YouVersion लोगो
सर्च आयकॉन

लूक 24:13-34

लूक 24:13-34 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

त्याच दिवशी त्याच्यातील दोघे शिष्य यरूशलेम शहरापासून सुमारे अकरा किलोमीटर अंतरावर असलेल्या अम्माऊस नावाच्या गावाला चालले होते. ते एकमेकांशी या घडलेल्या सर्व गोष्टीविषयी बोलत होते. ते बोलत असताना आणि या गोष्टींची चर्चा करीत असताना येशू स्वतः आला आणि त्यांच्याबरोबर चालू लागला. पण त्यांचे डोळे त्यास ओळखण्यापासून बंद करण्यात आले होते. येशू त्यांना म्हणाला, “चालत असताना तुम्ही एकमेकांबरोबर बोलत आहात त्या गोष्टी कोणत्या आहेत?” चालता चालता ते थांबले. ते अतिशय दुःखी दिसले. त्यांच्यातील एकजण ज्याचे नाव क्लयपा होते, तो त्यास म्हणाला, “या दिवसांमध्ये घडलेल्या गोष्टी माहीत नसलेले असे यरूशलेम शहरात राहणारे तुम्ही एकटेच आहात काय?” येशू त्यांना म्हणाला, “तुमच्या मते कोणत्या गोष्टी?” ते त्यास म्हणाले, “नासरेथकर येशूविषयीच्या सर्व गोष्टी. हाच तो मनुष्य जो आपल्या कृत्यांनी आणि शब्दांनी देवासमोर आणि मनुष्यांसमोर एक महान संदेष्टा झाला. आणि आम्ही चर्चा करीत होतो की, कसे आमच्या मुख्य याजकांनी आणि अधिकाऱ्यांनी त्यास मरणदंड भोगण्यासाठी स्वाधीन केले आणि त्यांनी त्यास वधस्तंभी खिळले. आम्ही अशी आशा केली होती की, तोच एक आहे जो इस्राएलाची मुक्तता करील आणि या सगळ्याशिवाय हे सर्व घडून गेलेल्या गोष्टीला आज तीन दिवस झालेत. आणि आमच्या परिवारातील काही स्त्रियांनी आम्हास आश्चर्यचकित केले आहे. आज अगदी पहाटे त्या कबरेकडे गेल्या, परंतु त्यांना त्याचे शरीर सापडले नाही. त्यांनी येऊन आम्हास सांगितले की, त्यांना देवदूतांचे दर्शन झाले आणि देवदूतांनी सांगितले की, तो जिवंत आहे. तेव्हा आमच्यातील काही कबरेकडे गेले आणि स्त्रियांनी जसे सांगितले होते, तसेच त्यांना आढळले, पण त्यांनी त्यास पाहिले नाही.” मग येशू त्यांना म्हणाला, “संदेष्ट्यांनी सांगितलेल्या सर्व गोष्टींवर विश्वास ठेवण्यास तुम्ही अति मूर्ख आणि मंद आहात. ख्रिस्तासाठी या सर्व गोष्टी सहन करणे आणि त्याच्या गौरवात जाणे आवश्यक नव्हते काय?” आणि म्हणून त्याने मोशेपासून सुरुवात करून आणि सर्व संदेष्टयापर्यंत सांगून, शास्त्रलेखात त्याच्याविषयी काय लिहिले आहे ते सर्व त्याने त्यांना स्पष्ट करून सांगितले. ज्या खेड्याकडे ते जात होते, त्याच्याजवळ ते आले आणि येशूने असा बहाणा केला की, जणू काय तो पुढे जाणार आहे. परंतु जास्त आग्रह करून ते म्हणाले, “आमच्याबरोबर राहा कारण संध्याकाळ झालीच आहे आणि दिवसही मावळला आहे.” मग तो त्यांच्याबरोबर रहावयास आत गेला. जेव्हा तो त्यांच्याबरोबर जेवायला मेजासभोवती बसला, त्याने भाकर घेतली आणि उपकार मानले. नंतर त्याने ती मोडली व ती त्यांना तो देऊ लागला. तेव्हा त्यांचे डोळे उघडले आणि त्यांनी त्यास ओळखले. पण तो त्यांच्यातून अदृश्य झाला. मग ते एकमेकांना म्हणू लागले, “तो वाटेवर आपणाशी बोलत असताना व शास्त्रलेखाचा उलगडा करीत होता तेव्हा आपल्या अंतःकरणाला आतल्या आत उकळी येत नव्हती काय?” मग ते लगेच उठले व यरूशलेम शहरास परत गेले. तेव्हा त्यांना अकरा प्रेषित व त्यांच्याबरोबर असलेले इतर एकत्र जमलेले आढळले. प्रेषित आणि इतरजण म्हणाले, “खरोखर प्रभू उठला आहे! आणि शिमोनाला दिसला आहे.”

