YouVersion लोगो
सर्च आयकॉन

लूक 23:13-25

लूक 23:13-25 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

पिलाताने मुख्य याजक लोक, पुढारी आणि लोकांस एकत्र बोलावले. “हा मनुष्य लोकांस फितवणारा म्हणून याला तुम्ही माझ्याकडे आणले; आणि पहा, ज्या गोष्टींचा आरोप तुम्ही याच्यावर ठेवता त्यासंबंधी मी तुमच्यासमक्ष चौकशी केल्यावर मला या मनुष्याकडे काहीही दोष सापडला नाही. हेरोदालाही आरोपाविषयी काहीही आधार सापडला नाही कारण त्याने त्यास परत आमच्याकडे आणले आहे. तुम्हीही पाहू शकता की, मरणाची शिक्षा देण्यास योग्य असे त्याने काहीही केलेले नाही. म्हणून मी याला फटके मारून सोडून देतो.” कारण त्यास त्या सणात त्यांच्याकरिता एकाला सोडावे लागत असे. पण ते सर्व एकत्र मोठ्याने ओरडले, “या मनुष्यास ठार करा! आणि आम्हासाठी बरब्बाला सोडा!” बरब्बाने शहरात खळबळ माजवली होती. त्याने काही लोकांस ठारही केले होते, त्यामुळे त्यास तुरुंगात टाकले होते. मग पिलात येशूला सोडण्याची इच्छा धरून फिरून त्यांच्याशी बोलला. पण ते ओरडतच राहिले, “त्याला वधस्तंभावर खिळा, त्यास वधस्तंभावर खिळा!” पिलात तिसऱ्यांदा त्यांना म्हणाला, “का? या मनुष्याने असा कोणता गुन्हा केला आहे? मरणाची शिक्षा देण्यायोग्य असे मला याच्याविरुद्ध काहीही आढळले नाही. यास्तव मी याला फटक्याची शिक्षा सांगून सोडून देतो.” पण याला वधस्तंभावर खिळाच असा त्यांनी मोठ्याने ओरडून आग्रह चालविला आणि त्यांच्या ओरडण्याला यश आले. तेव्हा पिलाताने त्यांच्या मागण्याप्रमाणे व्हावे असे ठरवले. जो मनुष्य दंगा आणि खून यासाठी तुरुंगात टाकला गेला होता व ज्याची त्यांनी मागणी केली होती त्यास त्याने सोडून दिले. पिलाताने त्यांच्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी येशूला त्यांच्या हाती दिले.

सामायिक करा
लूक 23 वाचा

लूक 23:13-25 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

नंतर पिलाताने प्रमुख याजक, अधिकारी आणि लोक यांना एकत्र बोलावून म्हटले, “तुम्ही या मनुष्याला, तो लोकांना बंड करावयास चिथावीतो म्हणून माझ्याकडे आणले. मी त्याची तुमच्यासमोर कसून तपासणी केली आणि तो निर्दोष आहे, असे मला आढळून आले. हेरोदाचा निर्णय देखील असाच आहे, म्हणूनच त्याने याला आमच्याकडे परत पाठविले आहे. मरणदंडाची शिक्षा व्हावी असे या मनुष्याने काहीही केलेले नाही. म्हणून मी याला फटके मारतो आणि नंतर त्याला सोडून देतो.” कारण या सणात त्यांच्यासाठी त्याला एका गुन्हेगाराला सोडावे लागत असे. परंतु गर्दीतील सर्व लोक ओरडून म्हणाले, “याला जिवे मारा आणि आमच्यासाठी बरब्बाला सोडा.” बरब्बाला त्यावेळी शहरामध्ये उठाव करणे व खून करणे यासाठी तुरुंगात ठेवले होते. येशूंना सोडून देण्याची पिलाताची इच्छा होती, म्हणून तो त्यांच्याशी वाद घालू लागला पण लोक ओरडतच राहिले, “त्याला क्रूसावर खिळा! त्याला क्रूसावर खिळा!” तरीही आणखी एकदा तिसर्‍या खेपेस पिलाताने खुलासा विचारला, “या मनुष्याने कोणता गुन्हा केला आहे? त्याला क्रूसखांबावर खिळावे असा कोणताही दोष त्याच्यामध्ये मला आढळला नाही, मी त्याला फटके मारून सोडून देतो.” परंतु येशूंना क्रूसावर खिळण्याची मागणी करीत, ते ओरडू लागले, शेवटी त्यांचे ओरडणे सफल झाले, आणि पिलाताने त्यांची मागणी मान्य करण्याचे ठरविले. तसेच त्यांच्या मागणीप्रमाणे, बंडाळी आणि खून करण्याच्या आरोपावरून तुरुंगात असलेला बरब्बाला सोडून दिले आणि येशूंना क्रूसावर खिळावे म्हणून त्यांच्या स्वाधीन केले.

