मलाखी 2:1-17
मलाखी 2:1-17 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
आता याजकहो, तुम्हांला ही आज्ञा होत आहे; सेनाधीश परमेश्वर म्हणतो, माझ्या नावाचा महिमा व्हावा ह्यासाठी तुम्ही ऐकून मन लावले नाही, तर मी तुमच्यावर शाप पाठवीन व तुमचे आशीर्वाद शाप करीन; तुम्ही लक्ष पुरवत नाही म्हणून मी त्यांना शापरूप करून चुकलो आहे. पाहा, मी तुमच्या शेतातले बी निर्जीव करीन,1 तुमच्या यज्ञपशूची विष्ठा तुमच्या मुखांना फाशीन; लोक विष्ठेबरोबर तुम्हांलाही फेकून देतील. लेव्यांबरोबर माझा करार कायम होण्यासाठी ही आज्ञा मी तुमच्याकडे पाठवली आहे हे तुम्हांला समजेल, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. मी त्यांच्याबरोबर केलेला करार जीवनाचा व शांतीचा होता; त्याने भय धरावे म्हणून मी ती त्याला दिली होती आणि त्याला माझी भीती वाटली व माझ्या नावाचा त्याला धाक वाटला. त्याच्या मुखात सत्याचे नियमशास्त्र होते, त्याच्या वाणीत कुटिलता आढळली नाही; तो माझ्याबरोबर शांतीने व सरळतेने वागला, व त्याने अनेकांना अधर्मापासून वळवले. कारण याजकाच्या वाणीच्या ठायी ज्ञान असावे, त्याच्या तोंडून नियमशास्त्र ऐकण्यास लोकांनी आतुर असावे; कारण तो सेनाधीश परमेश्वराचा निरोप्या आहे; पण तुम्ही मार्ग सोडून गेला आहात, नियमशास्त्राच्या मार्गात पुष्कळांना तुम्ही ठोकर खायला लावले आहे; तुम्ही लेव्यांचा करार बिघडवला आहे, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. ह्यास्तव मी तुम्हांला सर्व लोकांपुढे तुच्छ व नीच केले आहे, कारण तुम्ही माझ्या मार्गांनी चालत नाही व माणसांची भीड धरून न्याय करता.” आम्हा सर्वांचा एकच पिता नाही काय? एकाच देवाने आम्हांला उत्पन्न केले नाही काय? असे असताना आम्ही आपापल्या बंधूचा विश्वासघात करून आपल्या पूर्वजांचा करार का मोडतो बरे? यहूदा विश्वासघात करत आहे, इस्राएलमध्ये व यरुशलेमेत एक अमंगळ प्रकार घडला आहे; म्हणजे यहूदाने परमेश्वराला प्रिय असलेले त्याचे पवित्रस्थान भ्रष्ट केले आहे, व परक्या दैवताच्या कन्येबरोबर विवाह केला आहे. जो मनुष्य असे करतो तो हाक मारणारा असो, उत्तर देणारा असो, किंवा सेनाधीश परमेश्वराला यज्ञार्पण करणारा असो, त्याला परमेश्वर याकोबाच्या डेर्यातून नाहीसे करील. तसेच आसवे गाळणे, रडणे व उसासे टाकणे ह्यांनी परमेश्वराच्या वेदीला तुम्ही इतके झाकून टाकले आहे की तो यज्ञार्पणाकडे ढुंकून पाहत नाही; तुमच्या हातून ते आवडीने घेत नाही. तुम्ही म्हणता “असे का?” कारण तुझ्यामध्ये व तुझ्या तारुण्यातल्या स्त्रीमध्ये परमेश्वर साक्षी आहे; ती तर तुझी सहचारिणी व तुझी कराराची पत्नी असून तिच्याबरोबर तू विश्वासघाताने