YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 13:3-53

मत्तय 13:3-53 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

मग त्याने त्यांना दाखल्यांनी पुष्कळ गोष्टी सांगितल्या तो म्हणाला “पाहा, पेरणारा पेरणी करावयास निघाला; आणि तो पेरणी करीत असता काही बी वाटेवर पडले व पाखरांनी येऊन ते खाऊन टाकले. काही खडकाळ जमिनीवर पडले, तेथे फारशी माती नव्हती आणि माती खोल नसल्यामुळे ते लवकर उगवले; आणि सूर्य वर आला तेव्हा ते करपले व त्यास मूळ नव्हते म्हणून ते वाळून गेले. काही काटेरी झाडांमध्ये पडले; मग काटेरी झाडानी वाढून त्याची वाढ खुंटवली. काही चांगल्या जमिनीत पडले; मग त्याचे कोठे शंभरपट, कोठे साठपट तर कोठे तीसपट, असे पीक आले. ज्याला कान आहेत तो ऐको.” मग शिष्य जवळ येऊन त्यास म्हणाले, आपण त्याच्याबरोबर दाखल्यानी का बोलता? त्याने त्यास उत्तर दिले, “स्वर्गाच्या राज्याची गुपीते जाणण्याचे दान तुम्हास दिले आहे, परंतु त्यांना दिलेले नाही. कारण ज्या कोणाजवळ आहे त्यास दिले जाईल व त्यास भरपूर होईल; ज्या कोणाजवळ नाही त्याचे जे असेल ते देखील त्याच्यापासून काढून घेतले जाईल. यास्तव मी त्याच्याबरोबर दाखल्यांनी बोलतो; कारण ते पाहत असता पाहत नाहीत आणि ऐकत असता ऐकत नाहीत व त्यांना समजतही नाही. यशयाचा संदेश त्याच्याविषयी पूर्ण होत आहे, तो असा की, तुम्ही ऐकाल तर खरे, परंतु तुम्हास समजणारच नाही, व पाहाल तर खरे, परंतु तुम्हास दिसणारच नाही; कारण या लोकांचे अंतःकरण जड झाले आहे, ते कानानी मंद ऐकतात आणि त्यांनी डोळे मिटून घेतले आहेत; यासाठी की, त्यांनी डोळ्यांनी पाहू नये, कानांनी ऐकू नये, अंतःकरणाने समजून नये आणि वळू नये आणि मी त्यांना बरे करू नये. पण तुमचे डोळे धन्य आहेत, कारण ते पाहत आहे; आणि तुमचे कान, कारण ते ऐकत आहेत. मी तुम्हास खरे सांगतो की, तुम्ही जे पाहत आहात ते पाहावयास पुष्कळ संदेष्टे व नीतिमान जन उत्कंठित होते, तरी त्यांना पाहण्यास मिळाले नाही; आणि तुम्ही जे ऐकता ते ऐकावयास ते उत्कंठित होते, तरी त्यांना ऐकण्यास मिळाले नाही.” आता तुम्ही पेरणाऱ्याचा दाखला ऐकून घ्या. वाटेवर पेरलेला तो हा आहे की, कोणी राज्याचे वचन ऐकतो पण ते त्यास समजत नाही, तेव्हा तो दुष्ट येऊन त्याच्या अंतःकरणात पेरलेले ते हिरावून घेतो; खडकावरील पेरलेला तो हा आहे की, तो वचन ऐकतो व ते लगेच आनंदाने स्वीकारतो; परंतु त्यास मूळ नसल्याकारणाने तो थोडाच वेळ टिकतो आणि वचनामुळे संकट आले किंवा छळ झाला म्हणजे तो लागलाच अडखळतो. काटेरी झाडामध्ये पेरलेला तो हा आहे की, तो वचन ऐकतो, परंतु संसाराची चिंता व द्रव्याचा मोह ही वचनाची वाढ खुंटवतात आणि तो निष्फळ होतो. चांगल्या जमिनीत पेरलेला तो हा आहे की, तो वचन ऐकून ते समजतो; तो फळ देतोच देतो; कोणी शंभरपट, कोणी साठपट, तर कोणी तीसपट असे देतो. येशूने त्यांच्यापुढे दुसरा एक दाखला मांडला. “कोणी एका मनुष्याने आपल्या शेतात चांगले बी पेरले त्याच्यासारखे स्वर्गाचे राज्य आहे. लोक झोपेत असताना त्याचा शत्रू येऊन गव्हामध्ये निदण पेरून निघून गेला; पण जेव्हा पाला फुटला व दाणे आले तेव्हा निदण ही दिसले. तेव्हा घरधन्याच्या दासांनी येऊन त्यास म्हटले, महाराज, आपण आपल्या शेतामध्ये चांगले बी पेरले ना? तर मग त्यामध्ये निदण कोठून आले? तो त्यांना म्हणाला हे काम कोणा शत्रूचे