मत्तय 10:24-42
मत्तय 10:24-42 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
शिष्य त्याच्या गुरूपेक्षा वरचढ नाही किंवा चाकर मालकाच्या वरचढ नाही. शिष्य आपल्या शिक्षकासारखा व चाकर आपल्या मालकासारखा होणे इतके पुरे. जर घराच्या धन्याला त्यांनी बालजबूल म्हणले तर घरातील इतर मनुष्यांना ते किती वाईट नावे ठेवतील! लोकांचे नको तर देवाचे भय बाळगा. म्हणून त्यांना भिऊ नका, कारण उघडे होणार नाही असे काही झाकलेले नाही आणि कळणार नाही असे काही गुप्त नाही. जे मी तुम्हास अंधारात सांगतो ते तुम्ही प्रकाशात बोला आणि कानात सांगितलेले जे तुम्ही ऐकता ते तुम्ही छतावरून गाजवा. जे शरीराला वधतात पण आत्म्याचा वध करू शकत नाहीत त्यांना भिऊ नका, तर त्यापेक्षा आत्म्याला व शरीराला जो मारू शकतो व नरकात टाकू शकतो त्यास भ्या. दोन चिमण्या एका नाण्याला विकत नाहीत काय? तरीही तुमच्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेशिवाय त्यातील एकही जमिनीवर पडणार नाही. आणि तुमच्या डोक्यावरचे केससुद्धा त्याने मोजलेले आहेत. म्हणून घाबरु नका. पुष्कळ चिमण्यांपेक्षा तुम्ही अधिक मौल्यवान आहात. जो कोणी मनुष्यांसमोर मला स्वीकारील त्यास मीसुद्धा माझ्या स्वर्गातील पित्यासमोर स्वीकारीन. पण जो कोणी मनुष्यांसमोर मला नाकारील त्यास मीसुद्धा माझ्या स्वर्गातील पित्यासमोर नाकारीन. असे समजू नका की मी पृथ्वीवर शांतता प्रस्थापित करायला आलो आहे. मी शांतता स्थापित करायला आलो नाही तर तलवार चालवायला आलो आहे. मी फूट पाडायला आलो आहे, म्हणजे मुलाला त्याच्या पित्याविरुद्ध आणि मुलीला तिच्या आईविरुद्ध, सुनेला तिच्या सासूविरुद्ध उभे करायला आलो आहे. सारांश, मनुष्याच्या घरचीच माणसे त्याचे शत्रू होतील. जो माझ्यापेक्षा स्वतःच्या पित्यावर किंवा आईवर अधिक प्रीती करतो, तो मला योग्य नाही. जो माझ्यापेक्षा आपल्या मुलावर, मुलीवर अधिक प्रीती करतो, तो मला योग्य नाही. जो आपला वधस्तंभ घेऊन माझ्यामागे येण्याचे नाकारतो, तो मला योग्य नाही. जो आपला जीव मिळवतो तो त्यास गमवील पण जो माझ्याकरिता आपला जीव गमावतो तो त्यास मिळवील. जी व्यक्ती तुम्हास स्वीकारते ती व्यक्ती मला स्वीकारते आणि ज्या पित्याने मला पाठवले त्यालाही स्वीकारते. जो कोणी संदेष्ट्यांचा स्वीकार त्याच्या संदेशाच्या सेवेमुळे करतो, त्यास संदेष्ट्याचे प्रतिफळ मिळेल आणि नीतिमानाला नीतिमान म्हणून जो स्वीकारतो त्यास नीतिमानाचे प्रतिफळ मिळेल. मी तुम्हास खरे सांगतो की, या लहानातील एकाला शिष्य म्हणून जो कोणी प्यालाभर थंड पाणी प्यायला देईल तोही आपल्या प्रतिफळाला मुळीच मुकणार नाही.
