मत्तय 1:18-21
मत्तय 1:18-21 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
येशू ख्रिस्ताचा जन्म याप्रकारे झाला; त्याची आई मरीया हिची योसेफाशी मागणी झालेली होती, पण त्यांचा सहवास होण्यापूर्वी ती पवित्र आत्म्यापासून गर्भवती झालेली दिसून आली. मरीयेचा पती योसेफ हा नीतिमान होता, परंतु समाजामध्ये तिचा अपमान होऊ नये अशी त्याची इच्छा होती, म्हणून त्याने गुप्तपणे तिच्यासोबतची मागणी मोडण्याचा निर्णय घेतला. तो या गोष्टींविषयी विचार करीत असता त्यास स्वप्नात प्रभूच्या दूताने दर्शन देऊन म्हटले; “योसेफा, दावीदाच्या पुत्रा, तू मरीयेला आपली पत्नी म्हणून स्वीकार करण्यास घाबरू नकोस, कारण जो गर्भ तिच्या पोटी राहीला आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे. ती पुत्राला जन्म देईल आणि तू त्याचे नाव येशू ठेव, तो आपल्या लोकांस त्यांच्या पापांपासून तारील.”
मत्तय 1:18-21 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
येशू ख्रिस्त यांचा जन्म अशाप्रकारे झाला: त्यांची आई मरीया, हिचे लग्न योसेफाबरोबर ठरलेले होते. परंतु ते दोघे एकत्र येण्यापूर्वीच, मरीया पवित्र आत्म्याद्वारे गर्भवती आहे असे आढळून आले. तिचा पती योसेफ हा नीतिमान होता, आणि समाजात तिला लज्जित करू नये म्हणून त्याने तिला गुप्तपणे घटस्फोट देण्याचे मनात ठरविले. परंतु हे त्याने ठरविल्यानंतर, प्रभुचा एक दूत त्याला स्वप्नात प्रकट झाला आणि म्हणाला, “योसेफा दावीदाच्या पुत्रा, आपली पत्नी म्हणून मरीयेला घरी नेण्यास भिऊ नकोस, कारण जे तिच्या गर्भामध्ये आहे ते पवित्र आत्म्याकडून आहे. ती पुत्राला जन्म देईल आणि तू त्यांचे नाव येशू ठेव, कारण तेच आपल्या लोकांचे त्यांच्या पापांपासून तारण करतील.”
मत्तय 1:18-21 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
येशू ख्रिस्ताचा जन्म ह्या प्रकारे झाला. त्याची आई मरीया हिचे योसेफास वाग्दान झाल्यावर त्यांचा सहवास होण्यापूर्वी ती पवित्र आत्म्यापासून गर्भवती झालेली दिसून आली. तिचा पती योसेफ नीतिमान होता व तिची बेअब्रू करण्याची त्याची इच्छा नसल्यामुळे तिला गुप्तपणे सोडण्याचा त्याने विचार केला. असे विचार त्याच्या मनात घोळत असता पाहा, प्रभूच्या दूताने त्याला स्वप्नात दर्शन देऊन म्हटले, “योसेफा, दाविदाच्या पुत्रा, तू मरीयेचा आपली पत्नी म्हणून स्वीकार करण्यास अनमान करू नकोस, कारण तिच्या पोटी जो गर्भ आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे. तिला पुत्र होईल, आणि त्याचे नाव तू येशू असे ठेव, कारण तोच आपल्या प्रजेला त्यांच्या पापांपासून तारील.”
मत्तय 1:18-21 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
येशू ख्रिस्ताचा जन्म अशा प्रकारे झाला: त्याची आई मरिया हिचा योसेफबरोबर वाङ्निश्चय झाल्यावर त्यांचा सहवास होण्यापूर्वी ती पवित्र आत्म्यापासून गर्भवती झालेली दिसून आली. तिचा पती योसेफ नीतिमान होता व तिची बेअब्रु करण्याची त्याची इच्छा नसल्यामुळे तिला गुपचूप सोडून देण्याचा त्याने विचार केला. असा विचार त्याच्या मनात घोळत असता पाहा, प्रभूच्या दूताने त्याला स्वप्नात दर्शन दिले व म्हटले, “दावीदपुत्र योसेफ, तू मरियेला तुझी पत्नी म्हणून स्वीकारण्यास घाबरू नकोस कारण तिच्या पोटी जो गर्भ आहे, तो पवित्र आत्म्यापासून आहे. तिला पुत्र होईल. त्याचे नाव तू येशू असे ठेव कारण तो त्याच्या लोकांना पापांपासून मुक्त करील.”