वागला आहेस. ज्याच्या ठायी आत्म्याचा थोडातरी अंश आहे अशा कोणीही असे कधी केले नाही; देवाला अनुसरणार्या संततीची इच्छा करणारा कोणी आहे काय? ह्याकरता आपल्या आत्म्याला जपावे; व आपल्या तरुणपणाच्या पत्नीचा कोणी विश्वासघात करू नये. परमेश्वर, इस्राएलाचा देव म्हणतो, मला सूटपत्राचा तिटकारा आहे; म्हणून सेनाधीश परमेश्वर म्हणतो, जो आपल्या पत्नीबरोबर2 क्रूरतेने वागतो त्याचा मी द्वेष करतो; तुम्ही आपल्या आत्म्याला जपा, विश्वासघाताने वागू नका.” तुम्ही आपल्या भाषणाने परमेश्वराला कंटाळा आणला आहे, तरी तुम्ही म्हणता, ‘आम्ही कशाने त्याला कंटाळा आणला?’ तुम्ही म्हणता, ‘प्रत्येक दुष्कर्मी इसम परमेश्वराच्या दृष्टीने चांगला आहे व तो त्याच्यासंबंधाने संतुष्ट असतो, नाहीतर न्याय करणारा देव आहे कुठे?’ अशाने तुम्ही त्याला कंटाळा आणला आहे.
मलाखी 2:1-17 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
“आणि आता, याजकांनो, हा आदेश तुमच्यासाठी आहे. सेनाधीश परमेश्वर म्हणतो, जर तुम्ही ऐकले नाही, आणि माझ्या नावाला महिमा देण्याचे तुम्ही आपल्या हृदयांत आणले नाही, तर मी तुम्हावर शाप पाठवीन आणि तुमच्या आशीर्वादांना शापीत करीन, खचित मी त्यास आधीच शाप दिला आहे. कारण तू माझ्या आज्ञा आपल्या हृदयात पाळत नाहीस. पाहा! मी तुमच्या वंशजांना शिक्षा करीन आणि तुमच्या यज्ञपशूंचे शेण मी तुमच्या तोंडावर फाशीन, आणि त्याबरोबर तुम्हासही फेकून देण्यात येईल. आणि तेव्हा तुम्हास कळेल की, माझा करार लेवी बरोबर असावा ह्यास्तव मी या आज्ञा तुम्हाकडे पाठवल्या आहेत,” असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. “लेवीबरोबर केलेला माझा करार हा जीवनाचा व शांतीचा होता, आणि त्याने माझा सन्मान करावा ह्यासाठी मी त्यास तो दिला. त्यांनी मला सन्मानित केले आणि माझ्या नावाचे भय त्यास वाटले. खरे शिक्षण त्याच्या मुखात होते आणि त्याच्या ओठांत अनीती आढळली नव्हती. शांतीने आणि सरळपणाने तो माझ्यात चालला, आणि त्याने अन्यायापासून पुष्कळांना फिरवले. कारण याजकांच्या ओठांनी ज्ञान राखावे, आणि लोकांनी त्याच्या मुखाद्वारे शिक्षण शोधावे, कारण तो सेनाधीश परमेश्वराचा दूत असा आहे.” “परंतु तुम्ही सत्याच्या मार्गावरून फिरले आहात. तुम्ही अनेक लोकांस नियमशास्राविषयी अडखळण्याचे कारण झाले आहात. लेवीचा करार तुम्ही भ्रष्ट केला आहे.” सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो. “ह्याबद्दल मी देखील तुला तिरस्कारणीय आणि सर्व लोकांसमोर नीच असे करीन. कारण तू माझे मार्ग पाळले नाहीत आणि नियमशास्त्र पाळण्यात पक्षपात केला आहे.” आम्हास एकच पिता नाही काय? एकाच देवाने आपल्याला निर्माण केले नाही