लूक 2:42-52
लूक 2:42-52 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
जेव्हा तो बारा वर्षांचा झाला, ते सणाच्या रीतीप्रमाणे वर यरूशलेम शहरास गेले. मग सणाचे पूर्ण दिवस तेथे घालविल्या नंतर ते घराकडे परत येण्यास निघाले. परंतु मुलगा येशू मात्र यरूशलेमेतच मागे राहिला आणि हे त्याच्या आई-वडीलांना माहीत नव्हते. तो बरोबर प्रवास करणाऱ्या घोळक्या सोबत असेल असे समजून ते एक दिवसाची वाट चालून गेले. नंतर त्यांनी नातलग व मित्रांमध्ये त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. जेव्हा तो त्यांना सापडला नाही, म्हणून ते यरूशलेम शहरास परत आले आणि तेथे त्यांनी त्याचा शोध घेतला. असे घडले की, तीन दिवसानंतर तो त्यांना परमेश्वराच्या भवनात सापडला, तो शिक्षकांमध्ये बसून त्यांचे ऐकत होता व त्यांना प्रश्न विचारीत होता. ज्यांनी त्याचे ऐकले ते सर्व त्याच्या समजबुद्धीमुळे आणि उत्तरांमुळे चकित झाले. जेव्हा त्यांनी त्यास पाहिले तेव्हा ते आश्चर्यचकित झाले. त्याची आई त्यास म्हणाली, “मुला, तू आमच्याबरोबर असे का वागलास? ऐक, तुझा पिता व मी कष्टी होऊन तुझा शोध करीत आलो.” येशू त्यांना म्हणाला, “तुम्ही माझा शोध का करीत होता? मी माझ्या पित्याच्या घरात असावे, हे तुम्हास माहीत नव्हते काय?” परंतु तो जे शब्द त्यांच्याशी बोलला ते त्यांना समजले नाही. मग तो त्यांच्याबरोबर नासरेथास गेला आणि तो त्यांच्या आज्ञेत राहिला. त्याच्या आईने या सर्व गोष्टी आपल्या अंतःकरणात जपून ठेवल्या. येशू ज्ञानाने आणि शरीराने देवाच्या आणि मनुष्यांच्या कृपेत वाढत गेला.
लूक 2:42-52 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
जेव्हा येशू बारा वर्षांचे होते तेव्हा रिवाजाप्रमाणे ते सणासाठी तेथे गेले. सण संपल्यानंतर, येशूंचे आईवडील घरी परत जात असताना, येशू यरुशलेमातच मागे राहिले, परंतु त्यांना याची कल्पना नव्हती. ते त्यांच्याच बरोबर येत आहेत, असा विचार करून एक दिवसाची वाट चालून गेले. तेव्हा त्यांनी त्यांच्या नातेवाईकांकडे आणि मित्रमंडळींकडे त्याला शोधण्यास सुरुवात केली. पण त्यांना ते कुठेच सापडले नाही, म्हणून ते त्यांना शोधण्यासाठी परत यरुशलेमला गेले. तीन दिवसानंतर त्यांना ते मंदिराच्या परिसरात सापडले, शिक्षकांमध्ये बसून आणि त्यांचे ऐकून त्यांना ते प्रश्न विचारत होते. प्रत्येकजण जो त्यांचे ऐकत होता तो त्यांची बुद्धी आणि त्यांच्या उत्तरांनी आश्चर्यचकित झाला होता. त्यांना पाहून त्यांचे आईवडील विस्मित झाले. मुला, आईने विचारले, “तू आमच्याशी असा का वागलास? तुझे वडील आणि मी चिंतित होऊन तुला शोधत आहोत.” “तुम्ही माझा शोध का केला? मी माझ्या पित्याच्या घरामध्ये असावे, हे तुमच्या लक्षात कसे आले नाही?” परंतु ते त्यांना काय सांगत होते ते त्यांना समजले नाही. नंतर ते आईवडिलांबरोबर नासरेथला आले आणि त्यांच्या आज्ञेत राहिले. त्यांच्या आईने या सर्वगोष्टी आपल्या हृदयात साठवून ठेवल्या. आणि येशू ज्ञानाने व शरीराने, परमेश्वराच्या व मनुष्याच्या कृपेत वाढले.
