लूक 9:28-36
लूक 9:28-36 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आणि या गोष्टी सांगितल्यानंतर सुमारे आठ दिवसानी असे झाले की, पेत्र व योहान व याकोब यांना बरोबर घेऊन तो प्रार्थना करायला डोंगरावर गेला. तेव्हा तो प्रार्थना करीत असता त्याच्या मुखाचे रूप पालटले व त्याचे वस्त्र पांढरे शुभ्र लखलखीत झाले. आणि पाहा, दोन पुरूष त्याच्याशी संभाषण करीत होते; हे मोशे व एलीया होते, ते तेजस्वी दिसत होते आणि जे त्याचे प्रयाण तो यरूशलेम शहरात पूर्ण करणार होता, त्याविषयी ते बोलत होते. तेव्हा पेत्र व त्याच्याबरोबर जे होते ते झोपेने भारावले होते, परंतु ते पूर्णपणे जागे झाले तेव्हा त्यांचे तेज आणि जे दोन पुरूष त्याच्याजवळ उभे राहिले होते त्यांनाही पहिले. मग असे झाले की ते त्याच्यापासून दूर होत असता पेत्राने येशूला म्हटले, “हे गुरु, येथे असणे आम्हास बरे आहे; तर आम्ही तीन मंडप करू, तुझ्यासाठी एक व मोशेसाठी एक व एलीयासाठी एक.” आपण काय बोलत आहोत याचे त्यास भान नव्हते. तो या गोष्टी बोलत असता एक ढग येऊन त्यांच्यावर सावली करू लागला आणि ते ढगांत शिरले तेव्हा ते भ्याले. आणि ढगांतून वाणी आली, ती म्हणाली, “हा माझा निवडलेला पुत्र आहे, याचे तुम्ही ऐका.” ही वाणी झाल्यावर येशू एकटाच दिसला आणि ते उगेच राहिले व ज्या गोष्टी त्यांनी पहिल्या होत्या त्यांतले काहीच त्यांनी त्या दिवसांमध्ये कोणाला सांगितले नाही.
लूक 9:28-36 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
येशूंनी या गोष्टी सांगितल्यानंतर सुमारे आठ दिवसांनी, पेत्र, याकोब आणि योहान यांना बरोबर घेतले आणि ते प्रार्थना करण्यासाठी डोंगरावर गेले. येशू प्रार्थना करीत असताना त्यांच्या मुखाचे रूपांतर झाले आणि त्यांची वस्त्रे विजेसारखी लखलखीत झाली. मग दोन पुरुष म्हणजे स्वतः मोशे आणि एलीया तेथे प्रकट झाले आणि येशूंबरोबर संवाद करू लागले. आणि ते त्यांच्याबरोबर परमेश्वराच्या संकल्पाप्रमाणे नियोजित केलेल्या व यरुशलेममध्ये येशूंना होणार्या प्रयाणासंबंधाने बोलत होते. यावेळी पेत्र आणि इतर दोन शिष्य यांना अतिशय झोप आली होती, परंतु जागे झाल्यानंतर त्यांनी येशूंचे वैभव पाहिले आणि दोन पुरुष त्यांच्याजवळ उभे असलेले पाहिले. मग मोशे व एलीया येशूंना सोडून जात असताना, पेत्र येशूंना म्हणाले, “गुरुजी, आपल्याला येथेच राहता आले, तर फार चांगले होईल! आपण येथे तीन मंडप—एक तुमच्यासाठी, एक मोशेसाठी आणि एक एलीयासाठी बांधू या.” त्याला काय बोलावे हे समजत नव्हते. पण तो हे बोलत असतानाच, ढगाने येऊन त्यांच्यावर छाया केली आणि त्यात प्रवेश करते वेळी ते भयभीत झाले. मेघातून एक वाणी म्हणाली, “हा माझा पुत्र आहे, मी याला निवडले आहे, याचे तुम्ही ऐका.” ही वाणी झाली, तेव्हा येशू एकटेच त्यांच्या दृष्टीस पडले. त्यांनी काय पाहिले याविषयी शिष्यांनी कोणाला काहीही सांगितले नाही.
