मत्तय 14:22-29
मत्तय 14:22-29 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मी लोकसमुदायास निरोप देत आहे तो तुम्ही तारवात बसून माझ्यापुढे पलीकडे जा असे म्हणून त्याने लगेच शिष्यांना पाठवून दिले. लोकांस पाठवून दिल्यावर तो प्रार्थना करण्यास एकांत ठिकाणी डोंगरावर गेला, रात्र झाली तेव्हा तो तेथे एकटाच होता. पण तारू सरोवरामध्ये होते. इकडे वारा विरूद्ध दिशेने वाहत असल्यामुळे तारू लाटांनी हेलकावत होते व त्यामुळे ते त्याच्यावर ताबा ठेवू शकत नव्हते. तेव्हा रात्रीच्या चौथ्या प्रहरी येशू त्याच्याकडे आला. तो पाण्यावरून चालत होता. शिष्य त्यास पाण्यावरून चालताना पाहून घाबरून गेले व म्हणाले, हे “भूत आहे.” आणि ते भिऊन ओरडले पण येशू लगेच त्यांना म्हणाला, “धीर धरा, मी आहे; भिऊ नका.” पेत्र म्हणाला, प्रभूजी जर आपण असाल तर मला पाण्यावरून आपणाकडे येण्यास सांगा. येशू म्हणाला, “ये.” मग पेत्र तारवातून उतरून व पाण्यावर चालत येशूकडे जाऊ लागला.
मत्तय 14:22-29 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
लगेच येशूंनी आपल्या शिष्यांना होडीत बसून पुढे सरोवराच्या पैलतीराला जाण्यास सांगितले आणि ते स्वतः लोकांना निरोप देण्यासाठी मागे राहिले. त्यांना निरोप दिल्यावर, येशू प्रार्थना करण्यासाठी डोंगरावर गेले. रात्र झाली तरी तिथे ते एकांती होते. तेव्हा होडी किनार्यापासून बरीच दूर गेली होती आणि वारा त्यांच्याविरुद्ध दिशेने वाहत असल्यामुळे लाटांनी हेलकावे खात होती. पहाटेच्या सुमारास येशू पाण्यावरून चालत त्यांच्याकडे आले. शिष्यांनी येशूंना सरोवरावरून चालताना पाहिले, तेव्हा ते फार घाबरले आणि ओरडून म्हणाले, “हे भूत आहे.” पण येशू त्यांना तत्काळ म्हणाले, “धीर धरा, मीच आहे. भिऊ नका.” मग पेत्र म्हणाला, “प्रभूजी, जर आपण असाल, तर पाण्यावरून चालत आपल्याकडे येण्यास मला सांगा.” ते म्हणाले “ये.” तेव्हा पेत्र होडीतून उतरला आणि पाण्यावरून येशूंकडे चालत जाऊ लागला.
मत्तय 14:22-29 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
नंतर, ‘मी लोकसमुदायांना निरोप देतो आहे तोपर्यंत तुम्ही तारवात बसून माझ्यापुढे पलीकडे जा,’ असे म्हणून येशूने शिष्यांना लगेच पाठवून दिले. मग लोकसमुदायांना निरोप दिल्यावर तो प्रार्थना करण्यास डोंगरावर एकान्तात गेला आणि रात्र झाल्यावरही तो तेथे एकटा होता. इकडे वारा तोंडचा असल्यामुळे किनार्यापासून बर्याच अंतरावर तारू लाटांनी हैराण झालेले होते. तेव्हा रात्रीच्या चवथ्या प्रहरी येशू समुद्रावरून चालत त्यांच्याकडे आला. शिष्य त्याला समुद्रावरून चालताना पाहून घाबरून गेले व म्हणाले, “भूत आहे!” आणि ते भिऊन ओरडले. परंतु येशू त्यांना लगेच म्हणाला, “धीर धरा, मी आहे; भिऊ नका.” तेव्हा पेत्राने उत्तर दिले, “प्रभूजी, आपण असाल तर पाण्यावरून आपणाकडे येण्यास मला सांगा.” त्याने म्हटले, “ये.” तेव्हा पेत्र येशूकडे जाण्यासाठी तारवातून उतरून पाण्यावर चालू लागला
मत्तय 14:22-29 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
“मी लोकसमुदायाला निरोप देत आहे तोवर तुम्ही तारवात बसून माझ्यापुढे सरोवराच्या पलीकडे जा”, असे म्हणून त्याने शिष्यांना पाठवून दिले. लोकसमुदायाला निरोप दिल्यावर तो प्रार्थना करायला डोंगरावर एकांती गेला आणि रात्र झाल्यावरही तो तेथे एकटा होता. काठापासून बरेच दूर आलेले तारू लाटांमुळे हेलकावे खाऊ लागले, कारण वारा विरुद्ध दिशेचा होता. पहाटेस तीन ते सहाच्या दरम्यान तो पाण्यावर चालत त्यांच्याकडे आला. शिष्य त्याला पाण्यावर चालताना पाहून घाबरून ओरडू लागले, “भूत आहे.” परंतु येशू त्यांना लगेच म्हणाला, “धीर धरा, मी आहे. भिऊ नका.” पेत्र पुढे होऊन म्हणाला, “प्रभो, खरोखरच आपण असाल तर पाण्यावरून आपणाकडे यायची मला आज्ञा करा.” त्याने म्हटले, “ये.” तेव्हा पेत्र येशूकडे जाण्यासाठी तारवातून उतरून पाण्यावरून चालू लागला.