YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 1:17-25

मत्तय 1:17-25 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

अशाप्रकारे अब्राहामापासून दावीदापर्यंत सर्व मिळून चौदा पिढ्या, दावीदापासून बाबेलास देशांतर होईपर्यंत चौदा पिढ्या आणि बाबेलास देशांतर झाल्यापासून ख्रिस्तापर्यंत चौदा पिढ्या. येशू ख्रिस्ताचा जन्म याप्रकारे झाला; त्याची आई मरीया हिची योसेफाशी मागणी झालेली होती, पण त्यांचा सहवास होण्यापूर्वी ती पवित्र आत्म्यापासून गर्भवती झालेली दिसून आली. मरीयेचा पती योसेफ हा नीतिमान होता, परंतु समाजामध्ये तिचा अपमान होऊ नये अशी त्याची इच्छा होती, म्हणून त्याने गुप्तपणे तिच्यासोबतची मागणी मोडण्याचा निर्णय घेतला. तो या गोष्टींविषयी विचार करीत असता त्यास स्वप्नात प्रभूच्या दूताने दर्शन देऊन म्हटले; “योसेफा, दावीदाच्या पुत्रा, तू मरीयेला आपली पत्नी म्हणून स्वीकार करण्यास घाबरू नकोस, कारण जो गर्भ तिच्या पोटी राहीला आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे. ती पुत्राला जन्म देईल आणि तू त्याचे नाव येशू ठेव, तो आपल्या लोकांस त्यांच्या पापांपासून तारील.” प्रभूने संदेष्ट्यांच्याद्वारे जे सांगितले होते ते परिपूर्ण व्हावे यासाठी हे सर्व झाले, ते असे, “पाहा कुमारी गर्भवती होईल व पुत्राला जन्म देईल, आणि त्यास इम्मानुएल हे नाव देतील.” या नावाचा अर्थ, “आम्हाबरोबर देव.” तेव्हा झोपेतून उठल्यावर प्रभूच्या दूताने आज्ञा दिली होती तसे योसेफाने केले, त्याने तिचा आपली पत्नी म्हणून स्वीकार केला. तरी मुलाचा जन्म होईपर्यंत त्याने तिच्याशी सहवास ठेवला नाही; आणि त्याने त्याचे नाव येशू ठेवले.

सामायिक करा
मत्तय 1 वाचा

मत्तय 1:17-25 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

अब्राहामापासून दावीदापर्यंत सर्व मिळून चौदा पिढ्या, दावीदापासून बाबेलच्या बंदिवासापर्यंत चौदा पिढ्या, बंदिवासापासून ख्रिस्तापर्यंत चौदा पिढ्या. येशू ख्रिस्ताचा जन्म अशाप्रकारे झाला: त्यांची आई मरीयाचा िववाह योसेफाबरोबर ठरला होता. परंतु ते दोघे एकत्र येण्यापूर्वीच, मरीया पवित्र आत्म्याद्वारे गर्भवती आहे असे आढळून आले. तिचा पती योसेफ हा नीतिमान होता, आणि समाजात तिला लज्जित करू नये म्हणून त्याने तिला गुप्तपणे घटस्फोट देण्याचे मनात ठरविले. परंतु हे त्याने ठरविल्यानंतर, प्रभूचा एक दूत त्याला स्वप्नात प्रकट झाला आणि म्हणाला, “दावीदाच्या पुत्रा योसेफा, आपली पत्नी म्हणून मरीयेला घरी नेण्यास भिऊ नकोस, कारण तिच्या गर्भामध्ये जो आहे तो पवित्र आत्म्याकडून आहे. ती पुत्राला जन्म देईल आणि तू त्याचे नाव येशू ठेव, कारण तेच आपल्या लोकांचे त्यांच्या पापांपासून तारण करतील.” प्रभूने आपल्या संदेष्ट्यांच्याद्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून हे सर्व घडून आले. “कुमारी गर्भवती होईल आणि ती एक पुत्र प्रसवेल आणि त्याला इम्मानुएल हे नाव देतील” (इम्मानुएलचा अर्थ “परमेश्वर आम्हाबरोबर”). योसेफाने जागा झाल्यावर, प्रभूच्या दूताने दिलेल्या आज्ञेप्रमाणे केले आणि मरीयेला त्याची पत्नी म्हणून घरी आणले. तरीपण तिच्या पुत्राचा जन्म होईपर्यंत त्याने तिच्याशी शरीर संबंध ठेवला नाही. योसेफाने पुत्राचे नाव येशू ठेवले.