आहे. दासांनी त्यास म्हटले, तर आम्ही जाऊन ते काढून टाकावे अशी आपली इच्छा आहे काय? तो म्हणाला, नाही. तुम्ही निदण गोळा करताना त्याच्याबरोबर कदाचित गहू ही उपटाल. कापणीपर्यंत दोन्ही बरोबर वाढू द्या; मग कापणीच्या वेळेस मी कापणाऱ्यास सांगेन की, पहिल्याने निदण गोळा करा आणि जाळण्यासाठी त्याच्या पेढ्या बांधा; परंतु गहू मा‍झ्या कोठारात साठवा.” त्याने त्याच्यापुढे आणखी एक दाखला मांडला की, “स्वर्गाचे राज्य मोहरीच्या दाण्यासारखे आहे; तो कोणाएका मनुष्याने घेऊन आपल्या शेतात लावला; तो तर सर्व दाण्यामध्ये लहान आहे; तरी वाढल्यावर भाजीपाल्यापेक्षा मोठा होऊन त्याचे असे झाड होते की, आकाशातील पाखर त्याच्या फांद्यात वस्ती करतात.” त्याने त्यांना आणखी एक दाखला सांगितला की, “स्वर्गाचे राज्य खमिरासारखे आहे; ते एका स्त्रीने घेऊन तीन मापे पीठामध्ये लपवून ठेवले, तेणेकरून शेवटी ते सर्व पीठ फुगून गेले.” या सर्व गोष्टी येशूने दाखल्यानी लोकसमुदायाला सांगितल्या आणि दाखल्यावाचून तो त्याच्याबरोबर काही बोलला नाही; यासाठी की, संदेष्ट्याच्याद्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे; ते असे की, दाखले सांगायला मी आपले तोंड उघडीन; जगाच्या स्थापनेपासून गुप्त राहिलेल्या गोष्टी मी बोलून दाखवीन. नंतर तो लोकसमुदायास निरोप देऊन घरात गेला; तेव्हा त्याचे शिष्य त्याच्याकडे येऊन म्हणाले, शेतातल्या निदणाच्या दाखल्याची आम्हास फोड करून सांगा. त्याने उत्तर दिले की, चांगले बी पेरणारा हा मनुष्याचा पुत्र आहे. शेत हे जग आहे; चांगले बी हे राज्याचे पुत्र आहेत; निदण हे त्या दुष्टाचे पुत्र आहेत; ते पेरणारा शत्रू हा सैतान आहे; कापणीही युगाची समाप्ती आहे; आणि कापणारे हे देवदूत आहेत; तेव्हा जसे निदण गोळा करून अग्नीत जाळतात तसे युगाच्या समाप्तीस होईल. मनुष्याचा पुत्र आपल्या देवदूतांना पाठवील आणि त्याच्या राज्यातून अडखळण करणाऱ्या सर्व वस्तू व अन्याय करणार्‍यांना जमा करील, आणि त्यांना अग्नीच्या भट्टीत टाकतील; तेथे रडणे व दात खाणे चालेल. तेव्हा नीतिमान आपल्या पित्याच्या राज्यात सूर्यासारखे प्रकाशतील. ज्याला कान आहेत तो ऐको. स्वर्गाचे राज्य शेतात लपवलेल्या धनासारखे आहे, ती कोणाएका मनुष्यास सापडली आणि त्याने ती लपवून ठेवली. मग आनंदाच्या भरात त्याने जाऊन, आपले सर्वस्व विकले आणि ते शेत विकत घेतले. आणखी, स्वर्गाचे राज्य चांगल्या मोत्याचा शोध करणाऱ्या कोणाएका व्यापारासारखे आहे; त्यास एक अति मोलवान् मोती आढळला; मग त्याने जाऊन आपले सर्वस्व विकले आणि तो विकत घेतला. आणखी, स्वर्गाचे राज्य समुद्रात टाकलेल्या एखाद्या जाळ्यात सर्वप्रकारचे जीव एकत्र सापडतात त्यासारखे आहे; ते भरलेल्या मनुष्यांनी ते किनार्‍याकडे ओढले आणि बसून जे चांगले ते भांड्यात जमा केले, वाईट ते फेकून दिले. तसे युगाच्या समाप्तीस होईल; देवदूत येऊन नीतिमानातून दुष्टांना वेगळे करतील. आणि त्यांना अग्नीच्या भट्टीत टाकतील; तेथे रडणे व दात खाणे चालेल. तुम्हास या सर्व गोष्टी समजल्या काय? ते त्यास म्हणाले, हो. तेव्हा तो त्यांना म्हणाला, “प्रत्येक नियमशास्त्राचा शिक्षक जो स्वर्गाच्या राज्याचा शिष्य झाला आहे तो आपल्या भांडारातून नव्या जुन्या गोष्टी काढणार्‍या मनुष्यासारखा आहे.” नंतर असे झाले की, हे दाखले सांगण्याचे समाप्त केल्यावर येशू तेथून निघाला.

