मत्तय 15:22-28
मत्तय 15:22-28 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तेव्हा एक कनानी स्त्री त्या भागातून येशूकडे आली. ती स्त्री ओरडून म्हणाली, “प्रभू, दाविदाच्या पुत्रा, माझ्यावर दया करा. माझी मुलगी भूताने फार पिडलेली आहे.” पण येशूने तिला एका शब्दानेही उत्तर दिले नाही, तेव्हा त्याच्या शिष्यांनी येऊन त्यास विनंती केली, “तिला पाठवून द्या, कारण ती आमच्या मागे ओरडत येत आहे.” पण येशूने उत्तर दिले, “मला देवाने फक्त इस्राएलाच्या हरवलेल्या मेंढरांकडे पाठवले आहे.” मग ती स्त्री पुन्हा येशूकडे आली, ती येशूच्या पाया पडली व म्हणाली, “प्रभूजी, मला मदत करा.” परंतु त्याने म्हटले, “मुलाची भाकर घेऊन कुत्र्यास टाकणे योग्य नाही.” ती स्त्री म्हणाली, “होय प्रभूजी, परंतु तरीही कुत्रीही आपल्या धन्याच्या मेजावरून पडलेला चूरा खातात.” तेव्हा येशूने तिला उत्तर दिले, “मुली, तुझा विश्वास मोठा आहे. तुझ्या इच्छेप्रमाणे तुला प्राप्त होवो.” आणि त्याचवेळी तिची मुलगी बरी झाली.
मत्तय 15:22-28 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
एक कनानी स्त्री त्या विभागातून येशूंकडे आली आणि त्यांना विनवणी करून म्हणाली, “प्रभू, दावीद राजाचे पुत्र, माझ्यावर दया करा! माझ्या मुलीला भूतात्म्याने ग्रस्त झाली असून, ती पुष्कळ छळ सहन करीत आहे.” पण येशूंनी एका शब्दानेही तिला उत्तर दिले नाही; तेव्हा त्यांच्या शिष्यांनी त्यांना विनंती केली, “प्रभुजी, तिला पाठवून द्या, कारण ती आपल्यामागे सारखी ओरडत येत आहे.” तेव्हा येशू त्या स्त्रीला म्हणाले, “हरवलेल्या इस्राएली मेंढराकडेच मला पाठविले आहे.” परंतु ती बाई पुढे आली आणि त्यांच्या पाया पडून म्हणाली, “प्रभुजी, मला मदत करा.” येशू म्हणाले, “लेकरांची भाकर काढून कुत्र्यांना घालणे बरोबर नाही.” “हे प्रभू आपले म्हणणे अगदी बरोबर आहे!” स्त्रीने उत्तर दिले, “मुलांच्या मेजाखाली जे तुकडे पडतात ते कुत्रेही खातात.” ते ऐकून येशू तिला म्हणाले, “बाई, तुझा विश्वास फार मोठा आहे! म्हणून तुझी विनंती मान्य करण्यात आली आहे.” आणि त्याचक्षणी तिची मुलगी बरी झाली.
मत्तय 15:22-28 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
आणि पाहा, त्या भागातील एक कनानी बाई येऊन मोठ्याने म्हणू लागली, “अहो प्रभूजी, दाविदाचे पुत्र, माझ्यावर दया करा. माझी मुलगी भुताने फारच जर्जर केली आहे.” तरी त्याने तिला एका शब्दानेही उत्तर दिले नाही. तेव्हा त्याच्या शिष्यांनी जवळ येऊन त्याला विनंती केली, “तिला पाठवून द्या; कारण ती आमच्यामागून ओरडत येत आहे.” त्याने उत्तर दिले, “इस्राएलाच्या घराण्यातील हरवलेल्या मेंढरांखेरीज इतर कोणाकडे मला पाठवलेले नाही.” तेव्हा ती येऊन त्याच्या पाया पडून म्हणाली, “प्रभूजी, मला साहाय्य करा.” त्याने उत्तर दिले, “मुलांची भाकर घेऊन ती घरच्या कुत्र्यांना घालणे हे ठीक नाही!” तिने म्हटले, “खरेच, प्रभूजी; तरी घरची कुत्रीही आपल्या धन्यांच्या मेजावरून पडलेला चुरा खातात.” तेव्हा येशूने तिला उत्तर दिले, “बाई, तुझा विश्वास मोठा, तुझी इच्छा सफळ होवो.” आणि त्याच घटकेस तिची मुलगी बरी झाली.
मत्तय 15:22-28 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
त्या भागातील एक कनानी बाई येऊन ओरडू लागली, “हे प्रभो, दावीदपुत्रा, माझ्यावर दया करा. माझ्या मुलीला एक भूत फारच त्रास देत आहे.” तरी येशूने तिला एका शब्दानेही उत्तर दिले नाही. तेव्हा त्याच्या शिष्यांनी जवळ येऊन त्याला विनंती केली, “तिला पाठवून द्या, कारण ती आपल्यामागून ओरडत येत आहे.” त्याने उत्तर दिले, “इस्राएलच्या घराण्यातील हरवलेल्या मेंढरांसाठीच मला पाठवलेले आहे.” ती येऊन त्याच्या पाया पडून म्हणाली, “प्रभो, मला साहाय्य करा.” त्याने उत्तर दिले, “मुलांची भाकर घेऊन ती घरच्या कुत्र्यांना टाकणे ठीक नाही.” तिने म्हटले, “खरे आहे, प्रभो, तरीही कुत्रीदेखील आपल्या धन्याच्या मेजावरून पडलेला चुरा खातात.” नंतर येशूने तिला उत्तर दिले, “बाई, तुझा विश्वास मोठा आहे. तुझी इच्छा सफळ होवो!” आणि त्याच घटकेस तिची मुलगी बरी झाली!