सामायिक करा
मत्तय 1 वाचा

मत्तय 1:17-25 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

ह्याप्रमाणे अब्राहामापासून दाविदापर्यंत सर्व मिळून चौदा पिढ्या; दाविदापासून बाबेलास देशांतर होईपर्यंत चौदा पिढ्या; आणि बाबेलास देशांतर झाल्यापासून ख्रिस्तापर्यंत चौदा पिढ्या. येशू ख्रिस्ताचा जन्म ह्या प्रकारे झाला. त्याची आई मरीया हिचे योसेफास वाग्दान झाल्यावर त्यांचा सहवास होण्यापूर्वी ती पवित्र आत्म्यापासून गर्भवती झालेली दिसून आली. तिचा पती योसेफ नीतिमान होता व तिची बेअब्रू करण्याची त्याची इच्छा नसल्यामुळे तिला गुप्तपणे सोडण्याचा त्याने विचार केला. असे विचार त्याच्या मनात घोळत असता पाहा, प्रभूच्या दूताने त्याला स्वप्नात दर्शन देऊन म्हटले, “योसेफा, दाविदाच्या पुत्रा, तू मरीयेचा आपली पत्नी म्हणून स्वीकार करण्यास अनमान करू नकोस, कारण तिच्या पोटी जो गर्भ आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे. तिला पुत्र होईल, आणि त्याचे नाव तू येशू असे ठेव, कारण तोच आपल्या प्रजेला त्यांच्या पापांपासून तारील.” हे सर्व अशासाठी झाले की, प्रभूने संदेष्ट्याच्या द्वारे जे सांगितले ते पूर्ण व्हावे; ते असे : “पाहा, कुमारी गर्भवती होईल व तिला पुत्र होईल आणि त्याला इम्मानुएल हे नाव देतील.” ह्या नावाचा अर्थ, ‘आमच्याबरोबर देव.’ तेव्हा झोपेतून उठल्यावर त्याने प्रभूच्या दूताने आज्ञापिल्याप्रमाणे केले; त्याने आपल्या पत्नीचा स्वीकार केला, तरी तिला प्रथमपुत्र होईपर्यंत त्याने तिला जाणले नाही; मग त्याने त्याचे नाव येशू ठेवले.

सामायिक करा
मत्तय 1 वाचा

मत्तय 1:17-25 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

अशा प्रकारे अब्राहामपासून दावीदपर्यंत सर्व मिळून चौदा पिढ्या; दावीदपासून इस्राएली लोकांचे बाबेलला देशांतर होईपर्यंत चौदा पिढ्या आणि बाबेलला देशांतर झाल्यापासून ख्रिस्तापर्यंत चौदा पिढ्या. येशू ख्रिस्ताचा जन्म अशा प्रकारे झाला: त्याची आई मरिया हिचा योसेफबरोबर वाङ्‌निश्चय झाल्यावर त्यांचा सहवास होण्यापूर्वी ती पवित्र आत्म्यापासून गर्भवती झालेली दिसून आली. तिचा पती योसेफ नीतिमान होता व तिची बेअब्रु करण्याची त्याची इच्छा नसल्यामुळे तिला गुपचूप सोडून देण्याचा त्याने विचार केला. असा विचार त्याच्या मनात घोळत असता पाहा, प्रभूच्या दूताने त्याला स्वप्नात दर्शन दिले व म्हटले, “दावीदपुत्र योसेफ, तू मरियेला तुझी पत्नी म्हणून स्वीकारण्यास घाबरू नकोस कारण तिच्या पोटी जो गर्भ आहे, तो पवित्र आत्म्यापासून आहे. तिला पुत्र होईल. त्याचे नाव तू येशू असे ठेव कारण तो त्याच्या लोकांना पापांपासून मुक्त करील.” हे सर्व अशासाठी झाले की, प्रभूने संदेष्ट्याद्वारे जे भाकीत केले होते ते पूर्ण व्हावे. ते असे: पाहा, कुमारी गर्भवती होईल व तिला पुत्र होईल आणि त्याला इम्मानुएल हे नाव देतील. ह्या नावाचा अर्थ ‘आमच्याबरोबर देव’ असा आहे. झोपेतून उठल्यावर त्याने प्रभूच्या दूताने आदेश दिल्याप्रमाणे त्याच्या पत्नीचा स्वीकार केला. मात्र तिला पुत्र होईपर्यंत त्याने तिच्याबरोबर शरीरसंबंध ठेवला नाही. त्याने त्या बाळाचे नाव येशू असे ठेवले.

सामायिक करा
मत्तय 1 वाचा