मत्तय 13:24-43
मत्तय 13:24-43 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
येशूने त्यांच्यापुढे दुसरा एक दाखला मांडला. “कोणी एका मनुष्याने आपल्या शेतात चांगले बी पेरले त्याच्यासारखे स्वर्गाचे राज्य आहे. लोक झोपेत असताना त्याचा शत्रू येऊन गव्हामध्ये निदण पेरून निघून गेला; पण जेव्हा पाला फुटला व दाणे आले तेव्हा निदण ही दिसले. तेव्हा घरधन्याच्या दासांनी येऊन त्यास म्हटले, महाराज, आपण आपल्या शेतामध्ये चांगले बी पेरले ना? तर मग त्यामध्ये निदण कोठून आले? तो त्यांना म्हणाला हे काम कोणा शत्रूचे आहे. दासांनी त्यास म्हटले, तर आम्ही जाऊन ते काढून टाकावे अशी आपली इच्छा आहे काय? तो म्हणाला, नाही. तुम्ही निदण गोळा करताना त्याच्याबरोबर कदाचित गहू ही उपटाल. कापणीपर्यंत दोन्ही बरोबर वाढू द्या; मग कापणीच्या वेळेस मी कापणाऱ्यास सांगेन की, पहिल्याने निदण गोळा करा आणि जाळण्यासाठी त्याच्या पेढ्या बांधा; परंतु गहू माझ्या कोठारात साठवा.” त्याने त्याच्यापुढे आणखी एक दाखला मांडला की, “स्वर्गाचे राज्य मोहरीच्या दाण्यासारखे आहे; तो कोणाएका मनुष्याने घेऊन आपल्या शेतात लावला; तो तर सर्व दाण्यामध्ये लहान आहे; तरी वाढल्यावर भाजीपाल्यापेक्षा मोठा होऊन त्याचे असे झाड होते की, आकाशातील पाखर त्याच्या फांद्यात वस्ती करतात.” त्याने त्यांना आणखी एक दाखला सांगितला की, “स्वर्गाचे राज्य खमिरासारखे आहे; ते एका स्त्रीने घेऊन तीन मापे पीठामध्ये लपवून ठेवले, तेणेकरून शेवटी ते सर्व पीठ फुगून गेले.” या सर्व गोष्टी येशूने दाखल्यानी लोकसमुदायाला सांगितल्या आणि दाखल्यावाचून तो त्याच्याबरोबर काही बोलला नाही; यासाठी की, संदेष्ट्याच्याद्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे; ते असे की, दाखले सांगायला मी आपले तोंड उघडीन; जगाच्या स्थापनेपासून गुप्त राहिलेल्या गोष्टी मी बोलून दाखवीन. नंतर तो लोकसमुदायास निरोप देऊन घरात गेला; तेव्हा त्याचे शिष्य त्याच्याकडे येऊन म्हणाले, शेतातल्या निदणाच्या दाखल्याची आम्हास फोड करून सांगा. त्याने उत्तर दिले की, चांगले बी पेरणारा हा मनुष्याचा पुत्र आहे. शेत हे जग आहे; चांगले बी हे राज्याचे पुत्र आहेत; निदण हे त्या दुष्टाचे पुत्र आहेत; ते पेरणारा शत्रू हा सैतान आहे; कापणीही युगाची समाप्ती आहे; आणि कापणारे हे देवदूत आहेत; तेव्हा जसे निदण गोळा करून अग्नीत जाळतात तसे युगाच्या समाप्तीस होईल. मनुष्याचा पुत्र आपल्या देवदूतांना पाठवील आणि त्याच्या राज्यातून अडखळण करणाऱ्या सर्व वस्तू व अन्याय करणार्यांना जमा करील, आणि त्यांना अग्नीच्या भट्टीत टाकतील; तेथे रडणे व दात खाणे चालेल. तेव्हा नीतिमान आपल्या पित्याच्या राज्यात सूर्यासारखे प्रकाशतील. ज्याला कान आहेत तो ऐको.