काय? मग आम्ही आपापल्या भावाविरुद्ध विश्वासघात करून आपल्याच पूर्वजांचा करार का मोडतो? यहूदाने विश्वासघात केला आणि यरूशलेम व इस्राएलमध्ये तिरस्कारणीय गोष्टी केल्या आहेत. यहूदाने परमेश्वरास प्रिय असलेले पवित्र स्थान विटाळवीले आणि परक्या देवाच्या कन्येशी लग्न केले आहे. जो कोणी मनुष्य असे करतो आणि जो कोणी सेनाधीश परमेश्वरास अर्पण करतो त्यालाही परमेश्वर याकोबाच्या डेऱ्यातून काढून टाकील. आणखी तुम्ही परमेश्वराची वेदी आसवांनी, रडण्यांनी, उसासे टाकून झाकून टाकता, म्हणून तो अर्पण मान्य करत नाही आणि ते तुमच्या हातातून संतोषाने स्विकारत नाही. तुम्ही म्हणता, “असे का नाही?” कारण तुझ्यामध्ये व तुझ्या तारूण्यातल्या स्त्रीमध्ये परमेश्वर साक्षीदार आहे. ती तर तुझी सहचारिणी असून व तुझ्या कराराची पत्नी असून तिच्याशी तू विश्वासघाताने वागला आहेस. आणि त्याच्या जवळ आत्म्याचे शेष होते तरी त्याने एक केले नाही काय? आणि त्याने तुम्हास एक का केले? कारण तो ईश्वरीय संततीची आशा बाळगत होता. म्हणून तुम्ही आपल्या आत्म्याचे रक्षण करा, आणि कोणीही आपल्या तरूणपणाच्या पत्नी सोबत विश्वासघात करू नये. इस्राएलचा देव परमेश्वर म्हणतो, “घटस्फोटाचा मला तिटकारा आहे आणि त्याचाही जो आपल्या वस्राबरोबर म्हणजे पत्नीबरोबर हिंसेने वागतो त्याचाही मला तिटकार आहे. सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, यास्तव तुम्ही आपल्या आत्म्याचे रक्षण करा आणि अविश्वासू असू नका.” तुम्ही आपल्या शब्दांनी परमेश्वरास कंटाळविले आहे. परंतु तुम्ही म्हणता, त्यास आम्ही कशाने कंटाळविले आहे? तुम्ही म्हणता प्रत्येक दुष्कर्मी परमेश्वराच्या दृष्टीत चांगला आहे, आणि त्यास त्याच्यात आनंद आहे. किंवा न्यायी देव कोठे आहे? असे म्हणून तुम्ही त्यास कंटाळविले आहे.
मलाखी 2:1-17 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“आणि आता, अहो याजकांनो ऐका, हा सावधानतेचा इशारा तुमच्याकरिता आहे. जर तुम्ही ऐकले नाही आणि माझ्या नावाचे गौरव करण्याचा निश्चय केला नाही, तर मी तुम्हावर शाप पाठवेन आणि तुमच्या आशीर्वादास शाप देईन. होय, मी ते आधीच शापित केले आहेत, कारण तुम्ही माझ्या नावाचे गौरव करण्याचा निश्चय केला नाही,” असे सर्वसमर्थ याहवेह म्हणतात. “हे लक्षात ठेवा की मी तुमच्या मुलांना धमकावेन आणि तुम्ही मला सणासाठी अर्पण म्हणून आणलेल्या पशूंची विष्ठा मी तुमच्या मुखांना फाशीन आणि तुम्हाला तसेच जाऊ देईन. आणि मग तुम्हाला समजेल की मी तुम्हाला हा सावधानतेचा इशारा दिला आहे, जेणेकरून लेवी वंशाशी माझा करार कायम राहील,” असे सर्वसमर्थ याहवेह म्हणतात. “माझा करार लेवी वंशाशी होता, जीवन आणि शांतीचा