YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 14:22-36

मत्तय 14:22-36 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

मी लोकसमुदायास निरोप देत आहे तो तुम्ही तारवात बसून माझ्यापुढे पलीकडे जा असे म्हणून त्याने लगेच शिष्यांना पाठवून दिले. लोकांस पाठवून दिल्यावर तो प्रार्थना करण्यास एकांत ठिकाणी डोंगरावर गेला, रात्र झाली तेव्हा तो तेथे एकटाच होता. पण तारू सरोवरामध्ये होते. इकडे वारा विरूद्ध दिशेने वाहत असल्यामुळे तारू लाटांनी हेलकावत होते व त्यामुळे ते त्याच्यावर ताबा ठेवू शकत नव्हते. तेव्हा रात्रीच्या चौथ्या प्रहरी येशू त्याच्याकडे आला. तो पाण्यावरून चालत होता. शिष्य त्यास पाण्यावरून चालताना पाहून घाबरून गेले व म्हणाले, हे “भूत आहे.” आणि ते भिऊन ओरडले पण येशू लगेच त्यांना म्हणाला, “धीर धरा, मी आहे; भिऊ नका.” पेत्र म्हणाला, प्रभूजी जर आपण असाल तर मला पाण्यावरून आपणाकडे येण्यास सांगा. येशू म्हणाला, “ये.” मग पेत्र तारवातून उतरून व पाण्यावर चालत येशूकडे जाऊ लागला. पण तो पाण्यावर चालत असताना जोराचा वारा पाहून तो भ्याला आणि बुडू लागला असता ओरडून म्हणाला “प्रभूजी, मला वाचवा.” आणि लगेच येशूने आपला हात पुढे करून त्यास धरले व म्हटले, “अरे अल्पविश्वासी, तू संशय का धरलास?” मग येशू व पेत्र होडीत गेल्यावर वारा थांबला. तेव्हा जे शिष्य होडीत होते ते त्यास नमन करून म्हणाले, “तुम्ही खरोखर देवाचे पुत्र आहात.” नंतर ते पलीकडे गनेसरेताच्या भागात गेले. तेथील लोकांनी येशूला ओळखून व सभोवतालच्या सर्व प्रदेशात निरोप पाठवला व त्यांनी सर्व प्रकारच्या आजाऱ्यांस त्याच्याकडे आणले. आणि आम्हास आपल्या वस्त्राच्या काठाला स्पर्श करू द्यावा, अशी विनंती केली, तेव्हा जितक्यांनी स्पर्श केला तितके बरे झाले.

सामायिक करा
मत्तय 14 वाचा

मत्तय 14:22-36 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

लगेच येशूंनी आपल्या शिष्यांना होडीत बसून पुढे सरोवराच्या पैलतीराला जाण्यास सांगितले, आणि ते स्वतः लोकांना निरोप देण्यासाठी मागे राहिले. त्यांना निरोप दिल्यावर, येशू प्रार्थना करण्यासाठी डोंगरावर गेले. रात्र झाली तरी तेथे ते एकांती होते. तेव्हा होडी किनार्‍यापासून बरीच दूर गेली होती आणि वारा त्यांच्याविरुद्ध दिशेने वाहत असल्यामुळे लाटांनी हेलकावे खात होती. पहाटेच्या सुमारास येशू पाण्यावरून चालत त्यांच्याकडे आले. शिष्यांनी येशूंना सरोवरावरून चालताना पाहिले, तेव्हा ते फार घाबरले आणि ओरडून म्हणाले, “हे भूत आहे.” पण येशू त्यांना ताबडतोब म्हणाले, “धीर धरा, मीच आहे. भिऊ नका.” मग पेत्र म्हणाला, “प्रभुजी, जर आपण असाल, तर पाण्यावरून चालत आपल्याकडे येण्यास मला सांगा.” ते म्हणाले “ये.” तेव्हा पेत्र होडीतून उतरला आणि पाण्यावरून येशूंकडे चालत जाऊ लागला. परंतु उंच लाटांकडे त्याचे लक्ष गेले, तेव्हा तो घाबरला आणि लागला, “प्रभुजी, मला वाचवा!” त्याने आरोळी मारली. तत्क्षणी येशूंनी हात पुढे करून त्याला धरले. येशू म्हणाले, “अल्पविश्वासी तू संशय का धरलास?” मग ते होडीत चढले आणि वादळ शांत झाले आणि वारा थांबला. होडीत असलेले दुसरे शिष्य त्यांच्या पाया पडून म्हणाले, “खरोखर तुम्ही परमेश्वराचे पुत्र आहात.” ते पलीकडे गेल्यावर गनेसरेत येथे उतरले. तेथील लोकांनी येशूंना ओळखले व आसपासच्या सर्व भागात संदेश पाठविला. लोकांनी सर्व आजारी लोकांना त्यांच्याकडे आणले. “तुमच्या झग्याच्या काठाला तरी आम्हाला शिवू द्या.” अशी त्यांनी त्यांना विनंती केली आणि जितक्यांनी त्यांना स्पर्श केला तितके सर्व बरे झाले.