सामायिक करा
मत्तय 13 वाचा

मत्तय 13:3-53 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

अनेक गोष्टी त्यांना दाखल्याद्वारे शिकवीत ते म्हणाले, “एक शेतकरी बी पेरण्याकरीता निघाला तो बी पेरीत असताना, काही बी वाटेवर पडले, ते पक्ष्यांनी खाऊन टाकले. काही बी खडकाळ जमिनीवर पडले, तेथे पुरेशी माती नव्हती व माती खोल नसल्यामुळे ते झटकन उगवले. परंतु सूर्य उगवल्यावर, ती रोपे करपून गेली आणि मूळ नसल्यामुळे वाळून गेली. काही बी काटेरी झुडूपांमध्ये पडले, ते उगवले खरे पण काटेरी झुडूपांनी त्याची वाढ खुंटवली. परंतु काही बी सुपीक जमिनीत पडले आणि जेवढे पेरले होते त्या काही ठिकाणी शंभरपट, साठपट किंवा तीसपट पीक आले. ज्याला ऐकावयास कान आहेत त्यांनी ऐकावे.” आणि त्यांचे शिष्य त्यांच्याकडे आले व त्यांना विचारले, “लोकांशी तुम्ही दाखल्यांनी का बोलता?” यावर येशूंनी खुलासा केला, “स्वर्गाच्या राज्याची रहस्ये जाणून घेण्याचे ज्ञान तुम्हाला दिले आहे, परंतु त्यांना ते दिलेले नाही. कारण ज्यांच्याजवळ आहे त्यांना अधिक दिले जाईल, म्हणजे त्यांना विपुल असेल. ज्यांच्याजवळ नाही, त्यांच्याजवळ जे असेल ते देखील त्यांच्यापासून काढून घेतले जाईल.” म्हणूनच मी त्यांच्याशी दाखल्यांनी बोलतो: “ते पाहत असले तरी पाहत नाही, कानांनी ऐकत असले, तरी ते ऐकत नाहीत व समजत नाहीत. या लोकांमध्ये यशया संदेष्ट्याची भविष्यवाणी पूर्ण झाली ती ही: “ ‘तुम्ही सतत ऐकत असणार पण कधीही समजणार नाही; तुम्ही सतत पाहत असणार पण तुम्हाला त्याचे आकलन होणार नाही. कारण या लोकांची हृदये कठीण झाली आहेत, ते त्यांच्या कानाने क्वचितच ऐकतात, आणि त्यांनी डोळे मिटून घेतले आहेत; कदाचित ते त्यांच्या डोळ्यांनी पाहतील, त्यांच्या कानांनी ऐकतील, हृदयापासून समजून घेतील आणि वळतील, म्हणजे मी त्यांना बरे करीन.’ परंतु तुमचे डोळे धन्य आहेत, कारण ते पाहतात; तुमचे कान धन्य आहेत कारण ते ऐकतात. कारण मी तुम्हाला निश्चित सांगतो, तुम्ही जे पाहिले आणि ऐकले, ते पाहण्याची आणि ऐकण्याची अनेक संदेष्ट्यांनी आणि नीतिमान लोकांनी उत्कंठा बाळगली होती. “तर पेरणी करणार्‍याच्या दाखल्याचा अर्थ काय आहे ते ऐका: वाटेवर पडलेले बी अशा हृदयाच्या लोकांचे प्रतीक आहे की, ते परमेश्वराच्या राज्याची शुभवार्ता ऐकतात पण त्यातले त्यांना काहीही समजत नाही. मग सैतान येतो आणि त्यांच्या हृदयात पेरलेले वचन हिरावून नेतो. खडकाळ जमिनीत पडलेले बी त्यांच्याप्रमाणे आहेत जे वचन ऐकतात आणि तत्काळ आनंदाने स्वीकारतात. परंतु वचनामुळे संकटे आली किंवा छळ होऊ लागला की ते लगेच मागे जातात. त्यांना मूळ नसल्यामुळे, ते लवकर नाहीसे होतात. काटेरी झाडांमध्ये पेरलेले बी, जे वचन ऐकतात; परंतु संसाराची चिंता, पैशांची लालसा त्यांना भुरळ पाडते त्यामुळे परमेश्वराच्या वचनाची वाढ खुंटते व फळ देत नाही, त्यांच्याप्रमाणे आहे. परंतु चांगल्या जमिनीत पडलेले बी असा व्यक्ती आहे की जो परमेश्वराचे वचन ऐकतो आणि समजतो आणि मग, जे पेरले होते त्यापेक्षा शंभरपट पीक, साठपट किंवा तीसपट पीक देतो.” येशूंनी त्यांना दुसरा दाखला सांगितला: “स्वर्गाचे राज्य, आपल्या शेतामध्ये उत्तम प्रतीचे बी पेरणार्‍या एका मनुष्यासारखे आहे. पण रात्री सर्व झोपलेले असताना त्याचा शत्रू आला. आणि गव्हामध्ये रानगवताचे बी पेरले, आणि निघून गेला. पीक वाढू लागले, आणि दाणे आले तसे त्याच्याबरोबर रानगवतही दिसू लागले. “तेव्हा शेतातील मजूर मालकाकडे आले आणि म्हणाले, ‘महाराज, शेतात तुम्ही उत्तम प्रतीचे बी पेरले होते की नाही? तर मग रानगवत कोठून आले?’ “तेव्हा मालकाने म्हटले, ‘हे शत्रूने केले आहे.’ “मजुरांनी त्याला विचारले, आम्ही ते उपटून टाकावे काय? “ ‘नाही,’ मालक म्हणाला, ‘तुम्ही रानगवत उपटून काढीत असताना त्याच्याबरोबर कदाचित गहूही उपटाल. तर हंगामापर्यंत दोघांनाही बरोबरच वाढू द्या. त्यावेळी मी कापणी करणार्‍यांना सांगेन की पहिल्याने रानगवत गोळा करून ते जाळण्यासाठी त्यांच्या पेंढया बांधा, मग गहू गोळा करून माझ्या कोठारात आणा.’ ” येशूंनी त्यांना आणखी एक दाखला सांगितला: “स्वर्गाचे राज्य मोहरीच्या दाण्यासारखे आहे, जो एका मनुष्याने घेऊन आपल्या शेतात लावला. तो सर्व दाण्यापैकी सर्वात लहान असला तरी जेव्हा ते वाढते तेव्हा ते बागेतील सर्वात मोठे झाड होते, मग त्याच्या फांद्यांमध्ये आकाशातील पक्षी येऊन विसावा घेतात.” त्यांनी त्यांना आणखी एक दाखला सांगितला: “स्वर्गाचे राज्य त्या खमिरासारखे आहे, जे एका स्त्रीने ते घेतले आणि तीन माप पिठात एकत्र केले की त्यामुळे सर्व पीठ फुगले.” ह्या सर्वगोष्टी येशू गर्दीतील लोकांशी दाखल्यांमधून बोलले; आणि ते दाखल्यांवाचून त्यांच्याशी काहीच बोलले नाही. याप्रमाणे संदेष्ट्यांद्वारे जे भविष्य सांगितले होते ते पूर्ण झाले ते हे: “मी तोंड उघडून दाखल्यांनी त्यांच्याशी बोलेन. जगाच्या उत्पत्तीपासून जी रहस्ये गुप्त आहेत, ती मी त्यांना सांगेन.” गर्दीला बाहेर सोडून ते घरात गेले, तेव्हा त्यांचे शिष्य त्यांच्याकडे आले आणि म्हणाले, “शेतातील रानगवताच्या दाखल्याचा अर्थ आम्हासाठी स्पष्ट करून सांगा.” ते म्हणाले, “उत्तम प्रतीचे बी पेरणारा मानवपुत्र आहे. जग हे शेत आहे आणि चांगले बी हे परमेश्वराच्या राज्याचे लोक आहेत. रानगवत सैतानाच्या लोकांचे प्रतीक आहे. गव्हामध्ये रानगवताचे बी पेरणारा शत्रू म्हणजे सैतान आहे. हंगाम म्हणजे युगाचा अंत आणि कापणी करणारे म्हणजे देवदूत आहेत. “जसे रानगवत उपटून अग्नीत जाळण्यात आले, त्याचप्रमाणे युगाच्या शेवटी होईल. मानवपुत्र त्यांचे देवदूत पाठवीन आणि पाप व दुष्टाई करणार्‍या सर्वांना त्यांच्या राज्यातून बाहेर काढतील. त्यांना जळत्या भट्टीत टाकण्यात येईल जेथे रडणे आणि दातखाणे चालेल. मग नीतिमान लोक आपल्या पित्याच्या राज्यात सूर्यासारखे चमकतील. ज्यांना ऐकावयास कान आहेत त्यांनी ऐकावे. “स्वर्गाचे राज्य शेतात दडवून ठेवलेल्या धनासारखे आहे. एका मनुष्याला ते सापडले, तेव्हा त्याने ते पुन्हा लपविले आणि अतिशय आनंदाने त्याच्याजवळ होते ते सारे विकून ते शेत विकत घेतले. “पुन्हा, स्वर्गाचे राज्य उत्तम प्रतीच्या मोत्यांच्या शोधात असलेल्या एका व्यापार्‍यासारखे आहे. त्याला फार मोठ्या किमतीचे एक मोती सापडले तेव्हा त्याने जाऊन आपल्या मालकीचे सर्वकाही विकून ते विकत घेतले. “आणखी, स्वर्गाचे राज्य मासे धरण्यार्‍या एका जाळयासारखे आहे. ते सरोवरात टाकले आणि जाळ्यात सर्वप्रकारचे मासे लागले. जाळे भरल्यावर कोळी लोकांनी ते ओढून काठावर आणले. मग खाली बसून त्यांनी चांगले मासे भांड्यात भरले आणि वाईट मासे फेकून दिले. युगाच्या शेवटीही असेच होईल देवदूत येतील आणि वाईट लोकांना नीतिमान लोकांतून वेगळे करतील. आणि त्यांना जळत्या भट्टीत टाकण्यात येईल जेथे रडणे आणि दातखाणे चालेल. “तुम्हाला ह्या सर्वगोष्टी समजल्या काय?” येशूंनी विचारले. “होय,” ते म्हणाले. मग येशू त्यांना म्हणाले, “म्हणून नियमशास्त्राचा प्रत्येक शिक्षक जो स्वर्गाच्या राज्यात शिष्य झाला आहे, तो त्या घरमालकासारखा आहे जो त्याच्या भांडारातून जुने आणि नवे धन काढतो.” येशूंनी हे दाखले सांगण्याचे संपविल्यावर ते तेथून निघाले.

