YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 1:1-25

मत्तय 1:1-25 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

अब्राहामाचा पुत्र दावीद याचा पुत्र जो येशू ख्रिस्त याची वंशावळ. अब्राहामास इसहाक झाला, इसहाकास याकोब, याकोबास यहूदा व त्याचे भाऊ झाले. यहूदास तामारेपासून पेरेस व जेरह झाले, पेरेसास हेस्रोन, हेस्रोनास अराम झाला. अरामास अम्मीनादाब, अम्मीनादाबास नहशोन, नहशोनास सल्मोन, सल्मोनास राहाबेपासून बवाज, बवाजास रूथपासून ओबेद, ओबेदास इशाय झाला. आणि इशायास दावीद राजा झाला. उरीयाच्या पत्नीपासून दावीदास शलमोन झाला. शलमोनास रहबाम, रहबामास अबीया, अबीयास आसा झाला. आसास यहोशाफाट, यहोशाफाटास योराम आणि योरामास उज्जीया, उज्जीयास योथाम, योथामास आहाज, आहाजास हिज्कीया, हिज्कीयास मनश्शे, मनश्शेस आमोन, आमोनास योशीया, आणि बाबेलास देशांतर झाले त्यावेळी योशीयास यखन्या व त्याचे भाऊ झाले. बाबेलास देशांतर झाल्यानंतर यखन्यास शल्तीएल झाला, शल्तीएलास जरूब्बाबेल झाला. जरूब्बाबेलास अबीहूद, अबीहूदास एल्याकीम, एल्याकीमास अज्जुर झाला. अज्जुरास सादोक, सादोकास याखीम, याखीमास एलीहूद झाला. एलीहूदास एलाजार झाला. एलाजारास मत्तान, मत्तानास याकोब, याकोबास योसेफ झाला; जो मरीयेचा पती होता जिच्यापासून ख्रिस्त म्हटलेला येशू जन्मास आला. अशाप्रकारे अब्राहामापासून दावीदापर्यंत सर्व मिळून चौदा पिढ्या, दावीदापासून बाबेलास देशांतर होईपर्यंत चौदा पिढ्या आणि बाबेलास देशांतर झाल्यापासून ख्रिस्तापर्यंत चौदा पिढ्या. येशू ख्रिस्ताचा जन्म याप्रकारे झाला; त्याची आई मरीया हिची योसेफाशी मागणी झालेली होती, पण त्यांचा सहवास होण्यापूर्वी ती पवित्र आत्म्यापासून गर्भवती झालेली दिसून आली. मरीयेचा पती योसेफ हा नीतिमान होता, परंतु समाजामध्ये तिचा अपमान होऊ नये अशी त्याची इच्छा होती, म्हणून त्याने गुप्तपणे तिच्यासोबतची मागणी मोडण्याचा निर्णय घेतला. तो या गोष्टींविषयी विचार करीत असता त्यास स्वप्नात प्रभूच्या दूताने दर्शन देऊन म्हटले; “योसेफा, दावीदाच्या पुत्रा, तू मरीयेला आपली पत्नी म्हणून स्वीकार करण्यास घाबरू नकोस, कारण जो गर्भ तिच्या पोटी राहीला आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे. ती पुत्राला जन्म देईल आणि तू त्याचे नाव येशू ठेव, तो आपल्या लोकांस त्यांच्या पापांपासून तारील.” प्रभूने संदेष्ट्यांच्याद्वारे जे सांगितले होते ते परिपूर्ण व्हावे यासाठी हे सर्व झाले, ते असे, “पाहा कुमारी गर्भवती होईल व पुत्राला जन्म देईल, आणि त्यास इम्मानुएल हे नाव देतील.” या नावाचा अर्थ, “आम्हाबरोबर देव.” तेव्हा झोपेतून उठल्यावर प्रभूच्या दूताने आज्ञा दिली होती तसे योसेफाने केले, त्याने तिचा आपली पत्नी म्हणून स्वीकार केला. तरी मुलाचा जन्म होईपर्यंत त्याने तिच्याशी सहवास ठेवला नाही; आणि त्याने त्याचे नाव येशू ठेवले.