मत्तय 13:24-43 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
येशूंनी त्यांना दुसरा दाखला सांगितला: “स्वर्गाचे राज्य, आपल्या शेतामध्ये उत्तम प्रतीचे बी पेरणार्या एका मनुष्यासारखे आहे. पण रात्री सर्व झोपलेले असताना त्याचा शत्रू आला. आणि गव्हामध्ये रानगवताचे बी पेरले, आणि निघून गेला. पीक वाढू लागले, आणि दाणे आले तसे त्याच्याबरोबर रानगवतही दिसू लागले. “तेव्हा शेतातील मजूर मालकाकडे आले आणि म्हणाले, ‘महाराज, शेतात तुम्ही उत्तम प्रतीचे बी पेरले होते की नाही? तर मग रानगवत कोठून आले?’ “तेव्हा मालकाने म्हटले, ‘हे शत्रूने केले आहे.’ “मजुरांनी त्याला विचारले, आम्ही ते उपटून टाकावे काय? “ ‘नाही,’ मालक म्हणाला, ‘तुम्ही रानगवत उपटून काढीत असताना त्याच्याबरोबर कदाचित गहूही उपटाल. तर हंगामापर्यंत दोघांनाही बरोबरच वाढू द्या. त्यावेळी मी कापणी करणार्यांना सांगेन की पहिल्याने रानगवत गोळा करून ते जाळण्यासाठी त्यांच्या पेंढया बांधा, मग गहू गोळा करून माझ्या कोठारात आणा.’ ” येशूंनी त्यांना आणखी एक दाखला सांगितला: “स्वर्गाचे राज्य मोहरीच्या दाण्यासारखे आहे, जो एका मनुष्याने घेऊन आपल्या शेतात लावला. तो सर्व दाण्यापैकी सर्वात लहान असला तरी जेव्हा ते वाढते तेव्हा ते बागेतील सर्वात मोठे झाड होते, मग त्याच्या फांद्यांमध्ये आकाशातील पक्षी येऊन विसावा घेतात.” त्यांनी त्यांना आणखी एक दाखला सांगितला: “स्वर्गाचे राज्य त्या खमिरासारखे आहे, जे एका स्त्रीने ते घेतले आणि तीन माप पिठात एकत्र केले की त्यामुळे सर्व पीठ फुगले.” ह्या सर्वगोष्टी येशू गर्दीतील लोकांशी दाखल्यांमधून बोलले; आणि ते दाखल्यांवाचून त्यांच्याशी काहीच बोलले नाही. याप्रमाणे संदेष्ट्यांद्वारे जे भविष्य सांगितले होते ते पूर्ण झाले ते हे: “मी तोंड उघडून दाखल्यांनी त्यांच्याशी बोलेन. जगाच्या उत्पत्तीपासून जी रहस्ये गुप्त आहेत, ती मी त्यांना सांगेन.” गर्दीला बाहेर सोडून ते घरात गेले, तेव्हा त्यांचे शिष्य त्यांच्याकडे आले आणि म्हणाले, “शेतातील रानगवताच्या दाखल्याचा अर्थ आम्हासाठी स्पष्ट करून सांगा.” ते म्हणाले, “उत्तम प्रतीचे बी पेरणारा मानवपुत्र आहे. जग हे शेत आहे आणि चांगले बी हे परमेश्वराच्या राज्याचे लोक आहेत. रानगवत सैतानाच्या लोकांचे प्रतीक आहे. गव्हामध्ये रानगवताचे बी पेरणारा शत्रू म्हणजे सैतान आहे. हंगाम म्हणजे युगाचा अंत आणि कापणी करणारे म्हणजे देवदूत आहेत. “जसे रानगवत उपटून अग्नीत जाळण्यात आले, त्याचप्रमाणे युगाच्या शेवटी होईल. मानवपुत्र त्यांचे देवदूत पाठवीन आणि पाप व दुष्टाई करणार्या सर्वांना त्यांच्या राज्यातून बाहेर काढतील. त्यांना जळत्या भट्टीत टाकण्यात येईल जेथे रडणे आणि दातखाणे चालेल. मग नीतिमान लोक आपल्या पित्याच्या राज्यात सूर्यासारखे चमकतील. ज्यांना ऐकावयास कान आहेत त्यांनी ऐकावे.
