लूक 22:7-19
लूक 22:7-19 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
बेखमीर भाकरीचा सण, ज्या दिवशी वल्हांडणाचे कोकरु मारावयाचे तो दिवस आला. तेव्हा त्याने पेत्र व योहान यांना सांगून पाठवले की, “जा आणि आपणासाठी वल्हांडण सणाचे भोजन तयार करा म्हणजे आपण ते खाऊ.” पेत्र व योहान येशूला म्हणाले, “आम्ही त्याची तयारी कोठे करावी अशी तुमची इच्छा आहे?” तो त्यांना म्हणाला, “तुम्ही नगरात प्रवेश कराल तेव्हा पाण्याचे भांडे घेऊन जाणारा एक मनुष्य तुम्हास भेटेल. तो ज्या घरात जाईल तेथे जा. आणि त्या घरमालकास सांगा, ‘गुरुजींनी तुम्हास विचारले आहे की, माझ्या शिष्यांसह वल्हांडण सणाचे भोजन करता येईल ती पाहुण्यांची खोली कोठे आहे?’ तो मनुष्य तुम्हास माडीवरील सजविलेली खोली दाखवील तेथे तयारी करा.” तेव्हा पेत्र व योहान तेथून निघाले. जसे येशूने सांगितले तसेच सर्व घडले तेव्हा त्यांनी वल्हांडणाच्या भोजनाची तयारी केली. वेळ झाली तेव्हा येशू त्याच्या प्रेषितांसह भोजनास बसला. तो त्यांना म्हणाला, “मी दुःख भोगण्यापूर्वी तुमच्याबरोबर वल्हांडण सणाचे भोजन घ्यावे अशी माझी फार इच्छा होती. कारण मी तुम्हास सांगतो की, देवाच्या राज्यात हे परिपूर्ण होईपर्यंत मी पुन्हा हे भोजन करणार नाही.” नंतर येशूने पेला घेऊन व उपकारस्तुती करून तो म्हणाला, “हा घ्या आणि आपसात याची वाटणी करा. कारण मी तुम्हास सांगतो की, देवाचे राज्य येईपर्यंत यापुढे मी द्राक्षरस घेणार नाही.” नंतर त्याने भाकर घेऊन व उपकारस्तुती करून ती मोडली आणि त्यांना देऊन म्हटले, “हे माझे शरीर आहे जे तुम्हासाठी दिले जात आहे. माझ्या आठवणीसाठी हे करा.”
लूक 22:7-19 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
आता बेखमीर भाकरीच्या सणाचा दिवस आला, त्या दिवशी वल्हांडणाच्या कोकर्याचा बळी दिला जाणार होता. येशूंनी पेत्र आणि योहान यांना पुढे पाठविले व म्हणाले, “जा आणि आपल्यासाठी वल्हांडणाच्या भोजनाची तयारी करा.” तेव्हा त्या दोघांनी विचारले, “आम्ही कोठे तयारी करावी?” येशूंनी उत्तर दिले, “तुम्ही शहरात जा आणि एक मनुष्य पाण्याने भरलेली मोठी घागर घेऊन जात असलेला तुम्हाला भेटेल. ज्या घरात तो जाईल तेथे त्याच्यामागे जा. त्या घराच्या मालकाला सांगा, ‘गुरुजी विचारत आहेत की, ज्या ठिकाणी मला माझ्या शिष्यांबरोबर वल्हांडणाचे भोजन करता येईल ती पाहुण्यांची खोली कुठे आहे?’ तेव्हा तो तुम्हाला माडीवरील सजविलेल्या मोठ्या खोलीत घेऊन जाईल. तेथेच तयारी करा.” ते गेले आणि येशूंनी सांगितल्याप्रमाणे गोष्टी आढळल्या. तेव्हा त्यांनी तेथे वल्हांडणाच्या भोजनाची तयारी केली. जेव्हा ती वेळ आली तेव्हा येशू आणि त्यांचे शिष्य भोजन करण्यास बसले. मग ते शिष्यांना म्हणाले, “माझ्या दुःख सहन करण्यापूर्वी तुमच्याबरोबर हे वल्हांडणाचे भोजन करावे अशी माझी फार इच्छा होती. कारण मी तुम्हाला सांगतो की, परमेश्वराच्या राज्यात याची पूर्तता झाल्याशिवाय मी हे भोजन पुन्हा करणार नाही.” नंतर त्यांनी प्याला घेतला, त्याबद्दल उपकार मानले आणि ते म्हणाले, “हा घ्या आणि तुमच्यामध्ये त्याची वाटणी करा. मी तुम्हाला सांगतो की, परमेश्वराचे राज्य येईपर्यंत मी पुन्हा द्राक्षवेलीचा उपज पिणार नाही.” नंतर येशूंनी भाकर घेतली, आभार मानले आणि ती मोडली आणि ती त्यांना देत असताना म्हणाले, “हे माझे शरीर असून ते तुमच्याकरिता दिले जात आहे; माझ्या स्मरणार्थ हे करा.”