सामायिक करा
लूक 24 वाचा

लूक 24:13-34 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

त्याच दिवशी म्हणजे आठवड्याच्या पहिल्या दिवशी, येशूंचे दोन अनुयायी यरुशलेमपासून अंदाजे सात मैल असलेल्या अम्माऊस गावी चालले होते. घडलेल्या त्या सर्व गोष्टींविषयी ते एकमेकांबरोबर बोलत होते. ते एकमेकांशी बोलत व चर्चा करीत असताना प्रत्यक्ष येशू तेथे आले आणि त्यांच्याबरोबर चालू लागले. परंतु ते त्यांना ओळखणार नाहीत असे करण्यात आले होते. येशूंनी त्यांना विचारले, “चालताना, तुम्ही काय चर्चा करीत आहात?” हा प्रश्न ऐकून ते शांत उभे राहिले, त्यांचे चेहरे दुःखी झाले. त्यांच्यापैकी क्लयपा नावाचा एकजण म्हणाला, “गेल्या काही दिवसात यरुशलेममध्ये घडलेल्या त्या घटनांची माहिती नसलेले असे तुम्ही एकटेच आहात काय?” “कसल्या घटना?” येशूंनी विचारले. ते म्हणाले, “नासरेथ या गावातून आलेल्या येशूंविषयी, जो परमेश्वराच्या आणि सर्व लोकांच्या दृष्टीने उक्ती व कृती यामध्ये सामर्थ्यशाली असा संदेष्टा होता. मुख्य याजकांनी आणि आमच्या राज्यकर्त्यांनी त्यांना मृत्युदंडाची शिक्षा दिली, त्यांनी त्यांना क्रूसावर खिळून मारले. परंतु आम्हाला आशा होती की हा तोच जो इस्राएलास मुक्ती देणारा असा होता. या सर्वगोष्टी घडल्या त्याला आज तिसरा दिवस आहे. पण आमच्यातील काही स्त्रियांनी आम्हाला आश्चर्याचा मोठाच धक्का दिला आहे. त्या अगदी आज पहाटे कबरेकडे गेल्या. पण त्यांना त्यांचे शरीर सापडले नाही. तेव्हा त्यांनी येऊन सांगितले की त्यांना देवदूतांचे दर्शन झाले व ते म्हणाले की येशू जिवंत आहे. तेव्हा आमच्यातील काही लोक कबरेकडे गेले आणि त्या स्त्रियांनी जसे सांगितले होते तसेच त्यांना दिसले. परंतु येशूंचे शरीर त्यांना दिसले नाही.” तेव्हा येशू त्यांना म्हणाले, “तुम्ही मूर्ख आहात आणि संदेष्ट्यांनी जे लिहिले आहे, त्यावर विश्वास ठेवण्यास मतिमंद आहात. आपल्या गौरवात जाण्यापूर्वी या गोष्टी ख्रिस्ताने सहन करणे गरजेचे आहे असे नाही काय?” नंतर त्यांनी संपूर्ण धर्मग्रंथातील मोशे व सर्व संदेष्ट्यांच्या लिखाणामधून स्वतःविषयी काय सांगितले आहे, हे त्यांना स्पष्ट केले. जेव्हा ते त्या गावाजवळ आले जेथे ते जात होते, तेव्हा येशूंनी पुढे जाणे चालू ठेवले, जसे की ते पुढे जात होते असे दर्शविले. परंतु त्यांनी त्यांना आग्रह करून म्हटले, “आमच्या येथे राहा, कारण संध्याकाळ होत चालली आहे.” तेव्हा येशू त्यांच्या घरी गेले. ते भोजनास बसले असताना, येशूंनी भाकर घेतली, आभार मानले, ती मोडली आणि ती त्यांना दिली. तेव्हा त्यांचे डोळे उघडले आणि त्यांनी त्यांना ओळखले. त्याच क्षणाला येशू त्यांच्यापासून अंतर्धान पावले. ते एकमेकांस म्हणू लागले, “ते रस्त्याने आपल्यासोबत बोलत असताना आणि आपल्याला शास्त्रलेख समजावून सांगत असताना आपली अंतःकरणे प्रज्वलित झाली नाहीत काय?” तेव्हा त्याच घटकेस ते उठून यरुशलेमास माघारे गेले, तेथे येशूंचे अकरा शिष्य आणि इतर अनुयायी एकत्र जमले आहेत, असे त्यांनी पाहिले. जमलेले लोक म्हणत होते, “प्रभू खरोखर उठले आहे व त्यांनी शिमोनाला दर्शन दिले आहे.”

