनंदापेक्षा त्या एकासाठी जास्त आनंद होईल. असे मी तुम्हास खरे सांगतो, तशाच प्रकारे, या लहान मुलांपैकी एकाचा अगदी लहानातील लहानाचा ही नाश व्हावा अशी तुमच्या स्वर्गीय पित्याची इच्छा नाही.
मत्तय 18:1-14 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
त्याच सुमारास शिष्य येशूंकडे आले आणि त्यांना विचारले, “स्वर्गाच्या राज्यात सर्वात श्रेष्ठ कोण आहे?” तेव्हा येशूंनी एका लहान मुलाला जवळ बोलावले आणि त्या बालकाला त्यांच्यामध्ये उभे केले. मग येशू त्यांना म्हणाले, “मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो, जोपर्यंत तुमच्यात बदल होऊन तुम्ही लहान बालकासारखे होत नाही तोपर्यंत स्वर्गाच्या राज्यात कधीही तुमचा प्रवेश होणार नाही. म्हणून जो कोणी स्वतःला या बालकासारखे नम्र करतो तोच स्वर्गाच्या राज्यात सर्वश्रेष्ठ होईल. आणि कोणीही माझ्या नावाने अशा लहान बालकाचा स्वीकार करतो, तो माझा स्वीकार करतो. “जर कोणी माझ्यावर विश्वास ठेवणार्या अशा लहानातील एकालाही पाप करण्यास प्रवृत्त करील, तर त्यांच्या गळ्यात जात्याची मोठी तळी बांधून समुद्रात फेकून देणे हे त्यांच्यासाठी अधिक हिताचे ठरेल. ज्याच्यामुळे लोकांना अडखळण येतात त्या जगाचा धिक्कार असो! अडखळण न यावे हे अशक्य आहे, परंतु ज्याच्याद्वारे अडखळण येईल, त्याला धिक्कार असो. तुझा हात किंवा पाय तुम्हाला पापाला प्रवृत करीत असेल तर तो कापून टाकून दे. दोन पाय असून नरकात टाकले जावे, यापेक्षा एका पायाने अपंग होऊन जीवनात प्रवेश करणे हे तुझ्या हिताचे आहे तुझा डोळा तुला पापाला प्रवृत करीत असेल, तर तो उपटून फेकून द्या. दोन डोळयांसह अग्निच्या नरकात जाण्यापेक्षा एका डोळ्याने जीवनात जाणे उत्तम आहे. “या लहान बालकांपैकी एकालाही तुच्छ लेखू नका, कारण मी तुम्हाला सांगतो की स्वर्गात त्यांचे देवदूत माझ्या पित्याचे मुख निरंतर पाहत असतात. मानवपुत्र हरवलेले शोधावयास आणि उद्धार करावयास आले आहेत. “तुम्हाला काय वाटते? एका माणसाजवळ शंभर मेंढरे आहेत आणि त्यातले एक मेंढरू हरवून गेले, तर तो माणूस काय करील? तो आपली नव्याण्णव मेंढरे डोंगरावर सोडून ते हरवलेले मेंढरू शोधण्यास जाणार नाही काय? आणि मी तुम्हाला सत्य सांगतो, ते सापडल्यावर, आपली नव्याण्णव मेंढरे सुखरुप आहेत त्यापेक्षा, आपले हरवलेले मेंढरू सापडले म्हणून तो अधिक आनंद करील. त्याचप्रकारे या लहान बालकांतील एकाचाही नाश होऊ नये अशी तुमच्या स्वर्गीय पित्याची इच्छा आहे.