सामायिक करा
लूक 23 वाचा

लूक 23:13-25 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

मग पिलाताने मुख्य याजक, अधिकारी व लोक ह्यांना एकत्र बोलावून म्हटले, “हा मनुष्य लोकांना फितवणारा म्हणून ह्याला तुम्ही माझ्याकडे आणले; आणि पाहा, ज्या गोष्टींचा आरोप तुम्ही ह्याच्यावर ठेवता त्यासंबंधी मी तुमच्यासमक्ष ह्याची चौकशी केल्यावर मला ह्या मनुष्याकडे काहीही दोष सापडला नाही; हेरोदालाही सापडला नाही; कारण त्याने त्याला आमच्याकडे परत पाठवले आहे; आणि पाहा, ह्याने मरणदंड भोगण्यासारखे काही केलेले नाही. म्हणून मी ह्याला फटके मारून सोडून देतो.” [कारण त्या सणात त्याला त्यांच्याकरता एकाला सोडावे लागत असे.] परंतु सर्वांनी एकच ओरडा करून म्हटले, “ह्याची वाट लावा आणि आमच्यासाठी बरब्बाला सोडा.” हा माणूस शहरात झालेला दंगा व खून ह्यांमुळे तुरुंगात टाकलेला होता. येशूला सोडावे ह्या इच्छेने पिलाताने पुन्हा त्यांच्याबरोबर भाषण केले. तरी “ह्याला वधस्तंभावर खिळा,” “वधस्तंभावर खिळा,” असे ते ओरडत राहिले. तो त्यांना तिसर्‍यांदा म्हणाला, “का बरे? त्याने काय वाईट केले आहे? त्याच्याकडे मरणदंड होण्यासारखा काही दोष मला सापडला नाही; म्हणून मी ह्याला फटके मारून सोडून देतो.” पण ‘ह्याला वधस्तंभावर खिळाच’ असा त्यांनी मोठ्याने ओरडून आग्रह चालवला; आणि त्यांच्या व मुख्य याजकांच्या ओरडण्याला यश आले. तेव्हा त्यांच्या मागण्याप्रमाणे व्हावे असा पिलाताने निकाल दिला. नंतर दंगा व खून ह्यांमुळे तुरुंगात टाकलेल्या ज्याला त्यांनी मागितले होते त्याला त्याने सोडून दिले आणि येशूला त्यांच्या मर्जीवर सोपवून दिले.

सामायिक करा
लूक 23 वाचा

लूक 23:13-25 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

मुख्य याजक, अधिकारी व लोक ह्यांना पिलातने एकत्र बोलावून म्हटले, “हा मनुष्य लोकांना फितवणारा म्हणून ह्याला तुम्ही माझ्याकडे आणले. जो आरोप तुम्ही ह्याच्यावर ठेवता, त्यासंबंधी मी तुमच्यासमक्ष ह्याची चौकशी केल्यावर मला ह्या माणसात काहीही दोष सापडत नाही. हेरोदलाही सापडला नाही कारण त्याने त्याला आमच्याकडे परत पाठवले आहे. ह्याने मरणदंड भोगण्यासारखे काही केलेले नाही म्हणून मी ह्याला फटके मारून सोडून देतो.” [त्या सणात त्यांच्याकरता तुरुंगातील एकाला सोडून देण्याची प्रथा होती.] सर्वांनी ओरडत मागणी केली, “ह्याला घेऊन जा आणि आमच्यासाठी बरब्बाला सोडा.” बरब्बा हा शहरात झालेले बंड आणि खून ह्यासंबंधात तुरुंगात टाकलेला होता. येशूला सोडावे, ह्या इच्छेने पिलातने पुन्हा त्यांच्यासमोर बोलणी केली. परंतु ह्याला क्रुसावर खिळा, क्रुसावर खिळा, असे ते ओरडत राहिले. पिलात त्यांना तिसऱ्यांदा म्हणाला, “का बरे? त्याने कोणता गुन्हा केला आहे? त्याला देहान्ताची शिक्षा द्यावी असा कोणताही गुन्हा त्याने केलेला नाही, म्हणून ह्याला शिपायांकडून फटके मारून मी सोडून देतो.” तरीही त्याला क्रुसावर खिळायला हवे, असा त्यांनी उच्च स्वरात ओरडून आग्रह धरला. शेवटी त्यांच्या ओरडण्याला यश आले. त्यांच्या मागणीप्रमाणे व्हावे, असा पिलातने निकाल दिला. नंतर बंड व खून ह्यासंबंधात तुरुंगात टाकलेल्या ज्याच्यासाठी त्यांनी मागणी केली होती, त्याला त्याने सोडून दिले आणि येशूला त्यांच्या हवाली केले.

सामायिक करा
लूक 23 वाचा