लूक 9:28-36 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
ह्या बोलण्यानंतर असे झाले की, सुमारे आठ दिवसांनी पेत्र, योहान व याकोब ह्यांना बरोबर घेऊन तो प्रार्थना करण्यास डोंगरावर गेला. आणि तो प्रार्थना करत असता त्याच्या मुखाचे रूपांतर होऊन त्याचे वस्त्र पांढरे व चकचकीत झाले. आणि पाहा, मोशे व एलीया हे दोघे जण त्याच्याबरोबर संभाषण करत होते; ते तेजोमय दिसले आणि तो जे आपले निर्गमन यरुशलेमेत पूर्ण करणार होता त्याविषयी ते बोलत होते. तेव्हा पेत्र व त्याचे सोबती झोपेने भारावले होते; पण ते जागे झाले व त्यांना त्याचे तेज व त्याच्याजवळ उभे असलेले दोन पुरुष दिसले. मग असे झाले की, ते त्याच्यापासून निघून जात असताना पेत्राने येशूला म्हटले, “गुरूजी, आपण येथेच असावे हे बरे; तर आम्ही तीन मंडप करू; आपल्यासाठी एक, मोशेसाठी एक व एलीयासाठी एक;” हे जे तो बोलला त्याचे त्याला भान नव्हते. तो हे बोलत असता मेघ उतरून त्यांच्यावर छाया करू लागला; आणि ते मेघात शिरले तेव्हा ते भयभीत झाले. तेव्हा मेघातून अशी वाणी झाली की, “हा माझा (प्रिय) ‘पुत्र’, ‘माझा निवडलेला आहे; ह्याचे तुम्ही ऐका.”’ ही वाणी झाली तेव्हा येशू एकटाच दिसला. ह्यावर ते गप्प राहिले आणि ज्या गोष्टी त्यांनी पाहिल्या होत्या त्यांतले काहीच त्या दिवसांत त्यांनी कोणाला सांगितले नाही.
लूक 9:28-36 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
ह्या निवेदनानंतर सुमारे आठ दिवसांनी पेत्र, योहान व याकोब ह्यांना बरोबर घेऊन येशू प्रार्थना करायला डोंगरावर गेला. तो प्रार्थना करीत असता त्याच्या चेहऱ्याचे रूपांतर होऊन त्याचे वस्त्र डोळे दिपून टाकण्याइतके पांढरेशुभ्र झाले आणि काय आश्चर्य! अकस्मात मोशे व एलिया हे दोघे जण त्याच्याबरोबर संभाषण करीत असता त्यांच्या दृष्टीस पडले. ते तेजोमय दिसले. यरुशलेममधील त्याच्या मृत्यूने येशू देवाची योजना कशी पूर्ण करणार होता, ह्याविषयी ते बोलत होते. पेत्र व त्याचे सोबती झोपेने भारावले होते तरीही ते जागे राहिले होते म्हणून त्यांना येशूचे तेज व त्याच्याजवळ उभे असलेले दोघे पुरुष दिसले. ते दोघे येशूपासून निघून जात असताना पेत्राने येशूला म्हटले, “गुरुवर्य, आपण येथेच असावे हे बरे. आम्ही तीन तंबू तयार करतो. आपणासाठी एक, मोशेसाठी एक व एलियासाठी एक.” हे जे तो बोलला, त्याचे त्याला भान नव्हते. तो हे बोलत असता एक ढग उतरून त्यांच्यावर छाया करू लागला. ते मेघात शिरले तेव्हा शिष्य भयभीत झाले. मेघातून अशी वाणी झाली, “हा माझा पुत्र, माझा निवडलेला आहे, ह्याचे तुम्ही ऐका!” ही वाणी झाल्यावर येशू एकटाच दिसला. मात्र शिष्य गप्प राहिले आणि जे काही त्यांनी पाहिले होते, त्यातले त्यांनी त्या दिवसांत कोणाला काहीच सांगितले नाही.