सामायिक करा
मत्तय 14 वाचा

मत्तय 14:22-36 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

नंतर, ‘मी लोकसमुदायांना निरोप देतो आहे तोपर्यंत तुम्ही तारवात बसून माझ्यापुढे पलीकडे जा,’ असे म्हणून येशूने शिष्यांना लगेच पाठवून दिले. मग लोकसमुदायांना निरोप दिल्यावर तो प्रार्थना करण्यास डोंगरावर एकान्तात गेला आणि रात्र झाल्यावरही तो तेथे एकटा होता. इकडे वारा तोंडचा असल्यामुळे किनार्‍यापासून बर्‍याच अंतरावर तारू लाटांनी हैराण झालेले होते. तेव्हा रात्रीच्या चवथ्या प्रहरी येशू समुद्रावरून चालत त्यांच्याकडे आला. शिष्य त्याला समुद्रावरून चालताना पाहून घाबरून गेले व म्हणाले, “भूत आहे!” आणि ते भिऊन ओरडले. परंतु येशू त्यांना लगेच म्हणाला, “धीर धरा, मी आहे; भिऊ नका.” तेव्हा पेत्राने उत्तर दिले, “प्रभूजी, आपण असाल तर पाण्यावरून आपणाकडे येण्यास मला सांगा.” त्याने म्हटले, “ये.” तेव्हा पेत्र येशूकडे जाण्यासाठी तारवातून उतरून पाण्यावर चालू लागला; परंतु वारा पाहून तो भ्याला आणि बुडू लागला असता ओरडून म्हणाला, “प्रभूजी, मला वाचवा.” येशूने तत्क्षणी हात पुढे करून त्याला धरले व म्हटले, “अरे अल्पविश्वासी, तू संशय का धरलास?” मग ते तारवात चढल्यावर वारा पडला. तेव्हा जे तारवात होते ते त्याच्या पाया पडून म्हणाले, “आपण खरोखर देवाचे पुत्र आहात.” नंतर ते पलीकडे जाऊन गनेसरेताच्या भागात गेले. आणि तेथल्या लोकांनी त्याला ओळखून आपल्या आसपासच्या अवघ्या प्रांतात माणसे पाठवून सर्व दुखणाइतांना त्याच्याकडे आणले; आणि केवळ आपल्या वस्त्राच्या गोंड्यास आम्हांला स्पर्श करू द्या, अशी त्यांनी त्याला विनंती केली; तेव्हा जितक्यांनी स्पर्श केला तितके बरे झाले.

सामायिक करा
मत्तय 14 वाचा

मत्तय 14:22-36 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

“मी लोकसमुदायाला निरोप देत आहे तोवर तुम्ही तारवात बसून माझ्यापुढे सरोवराच्या पलीकडे जा”, असे म्हणून त्याने शिष्यांना पाठवून दिले. लोकसमुदायाला निरोप दिल्यावर तो प्रार्थना करायला डोंगरावर एकांती गेला आणि रात्र झाल्यावरही तो तेथे एकटा होता. काठापासून बरेच दूर आलेले तारू लाटांमुळे हेलकावे खाऊ लागले, कारण वारा विरुद्ध दिशेचा होता. पहाटेस तीन ते सहाच्या दरम्यान तो पाण्यावर चालत त्यांच्याकडे आला. शिष्य त्याला पाण्यावर चालताना पाहून घाबरून ओरडू लागले, “भूत आहे.” परंतु येशू त्यांना लगेच म्हणाला, “धीर धरा, मी आहे. भिऊ नका.” पेत्र पुढे होऊन म्हणाला, “प्रभो, खरोखरच आपण असाल तर पाण्यावरून आपणाकडे यायची मला आज्ञा करा.” त्याने म्हटले, “ये.” तेव्हा पेत्र येशूकडे जाण्यासाठी तारवातून उतरून पाण्यावरून चालू लागला. परंतु जोरदार वारा पाहून तो भ्याला आणि बुडू लागला तसा तो ओरडून म्हणाला, “प्रभो, मला वाचवा.” येशूने तत्क्षणी हात पुढे करून त्याला धरले व म्हटले, “अरे अल्पविश्वासी, तू संशय का धरलास?” ते दोघे तारवात चढल्यावर वारा पडला. जे तारवात होते, ते येशूला नमन करून म्हणाले, “आपण खरोखर देवाचे पुत्र आहात.” ते सरोवराच्या पलीकडे जाऊन गनेसरेतच्या भागात किनाऱ्यावर उतरले. तेथल्या लोकांनी त्याला ओळखून आसपासच्या परिसरात माणसे पाठवून सर्व आजारी लोकांना त्याच्याकडे आणले. “केवळ तुमच्या वस्त्राच्या किनारीला आम्हांला स्पर्श करू द्या”, अशी त्यांनी येशूला विनंती केली आणि जेवढ्या लोकांनी त्याला स्पर्श केला, तेवढे लोक बरे झाले.

सामायिक करा
मत्तय 14 वाचा