सामायिक करा
मत्तय 1 वाचा

मत्तय 1:1-25 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

अब्राहामाचा पुत्र दावीदाचा पुत्र, येशू ख्रिस्ताची ही वंशावळी: अब्राहाम इसहाकाचा पिता होता, इसहाक याकोबाचा पिता, याकोब यहूदाह व त्याच्या भावांचा पिता होता, यहूदाह पेरेस व जेरहचा पिता, त्यांची आई तामार होती. पेरेस हेस्रोनचा पिता, हेस्रोन अरामचा पिता, अराम अम्मीनादाबाचा पिता, अम्मीनादाब नहशोनाचा पिता, नहशोन हा सल्मोनाचा पिता, सल्मोन बवाजाचा पिता व त्याची आई राहाब होती, बवाज ओबेदाचा पिता, ओबेदची आई रूथ होती, ओबेद इशायाचा पिता, इशाय दावीद राजाचा पिता, दावीद शलोमोनाचा पिता, शलोमोनाची आई पूर्वी उरीयाहची पत्नी होती, शलोमोन रहबामाचा पिता, रहबाम अबीयाचा पिता, अबीया आसाचा पिता, आसा यहोशाफाटाचा पिता, यहोशाफाट योरामाचा पिता, योराम उज्जीयाहचा पिता, उज्जीयाह योथामाचा पिता, योथाम आहाजाचा पिता, आहाज हिज्कीयाचा पिता, हिज्कीयाह मनश्शेहचा पिता, मनश्शेह आमोनाचा पिता, आमोन योशीयाहचा, योशीयाह यखन्या व त्यांच्या भावांचा पिता होता, हे बाबेलमध्ये हद्दपार केले तेव्हा झाले. बाबेलमध्ये हद्दपार झाल्यावर: यखन्या शल्तीएलचा पिता, शल्तीएल जरूब्बाबेलाचे पिता, जरूब्बाबेल अबीहूदचा पिता, अबीहूद एल्याकीमचा पिता, एल्याकीम अज्जूरचा पिता, अज्जूर सादोकाचा पिता, सादोक याखीमचा पिता, याखीम एलीहूदाचा पिता, एलीहूद एलअज़ाराचा पिता, एलअज़ार मत्तानाचा पिता, मत्तान याकोबाचा पिता, याकोब योसेफाचा पिता, योसेफ मरीयेचा पती होता; मरीया, ज्यांना ख्रिस्त म्हणत त्या येशूची आई होती. अब्राहामापासून दावीदापर्यंत सर्व मिळून चौदा पिढ्या, दावीदापासून बाबेलच्या बंदिवासापर्यंत चौदा पिढ्या, बंदिवासापासून ख्रिस्तापर्यंत चौदा पिढ्या. येशू ख्रिस्ताचा जन्म अशाप्रकारे झाला: त्यांची आई मरीयाचा िववाह योसेफाबरोबर ठरला होता. परंतु ते दोघे एकत्र येण्यापूर्वीच, मरीया पवित्र आत्म्याद्वारे गर्भवती आहे असे आढळून आले. तिचा पती योसेफ हा नीतिमान होता, आणि समाजात तिला लज्जित करू नये म्हणून त्याने तिला गुप्तपणे घटस्फोट देण्याचे मनात ठरविले. परंतु हे त्याने ठरविल्यानंतर, प्रभूचा एक दूत त्याला स्वप्नात प्रकट झाला आणि म्हणाला, “दावीदाच्या पुत्रा योसेफा, आपली पत्नी म्हणून मरीयेला घरी नेण्यास भिऊ नकोस, कारण तिच्या गर्भामध्ये जो आहे तो पवित्र आत्म्याकडून आहे. ती पुत्राला जन्म देईल आणि तू त्याचे नाव येशू ठेव, कारण तेच आपल्या लोकांचे त्यांच्या पापांपासून तारण करतील.” प्रभूने आपल्या संदेष्ट्यांच्याद्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून हे सर्व घडून आले. “कुमारी गर्भवती होईल आणि ती एक पुत्र प्रसवेल आणि त्याला इम्मानुएल हे नाव देतील” (इम्मानुएलचा अर्थ “परमेश्वर आम्हाबरोबर”). योसेफाने जागा झाल्यावर, प्रभूच्या दूताने दिलेल्या आज्ञेप्रमाणे केले आणि मरीयेला त्याची पत्नी म्हणून घरी आणले. तरीपण तिच्या पुत्राचा जन्म होईपर्यंत त्याने तिच्याशी शरीर संबंध ठेवला नाही. योसेफाने पुत्राचे नाव येशू ठेवले.