सामायिक करा
मत्तय 13 वाचा

मत्तय 13:3-53 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

मग त्याने त्यांना दाखल्यांनी पुष्कळ गोष्टी सांगितल्या. तो म्हणाला, “पाहा, पेरणारा पेरणी करण्यास निघाला. आणि तो पेरत असता काही बी वाटेवर पडले व पाखरांनी येऊन ते खाऊन टाकले. काही खडकाळीवर पडले, तेथे त्याला फारशी माती नव्हती, आणि माती खोल नसल्यामुळे ते लवकर उगवले; आणि सूर्य वर आला तेव्हा ते करपले व त्याला मूळ नव्हते म्हणून ते वाळून गेले. काही काटेरी झाडांमध्ये पडले; मग काटेरी झाडांनी वाढून त्याची वाढ खुंटवली. काही चांगल्या जमिनीत पडले; मग त्याचे कोठे शंभरपट, कोठे साठपट तर कोठे तीसपट, असे पीक आले. ज्याला कान आहेत तो ऐको.” मग शिष्य जवळ येऊन त्याला म्हणाले, “आपण त्यांच्याबरोबर दाखल्यांनी का बोलता?” त्याने त्यांना उत्तर दिले, “स्वर्गाच्या राज्याची रहस्ये जाणण्याचे दान तुम्हांला दिलेले आहे, परंतु त्यांना दिलेले नाही. कारण ज्या कोणाजवळ आहे त्याला दिले जाईल व त्याला भरपूर होईल; परंतु ज्या कोणाजवळ नाही त्याचे जे असेल तेदेखील त्याच्यापासून काढून घेतले जाईल. ह्यास्तव मी त्यांच्याबरोबर दाखल्यांनी बोलतो; कारण ते पाहत असता पाहत नाहीत, आणि ऐकत असता ऐकत नाहीत व त्यांना समजतही नाही. यशयाचा संदेश त्यांच्याविषयी पूर्ण होत आहे, तो असा की, ‘तुम्ही ऐकाल तर खरे, परंतु तुम्हांला समजणारच नाही, व पाहाल तर खरे, परंतु तुम्हांला दिसणारच नाही; कारण ह्या लोकांचे अंतःकरण जड झाले आहे, ते कानांनी मंद ऐकतात, आणि त्यांनी आपले डोळे मिटून घेतले आहेत; ह्यासाठी की, त्यांनी डोळ्यांनी पाहू नये, कानांनी ऐकू नये, अंतःकरणाने समजू नये व वळू नये, आणि मी त्यांना बरे करू नये.’ पण धन्य तुमचे डोळे, कारण ते पाहत आहेत; आणि तुमचे कान, कारण ते ऐकत आहेत. मी तुम्हांला खचीत सांगतो की, तुम्ही जे पाहत आहात ते पाहण्यास पुष्कळ संदेष्टे व नीतिमान जन उत्कंठित होते, तरी त्यांना पाहण्यास मिळाले नाही; आणि तुम्ही जे ऐकता ते ऐकण्यास ते उत्कंठित होते, तरी त्यांना ऐकण्यास मिळाले नाही. आता तुम्ही पेरणार्‍याचा दाखला ऐकून घ्या. कोणी राज्याचे वचन ऐकतो पण ते त्याला समजत नाही, तेव्हा तो दुष्ट येऊन त्याच्या अंतःकरणात पेरलेले ते हिरावून घेतो; वाटेवर पेरलेला तो हा आहे. खडकाळीवर पेरलेला तो हा आहे की, तो वचन ऐकतो व ते तत्काळ आनंदाने ग्रहण करतो; परंतु त्याला मूळ नसल्याकारणाने तो थोडाच वेळ टिकतो, आणि वचनामुळे संकट आले किंवा छळ झाला म्हणजे तो लगेच अडखळतो. काटेरी झाडांमध्ये पेरलेला तो हा आहे की, तो वचन ऐकतो, परंतु संसाराची चिंता व द्रव्याचा मोह वचनाची वाढ खुंटवतात आणि तो निष्फळ होतो. चांगल्या जमिनीत पेरलेला तो हा आहे की, तो वचन ऐकून ते समजतो; तो फळ देतोच देतो; कोणी शंभरपट, कोणी साठपट, तर कोणी तीसपट असे देतो.” त्याने त्यांच्यापुढे दुसरा एक दाखला मांडला : “कोणाएका मनुष्याने आपल्या शेतात चांगले बी पेरले त्याच्यासारखे स्वर्गाचे राज्य आहे. लोक झोपेत असताना त्याचा वैरी येऊन गव्हामध्ये निदण पेरून गेला. पण जेव्हा पाला फुटला व दाणे आले तेव्हा निदणही दिसले. तेव्हा घरधन्याच्या दासांनी येऊन त्याला म्हटले, ‘महाराज, आपण आपल्या शेतामध्ये चांगले बी पेरले ना? तर मग त्यात निदण कोठून आले?’ तो त्यांना म्हणाला, ‘हे काम कोणा वैर्‍याचे आहे.’ दासांनी त्याला म्हटले, ‘तर आम्ही जाऊन ते जमा करावे अशी आपली इच्छा आहे काय?’ तो म्हणाला, ‘नाही. तुम्ही निदण गोळा करताना त्याच्याबरोबर कदाचित गहूही उपटाल. कापणीपर्यंत दोन्ही बरोबर वाढू द्या; मग कापणीच्या वेळेस मी कापणार्‍यांना सांगेन की, आधी निदण गोळा करा व जाळण्यासाठी त्याच्या पेंढ्या बांधा; परंतु गहू माझ्या कोठारात साठवा.”’ त्याने त्यांच्यापुढे आणखी एक दाखला मांडला की, “स्वर्गाचे राज्य मोहरीच्या दाण्यासारखे आहे; तो कोणाएका मनुष्याने घेऊन आपल्या शेतात लावला; तो तर सर्व दाण्यांमध्ये लहान आहे; तरी वाढल्यावर भाज्यांपेक्षा मोठा होऊन त्याचे असे झाड होते, की ‘आकाशातील पाखरे’ येऊन ‘त्याच्या फांद्यांत वस्ती करतात.”’ त्याने त्यांना आणखी एक दाखला सांगितला की, “स्वर्गाचे राज्य खमिरासारखे आहे; ते एका स्त्रीने घेऊन तीन मापे पिठामध्ये लपवून ठेवले, तेणेकरून शेवटी ते सर्व पीठ फुगून गेले.” ह्या सर्व गोष्टी येशूने दाखल्यांनी लोकसमुदायांना सांगितल्या आणि दाखल्यावाचून तो त्यांच्याबरोबर काही बोलला नाही; ह्यासाठी की, संदेष्ट्याच्या द्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे; ते असे की, “मी आपले तोंड उघडून दाखले देईन; जगाच्या स्थापनेपासून जे गुप्त ते प्रकट करीन.” नंतर तो लोकसमुदायांना निरोप देऊन घरात गेला. तेव्हा त्याचे शिष्य त्याच्याकडे येऊन म्हणाले, “शेतातल्या निदणाच्या दाखल्याची आम्हांला फोड करून सांगा.” त्याने उत्तर दिले की, “चांगले बी पेरणारा हा मनुष्याचा पुत्र आहे; शेत हे जग आहे; चांगले बी हे राज्याचे पुत्र आहेत; निदण हे त्या दुष्टाचे पुत्र आहेत; ते पेरणारा वैरी हा सैतान आहे; कापणी ही युगाची समाप्ती आहे; आणि कापणारे हे देवदूत आहेत. तेव्हा जसे निदण गोळा करून अग्नीत जाळतात तसे युगाच्या समाप्तीस होईल. मनुष्याचा पुत्र आपल्या दूतांना पाठवील, आणि ते सर्व ‘अडखळवणार्‍यांना व अनाचार करणार्‍यांना’ त्याच्या राज्यातून जमा करून त्यांना अग्नीच्या भट्टीत टाकतील; तेथे रडणे व दात खाणे चालेल. तेव्हा ‘नीतिमान’ आपल्या पित्याच्या राज्यात सूर्यासारखे ‘प्रकाशतील.’ ज्याला कान आहेत तो ऐको. स्वर्गाचे राज्य शेतात लपवलेल्या ठेवीसारखे आहे; ती कोणाएका मनुष्याला सापडली आणि त्याने ती लपवून ठेवली. मग आनंदाच्या भरात तो जातो, आपले सर्वस्व विकतो आणि ते शेत विकत घेतो. आणखी, स्वर्गाचे राज्य चांगल्या मोत्यांचा शोध करणार्‍या कोणाएका व्यापार्‍यासारखे आहे; त्याला एक अति मोलवान मोती आढळला; मग त्याने जाऊन आपले सर्वस्व विकले आणि तो विकत घेतला. आणखी, स्वर्गाचे राज्य समुद्रात टाकलेल्या एखाद्या जाळ्यात सर्व प्रकारचे जीव एकत्र सापडतात त्यासारखे आहे; ते भरल्यावर माणसांनी ते किनार्‍याकडे ओढले आणि बसून जे चांगले ते भांड्यांत जमा केले, वाईट ते फेकून दिले. तसे युगाच्या समाप्तीस होईल; देवदूत येऊन नीतिमानांतून दुष्टांना वेगळे करतील आणि त्यांना अग्नीच्या भट्टीत टाकतील; तेथे रडणे व दात खाणे चालेल.” येशू त्यांना म्हणाला, “तुम्हांला ह्या सर्व गोष्टी समजल्या काय?” ते त्याला म्हणाले, “होय प्रभूजी.” तेव्हा तो त्यांना म्हणाला, “प्रत्येक शास्त्री जो स्वर्गाच्या राज्याचा शिष्य झाला आहे तो आपल्या भांडारातून नव्याजुन्या गोष्टी काढणार्‍या गृहस्थासारखा आहे.” नंतर असे झाले की, हे दाखले सांगण्याचे समाप्त केल्यावर येशू तेथून निघाला.

