मत्तय 15:10-20
मत्तय 15:10-20 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तेव्हा लोकांस आपल्याजवळ बोलावून त्याने म्हटले, “ऐका व समजून घ्या. जे तोंडाद्वारे आत जाते ते मनुष्यास अशुद्ध करीत नाही, पण जे तोंडातून बाहेर निघते तेच मनुष्यास अशुद्ध करते.” नंतर शिष्य जवळ येऊन त्यास म्हणाले, “परूश्यांनी जेव्हा हे ऐकले तेव्हा ते रागावले हे आपणाला कळले काय?” पण त्याने उत्तर देऊन म्हटले, “प्रत्येक रोप जे माझ्या स्वर्गातील पित्याने लावले नाही ते उपटले जाईल. त्यांना जाऊ द्या. ते आंधळे वाटाडे आहेत. जर एका आंधळ्याने दुसऱ्या आंधळ्याला वाट दाखवण्याचा प्रयत्न केला तर दोघेही खड्ड्यात पडतील.” पेत्र म्हणाला, “आमच्यासाठी हा दाखला स्पष्ट करून सांगा.” येशूने त्यांना विचारले, “तुम्ही अजूनही अज्ञानी आहात काय? जे काही तोंडात जाते ते सर्व पोटात जाते व मग शौचकूपातून बाहेर टाकले जाते. हे तुम्हास अजून समजत नाही काय? परंतु ज्या गोष्टी तोंडातून बाहेर निघतात त्या अंतःकरणातून येतात व त्याच मनुष्यास अशुद्ध करतात. कारण वाईट विचार, खून, व्यभिचार, जारकर्मे, खोट्या साक्षी, निंदा ही अंतःकरणातून बाहेर निघतात. या गोष्टी मनुष्यास अशुद्ध करतात. परंतु न धुतलेल्या हाताने खाण्याने मनुष्य अशुद्ध होत नाही.”
मत्तय 15:10-20 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
येशूने गर्दीतील लोकांना आपल्याकडे बोलाविले आणि म्हटले, “ऐका आणि समजून घ्या. मनुष्याच्या मुखात जे जाते ते त्यांना अशुद्ध करीत नाही, पण जे त्यांच्या मुखातून बाहेर पडते ते त्यांना अशुद्ध करते.” थोड्या वेळाने त्यांच्या शिष्यांनी त्यांच्याकडे येऊन विचारले, “आपल्या उद्गारांनी परूशी लोकांची मने दुखावली आहेत हे तुम्हाला कळले काय?” येशू म्हणाले, “माझ्या स्वर्गीय पित्याने न लावलेले प्रत्येक झाड उपटून टाकण्यात येईल. त्यांच्याकडे लक्ष देऊ नका; ते आंधळे मार्गदर्शक आहेत. जर एक आंधळा मनुष्य दुसर्या आंधळ्याला वाट दाखवेल, तर ते दोघेही खाचेत पडतील.” पेत्र म्हणाला, “आम्हाला हा दाखला स्पष्ट करून सांगा.” “तुम्ही अजूनही अज्ञानी आहात काय?” येशूंनी त्यांना विचारले. “तुम्हाला हे समजत नाही काय की, जे मुखात जाते ते पोटात उतरते आणि शरीरातून बाहेर पडते? परंतु जे शब्द मुखातून बाहेर येतात ते हृदयातून येतात आणि तेच मनुष्याला अशुद्ध करतात. कारण हृदयातून दुष्ट विचार, खून, जारकर्म, व्यभिचार, चोरी, खोटी साक्ष, निंदा ही बाहेर पडतात; आणि हेच मनुष्याला अशुद्ध करतात. परंतु हात धुतल्याशिवाय अन्न खाल्याने ते अशुद्ध होत नाहीत.”
मत्तय 15:10-20 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तेव्हा त्याने लोकसमुदायाला आपल्याकडे बोलावून म्हटले, “ऐका व समजून घ्या : जे तोंडात जाते ते माणसाला विटाळवत नाही; तर जे तोंडातून निघते ते माणसाला विटाळवते.” नंतर शिष्य येऊन त्याला म्हणाले, “हे वचन ऐकून परूशी नाराज झाले, हे आपल्याला कळले काय?” त्याने उत्तर दिले, “माझ्या स्वर्गातील पित्याने लावले नाही असे प्रत्येक रोप उपटले जाईल. त्यांना असू द्या; ते आंधळ्यांचे आंधळे वाटाडे आहेत आणि आंधळा आंधळ्याला नेऊ लागला तर दोघेही खाचेत पडतील.” पेत्र त्याला म्हणाला, “हा दाखला आम्हांला समजावून सांगा.” तो म्हणाला, “तुम्हीदेखील अज्ञानी आहात काय? जे काही तोंडात जाते ते पोटात उतरते व बाहेर शौचकूपात टाकण्यात येते, हे तुम्हांला समजत नाही काय? जे तोंडातून निघते ते अंतःकरणातून येते व माणसाला विटाळवते. कारण अंतःकरणातूनच दुष्ट कल्पना, खून, व्यभिचार, जारकर्मे, चोर्या, खोट्या साक्षी, शिवीगाळी ही निघतात. ह्या गोष्टी माणसाला विटाळवतात; न धुतलेल्या हातांनी जेवणे हे माणसाला विटाळवत नाही.”
मत्तय 15:10-20 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
नंतर येशूने लोकसमुदायाला आपल्याकडे बोलावून म्हटले, “ऐका व समजून घ्या. जे तोंडातून आत जाते ते माणसाला अशुद्ध करत नाही, तर जे तोंडातून बाहेर निघते ते माणसाला अशुद्ध करते.” नंतर शिष्य येऊन त्याला म्हणाले, “हे वचन ऐकून परुश्यांच्या भावना दुखावल्या गेल्या, हे आपल्याला कळले काय?” त्याने उत्तर दिले, “माझ्या स्वर्गातील पित्याने लावले नाही, असे प्रत्येक रोपटे उपटले जाईल. त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, ते आंधळ्यांचे आंधळे वाटाड्ये आहेत आणि आंधळा आंधळ्याला नेऊ लागला तर दोघेही खड्ड्यात पडतील.” परंतु पेत्र त्याला म्हणाला, “हा दाखला आम्हांला समजावून सांगा.” तेव्हा तो म्हणाला, “तुम्हीदेखील अज्ञानी आहात काय? जे काही तोंडात जाते, ते पोटात उतरते व नंतर पुढे शरीराबाहेर टाकण्यात येते, हे तुम्हांला समजत नाही काय? मात्र जे तोंडातून निघते ते अंतःकरणातून येते व माणसाला अशुद्ध करते. अंतःकरणातूनच दुष्ट कल्पना, खून, व्यभिचार आणि लैंगिक अनैतिकता, तसेच चोऱ्या, खोट्या साक्षी व निंदानालस्ती निघतात. ह्या गोष्टी माणसाला अशुद्ध करतात. न धुतलेल्या हातांनी जेवणे माणसाला अशुद्ध करत नाही.”