सामायिक करा
लूक 24 वाचा

लूक 24:13-34 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

त्याच दिवशी त्यांच्यातील दोघे जण यरुशलेमेपासून सुमारे चार कोसांवरील अम्माऊस नावाच्या गावाला चालले होते. ते घडलेल्या सर्व गोष्टींविषयी एकमेकांशी संभाषण करत होते. आणि असे झाले की, ते संभाषण व चर्चा करत असताना येशू स्वतः जवळ येऊन त्यांच्याबरोबर चालू लागला; परंतु त्यांनी त्याला ओळखू नये म्हणून त्यांचे डोळे जणू काय बंद करण्यात आले होते. त्याने त्यांना म्हटले, “तुम्ही चालताना ज्या गोष्टी एकमेकांबरोबर बोलत आहात त्या कोणत्या?” तेव्हा ते म्लानमुख होऊन उभे राहिले. मग त्यांच्यातील क्लयपा नावाच्या इसमाने त्याला उत्तर दिले, “अलीकडे यरुशलेमेत घडलेल्या गोष्टी ठाऊक नसलेले तुम्ही एकटेच प्रवासी आहात काय?” तो त्यांना म्हणाला, “कसल्या गोष्टी?” त्यांनी त्याला म्हटले, “नासरेथकर येशूविषयीच्या. तो देवाच्या व सर्व लोकांच्या समोर, कृतीने व उक्तीने पराक्रमी संदेष्टा होता. त्याला मुख्य याजकांनी व आमच्या अधिकार्‍यांनी देहान्त शिक्षेसाठी पकडून वधस्तंभावर खिळले. परंतु इस्राएलाची मुक्ती करणारा तो हाच अशी आमची आशा होती. शिवाय ह्या सर्व गोष्टी झाल्या तेव्हापासून आज तिसरा दिवस आहे. आणखी आमच्यातील ज्या कित्येक स्त्रिया कबरेकडे मोठ्या पहाटेस गेल्या होत्या त्यांनी तर आम्हांला थक्कच केले. त्यांना त्याचे शरीर सापडले नाही, तेव्हा त्यांनी येऊन म्हटले की, आम्हांला देवदूतांचे दर्शन झाले; व देवदूतांनी सांगितले की, तो जिवंत आहे. मग आमच्याबरोबर जे होते त्यांपैकी कित्येक कबरेकडे गेले आणि त्या स्त्रियांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना आढळले; पण त्यांना तो दिसला नाही.” मग तो त्यांना म्हणाला, “अहो निर्बुद्ध व संदेष्ट्यांनी सांगितलेल्या सर्व गोष्टींविषयी विश्वास धरण्यास मतिमंद अशा माणसांनो! ख्रिस्ताने ही दु:खे सोसावी आणि आपल्या गौरवात जावे, ह्याचे अगत्य नव्हते काय?” मग त्याने मोशे व सर्व संदेष्टे ह्यांच्यापासून आरंभ करून संपूर्ण शास्त्रलेखांतील आपणाविषयीच्या गोष्टींचा अर्थ त्यांना सांगितला. मग ज्या गावाला ते जात होते त्याच्याजवळ ते आले तेव्हा त्याने पुढे जाण्याचा रोख दाखवला; परंतु ते त्याला आग्रह करून म्हणाले, “आमच्याबरोबर राहा; कारण संध्याकाळ होत चालली असून दिवस उतरला आहे.” तेव्हा तो त्यांच्याबरोबर राहायला आत गेला. मग असे झाले की, तो त्यांच्याबरोबर जेवायला बसला असताना त्याने भाकर घेऊन आशीर्वाद दिला व ती मोडून त्यांना दिली. तेव्हा त्यांचे डोळे उघडले व त्यांनी त्याला ओळखले; मग तो त्यांच्यापासून अंतर्धान पावला. तेव्हा ते एकमेकांना म्हणाले, “तो वाटेने आपल्याबरोबर बोलत होता व शास्त्राचा उलगडा करत होता तेव्हा आपल्या अंतःकरणाला आतल्या आत उकळी येत नव्हती काय?” मग त्याच घटकेस ते उठून यरुशलेमेस माघारी गेले, तेव्हा अकरा प्रेषित व त्यांच्याबरोबर लोक एकत्र जमलेले त्यांना आढळले. ते म्हणत होते की, “प्रभू खरोखर उठला आहे व शिमोनाच्या दृष्टीस पडला.”