लूक 2:42-52 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
आणि तो बारा वर्षांचा झाला तेव्हा ते त्या सणातील रिवाजाप्रमाणे तेथे गेले. मग सणाचे दिवस संपल्यावर ते परत जाण्यास निघाले, तेव्हा तो मुलगा येशू यरुशलेमेत मागे राहिला हे त्याच्या आईबापांना कळले नाही. तो वाटेच्या सोबत्यांत असेल असे समजून ते एक दिवसाची वाट चालून गेले; नंतर नातलग व ओळखीचे ह्यांच्यामध्ये त्यांनी त्याचा शोध केला. परंतु तो त्यांना सापडला नाही, म्हणून ते त्याचा शोध करत करत यरुशलेमेस परत गेले. मग असे झाले की, तीन दिवसांनंतर तो त्यांना मंदिरात गुरुजनांमध्ये बसून त्यांचे भाषण ऐकताना व त्यांना प्रश्न करताना सापडला. त्याचे बोलणे जे ऐकत होते, ते सर्व त्याच्या बुद्धीवरून व उत्तरांवरून थक्क झाले. त्याला तेथे पाहून त्यांना आश्चर्य वाटले आणि त्याची आई त्याला म्हणाली, “बाळा, तू आमच्याबरोबर असा का वागलास? पाहा, तुझा पिता व मी कष्टी होऊन तुझा शोध करत आलो.” तो त्यांना म्हणाला, “तुम्ही माझा शोध करत राहिलात हे कसे? माझ्या पित्याच्या घरात मी असावे हे तुमच्या ध्यानात आले नाही काय?” परंतु तो हे जे काही त्यांच्याशी बोलला ते त्यांना समजले नाही. मग तो त्यांच्याबरोबर खाली नासरेथास गेला व त्यांच्या आज्ञेत राहिला. त्याच्या आईने ह्या सर्व गोष्टी आपल्या मनात ठेवल्या. येशू ज्ञानाने, शरीराने आणि ‘देवाच्या व माणसांच्या कृपेत वाढत गेला.’
लूक 2:42-52 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
येशू बारा वर्षांचा झाला, तेव्हा ते नेहमीप्रमाणे सणासाठी तेथे गेले. सणाचे दिवस संपल्यावर ते परत जायला निघाले, तेव्हा त्यांचा मुलगा येशू यरुशलेममध्ये मागे राहिला, हे त्याच्या आईबापांना माहीत नव्हते. तो वाटेवरच्या सोबत्यांत असेल, असे समजून ते एक दिवसाची वाट चालून गेले. नंतर नातलग व ओळखीचे लोक ह्यांच्यामध्ये त्यांनी त्याचा शोध घेतला. तो त्यांना सापडला नाही, तेव्हा ते त्याचा शोध घेत घेत यरुशलेमला परत गेले. तीन दिवसांनंतर तो त्यांना मंदिरात गुरुजनांमध्ये बसून त्यांचे भाषण ऐकताना व त्यांना प्रश्न विचारताना सापडला. त्याची बुद्धिमत्ता व उत्तरे ह्यांवरून त्याचे बोलणे जे ऐकत होते ते सर्व थक्क झाले. त्याला तेथे पाहून त्याच्या आईवडिलांना आश्चर्य वाटले आणि त्याची आई त्याला म्हणाली, “बाळा, तू आमच्याबरोबर असा का वागलास? पाहा, तुझे वडील व मी चिंताक्रांत होऊन तुझा शोध घेत परत आलो.” तो त्यांना म्हणाला, “तुम्ही माझा शोध घेत राहिलात हे कसे? मी माझ्या पित्याच्या घरात असावे, हे तुमच्या ध्यानात आले नाही काय?” परंतु त्याचे हे बोलणे त्यांना समजले नाही. नंतर तो त्यांच्याबरोबर नासरेथ येथे गेला व त्यांच्या आज्ञेत राहिला. त्याच्या आईने ह्या सर्व गोष्टी आपल्या अंतःकरणात जतन करून ठेवल्या. येशू वयाने मोठा होत असता सुज्ञता, देवकृपा व लोकप्रियता ह्यांबाबतीतही वाढत गेला.