लूक 22:7-13
लूक 22:7-13 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
बेखमीर भाकरीचा सण, ज्या दिवशी वल्हांडणाचे कोकरु मारावयाचे तो दिवस आला. तेव्हा त्याने पेत्र व योहान यांना सांगून पाठवले की, “जा आणि आपणासाठी वल्हांडण सणाचे भोजन तयार करा म्हणजे आपण ते खाऊ.” पेत्र व योहान येशूला म्हणाले, “आम्ही त्याची तयारी कोठे करावी अशी तुमची इच्छा आहे?” तो त्यांना म्हणाला, “तुम्ही नगरात प्रवेश कराल तेव्हा पाण्याचे भांडे घेऊन जाणारा एक मनुष्य तुम्हास भेटेल. तो ज्या घरात जाईल तेथे जा. आणि त्या घरमालकास सांगा, ‘गुरुजींनी तुम्हास विचारले आहे की, माझ्या शिष्यांसह वल्हांडण सणाचे भोजन करता येईल ती पाहुण्यांची खोली कोठे आहे?’ तो मनुष्य तुम्हास माडीवरील सजविलेली खोली दाखवील तेथे तयारी करा.” तेव्हा पेत्र व योहान तेथून निघाले. जसे येशूने सांगितले तसेच सर्व घडले तेव्हा त्यांनी वल्हांडणाच्या भोजनाची तयारी केली.
लूक 22:7-13 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
आता बेखमीर भाकरीच्या सणाचा दिवस आला, त्या दिवशी वल्हांडणाच्या कोकर्याचा बळी दिला जाणार होता. येशूंनी पेत्र आणि योहान यांना पुढे पाठविले व म्हणाले, “जा आणि आपल्यासाठी वल्हांडणाच्या भोजनाची तयारी करा.” तेव्हा त्या दोघांनी विचारले, “आम्ही कुठे तयारी करावी?” येशूंनी उत्तर दिले, “तुम्ही शहरात जा आणि एक मनुष्य पाण्याने भरलेली मोठी घागर घेऊन जात असलेला तुम्हाला भेटेल. ज्या घरात तो जाईल तिथे त्याच्यामागे जा. त्या घराच्या मालकाला सांगा, ‘गुरुजी विचारत आहेत की, ज्या ठिकाणी मला माझ्या शिष्यांबरोबर वल्हांडणाचे भोजन करता येईल ती पाहुण्यांची खोली कुठे आहे?’ तो तुम्हाला माडीवरील मोठी तयार असलेली एक खोली दाखवेल. तिथे तयारी करा.” ते गेले आणि येशूंनी सांगितल्याप्रमाणे त्यांना आढळून आले. तेव्हा त्यांनी वल्हांडणाच्या भोजनाची तयारी केली.
लूक 22:7-13 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
नंतर ज्या दिवशी वल्हांडणाचा यज्ञपशू मारायचा तो बेखमीर भाकरीचा दिवस आला. तेव्हा त्याने पेत्र व योहान ह्यांना असे सांगून पाठवले की, “आपण वल्हांडण सणाचे भोजन करावे म्हणून तुम्ही जाऊन आपल्यासाठी तयारी करा.” ते त्याला म्हणाले, “आम्ही त्याची तयारी कोठे करावी म्हणून आपली इच्छा आहे?” त्याने त्यांना सांगितले, “पाहा, तुम्ही नगरात प्रवेश केल्यावर पाण्याची घागर घेऊन जाणारा एक माणूस तुम्हांला भेटेल; तो ज्या घरात जाईल त्यात त्याच्यामागून जा; आणि त्या घराच्या धन्याला असे म्हणा, ‘गुरूजी तुम्हांला विचारतात, मला माझ्या शिष्यांसह वल्हांडणाचे भोजन करता येईल अशी पाहुण्यांची खोली कोठे आहे?’ मग तो तुम्हांला सज्ज केलेली मोठी माडी दाखवील; तेथे तयारी करा.” तेव्हा ते गेले व त्याने सांगितल्याप्रमाणे त्यांना आढळले; आणि त्यांनी वल्हांडणाची तयारी केली.
लूक 22:7-13 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
ज्या दिवशी ओलांडण सणाचा यज्ञपशू मारायचा, तो बेखमीर भाकरीचा दिवस आला. येशूने पेत्र व योहान ह्यांना असे सांगून पाठवले, “आपण ओलांडण सणाचे भोजन करावे म्हणून तुम्ही जाऊन आपल्यासाठी तयारी करा.” त्यांनी त्याला विचारले, “आम्ही त्याची तयारी कुठे करावी, अशी आपली इच्छा आहे?” त्याने त्यांना सांगितले, “तुम्ही नगरात प्रवेश केल्यावर पाण्याची घागर घेऊन जाणारा एक माणूस तुम्हांला भेटेल. तो ज्या घरात जाईल, त्या घरात त्याच्यामागून जा आणि त्या घराच्या धन्याला असे म्हणा, “गुरूजींनी तुम्हांला विचारले आहे की, मला माझ्या शिष्यांसह ओलांडण सणाचे भोजन करता येईल, अशी खोली कोठे आहे?’ तो तुम्हांला वरच्या मजल्यावर सज्ज केलेली प्रशस्त खोली दाखवील. तेथे तयारी करा.” ते गेले व त्याने सांगितल्याप्रमाणे त्यांना आढळले. तेथे त्यांनी ओलांडण सणाची तयारी केली.