YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 14:1-18

मत्तय 14:1-18 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

त्यावेळी चौथाई देशांचा राजा हेरोदाने येशूची किर्ती ऐकली. तेव्हा त्याने आपल्या चाकरांना म्हटले, “येशू हा बाप्तिस्मा करणारा योहान आहे. त्यास मरण पावलेल्यातून उठविण्यात आले आहे म्हणून याच्याठायी सामर्थ्य कार्य करीत आहे.” हेरोदाने आपला भाऊ फिलिप्प याची पत्नी हेरोदिया हिच्यामुळे योहानाला अटक करून तुरूंगात टाकले होते. कारण योहान त्यास सांगत होता, “तू तिला पत्नी बनवावे हे देवाच्या नियमशास्त्राच्या योग्य नाही.” हेरोद त्यास मारावयास पाहत होता, पण तो लोकांस भीत होता कारण लोकांचा असा विश्वास होता की, योहान संदेष्टा आहे. हेरोदाच्या वाढदिवशी हेरोदियाच्या मुलीने दरबारात नाच करून हेरोदाला खूश केले. त्यामुळे त्याने शपथ वाहून ती जे काही मागेल ते देण्याचे अभिवचन तिला दिले. तिच्या आईच्या सांगण्यावरून ती म्हणाली, “बाप्तिस्मा करणारा योहानाचे शीर तबकात घालून मला इथे आणून द्या.” हेरोद राजाला फार वाईट वाटले. तरी त्याने आपल्या शपथपूर्वक दिलेल्या वचनामुळे व आमंत्रित लोकांमुळे ते द्यावयाची आज्ञा केली. आणि त्याने तुरुंगात माणसे पाठवून योहानाचे शीर उडवले. मग त्यांनी त्याचे शीर तबकात घालून त्या मुलीला आणून दिले. तिने ते आपल्या आईकडे आणले. मग त्याच्या शिष्यांनी येऊन त्याचे प्रेत उचलून नेले व त्यास पुरले आणि त्यांनी जाऊन जे घडले ते येशूला सांगितले. मग ते ऐकून येशू तेथून होडीत बसून निवांत जागी निघून गेला. हे ऐकून लोकसमुदाय नगरांतून त्याच्यामागे पायीपायी गेले. मग जेव्हा त्याने मोठा लोकसमुदाय पाहिला. तेव्हा त्यास त्यांच्याविषयी कळवळा आला व जे आजारी होते त्यांना त्याने बरे केले. मग संध्याकाळ झाल्यावर त्याचे शिष्य त्याच्याकडे आले आणि म्हणाले, “ही अरण्यातील जागा आहे आणि भोजनाची वेळ होऊन गेली आहे. लोकांनी गावामध्ये जाऊन स्वतःकरता अन्न विकत घ्यावे म्हणून त्यांना पाठवून द्या.” परंतु येशू त्यांना म्हणाला, “त्यांना जाण्याची गरज नाही. तुम्हीच त्यांना काही खायला द्या.” ते त्यास म्हणाले, आमच्याजवळ केवळ “पाच भाकरी व दोन मासे आहेत.” तो म्हणाला, “ते माझ्याकडे आणा.”