सामायिक करा
मत्तय 1 वाचा

मत्तय 1:1-25 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

अब्राहामाचा पुत्र दावीद ह्याचा पुत्र जो येशू ख्रिस्त, त्याची वंशावळी. अब्राहामाला इसहाक झाला; इसहाकाला याकोब; याकोबाला यहूदा व त्याचे भाऊ झाले; यहूदाला तामारेपासून पेरेस व जेरह झाले; पेरेसाला हेस्रोम झाला; हेस्रोमाला अराम झाला; अरामाला अम्मीनादाब; अम्मीनादाबाला नहशोन; नहशोनाला सल्मोन; सल्मोनाला राहाबेपासून बवाज; बवाजाला रूथपासून ओबेद; ओबेदाला इशाय; आणि इशायाला दावीद राजा झाला. जी पूर्वी उरीयाची बायको होती तिच्यापासून दाविदाला शलमोन झाला; शलमोनाला रहबाम; रहबामाला अबीया; अबीयाला आसा; आसाला यहोशाफाट; यहोशाफाटाला योराम; योरामाला उज्जीया; उज्जीयाला योथाम; योथामाला आहाज; आहाजाला हिज्कीया; हिज्कीयाला मनश्शे; मनश्शेला आमोन; आमोनाला योशीया; आणि बाबेलास देशांतर झाले त्या वेळी योशीयाला यखन्या व त्याचे भाऊ झाले. बाबेलास देशांतर झाल्यावर यखन्याला शल्तीएल झाला. शल्तीएलाला जरूब्बाबेल; जरूब्बाबेलाला अबीहूद; अबीहूदाला एल्याकीम; एल्याकीमाला अज्जुर; अज्जुराला सादोक; सादोकाला याखीम; याखीमाला एलीहूद; एलीहूदाला एलाजार; एलाजाराला मत्तान; मत्तानाला याकोब; आणि याकोबाला योसेफ झाला. ज्या मरीयेपासून ख्रिस्त म्हटलेला येशू जन्मला तिचा हा पती. ह्याप्रमाणे अब्राहामापासून दाविदापर्यंत सर्व मिळून चौदा पिढ्या; दाविदापासून बाबेलास देशांतर होईपर्यंत चौदा पिढ्या; आणि बाबेलास देशांतर झाल्यापासून ख्रिस्तापर्यंत चौदा पिढ्या. येशू ख्रिस्ताचा जन्म ह्या प्रकारे झाला. त्याची आई मरीया हिचे योसेफास वाग्दान झाल्यावर त्यांचा सहवास होण्यापूर्वी ती पवित्र आत्म्यापासून गर्भवती झालेली दिसून आली. तिचा पती योसेफ नीतिमान होता व तिची बेअब्रू करण्याची त्याची इच्छा नसल्यामुळे तिला गुप्तपणे सोडण्याचा त्याने विचार केला. असे विचार त्याच्या मनात घोळत असता पाहा, प्रभूच्या दूताने त्याला स्वप्नात दर्शन देऊन म्हटले, “योसेफा, दाविदाच्या पुत्रा, तू मरीयेचा आपली पत्नी म्हणून स्वीकार करण्यास अनमान करू नकोस, कारण तिच्या पोटी जो गर्भ आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे. तिला पुत्र होईल, आणि त्याचे नाव तू येशू असे ठेव, कारण तोच आपल्या प्रजेला त्यांच्या पापांपासून तारील.” हे सर्व अशासाठी झाले की, प्रभूने संदेष्ट्याच्या द्वारे जे सांगितले ते पूर्ण व्हावे; ते असे : “पाहा, कुमारी गर्भवती होईल व तिला पुत्र होईल आणि त्याला इम्मानुएल हे नाव देतील.” ह्या नावाचा अर्थ, ‘आमच्याबरोबर देव.’ तेव्हा झोपेतून उठल्यावर त्याने प्रभूच्या दूताने आज्ञापिल्याप्रमाणे केले; त्याने आपल्या पत्नीचा स्वीकार केला, तरी तिला प्रथमपुत्र होईपर्यंत त्याने तिला जाणले नाही; मग त्याने त्याचे नाव येशू ठेवले.

