मलाखी 4:1-6
मलाखी 4:1-6 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
“कारण पाहा, तो दिवस येत आहे, तो भट्टीसारखा जळतो, आणि सर्व गर्विष्ठ आणि प्रत्येक दुष्ट धसकट बनतील. येणारा दिवस त्यांना जाळून टाकील, म्हणजे एकही फांदी किंवा मूळ शिल्लक ठेवले जाणार नाही.” सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो. “परंतु जे तुम्ही माझ्या नावाचे भय धरता त्या तुम्हासाठी न्यायीपणाचा सूर्य उगवेल. आणि त्याच्या पंखात निरोगी करण्याचा उपाय आहे. मग तुम्ही गोठ्यातून सुटलेल्या वासरांप्रमाणे, मुक्त व आनंदी व्हाल. तुम्ही दुष्टांना तुडवाल, कारण मी हे करीन त्या दिवशी ते तुमच्या तळपायाखाली राख होतील.” सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो. “मोशे जो माझा सेवक होता त्यास होरेबात सर्व इस्राएलासाठी जे नियमशास्त्र मी आज्ञापिले ते, म्हणजे नियम व न्यायही तुम्ही आठवा.” “पाहा, परमेश्वराचा मोठा व भयंकर दिवस येईल त्यापूर्वी मी एलीया संदेष्ट्याला तुमच्याकडे पाठवीन. देवाच्या न्यायदानाच्या भयंकर मोठ्या वेळेपूर्वी तो येईल. आणि तो बापाचे हृदय मुलांकडे, आणि मुलांचे हृदय त्यांच्या बापाकडे फिरवील, नाहीतर मी कदाचित येईन आणि तुमच्या भूमीला शापाने मारीन.”
मलाखी 4:1-6 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
सर्वसमर्थ याहवेह म्हणतात, “निश्चितच तो दिवस येत आहे, जो धगधगत्या भट्टीसारखा ज्वलंत असेल. त्या भट्टीत गर्विष्ठ आणि दुष्ट लोक गवताच्या काडीप्रमाणे जळून जातील. तो दिवस येत आहे, जो त्यांना अग्नीत भस्मसात करेल. त्यांचे एकही मूळ अथवा फांदी त्यावर उरणार नाही. परंतु तुम्ही जे माझे नाव सन्माननीय मानता, त्या तुम्हासाठी नीतिमत्वाचा सूर्य उगवेल आणि त्याच्या किरणात आरोग्य असेल. मग तुम्ही बाहेर जाल व धष्टपुष्ट वासरांप्रमाणे बागडाल. जेव्हा मी कार्य करेन, त्या दिवशी तुम्ही दुष्ट लोकांना तुडवाल, ते तुमच्या पायाखालच्या राखेप्रमाणे होतील,” असे सर्वसमर्थ याहवेह म्हणतात. “होरेब पर्वतावर माझा सेवक मोशेमार्फत सर्व इस्राएली लोकांसाठी मी जे नियमशास्त्र दिले त्याची आठवण ठेवा. “पाहा! याहवेहचा तो महान व भयंकर दिवस येण्यापूर्वी, मी तुमच्याकडे संदेष्टा एलीयाहला पाठवेन. तो पालकांचे अंतःकरण त्यांच्या मुलांकडे व मुलांचे अंतःकरण त्यांच्या पालकांकडे करेल; अन्यथा मी फटकारून त्यांच्या देशाचा संपूर्ण नाश करेन.”
मलाखी 4:1-6 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
पाहा, भट्टीसारखा तप्त दिवस येत आहे; सर्व गर्विष्ठ व सर्व दुराचारी धसकट बनतील; तो येणारा दिवस त्यांना जाळून टाकील, त्यांचे मूळ, फांदी वगैरे काहीच राहू देणार नाही, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. पण तुम्ही जे माझ्या नावाचे भय धरणारे त्या तुमच्यावर न्याय्यत्वाचा सूर्य उदय पावेल, त्याच्या पंखांच्या ठायी आरोग्य असेल; तुम्ही गोठ्यातल्या वत्सांप्रमाणे बाहेर पडून बागडाल. तुम्ही दुष्टांना तुडवाल; कारण मी हे करीन त्या दिवशी ते तुमच्या पायांच्या तळव्यांखाली राखेप्रमाणे होतील, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. माझा सेवक मोशे ह्याला सर्व इस्राएलसाठी म्हणून होरेबात मी दिलेले नियमशास्त्र, म्हणजे अर्थात नियम व निर्णय ह्यांचे स्मरण ठेवा.” पाहा, परमेश्वराचा मोठा व भयंकर दिवस येण्यापूर्वी मी एलीया संदेष्ट्याला तुमच्याकडे पाठवीन. तो वडिलांचे हृदय त्यांच्या पुत्रांकडे व पुत्रांचे हृदय त्यांच्या वडिलांकडे वळवील; नाहीतर कदाचित मी येईन आणि भूमीला शापाने ताडन करीन.”