मत्तय 18:1-14 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
त्या वेळेस शिष्य येशूकडे येऊन म्हणाले, “स्वर्गाच्या राज्यात सर्वांत मोठा कोण?” तेव्हा येशूने एका बालकाला बोलावून त्याला त्यांच्यामध्ये उभे केले आणि म्हटले, “मी तुम्हांला खचीत सांगतो, तुमचा पालट होऊन तुम्ही बालकांसारखे झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही. ह्यास्तव जो कोणी स्वत:ला ह्या बालकासारखे नम्र करतो तो स्वर्गाच्या राज्यात सर्वांत मोठा होय; आणि जो कोणी माझ्या नावाने अशा एखाद्या बालकाला जवळ करतो तो मला जवळ करतो. माझ्यावर विश्वास ठेवणार्या ह्या लहानांतील एकाला जो कोणी अडखळवील त्याच्या गळ्यात मोठ्या जात्याची तळी बांधून त्याला समुद्राच्या खोल पाण्यात बुडवावे ह्यात त्याचे हित आहे. अडखळणांमुळे जगाची केवढी दुर्दशा होणार! अडखळणे तर अवश्य होणार; परंतु ज्या माणसाकडून अडखळण होईल त्याची केवढी दुर्दशा होणार! तुझा हात किंवा तुझा पाय तुला अडखळवत असेल तर तो तोडून फेकून दे; दोन हात किंवा दोन पाय असून सार्वकालिक अग्नीत पडावे ह्यापेक्षा लुळे किंवा लंगडे होऊन जीवनात जावे हे तुला बरे आहे. तुझा डोळा तुला अडखळवत असेल तर तो उपटून फेकून दे; दोन डोळे असून अग्निनरकात पडावे ह्यापेक्षा एक डोळा असून जीवनात जावे हे तुला बरे आहे. सांभाळा, ह्या लहानातील एकालाही तुच्छ मानू नका; कारण मी तुम्हांला सांगतो, स्वर्गात त्यांचे दिव्यदूत माझ्या स्वर्गातील पित्याचे मुख नित्य पाहतात. [आणखी, जे हरवलेले त्यांना तारायला मनुष्याचा पुत्र आला आहे.] तुम्हांला काय वाटते? कोणाएका मनुष्याजवळ शंभर मेंढरे असली आणि त्यांतून एखादे भटकले तर ती नव्याण्णव डोंगरावर सोडून त्या भटकलेल्याचा शोध करण्यास तो जाणार नाही काय? आणि समजा, ते त्याला सापडले तर न भटकलेल्या नव्याण्णवांपेक्षा तो त्यावरून अधिक आनंद करील, असे मी तुम्हांला खचीत सांगतो. तसे ह्या लहानांतील एकाचाही नाश व्हावा अशी तुमच्या स्वर्गातील पित्याची इच्छा नाही.
मत्तय 18:1-14 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
एकदा शिष्य येशूकडे येऊन विचारू लागले, “स्वर्गाच्या राज्यात सर्वांत मोठा कोण?” तेव्हा त्याने एका लहान मुलाला घेऊन त्याला त्यांच्यामध्ये उभे केले आणि म्हटले, “मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, तुमचे परिवर्तन होऊन तुम्ही बालकांसारखे झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुम्हांला मुळीच प्रवेश मिळणार नाही. म्हणजेच जो कोणी स्वतःला ह्या बालकासारखे नम्र करतो, तो स्वर्गाच्या राज्यात मोठा होय. तसेच जो कोणी माझ्या नावाने अशा एखाद्या बालकाचा स्वीकार करतो, तो माझा स्वीकार करतो. माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या ह्या लहानांतील एकाला जो कोणी पापास प्रवृत्त करील त्याच्या गळ्यात मोठ्या जात्याची तळी बांधून त्याला समुद्राच्या खोल पाण्यात बुडवावे, हे त्याच्या हिताचे आहे. अडखळण होणे ही जगासाठी किती भयानक गोष्ट आहे! अशी अडखळणे अवश्य घडणार. परंतु ज्याच्याकडून ती अडखळणे घडतील त्याची केवढी दुर्दशा होणार! तुझा हात किंवा तुझा पाय तुला पाप करण्यासाठी प्रवृत्त करत असेल, तर तो तोडून फेकून दे, दोन हात किंवा दोन पाय असून न विझणाऱ्या अग्नीत पडण्यापेक्षा लुळे किंवा लंगडे होऊन जीवनात जावे, हे तुझ्या हिताचे आहे. तुझा डोळा तुला पाप करण्यासाठी प्रवृत्त करत असेल, तर तो उपटून फेकून दे. दोन डोळे असून नरकाग्नीत पडण्यापेक्षा एक डोळा असून जीवनात जावे, हे तुझ्या हिताचे आहे. सांभाळा, ह्या लहानांतील एकालाही तुच्छ मानू नका. मी तुम्हांला सांगतो, त्यांचे दिव्य दूत माझ्या स्वर्गातील पित्यापुढे नित्य उपस्थित असतात. [जे हरवलेले आहे, त्याचा शोध घेण्यासाठी मनुष्याचा पुत्र आला आहेर्.] तुम्हांला काय वाटते? एका माणसाजवळ शंभर मेंढरे असली आणि त्यांतून एखादे भटकले तर टेकडीवर चरत असलेल्या नव्याण्णव मेंढरांना सोडून जे एक भटकले आहे त्याला शोधायला तो जाणार नाही काय? आणि समजा, ते त्याला सापडले तर न भटकलेल्या नव्याण्णवांपेक्षा तो सापडलेल्या मेंढराबद्दल अधिक आनंद व्यक्त करणार नाही का? त्याप्रमाणे ह्या लहानांतील एकाचाही नाश व्हावा, अशी तुमच्या स्वर्गातील पित्याची इच्छा नाही.