करार आणि मी हे सर्व त्याला दिले; हे प्राप्त व्हावे म्हणून आदर करण्याची गरज होती आणि त्याने मला आदर दिला व माझ्या नामाचे भय बाळगले. सत्याचे शिक्षण त्याच्या मुखात होते व त्याच्या जिभेवर काहीही असत्य असे नव्हते. तो माझ्यासह शांती व नीतिमत्तेत चालला आणि त्याने अनेकांना त्यांच्या पापी जीवनापासून वळविले. “याजकांच्या ओठात याहवेहसंबंधीचे ज्ञान साठविलेले असावे, कारण तो सर्वसमर्थ याहवेहचा संदेष्टा आहे आणि लोक त्याच्या मुखाद्वारे शिकवण शोधतात. पण तुम्ही पथभ्रष्ट झाला आहात व तुमच्या शिक्षणामुळे अनेकजण अडखळून पडले आहेत; तुम्ही लेव्याचा करार विपरीत केला आहे,” असे सर्वसमर्थ याहवेह म्हणतात. “म्हणून सर्व लोकांच्या दृष्टीने मी तुम्हाला तिरस्करणीय व तुच्छ केले आहे; कारण तुम्ही स्वतः माझे मार्ग अनुसरले नाहीतच, पण कायद्याबाबत तुम्ही पक्षपात केला.” आपण सर्व एकाच पित्याची मुले नाही का? आपल्याला एकाच परमेश्वराने निर्माण केले नाही का? मग आपण एकमेकांचा विश्वासघात करून आपल्या पूर्वजांचा करार का मोडतो? यहूदाहने विश्वासघात केला. इस्राएल आणि यरुशलेम येथे अत्यंत घृणास्पद कार्य केले आहे: यहूदीयाच्या पुरुषांनी याहवेहचे प्रिय मंदिर परकीय मूर्तिपूजक स्त्रियांशी विवाह करून भ्रष्ट केले आहे. ज्याने अशी गोष्ट केली आहे, मग तो कोणीही असो, तो सर्वसमर्थ याहवेहस अर्पणे वाहत असेल तरीही याहवेह त्याला याकोबाच्या तंबूमधून काढून टाको. दुसरी गोष्ट तुम्ही ही करता: तुम्ही याहवेहच्या वेदीवर अश्रूंचा पूर वाहता. तुम्ही रडता व आक्रोश करता, कारण ते तुमच्या हातातील अर्पणांवर कृपादृष्टी टाकत नाहीत व प्रसन्नतेने त्यांचा स्वीकार करीत नाहीत. तुम्ही विचारता, “का?” कारण याहवेह तुम्ही व तुमच्या तारुण्यातील पत्नी मधील साक्षीदार आहेत. ती तुमची सहचारिणी आहे व तुमच्या वैवाहिक कराराद्वारे तुमची पत्नी आहे, तरीही तुम्ही तिचा विश्वासघात केला. तुम्हाला एकाच परमेश्वराने निर्माण केले नाही का? तुमचे शरीर व आत्मा त्यांचाच मालकीचे आहे. आणि एका परमेश्वरास काय हवे असते? धार्मिक संतती. म्हणून सावध राहा, आपल्या तारुण्यातील पत्नीचा विश्वासघात करू नका. याहवेह इस्राएलाचे परमेश्वर म्हणतात, “जिला संरक्षण देणे हे त्याचे कर्तव्य आहे, तिच्याविरुद्ध तो हिंसाचार करतो, तिचा तो तिरस्कार करतो व तिला घटस्फोट देतो.” म्हणून सावध राहा व विश्वासघात करू नका. तुम्ही आपल्या शब्दांनी याहवेहला त्रागा आणला आहे. पण तुम्ही विचारता, “आम्ही याहवेहला त्रागा कसा आणला?” असे म्हणूनच, “जे सर्व लोक दुष्टता करतात, ते याहवेहच्या दृष्टीने चांगले आहेत व ते त्यांच्यावर प्रसन्न आहेत, मग न्यायी परमेश्वर कुठे आहेत?”