मत्तय 13:24-43 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
त्याने त्यांच्यापुढे दुसरा एक दाखला मांडला : “कोणाएका मनुष्याने आपल्या शेतात चांगले बी पेरले त्याच्यासारखे स्वर्गाचे राज्य आहे. लोक झोपेत असताना त्याचा वैरी येऊन गव्हामध्ये निदण पेरून गेला. पण जेव्हा पाला फुटला व दाणे आले तेव्हा निदणही दिसले. तेव्हा घरधन्याच्या दासांनी येऊन त्याला म्हटले, ‘महाराज, आपण आपल्या शेतामध्ये चांगले बी पेरले ना? तर मग त्यात निदण कोठून आले?’ तो त्यांना म्हणाला, ‘हे काम कोणा वैर्याचे आहे.’ दासांनी त्याला म्हटले, ‘तर आम्ही जाऊन ते जमा करावे अशी आपली इच्छा आहे काय?’ तो म्हणाला, ‘नाही. तुम्ही निदण गोळा करताना त्याच्याबरोबर कदाचित गहूही उपटाल. कापणीपर्यंत दोन्ही बरोबर वाढू द्या; मग कापणीच्या वेळेस मी कापणार्यांना सांगेन की, आधी निदण गोळा करा व जाळण्यासाठी त्याच्या पेंढ्या बांधा; परंतु गहू माझ्या कोठारात साठवा.”’ त्याने त्यांच्यापुढे आणखी एक दाखला मांडला की, “स्वर्गाचे राज्य मोहरीच्या दाण्यासारखे आहे; तो कोणाएका मनुष्याने घेऊन आपल्या शेतात लावला; तो तर सर्व दाण्यांमध्ये लहान आहे; तरी वाढल्यावर भाज्यांपेक्षा मोठा होऊन त्याचे असे झाड होते, की ‘आकाशातील पाखरे’ येऊन ‘त्याच्या फांद्यांत वस्ती करतात.”’ त्याने त्यांना आणखी एक दाखला सांगितला की, “स्वर्गाचे राज्य खमिरासारखे आहे; ते एका स्त्रीने घेऊन तीन मापे पिठामध्ये लपवून ठेवले, तेणेकरून शेवटी ते सर्व पीठ फुगून गेले.” ह्या सर्व गोष्टी येशूने दाखल्यांनी लोकसमुदायांना सांगितल्या आणि दाखल्यावाचून तो त्यांच्याबरोबर काही बोलला नाही; ह्यासाठी की, संदेष्ट्याच्या द्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे; ते असे की, “मी आपले तोंड उघडून दाखले देईन; जगाच्या स्थापनेपासून जे गुप्त ते प्रकट करीन.” नंतर तो लोकसमुदायांना निरोप देऊन घरात गेला. तेव्हा त्याचे शिष्य त्याच्याकडे येऊन म्हणाले, “शेतातल्या निदणाच्या दाखल्याची आम्हांला फोड करून सांगा.” त्याने उत्तर दिले की, “चांगले बी पेरणारा हा मनुष्याचा पुत्र आहे; शेत हे जग आहे; चांगले बी हे राज्याचे पुत्र आहेत; निदण हे त्या दुष्टाचे पुत्र आहेत; ते पेरणारा वैरी हा सैतान आहे; कापणी ही युगाची समाप्ती आहे; आणि कापणारे हे देवदूत आहेत. तेव्हा जसे निदण गोळा करून अग्नीत जाळतात तसे युगाच्या समाप्तीस होईल. मनुष्याचा पुत्र आपल्या दूतांना पाठवील, आणि ते सर्व ‘अडखळवणार्यांना व अनाचार करणार्यांना’ त्याच्या राज्यातून जमा करून त्यांना अग्नीच्या भट्टीत टाकतील; तेथे रडणे व दात खाणे चालेल. तेव्हा ‘नीतिमान’ आपल्या पित्याच्या राज्यात सूर्यासारखे ‘प्रकाशतील.’ ज्याला कान आहेत तो ऐको.
