YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 15:29-39

मत्तय 15:29-39 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

नंतर येशू तेथून निघून गालीलच्या सरोवराजवळ आला व येशू डोंगरावर चढून तेथे बसला. मग पुष्कळ लोक त्याच्याकडे आले, त्यांनी आपल्याबरोबर लुळे, पांगळे, आंधळे, बहिरे व इतर अनेक लोकांस आणले होते आणि त्यांनी त्या आजाऱ्यांना येशूच्या पायावर ठेवले. तेव्हा त्याने त्यांना बरे केले. मुके बोलू लागले, व्यंग असलेले चांगले झाले, लंगडे चालू लागले, आंधळे पाहू लागले. हे पाहून लोक थक्क झाले आणि त्यांनी इस्राएलाच्या देवाचे गौरव केले. मग येशूने आपल्या शिष्यांना आपल्याजवळ बोलावून म्हटले, “मला लोकांचा कळवळा येतो कारण ते आज तीन दिवसांपासून माझ्याबरोबर राहिले आहेत आणि त्यांच्याकडे खायला काही नाही, त्यांना उपाशी पाठवावे अशी माझी इच्छा नाही कारण ते वाटेत कदाचित कासावीस होतील.” शिष्य त्यास म्हणाले, “एवढ्या मोठ्या लोकसमुदायाला तृप्त करावे इतक्या भाकरी या दूर रानात आमच्याजवळ कोठून असणार?” तेव्हा येशू म्हणाला, “तुमच्याजवळ किती भाकरी आहेत?” ते म्हणाले, “आमच्याकडे सात भाकरी आहेत व काही लहान मासे आहेत.” मग त्याने लोकांस जमिनीवर बसविण्याची आज्ञा केली. मग त्या सात भाकरी व मासे घेऊन त्याने देवाचे उपकार मानले व त्या भाकरी मोडल्या व शिष्यांना दिल्या व शिष्यांनी लोकांस दिल्या. तेव्हा ते सर्व जेवून तृप्त झाले आणि त्यांनी उरलेल्या तुकड्यांनी भरलेल्या सात टोपल्या गोळा केल्या. आणि जेवणारे, स्त्रिया व लेकरे सोडून चार हजार पुरूष होते. मग समुदायास निरोप दिल्यावर तो तारवात बसून मगदानाच्या प्रदेशात गेला.

सामायिक करा
मत्तय 15 वाचा

मत्तय 15:29-39 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

नंतर येशूंनी ते ठिकाण सोडले आणि गालील सरोवराच्या किनार्‍याने गेले. मग ते एका डोंगरावर जाऊन बसले. खूप मोठी गर्दी त्यांच्याजवळ जमली. लोकांनी आपल्यातील लंगडे, आंधळे, मुके, अपंग आणि इतर रोगांनी आजारी असलेल्यांना त्यांच्या चरणांजवळ आणले आणि त्या सर्वांना त्यांनी बरे केले. मुके बोलू लागले, जे लंगडे होते ते चालू लागले आणि आंधळे पाहू लागले. सर्व जमाव आश्चर्यचकित होऊन इस्राएलाच्या परमेश्वराची मनःपूर्वक स्तुती करू लागला. येशूंनी आपल्या शिष्यांना जवळ बोलाविले आणि म्हणाले, “मला या लोकांचा कळवळा येतो. कारण ते तीन दिवसापासून आहेत आणि त्यांना खावयास काही नाही. त्यांना तसेच उपाशी पाठवून देण्याची माझी इच्छा नाही, तसे केले तर ते रस्त्यातच कोसळून पडतील.” शिष्यांनी उत्तर दिले, “एवढ्या लोकांना पुरेल इतके अन्न या ओसाड रानात कुठून आणावे?” येशूंनी विचारले, “तुमच्याजवळ किती भाकरी आहेत?” शिष्यांनी उत्तर दिले, “सात आणि काही लहान मासे.” तेव्हा त्यांनी जमावाला जमिनीवर बसावयास सांगितले. मग त्या सात भाकरी व मासे घेऊन त्या भाकरीबद्दल परमेश्वराचे आभार मानले आणि त्या मोडल्या व शिष्यांना दिल्या आणि त्यांनी ते लोकांना वाढले. ते सर्वजण जेवले व तृप्त झाले. नंतर शिष्यांनी उरलेले तुकडे गोळा केले तेव्हा सात टोपल्या भरल्या. स्त्रिया व लेकरांशिवाय जे जेवले ते चार हजार पुरुष होते. येशूंनी लोकांना घरी जाण्यास निरोप दिल्यानंतर ते एका होडीत बसून मगादान नावाच्या भागात आले.