सामायिक करा
लूक 24 वाचा

लूक 24:13-34 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

त्याच दिवशी येशूच्या शिष्यांपैकी दोघे जण यरुशलेमपासून सुमारे अकरा किलोमीटर अंतरावर असलेल्या अम्माऊस नावाच्या गावाला जायला निघाले होते. घडलेल्या सर्व घटनांविषयी ते एकमेकांशी संभाषण करत होते. ते संभाषण व चर्चा करत असताना येशू स्वतः त्यांच्याजवळ येऊन त्यांच्याबरोबर चालू लागला. त्यांनी त्याला पाहिले परंतु ओळखले नाही. येशूने त्यांना म्हटले, “तुम्ही चालताना ज्या गोष्टी एकमेकांबरोबर बोलत आहात, त्या कोणत्या?” ते दुःखी होऊन उभे राहिले. त्यांच्यातील क्लयपा नावाच्या एकाने त्याला उत्तर दिले, “अलीकडे यरुशलेममध्ये घडलेल्या घटना ठाऊक नसलेले तुम्ही एकटेच प्रवासी आहात काय?” तो त्यांना म्हणाला, “कोणत्या घटना?” त्यांनी त्याला म्हटले, “नासरेथकर येशूविषयीच्या. तो देवाच्या व सर्व लोकांच्या नजरेत कृतीने व उक्‍तीने पराक्रमी संदेष्टा होता. त्याला आमच्या मुख्य याजकांनी व अधिकाऱ्यांनी देहान्ताच्या शिक्षेसाठी पकडून क्रुसावर चढवले. इस्राएलची मुक्‍ती करणारा तो हाच, अशी आमची आशा होती. शिवाय ह्या सर्व गोष्टी होऊन आज तीन दिवस झाले. आणखी आमच्यातील ज्या अनेक स्त्रिया भल्या पहाटेस कबरीकडे गेल्या होत्या, त्यांनी तर आम्हांला थक्कच केले. त्यांना त्याचे शरीर कबरीत सापडले नाही. त्यांनी येऊन म्हटले, ‘आम्हांला देवदूतांचे दर्शन झाले व देवदूतांनी सांगितले की, तो जिवंत आहे.’ मग आमच्यापैकी काही जण कबरीकडे गेले आणि त्या स्त्रियांनी सांगितल्याप्रमाणेच त्यांना आढळले. मात्र त्यांना त्याचे शरीर दिसले नाही.” मग येशू त्यांना म्हणाला, “तुम्ही किती निर्बुद्ध व संदेष्ट्यांनी सांगितलेल्या सर्व गोष्टींवर विश्वास ठेवण्यात किती मतिमंद आहात! ख्रिस्ताने ही दुःखे सोसावीत आणि आपल्या वैभवात प्रवेश करावा, हे क्रमप्राप्त नव्हते काय?” मग येशूने मोशे व सर्व संदेष्टे ह्यांच्यापासून आरंभ करून संपूर्ण धर्मशास्त्रातील आपणाविषयीच्या गोष्टींचा अर्थ त्यांना सांगितला. ज्या गावास ते जात होते, त्या गावाजवळ ते आले, तेव्हा त्याला जणू पुढे जायचे आहे, असे येशूने दाखवले. परंतु ते त्याला विनंती करून म्हणाले, “आमच्याबरोबर राहा, संध्याकाळ होत चालली असून दिवस उतरला आहे.” तो त्यांच्याबरोबर वसती करायला आत गेला. तेथे तो त्यांच्याबरोबर जेवायला बसला असता त्याने भाकर घेऊन आशीर्वाद दिला व ती मोडून त्यांना दिली. तेव्हा त्यांचे डोळे उघडले व त्यांनी त्याला ओळखले आणि तो अंतर्धान पावला. ते एकमेकांना म्हणाले, “तो वाटेने आपल्याबरोबर बोलत होता व धर्मशास्त्राचा उलगडा करत होता, तेव्हा आपली अंतःकरणे आपल्याठायी धगधगत नव्हती काय?” त्याच घटकेस ते उठून यरुशलेम येथे परत गेले. तेथे अकरा प्रेषित व त्यांच्याबरोबरचे लोक एकत्र जमलेले त्यांना आढळले. ते म्हणत होते की, प्रभू खरोखर उठला आहे व तो शिमोनच्या दृष्टीस पडला आहे.

सामायिक करा
लूक 24 वाचा