मत्तय 13:24-43 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
त्यांच्यापुढे दुसरा एक दाखला ठेवत येशू म्हणाला, “स्वर्गाचे राज्य अशा प्रकारचे आहे:एका मनुष्याने आपल्या शेतात चांगले बी पेरले. परंतु सर्व झोपलेले असताना त्याचावैरी आला आणि गव्हामध्ये निदण पेरून गेला. जेव्हा रोपटी वाढली व कणसे आली तेव्हा निदणही वाढलेले दिसू लागले. तेव्हा त्या माणसाच्या नोकरांनी येऊन त्याला विचारले, “धनी, आपण आपल्या शेतामध्ये चांगले बी पेरले असताना त्यात निदण कोठून आले?’ तो त्यांना म्हणाला, “हे काम कोणा वैऱ्याचे आहे.’ नोकरांनी त्याला म्हटले, “आम्ही जाऊन ते निदण गोळा करावे, अशी आपली इच्छा आहे काय?’ परंतु तो मनुष्य म्हणाला, “नाही. तुम्ही निदण गोळा करताना त्याबरोबर कदाचित गहूदेखील उपटाल. कापणीपर्यंत दोन्ही बरोबर वाढू द्या. कापणीच्या वेळी मी कापणाऱ्यांना सांगेन की, प्रथम निदण गोळा करा व जाळण्यासाठी त्याच्या पेंढ्या बांधा आणि नंतर गहू गोळा करून माझ्या कोठारात साठवा.’” येशूने त्यांच्यापुढे आणखी एक दाखला ठेवला तो असा: “स्वर्गाचे राज्य मोहरीच्या दाण्यासारखे आहे, तो एका माणसाने आपल्या शेतात लावला. तो सर्व दाण्यांमध्ये जरी लहान असला, तरी उगवल्यावर सर्व रोपट्यांमध्ये मोठा होऊन त्याचे झाड होते आणि आकाशातील पक्ष्यांना त्याच्या फांद्यांवर वसती करता येते.” येशूने त्यांना आणखी एक दाखला सांगितला. “स्वर्गाचे राज्य खमिरासारखे आहे. ते एका स्त्रीने तीन मापे पिठामध्ये मिसळले. त्यामुळे शेवटी ते सर्व पीठ फुगले.” दाखले देऊन येशूने लोकसमुदायांना या सर्व गोष्टी सांगितल्या. दाखल्यांशिवाय तो लोकांना कोणताही उपदेश करत नसे. ‘मी त्यांच्याशी बोलताना दाखले देईन, जगाच्या स्थापनेपासून जे अज्ञात आहे, ते प्रकट करीन’, असे संदेष्ट्याद्वारे जे सांगितले गेले होते, ते पूर्ण व्हावे म्हणून हे घडले. लोकसमुदायास निरोप देऊन येशू घरात गेला तेव्हा त्याचे शिष्य त्याच्याकडे येऊन म्हणाले, “शेतातल्या निदणाचा दाखला आम्हांला समजावून सांगा.” त्याने उत्तर दिले, “चांगले बी पेरणारा हा मनुष्याचा पुत्र आहे. शेत हे जग आहे, चांगले बी म्हणजे स्वर्गराज्याचे लोक आहेत. निदण म्हणजे सैतानाची प्रजा. ते पेरणारा वैरी हा सैतान आहे. कापणीची वेळ म्हणजे युगाच्या समाप्तीचा समय व कापणी करणारे हे देवदूत आहेत. जसे निदण गोळा करून अग्नीत जाळतात, तसे युगाच्या शेवटी होईल. मनुष्याचा पुत्र त्याच्या दूतांना पाठवील आणि ते अडथळे आणणाऱ्या व अनाचार करणाऱ्या सर्वांना त्याच्या राज्यातून जमा करून अग्नीच्या भट्टीत टाकतील. तेथे आक्रोश व दात ओठ खाणे चालेल. त्या वेळी नीतिमान आपल्या पित्याच्या राज्यात सूर्यासारखे तळपतील. ज्याला कान आहेत त्याने ऐकावे!