सामायिक करा
मत्तय 14 वाचा

मत्तय 14:1-18 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

त्यावेळी प्रांताधिकारी हेरोद याने येशूंविषयी ऐकले, तो आपल्या सेवकांना म्हणाला, “हा मेलेल्यातून जिवंत होऊन आलेला बाप्तिस्मा करणारा योहानच आहे! म्हणूनच आश्चर्यकर्म करण्याचे सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे.” आता हेरोदाने आपली पत्नी हेरोदिया जी पूर्वी त्याचा भाऊ फिलिप्प याची पत्नी होती हिच्या मागणीनुसार योहानाला बांधून तुरुंगात ठेवले होते. कारण योहान त्याला म्हणत असे: “तू तिला ठेवावे हे कायद्याने योग्य नाही.” म्हणून हेरोद त्याचा जीव घेण्‍यास पाहत होता, पण लोकांना तो भीत होता, कारण योहान संदेष्टा आहे असे लोक मानत होते. हेरोदाच्या वाढदिवशी हेरोदियेच्या कन्येने पाहुण्यांसाठी नृत्य करून हेरोदाला खूप संतुष्ट केले. त्यामुळे वचन देऊन ती मागेल ते देण्याची त्याने शपथ वाहिली. तिने आपल्या आईच्या संकेताप्रमाणे म्हटले, “बाप्तिस्मा करणार्‍या योहानाचे शिर एका तबकात मला द्या.” तेव्हा राजा अस्वस्थ झाला, पण आपल्या शपथेमुळे आणि भोजनाला आलेल्या पाहुण्यांमुळे त्याने मुलीची मागणी अंमलात आणण्यासाठी हुकूम दिला. आणि योहानाचा तुरुंगात शिरच्छेद करण्यात आला. आणि त्याचे शिर एका तबकात आणून त्या मुलीला देण्यात आले व तिने ते आपल्या आईला दिले. योहानाचे शिष्य आले आणि त्यांनी त्याचे शव घेतले आणि पुरले. नंतर जे घडले ते त्यांनी येशूंना सांगितले. जे घडले ते ऐकल्यानंतर, येशू एका होडीत बसून एकटेच दूर एकांतस्थळी गेले, परंतु हे गर्दीतल्या लोकांनी ऐकले, तेव्हा शहरातील लोक त्यांच्याकडे पायी चालत आले. जेव्हा येशू होडीतून उतरले आणि त्यांनी मोठा समुदाय पाहिला, तेव्हा त्यांना कळवळा आला व त्यांनी आजार्‍यांना बरे केले. संध्याकाळ झाल्यावर शिष्य येशूंकडे येऊन म्हणाले, “ही ओसाड जागा आहे शिवाय उशीरही होत आहे. लोकांना आसपासच्या खेड्यात आणि गावात जाऊन काही अन्न विकत घ्यावे म्हणून त्यांना निरोप द्या.” यावर येशूंनी उत्तर दिले, “त्यांना जाण्याची गरज नाही; तुम्ही त्यांना काहीतरी खावयास द्या.” त्यांनी उत्तर दिले, “आमच्याजवळ पाच भाकरी आणि दोन मासे आहेत.” येशू म्हणाले, “ते माझ्याकडे आणा.”

सामायिक करा
मत्तय 14 वाचा

मत्तय 14:1-18 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

त्या वेळी मांडलिक हेरोदाने येशूची कीर्ती ऐकली, आणि आपल्या सेवकांना म्हटले, “हा बाप्तिस्मा करणारा योहान आहे; हा मेलेल्यातून उठवण्यात आला आहे म्हणून ह्याच्या ठायी अद्भुत कृत्ये करण्याचे हे सामर्थ्य कार्य करत आहे.” कारण हेरोदाने आपला भाऊ फिलिप्प ह्याची बायको हेरोदिया हिच्यासाठी योहानाला धरून व बांधून कैदेत टाकले होते; कारण योहानाने त्याला म्हटले होते की, “तू तिला ठेवावे हे तुला योग्य नाही.” आणि तो त्याला जिवे मारण्यास पाहत असूनही लोकांना भीत होता, कारण ते त्याला संदेष्टा मानत असत. नंतर हेरोदाचा वाढदिवस आला तेव्हा हेरोदियाच्या कन्येने दरबारात नाच करून हेरोदाला खूश केले. त्यावरून त्याने तिला शपथपूर्वक वचन दिले की, “जे काही तू मागशील ते मी तुला देईन.” मग तिच्या आईने तिला पढवल्याप्रमाणे ती म्हणाली, “बाप्तिस्मा करणार्‍या योहानाचे शीर तबकात घालून मला येथे आणून द्या.” तेव्हा राजाला वाईट वाटले; तरी आपल्या शपथांमुळे व जे पंक्तीस बसले होते त्यांच्यामुळे त्याने ते देण्याची आज्ञा केली; आणि माणूस पाठवून तुरुंगात योहानाचा शिरच्छेद करवला. मग त्याचे शीर तबकात घालून मुलीला आणून दिले आणि तिने ते आईजवळ नेले. नंतर त्याच्या शिष्यांनी येऊन त्याचे प्रेत उचलून नेले व त्याला पुरले आणि जाऊन येशूला हे वर्तमान कळवले. ते ऐकून येशू तेथून तारवात बसून निघाला आणि अरण्यात एकान्ती गेला; हे ऐकून लोकसमुदाय नगरातून त्याच्यामागे पायीपायी गेले. मग येशूने बाहेर येऊन मोठा लोकसमुदाय पाहिला; तेव्हा त्यांचा त्याला कळवळा आला व त्यांच्यातील दुखणेकर्‍यांना त्याने बरे केले. दिवस उतरल्यावर त्याचे शिष्य त्याच्याकडे येऊन म्हणाले, “ही अरण्यातली जागा आहे व वेळ होऊन गेली आहे; लोकांनी गावांत जाऊन स्वतःकरता खायला विकत घ्यावे म्हणून त्यांना निरोप द्या.” येशू त्यांना म्हणाला, “त्यांना जाण्याची गरज नाही; तुम्हीच त्यांना खायला द्या.” ते त्याला म्हणाले, “आमच्याजवळ केवळ पाच भाकरी व दोन मासे आहेत.” तो म्हणाला, “ते इकडे माझ्याजवळ आणा.”