सामायिक करा
मत्तय 13 वाचा

मत्तय 13:3-53 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

त्याने त्यांना दाखले देऊन पुष्कळ गोष्टी शिकविल्या. तो म्हणाला, “पाहा, पेरणारा पेरणी करायला निघाला. तो पेरीत असता काही बी वाटेवर पडले व पक्ष्यांनी येऊन ते खाऊन टाकले. काही खडकाळ जमिनीवर पडले. तेथे फारशी माती नव्हती. माती खोल नसल्यामुळे ते लवकर उगवले. परंतु सूर्य वर आला तेव्हा ते करपले आणि मुळे नसल्यामुळे वाळून गेले. काही काटेरी झुडुपांमध्ये पडले. ती झुडुपे वाढल्याने ते गुदमरून गेले. काही सुपीक जमिनीत पडले. त्याला शंभरपट, साठपट, तर तीसपट असे पीक आले. ज्याला ऐकण्यासाठी कान असतील त्याने ऐकावे!” तेव्हा शिष्यांनी जवळ येऊन त्याला विचारले, “आपण लोकांना उपदेश करताना दाखले का देता?” त्याने त्यांना उत्तर दिले, “स्वर्गाच्या राज्याची रहस्ये जाणण्याचे ज्ञान तुम्हांला दिलेले आहे परंतु त्यांना ते ज्ञान दिलेले नाही. कारण ज्या कोणाजवळ आहे त्याला अधिक दिले जाईल व त्याची भरभराट होईल; परंतु ज्या कोणाजवळ काहीच नाही त्याचे थोडेफार जे असेल तेदेखील त्याच्याकडून घेतले जाईल. ते बघतात पण त्यांना दिसत नाही; ते ऐकतात पण त्यांना ऐकू येत नाही आणि त्यांना समजतही नाही. म्हणून त्यांना प्रबोधन करताना मी दाखले देतो. यशयाचा संदेश त्यांच्याविषयी पूर्ण होत आहे. तो असा, “तुम्ही ऐकाल पण तुम्हांला समजणार नाही, तुम्ही पाहाल पण तुम्हांला कळणार नाही’, ह्या लोकांचे अंतःकरण जड झाले आहे. ते कानांनी मंद ऐकतात आणि त्यांनी आपले डोळे मिटून घेतले आहेत. नाही तर ते त्यांच्या डोळ्यांनी पाहतील, कानांनी ऐकतील, त्यांच्या अंतःकरणांना समजेल, ते माझ्याकडे वळतील व मी त्यांना बरे करीन. परंतु धन्य तुमचे डोळे, कारण ते पाहत आहेत आणि धन्य तुमचे कान कारण ते ऐकत आहेत. मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, तुम्ही जे पाहात आहात ते पाहायला पुष्कळ संदेष्टे व नीतिमान उत्कंठित झाले होते तरीसुद्धा त्यांना ते पाहायला मिळाले नाही आणि तुम्ही जे ऐकत आहात ते ऐकायला ते उत्कंठित झाले होते पण त्यांना ते ऐकायला मिळाले नाही. तुम्ही पेरणाऱ्याचा दाखला ऐकून घ्या. जो स्वर्गाच्या राज्याचे वचन ऐकतो पण त्याला ते समजत नाही तो वाटेवर पडलेल्या बीप्रमाणे आहे. त्याच्या अंतःकरणात जे पेरले होते ते सैतान येऊन हिरावून घेतो. जो वचन ऐकतो व ते आनंदाने तत्काळ ग्रहण करतो, तो खडकाळ जमिनीत पेरलेल्या बीसारखा आहे. परंतु ते त्याच्या अंतःकरणात खोल मूळ धरत नाही म्हणून तो थोडाच वेळ टिकतो; देवाच्या शब्दामुळे संकट आले किंवा छळ झाला म्हणजे तो विचलित होतो. जो वचन ऐकतो, पण संसाराची चिंता व पैशाच्या मोहामुळे ज्याच्यात वचनाची वाढ खुंटते व जो निष्फळ राहतो, तो काटेरी झुडुपांमध्ये पेरलेल्या बीसारखा आहे. जो वचन ऐकून ते समजून घेतो, तो चांगल्या जमिनीत पेरलेल्या बीसारखा आहे. त्याचे पीक मिळते - कुठे शंभरपट, कुठे साठपट, तर अन्यत्र तीसपट.” त्यांच्यापुढे दुसरा एक दाखला ठेवत येशू म्हणाला, “स्वर्गाचे राज्य अशा प्रकारचे आहे:एका मनुष्याने आपल्या शेतात चांगले बी पेरले. परंतु सर्व झोपलेले असताना त्याचावैरी आला आणि गव्हामध्ये निदण पेरून गेला. जेव्हा रोपटी वाढली व कणसे आली तेव्हा निदणही वाढलेले दिसू लागले. तेव्हा त्या माणसाच्या नोकरांनी येऊन त्याला विचारले, “धनी, आपण आपल्या शेतामध्ये चांगले बी पेरले असताना त्यात निदण कोठून आले?’ तो त्यांना म्हणाला, “हे काम कोणा वैऱ्याचे आहे.’ नोकरांनी त्याला म्हटले, “आम्ही जाऊन ते निदण गोळा करावे, अशी आपली इच्छा आहे काय?’ परंतु तो मनुष्य म्हणाला, “नाही. तुम्ही निदण गोळा करताना त्याबरोबर कदाचित गहूदेखील उपटाल. कापणीपर्यंत दोन्ही बरोबर वाढू द्या. कापणीच्या वेळी मी कापणाऱ्यांना सांगेन की, प्रथम निदण गोळा करा व जाळण्यासाठी त्याच्या पेंढ्या बांधा आणि नंतर गहू गोळा करून माझ्या कोठारात साठवा.’” येशूने त्यांच्यापुढे आणखी एक दाखला ठेवला तो असा: “स्वर्गाचे राज्य मोहरीच्या दाण्यासारखे आहे, तो एका माणसाने आपल्या शेतात लावला. तो सर्व दाण्यांमध्ये जरी लहान असला, तरी उगवल्यावर सर्व रोपट्यांमध्ये मोठा होऊन त्याचे झाड होते आणि आकाशातील पक्ष्यांना त्याच्या फांद्यांवर वसती करता येते.” येशूने त्यांना आणखी एक दाखला सांगितला. “स्वर्गाचे राज्य खमिरासारखे आहे. ते एका स्त्रीने तीन मापे पिठामध्ये मिसळले. त्यामुळे शेवटी ते सर्व पीठ फुगले.” दाखले देऊन येशूने लोकसमुदायांना या सर्व गोष्टी सांगितल्या. दाखल्यांशिवाय तो लोकांना कोणताही उपदेश करत नसे. ‘मी त्यांच्याशी बोलताना दाखले देईन, जगाच्या स्थापनेपासून जे अज्ञात आहे, ते प्रकट करीन’, असे संदेष्ट्याद्वारे जे सांगितले गेले होते, ते पूर्ण व्हावे म्हणून हे घडले. लोकसमुदायास निरोप देऊन येशू घरात गेला तेव्हा त्याचे शिष्य त्याच्याकडे येऊन म्हणाले, “शेतातल्या निदणाचा दाखला आम्हांला समजावून सांगा.” त्याने उत्तर दिले, “चांगले बी पेरणारा हा मनुष्याचा पुत्र आहे. शेत हे जग आहे, चांगले बी म्हणजे स्वर्गराज्याचे लोक आहेत. निदण म्हणजे सैतानाची प्रजा. ते पेरणारा वैरी हा सैतान आहे. कापणीची वेळ म्हणजे युगाच्या समाप्तीचा समय व कापणी करणारे हे देवदूत आहेत. जसे निदण गोळा करून अग्नीत जाळतात, तसे युगाच्या शेवटी होईल. मनुष्याचा पुत्र त्याच्या दूतांना पाठवील आणि ते अडथळे आणणाऱ्या व अनाचार करणाऱ्या सर्वांना त्याच्या राज्यातून जमा करून अग्नीच्या भट्टीत टाकतील. तेथे आक्रोश व दात ओठ खाणे चालेल. त्या वेळी नीतिमान आपल्या पित्याच्या राज्यात सूर्यासारखे तळपतील. ज्याला कान आहेत त्याने ऐकावे! स्वर्गाचे राज्य शेतात लपवलेल्या खजिन्यासारखे आहे. तो एका मनुष्याला सापडतो. तो मनुष्य खजिना पुन्हा लपवून ठेवतो. नंतर तो आनंदाच्या भरात जातो, आपले सर्वस्व विकतो आणि ते शेत विकत घेतो. तसेच स्वर्गाचे राज्य चांगल्या मोत्यांचा शोध घेणाऱ्या एका व्यापाऱ्यासारखे आहे. त्याला असामान्य प्रतीचा एक मोती आढळला. त्याने जाऊन त्याचे सर्वस्व विकले आणि तो विकत घेतला. स्वर्गाचे राज्य हे सरोवरात टाकलेल्या जाळ्यासारखे आहे. त्यात सर्व प्रकारचे मासे एकत्र पकडले जातात. जाळे भरल्यावर कोळी लोक ते काठावर ओढतात आणि चांगले मासे भांड्यांत जमा करतात, पण खराब ते फेकून देतात. तसे युगाच्या शेवटी होईल, देवदूत येऊन नीतिमानांतून दुष्टांना वेगळे करतील व त्यांना अग्नीच्या भट्टीत टाकतील. तेथे आक्रोश व दात ओठ खाणे चालेल. तुम्हांला ह्या सर्व गोष्टी समजल्या काय?” ते त्याला म्हणाले, “होय.” तेव्हा तो त्यांना म्हणाला, “प्रत्येक शास्त्री जो स्वर्गाच्या राज्याचा शिष्य होतो, तो आपल्या भांडारातून जुन्या व नव्या गोष्टी बाहेर काढणाऱ्या घरमालकासारखा असतो.” हे दाखले सांगण्याचे पूर्ण केल्यावर येशू तेथून निघून गेला.

सामायिक करा
मत्तय 13 वाचा