लूक 22:7-19 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
नंतर ज्या दिवशी वल्हांडणाचा यज्ञपशू मारायचा तो बेखमीर भाकरीचा दिवस आला. तेव्हा त्याने पेत्र व योहान ह्यांना असे सांगून पाठवले की, “आपण वल्हांडण सणाचे भोजन करावे म्हणून तुम्ही जाऊन आपल्यासाठी तयारी करा.” ते त्याला म्हणाले, “आम्ही त्याची तयारी कोठे करावी म्हणून आपली इच्छा आहे?” त्याने त्यांना सांगितले, “पाहा, तुम्ही नगरात प्रवेश केल्यावर पाण्याची घागर घेऊन जाणारा एक माणूस तुम्हांला भेटेल; तो ज्या घरात जाईल त्यात त्याच्यामागून जा; आणि त्या घराच्या धन्याला असे म्हणा, ‘गुरूजी तुम्हांला विचारतात, मला माझ्या शिष्यांसह वल्हांडणाचे भोजन करता येईल अशी पाहुण्यांची खोली कोठे आहे?’ मग तो तुम्हांला सज्ज केलेली मोठी माडी दाखवील; तेथे तयारी करा.” तेव्हा ते गेले व त्याने सांगितल्याप्रमाणे त्यांना आढळले; आणि त्यांनी वल्हांडणाची तयारी केली. नंतर वेळ झाली तेव्हा तो जेवायला बसला व त्याच्याबरोबर प्रेषितही बसले. तेव्हा तो त्यांना म्हणाला, “मी दुःख भोगण्यापूर्वी हे वल्हांडणाचे भोजन तुमच्याबरोबर करावे अशी माझी फार उत्कट इच्छा होती; कारण मी तुम्हांला सांगतो की, देवाच्या राज्यात हे पूर्ण होईपर्यंत मी हे भोजन पुन्हा करणार नाही.” मग प्याला हातात घेऊन व उपकारस्तुती करून तो म्हणाला, “हा घ्या आणि आपणांमध्ये ह्याची वाटणी करा; कारण मी तुम्हांला सांगतो की, देवाचे राज्य येईपर्यंत द्राक्षवेलाचा उपज ह्यापुढे मी पिणार नाही.” मग त्याने भाकर घेऊन व उपकारस्तुती करून ती मोडली आणि त्यांना ती देऊन म्हटले, “हे माझे शरीर आहे; ते तुमच्यासाठी दिले जात आहे. माझ्या स्मरणार्थ हे करा.”
लूक 22:7-19 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
ज्या दिवशी ओलांडण सणाचा यज्ञपशू मारायचा, तो बेखमीर भाकरीचा दिवस आला. येशूने पेत्र व योहान ह्यांना असे सांगून पाठवले, “आपण ओलांडण सणाचे भोजन करावे म्हणून तुम्ही जाऊन आपल्यासाठी तयारी करा.” त्यांनी त्याला विचारले, “आम्ही त्याची तयारी कुठे करावी, अशी आपली इच्छा आहे?” त्याने त्यांना सांगितले, “तुम्ही नगरात प्रवेश केल्यावर पाण्याची घागर घेऊन जाणारा एक माणूस तुम्हांला भेटेल. तो ज्या घरात जाईल, त्या घरात त्याच्यामागून जा आणि त्या घराच्या धन्याला असे म्हणा, “गुरूजींनी तुम्हांला विचारले आहे की, मला माझ्या शिष्यांसह ओलांडण सणाचे भोजन करता येईल, अशी खोली कोठे आहे?’ तो तुम्हांला वरच्या मजल्यावर सज्ज केलेली प्रशस्त खोली दाखवील. तेथे तयारी करा.” ते गेले व त्याने सांगितल्याप्रमाणे त्यांना आढळले. तेथे त्यांनी ओलांडण सणाची तयारी केली. ती वेळ आली तेव्हा येशू भोजनास बसला व त्याच्याबरोबर प्रेषितही बसले. तो त्यांना म्हणाला, “मी दुःख भोगण्यापूर्वी हे ओलांडण सणाचे भोजन तुमच्याबरोबर करावे, अशी माझी उत्कट इच्छा आहे. मी तुम्हांला सांगतो, देवाच्या राज्यात ह्या भोजनाची परिपूर्ती होईपर्यंत मी हे भोजन पुन्हा करणार नाही.” त्यानंतर प्याला घेऊन व देवाचे आभार मानून तो म्हणाला, “हा घ्या आणि तुमच्यांत वाटा. मी तुम्हांला सांगतो, देवाचे राज्य येईपर्यंत हा द्राक्षारस ह्यापुढे मी पिणार नाही.” मग त्याने भाकर घेऊन देवाचे आभार मानले व ती मोडली आणि ती त्यांना देऊन म्हटले, “हे माझे शरीर आहे. हे तुमच्यासाठी अर्पण केले आहे. माझ्या स्मरणार्थ हे करा.”