मत्तय 10:24-42 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“शिष्य गुरूपेक्षा श्रेष्ठ नाही किंवा दास आपल्या धन्यापेक्षा श्रेष्ठ नाही. शिष्याने आपल्या गुरू सारखे असणे आणि दासाने आपल्या धन्यासारखे असणे पुरे आहे. जर घर प्रमुखाला बालजबूल म्हटले, तर घरच्या सभासदांना कितीतरी अधिक म्हणतील! “तुम्ही त्यांना भिऊ नका, जे प्रकट होणार नाही असे काही झाकलेले नाही उघडकीस येणार नाही असे काही गुप्त नाही. आता मी तुम्हाला अंधारात सांगत आहे ते दिवसाच्या प्रकाशात सांगा; जे मी तुमच्या कानात सांगत आहे ते घराच्या धाब्यावरून जाहीर करा. जे तुमच्या शरीराचा वध करू शकतात परंतु आत्म्याचा नाश करू शकत नाहीत, अशांना भिऊ नका. तर तुमचा आत्मा आणि शरीर या दोहोंचा नरकामध्ये जे नाश करू शकतात त्या परमेश्वराचे मात्र भय धरा. एका पैशात दोन चिमण्या विकत मिळतात, तरी त्यापैकी एकही चिमणी तुमच्या पित्याच्या इच्छेविना जमिनीवर पडत नाही. आणि तुमच्या डोक्याचे सर्व केसही मोजलेले आहेत. म्हणून भीती बाळगू नका, कारण तुम्ही पुष्कळ चिमण्यांपेक्षा अधिक मोलवान आहात. “जो कोणी मला जाहीरपणे स्वीकारेल, तर मीही त्याचा माझ्या स्वर्गीय पित्यासमोर जाहीरपणे स्वीकार करीन. तरी जे मला येथे लोकांसमोर नाकारतात, तर मीही त्यांना माझ्या स्वर्गीय पित्यासमोर जाहीरपणे नाकारीन. “मी पृथ्वीवर शांती देण्यासाठी आलो आहे अशी कल्पना करू नका. शांती देण्यासाठी नाही, तर तलवार चालवण्यास आलो आहे. “ ‘पुत्राला आपल्या पित्याविरुद्ध, मुलीला आपल्या आईविरुद्ध, आणि सूनेला तिच्या सासूविरुद्ध करण्यासाठी मी आलो आहे. एखाद्या मनुष्याच्या स्वतःच्या घरातीलच लोक त्याचे शत्रू होतील.’ “जो कोणी माझ्यापेक्षा आपल्या आईवडिलांवर अधिक प्रेम करीत असेल, तर तो मला पात्र नाही; जो कोणी माझ्यापेक्षा आपल्या पुत्र व कन्यांवर अधिक प्रेम करीत असेल तर ते मला पात्र नाही. जो कोणी आपला क्रूसखांब उचलून घेऊन माझ्यामागे येत नाही तो मला पात्र नाही. जो आपल्या जीवाला जपतो, तो आपला जीव गमावील आणि जो माझ्याकरिता आपला जीव गमावतो, तो आपला जीव सुरक्षित राखील. “जे तुमचे स्वागत करतात, ते माझे स्वागत करतात आणि जे माझे स्वागत करतात, ते ज्यांनी मला पाठविले त्यांचे स्वागत करतात. जो संदेष्ट्यांचा संदेष्टा म्हणून स्वीकार करतो, त्याला संदेष्ट्यांचे प्रतिफळ मिळेल; जो कोणी नीतिमान मनुष्याचा स्वीकार नीतिमान आहे म्हणून करतो, त्याला नीतिमान मनुष्याचे प्रतिफळ मिळेल. मी तुम्हाला निश्चित सांगतो की, जर कोणी या लहानातील एकाला जो माझा शिष्य आहे त्याला पेलाभर थंड पाणी प्यावयास दिले, तर तो आपल्या पारितोषिकाला मुकणार नाही.”
मत्तय 10:24-42 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
गुरूपेक्षा शिष्य थोर नाही, आणि धन्यापेक्षा दास थोर नाही. शिष्याने गुरूसारखे व दासाने धन्यासारखे व्हावे, इतके त्याला पुरे. घरधन्यास बालजबूल म्हटले तर घरच्या माणसांना कितीतरी अधिक म्हणतील? ह्यास्तव त्यांना भिऊ नका; कारण उघडकीस येणार नाही असे काही झाकलेले नाही आणि कळणार नाही असे काही गुप्त नाही. जे मी तुम्हांला अंधारात सांगतो ते उजेडात बोला आणि तुमच्या कानात सांगितलेले जे तुम्ही ऐकता ते धाब्यांवरून घोषित करा. जे शरीराचा घात करतात पण आत्म्याचा घात करण्यास समर्थ नाहीत त्यांना भिऊ नका, तर आत्मा व शरीर ह्या दोहोंचा नरकात नाश करण्यास जो समर्थ आहे त्याला भ्या. दोन चिमण्या दमडीला विकतात की नाही? तथापि तुमच्या पित्याच्या आज्ञेवाचून त्यांतून एकही भूमीवर पडणार नाही. तुमच्या डोक्यावरील सर्व केसदेखील मोजलेले आहेत. म्हणून भिऊ नका; पुष्कळ चिमण्यांपेक्षा तुमचे मोल अधिक आहे. जो कोणी माणसांसमोर मला पत्करील त्याला मीही आपल्या स्वर्गातील पित्यासमोर पत्करीन; पण जो कोणी माणसांसमोर मला नाकारील त्याला मीही आपल्या स्वर्गातील पित्यासमोर नाकारीन. मी पृथ्वीवर शांतता आणण्यास आलो असे समजू नका. मी शांतता आणण्यास नव्हे तर तलवार चालवण्यास आलो आहे. कारण ‘मुलगा व बाप, मुलगी व आई, सून व सासू ह्यांच्यात फूट’ पाडण्यास मी आलो आहे; आणि ‘मनुष्याच्या घरचेच लोक त्याचे वैरी होतील.’ जो माझ्यापेक्षा आपल्या बापावर किंवा आईवर अधिक प्रेम करतो तो मला योग्य नाही; जो माझ्यापेक्षा मुलावर किंवा मुलीवर अधिक प्रेम करतो तो मला योग्य नाही; आणि जो आपला वधस्तंभ उचलून घेऊन माझ्यामागे येत नाही तो मला योग्य नाही. ज्याने आपला जीव राखला तो त्याला गमावील, आणि ज्याने माझ्याकरता आपला जीव गमावला तो त्याला राखील. जो तुम्हांला स्वीकारतो, तो मला स्वीकारतो आणि जो मला स्वीकारतो तो ज्याने मला पाठवले त्याला स्वीकारतो. संदेष्ट्याला संदेष्टा म्हणून जो स्वीकारतो त्याला संदेष्ट्याचे प्रतिफळ मिळेल आणि नीतिमानाला नीतिमान म्हणून जो स्वीकारतो त्याला नीतिमानाचे प्रतिफळ मिळेल. आणि ह्या लहानांतील एकाला शिष्य म्हणून जो कोणी केवळ गार पाण्याचा एक प्याला पाजतो तो आपल्या प्रतिफळाला मुकणारच नाही असे मी तुम्हांला खचीत सांगतो.”