सामायिक करा
मत्तय 15 वाचा

मत्तय 15:29-39 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

नंतर येशू तेथून निघून गालील समुद्राजवळ आला व डोंगरावर चढून तेथे बसला. मग लोकांचे थव्यांचे थवे त्याच्याकडे आले; त्यांच्याबरोबर लंगडे, व्यंग असलेले, आंधळे, मुके व दुसरे पुष्कळ जण होते; त्यांना त्यांनी त्याच्या पायांशी आणून ठेवले आणि त्याने त्यांना बरे केले. मुके बोलतात, व्यंग असलेले धड होतात, लंगडे चालतात व आंधळे पाहतात, हे पाहून लोकसमुदायाने आश्‍चर्य केले आणि इस्राएलाच्या देवाचा गौरव केला. मग येशूने आपल्या शिष्यांना बोलावून म्हटले, “मला लोकांचा कळवळा येतो, कारण ते आज तीन दिवस माझ्याजवळ आहेत आणि त्यांच्याजवळ खायला काहीही नाही; कदाचित ते वाटेत कासावीस होतील; म्हणून त्यांना उपाशी लावून द्यावे अशी माझी इच्छा नाही.” शिष्य त्याला म्हणाले, “एवढा मोठा लोकसमुदाय तृप्त होईल इतक्या भाकरी आमच्याजवळ रानात कोठून असणार?” येशूने त्यांना विचारले, “तुमच्याजवळ किती भाकरी आहेत?” ते म्हणाले, “सात, व काही लहान मासे.” मग त्याने लोकसमुदायांना जमिनीवर बसण्यास सांगितले. नंतर त्याने त्या सात भाकरी व मासे घेऊन उपकार-स्तुती केली, त्या मोडून शिष्यांना दिल्या आणि शिष्यांनी लोकसमुदायांना दिल्या. मग ते सर्व जेवून तृप्त झाले आणि त्यांनी उरलेल्या तुकड्यांच्या सात पाट्या भरून घेतल्या. जेवणारे चार हजार पुरुष होते; त्याशिवाय स्त्रिया व मुले होतीच. मग लोकसमुदायांना निरोप दिल्यावर तो तारवात बसून मगदानाच्या हद्दीत आला.

सामायिक करा
मत्तय 15 वाचा

मत्तय 15:29-39 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

येशू तेथून निघून गालील सरोवराजवळ आला व डोंगरावर चढून तेथे बसला. लोकांच्या झुंडीच्या झुंडी त्याच्याकडे आल्या, त्यांच्याबरोबर लुळेपांगळे, आंधळे, मुके, व्यंग व दुसरे पुष्कळ आजारी लोक होते; त्यांना त्यांनी त्याच्या पायांशी आणून ठेवले आणि येशूने त्यांना बरे केले. मुके बोलतात, लुळेपांगळे धड होतात, लंगडे चालतात व आंधळे पाहतात, हे बघून लोकसमुदायाने आश्‍चर्य व्यक्त केले आणि त्यांनी इस्राएलच्या देवाचा गौरव केला. नंतर येशूने आपल्या शिष्यांना जवळ बोलावून म्हटले, “मला लोकांचा कळवळा येतो, कारण आज तीन दिवस ते माझ्याबरोबर आहेत आणि आता त्यांच्याजवळ खायला काही नाही. मी त्यांना उपाशी घरी पाठवले तर ते वाटेवर मूर्च्छित होतील.” शिष्य त्याला म्हणाले, “एवढा मोठा लोकसमुदाय तृप्त होईल इतक्या भाकरी येथे अरण्यात आम्ही कुठून आणणार?” येशूने त्यांना विचारले, “तुमच्याजवळ किती भाकरी आहेत?” ते म्हणाले, “सात व काही लहान मासे आहेत.” त्याने लोकसमुदायाला जमिनीवर बसायला सांगितले. त्या सात भाकरी व मासे घेऊन त्याने परमेश्वराचे आभार मानले व त्यांचे तुकडे करून ते शिष्यांना दिले आणि शिष्यांनी ते लोकसमुदायाला वाटले. ते सर्व जेवून तृप्त झाले आणि उरलेल्या तुकड्यांच्या सात टोपल्या शिष्यांनी भरून घेतल्या. जेवणारे चार हजार पुरुष होते, शिवाय स्त्रिया व मुले होती ती निराळीच. त्यानंतर लोकसमुदायाला निरोप दिल्यावर तो मचव्यात बसून मगदानाच्या हद्दीत गेला.

सामायिक करा
मत्तय 15 वाचा