सामायिक करा
मत्तय 1 वाचा

मत्तय 1:1-25 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

अब्राहामचा वंशज दावीद ह्याच्या कुळात जन्मलेल्या येशू ख्रिस्ताची वंशावळी: अब्राहामपासून दावीद राजापर्यंत जे वंशज होऊन गेले त्यांची यादी पुढीलप्रमाणे: अब्राहाम, इसहाक, याकोब, यहुदा व त्याचे भाऊ, त्यानंतर पेरेज व जेरह (ह्यांची आई तामार) हेस्रोन, अराम, अम्मीनादाब, नहशोन, सल्मोन, बवाज (ह्याची आई राहाब), ओबेद (ह्याची आई रूथ), इशाय व दावीद राजा. दावीद राजाच्या काळापासून इस्राएली लोक बाबेल येथे हद्दपार होईपर्यंत पुढील पूर्वजांचा उल्‍लेख येतो: दावीद, शलमोन (ह्याची आई अगोदर उरियाची पत्नी होती) रहबाम, अबिया, आसा, यहोशाफाट, योराम, उज्जिया, योथाम, आहाज, हिज्किया, मनश्शे, आमोन, योशिया, यखन्या व त्याचे भाऊ. बाबेल येथील हद्दपार अवस्थेच्या काळापासून येशूच्या जन्मापर्यंत पुढील वंशजांची नावे नमूद केली आहेत: यखन्या, शल्तिएल, जरुब्बाबेल, अबिहूद, एल्याकीम, अज्जुर, सादोक, याखीम, एलिहूद, एलाजार, मत्तान, याकोब व योसेफ. ज्या मरियेपासून ख्रिस्त म्हटलेल्या येशूचा जन्म झाला तिचा हा पती. अशा प्रकारे अब्राहामपासून दावीदपर्यंत सर्व मिळून चौदा पिढ्या; दावीदपासून इस्राएली लोकांचे बाबेलला देशांतर होईपर्यंत चौदा पिढ्या आणि बाबेलला देशांतर झाल्यापासून ख्रिस्तापर्यंत चौदा पिढ्या. येशू ख्रिस्ताचा जन्म अशा प्रकारे झाला: त्याची आई मरिया हिचा योसेफबरोबर वाङ्‌निश्चय झाल्यावर त्यांचा सहवास होण्यापूर्वी ती पवित्र आत्म्यापासून गर्भवती झालेली दिसून आली. तिचा पती योसेफ नीतिमान होता व तिची बेअब्रु करण्याची त्याची इच्छा नसल्यामुळे तिला गुपचूप सोडून देण्याचा त्याने विचार केला. असा विचार त्याच्या मनात घोळत असता पाहा, प्रभूच्या दूताने त्याला स्वप्नात दर्शन दिले व म्हटले, “दावीदपुत्र योसेफ, तू मरियेला तुझी पत्नी म्हणून स्वीकारण्यास घाबरू नकोस कारण तिच्या पोटी जो गर्भ आहे, तो पवित्र आत्म्यापासून आहे. तिला पुत्र होईल. त्याचे नाव तू येशू असे ठेव कारण तो त्याच्या लोकांना पापांपासून मुक्त करील.” हे सर्व अशासाठी झाले की, प्रभूने संदेष्ट्याद्वारे जे भाकीत केले होते ते पूर्ण व्हावे. ते असे: पाहा, कुमारी गर्भवती होईल व तिला पुत्र होईल आणि त्याला इम्मानुएल हे नाव देतील. ह्या नावाचा अर्थ ‘आमच्याबरोबर देव’ असा आहे. झोपेतून उठल्यावर त्याने प्रभूच्या दूताने आदेश दिल्याप्रमाणे त्याच्या पत्नीचा स्वीकार केला. मात्र तिला पुत्र होईपर्यंत त्याने तिच्याबरोबर शरीरसंबंध ठेवला नाही. त्याने त्या बाळाचे नाव येशू असे ठेवले.

सामायिक करा
मत्तय 1 वाचा