YouVersion लोगो
सर्च आयकॉन

लूक 2:3-12

लूक 2:3-12 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

तेव्हा सर्व लोक आपापल्या गावी नावनिशी लिहून देण्यास गेले. योसेफ हा दाविदाच्या घराण्यातला व कुळातला असल्यामुळे तोही गालीलातील नासरेथ गावाहून वर यहूदीयातील दाविदाच्या बेथलहेम गावी गेला, व नावनिशी लिहून देण्यासाठी, त्याला वाग्दत्त झालेली मरीया गरोदर असताना तिलाही त्याने बरोबर नेले. ते तेथे असताना असे झाले की, तिचे दिवस पूर्ण भरले; आणि तिला तिचा प्रथमपुत्र झाला; त्याला तिने बाळंत्याने गुंडाळून गव्हाणीत ठेवले, कारण त्यांना उतारशाळेत जागा नव्हती. त्याच परिसरात मेंढपाळ रानात राहून रात्रीच्या वेळी आपले कळप राखत होते. तेव्हा प्रभूचा दूत त्यांच्याजवळ उभा राहिला, प्रभूचे तेज त्यांच्याभोवती प्रकाशले आणि त्यांना मोठी भीती वाटली. तेव्हा देवदूत त्यांना म्हणाला, “भिऊ नका; कारण पाहा, जो मोठा आनंद सर्व लोकांना होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हांला सांगतो; ती ही की, तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे. आणि तुम्हांला खूण ही की, बाळंत्याने गुंडाळलेले व गव्हाणीत ठेवलेले एक बालक तुम्हांला आढळेल.”

सामायिक करा
लूक 2 वाचा

लूक 2:3-12 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

प्रत्येकजण नावनोंदणी करण्यासाठी आपापल्या गांवी गेले. मग योसेफसुद्धा गालील प्रांतातील नासरेथ गांवाहून यहूदीया प्रांतातील दाविदाच्या बेथलेहेम या गावी गेला कारण तो दाविदाच्या घराण्यातील व कुळातील होता. व नावनिशी लिहून देण्यासाठी, जिच्याशी त्याची मागणी झालेली होती त्या गरोदर मरीयेला त्याने बरोबर नेले. आणि असे झाले, ते तेथे असताच तिचे प्रसूतीचे दिवस पूर्ण होऊन, तिने तिच्या पहिल्या मुलाला जन्म दिला आणि तिने त्यास कापडात गुंडाळले व गव्हाणींत ठेवले कारण धर्मशाळेत उतरण्यासाठी त्यांना जागा मिळाली नाही. त्याच भागांत, मेंढपाळ रात्रीच्या वेळी रानात राहून आपले कळप राखीत होते. अचानक, देवाचा एक दूत त्यांच्यासमोर प्रकट झाला व प्रभूचे तेज त्यांच्याभोवती पसरले आणि ते खूप भ्याले. देवदूत त्यांना म्हणाला भिऊ नका; जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हास सांगतो. दावीदाच्या नगरात आज तुमच्यासाठी तारणारा जन्मला आहे! तो ख्रिस्त प्रभू आहे. तुमच्यासाठी ही खूण असेल की, बालक बाळंत्याने गुंडाळून गव्हाणीत निजवलेले तुम्हास आढळेल.

सामायिक करा
लूक 2 वाचा

लूक 2:3-12 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

तेव्हा प्रत्येकजण आपआपल्या गावी नोंदणी करण्यासाठी गेले. योसेफसुद्धा दावीदाच्या घराण्यातील व वंशातील असल्यामुळे, तो यहूदा प्रांतातील गालीलातील नासरेथ या दावीदाच्या गावी बेथलेहेम येथे वर गेला. नाव नोंदणीसाठी त्याने आपली होणारी वधू मरीया हिला बरोबर घेतले कारण तिला लवकरच बाळ होणे अपेक्षित होते. जेव्हा ते त्याठिकाणी होते, तेव्हा बाळाचा जन्म होण्याची वेळ आली, आणि तिने आपल्या प्रथम पुत्राला जन्म दिला. तिने त्याला गोठ्यातील गव्हाणीत ठेवले, कारण तेथे त्यांच्यासाठी विश्रांतीगृह उपलब्ध नव्हते. आणि त्या भागात मेंढपाळ रानात राहून, रात्रीच्या समयी त्यांचे कळप राखीत होते. इतक्यात त्यांच्यामध्ये प्रभुचा देवदूत प्रकट झाला आणि परमेश्वराचे गौरव त्यांच्याभोवती प्रकाशले आणि ते अत्यंत भयभीत झाले. परंतु देवदूत मेंढपाळांना म्हणाला, “भिऊ नका. मी तुमच्यासाठी एक शुभवार्ता आणली आहे, ज्यामुळे सर्व लोकांना मोठा हर्ष होईल. आज दावीदाच्या गावात तुमच्यासाठी तारणारा जन्मला आहे; तोच ख्रिस्त, प्रभू आहे. त्याची खूण ही आहे: बाळंत्याने गुंडाळलेले व गव्हाणीत निजविलेले असे बालक तुम्हाला सापडेल.”

सामायिक करा
लूक 2 वाचा

लूक 2:3-12 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

सर्व लोक आपापल्या गावी नावनोंदणी करण्यासाठी गेले. योसेफ हा दावीदच्या घराण्यातला व कुळातला असल्यामुळे तोही गालीलमधील नासरेथ गावाहून यहुदियातील दावीदच्या बेथलेहेम गावी गेला, नावनिशी लिहून देण्यासाठी जाताना त्याची वाग्दत्त वधू मरिया हिला त्याने बरोबर नेले. ती गरोदर होती. ती तेथे असताना तिच्या बाळंतपणाची घटका आली. तिला तिचा प्रथम पुत्र झाला. त्याला तिने बाळंत्याने गुंडाळून गव्हाणीत ठेवले कारण त्यांना उतारशाळेत जागा नव्हती. त्याच परिसरात काही मेंढपाळ रानात राहून रात्रीच्या वेळी आपले कळप राखत होते. त्या वेळी प्रभूचा दूत त्यांच्याजवळ उभा राहिला. प्रभूचे तेज त्यांच्याभोवती उजळले. त्यांना फार भीती वाटली. परंतु देवदूत त्यांना म्हणाला, “भिऊ नका, ज्याच्यामुळे सर्व लोकांना अत्यानंद होणार आहे, असे सुवृत्त मी तुम्हांला सांगतो: तुमच्यासाठी आज दावीदच्या नगरात तारणारा जन्माला आला आहे. तो ख्रिस्त प्रभू आहे! तुम्हांला खूण ही की, बाळंत्यांत गुंडाळलेले व गव्हाणीत ठेवलेले बालक तुम्हांला आढळेल.”

सामायिक करा
लूक 2 वाचा