मत्तय 10:24-42 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
गुरूपेक्षा शिष्य थोर नाही आणि धन्यापेक्षा दास महान नाही. शिष्याने गुरूसारखे व दासाने धन्यासारखे व्हावे, एवढे पुरे. कुटुंबप्रमुखाला बाल्जबूल म्हणतात तर कुटुंबातील सदस्यांना कितीतरी अधिक वाईट नावे ठेवतील! तर मग तुम्ही त्यांना भिऊ नका. उघडकीस येणार नाही, असे काही झाकलेले राहणार नाही आणि प्रत्येक गुपित उघड केले जाईल. जे मी तुम्हांला अंधारात सांगतो त्याची उजेडात पुनरुक्ती करा आणि तुमच्या कानांत सांगितलेले जे तुम्ही ऐकता, ते छपरावरून घोषित करा. जे शरीराचा घात करतात पण आत्म्याचा घात करायला समर्थ नाहीत, त्यांना भिऊ नका, तर आत्मा व शरीर ह्या दोहोंचा नरकात नाश करायला जो समर्थ आहे, त्याचे भय बाळगा. दोन चिमण्यांची किंमत ती काय? पण तुमच्या पित्याच्या संमतीशिवाय त्यांतून एकही जमिनीवर पडत नाही. तसेच तुमच्या डोक्यावरचे सर्व केसदेखील मोजलेले आहेत. म्हणून भिऊ नका. पुष्कळ चिमण्यांपेक्षा तुमचे मोल अधिक आहे! जो कोणी इतरांसमोर मला पत्करील, त्याला मीही माझ्या स्वर्गातील पित्यासमोर पत्करीन. परंतु जो कोणी इतरांसमोर मला नाकारील, त्याला मीही माझ्या स्वर्गातील पित्यासमोर नाकारीन. मी पृथ्वीवर शांती आणायला आलो आहे, असे समजू नका. शांती नव्हे तर तलवार घेऊन मी आलो आहे. मुलगा व वडील, मुलगी व आई, सून व सासू ह्यांच्यांत फूट पाडायला मी आलो आहे. मनुष्याचे कुटुंबीयच त्याचे वैरी होतील. जो माझ्यापेक्षा वडिलांवर किंवा आईवर अधिक प्रेम करतो, तो माझ्यासाठी योग्य नाही. जो माझ्यापेक्षा आपल्या मुलावर किंवा मुलीवर अधिक प्रेम करतो, तोही माझ्यासाठी योग्य नाही. जो आपला क्रुस उचलून घेऊन माझ्यामागे येत नाही, तो माझ्यासाठी योग्य नाही. जो आपले जीवन वाचवतो, तो ते गमावेल आणि जो माझ्याकरता आपले जीवन गमावतो, तो ते वाचवेल. जो तुमचा स्वीकार करतो, तो माझा स्वीकार करतो आणि जो माझा स्वीकार करतो, तो ज्याने मला पाठवले, त्याचा स्वीकार करतो. जो कोणी संदेष्ट्याचा संदेष्टा म्हणून स्वीकार करतो, त्याला संदेष्ट्याचे पारितोषिक मिळेल. जो कोणी नीतिमान माणसाचा नीतिमान माणूस म्हणून स्वीकार करतो, त्याला नीतिमान माणसाचे पारितोषिक मिळेल. ह्या लहानांतल्या एकाला तो माझा शिष्य आहे म्हणून जो कोणी केवळ गार पाण्याचा एक प्याला पाजतो त्याला त्याचे पारितोषिक मिळाल्याशिवाय राहणार नाही, हे मी तुम्हांला निक्षून सांगतो.”