सामायिक करा
मत्तय 14 वाचा

मत्तय 14:1-18 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

त्या वेळी हेरोद राजाने येशूची कीर्ती ऐकली आणि आपल्या सेवकांना म्हटले, “हा बाप्तिस्मा देणारा योहान आहे. तो मेलेल्यांतून उठला आहे आणि म्हणून ही सामर्थ्यशाली कृत्ये करत आहे.” हेरोदने त्याचा भाऊ फिलिप ह्याची बायको हेरोदिया हिच्यासाठी योहानला बांधून कैदेत टाकले होते; कारण योहानने त्याला म्हटले होते, “तू तिला ठेवावेस हे योग्य नाही.” तेव्हापासून तो त्याला ठार मारायला पाहात होता, पण तो यहुदी लोकांना भीत होता कारण ते योहानला संदेष्टा मानत असत. पुढे हेरोदचा वाढदिवस आला तेव्हा हेरोदियाच्या कन्येने दरबारात नृत्य करून हेरोदला खूष केले. त्यावरून त्याने तिला शपथपूर्वक वचन दिले, “तू जे काही मागशील, ते मी तुला देईन.” तिच्या आईने तिला पढवल्याप्रमाणे ती म्हणाली, “बाप्तिस्मा देणाऱ्या योहानचे शिर तबकात घालून मला आत्ता येथे आणून द्या.” राजाला वाईट वाटले, परंतु सर्व पाहुण्यांच्या देखत वाहिलेल्या शपथेमुळे त्याने ते द्यायचा आदेश दिला आणि माणूस पाठवून तुरुंगात योहानचा शिरच्छेद करविला. त्याचे शिर तबकात घालून मुलीला देण्यात आले आणि तिने ते आपल्या आईला दिले. नंतर योहानचे शिष्य आले आणि त्यांनी त्याचा मृतदेह उचलून नेला व पुरला आणि येशूला ही बातमी जाऊन कळवली. योहानविषयीचे वृत्त ऐकून येशू तेथून तारवात बसून अरण्यात एकांती जाण्यासाठी निघाला. हे समजताच आपापल्या नगरांतून लोक त्याच्या मागे पायी गेले. तो बाहेर आला तेव्हा त्याने विशाल लोकसमुदाय पाहिला. त्याला त्याचा कळवळा आला व त्यांच्यांतील आजारी लोकांना त्याने बरे केले. दिवस उतरल्यावर त्याचे शिष्य त्याच्याकडे येऊन म्हणाले, “ही एकाकी जागा आहे व वेळ होऊन गेली आहे. लोकांनी गावात जाऊन स्वतःकरता खायला विकत घ्यावे म्हणून त्यांना निरोप द्या.” येशू त्यांना म्हणाला, “त्यांना जायची गरज नाही, तुम्ही त्यांना खायला द्या.” ते त्याला म्हणाले, “आमच्याजवळ केवळ पाच भाकरी व दोन मासे आहेत.” तो म्हणाला, “ते इकडे माझ्याजवळ आणा.”

सामायिक करा
मत्तय 14 वाचा