लूक 2:21-33
लूक 2:21-33 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आठवा दिवस म्हणजे सुंतेचा दिवस आल्यावर त्याचे नाव येशू ठेवण्यात आले. हे नाव तो उदरात संभवण्यापूर्वीच देवदूताने ठेवले होते. पुढे मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे त्यांचे शुद्धीकरणाचे दिवस भरल्यावर ते त्यास वर यरूशलेम शहरास घेऊन आले; ते अशासाठी की, त्याचे प्रभूला समर्पण करावे. म्हणजे प्रत्येक प्रथम जन्मलेला नर प्रभूसाठी पवित्र म्हटला जावा असे जे प्रभूच्या नियमशास्त्रात लिहिले आहे त्याप्रमाणे करावे. आणि प्रभूच्या नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे होल्यांचा जोडा किंवा कबुतरांची दोन पिल्ले यांचा यज्ञ अर्पावा म्हणून त्यांनी त्यास तेथे आणले. तेव्हा पाहा, यरूशलेम त शिमोन नावाचा कोणीएक मनुष्य होता. तो मनुष्य नीतिमान व भक्तिमान होता. तो इस्राएलाच्या सांत्वनाची वाट पाहत होता आणि पवित्र आत्मा त्याच्यावर होता. आणि प्रभूच्या ख्रिस्ताला पाहिल्याशिवाय तू मरणार नाही असे पवित्र आत्म्याने त्यास प्रकट केले होते. आणि तो आत्म्यांत असता परमेश्वराच्या भवनात आला आणि जेव्हा आईवडीलांनी येशू बाळाला, त्याच्याविषयी नियमशास्त्राच्या रीतीप्रमाणे करण्याकरीता, आत आणले, तेव्हा शिमोनाने येशूला आपल्या हातात घेतले आणि त्याने देवाचा धन्यवाद केला आणि म्हटले, “हे प्रभू, आता तू आपल्या वचनाप्रमाणे आपल्या दासास शांतीने जाऊ देत आहेस. कारण माझ्या डोळ्यांनी तुझे तारण पाहिले आहे, ते तू सर्व राष्ट्रांतील लोकांच्या समक्ष तयार केले. ते परराष्ट्रीयांस प्रगटीकरण होण्यासाठी उजेड व तुझ्या इस्राएल लोकांचे वैभव असे आहे.” त्याच्याविषयी सांगितलेल्या गोष्टींमुळे त्याचे आईवडील आश्चर्यचकित झाले.
लूक 2:21-33 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
आठव्या दिवशी, बालकाची सुंता करण्याची वेळ आली, त्यावेळी त्यांचे नाव येशू ठेवण्यात आले, हे नाव त्यांना त्यांची गर्भधारणा होण्यापूर्वीच देवदूताने दिले होते. मोशेच्या नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे शुद्धीकरणाच्या अर्पणाची वेळ आली, तेव्हा त्यांच्या आईवडिलांनी त्याला प्रभूला सादर करण्यासाठी यरुशलेमला नेले. कारण प्रभूच्या नियमात असे लिहिलेले आहे, “प्रत्येक प्रथम जन्मलेला पुत्र प्रभूला समर्पित केला पाहिजे.” प्रभूच्या नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे हे अर्पण: “दोन कबुतरे किंवा पारव्याची दोन पिल्ले,” असे होते. यरुशलेम येथे शिमोन नावाचा एक मनुष्य होता, तो नीतिमान आणि भक्तिमान होता व इस्राएलाच्या सांत्वनाची वाट पाहत असून पवित्र आत्मा त्याजवर होता. कारण प्रभू ख्रिस्ताला पाहिल्याशिवाय तुला मरण येणार नाही, असे पवित्र आत्म्याने त्याला प्रकट केले होते. पवित्र आत्म्याने प्रवृत्त होऊन तो मंदिराच्या परिसरात गेला. तेव्हा आईवडिलांनी नियमशास्त्रात सांगितलेला विधी पूर्ण करण्यासाठी येशू बाळाला मंदिरात आणले, तेव्हा शिमोनाने बाळाला आपल्या हातात घेतले आणि परमेश्वराची स्तुती करीत म्हटले: “हे सर्वशक्तिमान प्रभू, तुमच्या वचनाप्रमाणे आता तुमच्या सेवकाला शांतीने घेऊन जावे. मी तुमचे तारण माझ्या डोळ्यांनी पाहिले आहे. जे तुम्ही सर्व राष्ट्रांच्या नजरेसमोर सिद्ध केले आहे, ते गैरयहूदीयांसाठी प्रकटीकरणाचा प्रकाश, आणि आपल्या इस्राएली लोकांचे गौरव आहे.” आपल्या पुत्राविषयी हे बोलणे ऐकून योसेफ आणि मरीया आश्चर्यचकित झाले.
लूक 2:21-33 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
आठवा दिवस म्हणजे सुंतेचा दिवस आल्यावर त्याचे नाव येशू ठेवण्यात आले; हे तो उदरात संभवण्यापूर्वीच देवदूताने ठेवले होते. पुढे मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे त्यांचे ‘शुद्धीकरणाचे दिवस भरल्यावर’ ते त्याला वर यरुशलेमेस घेऊन आले. ते अशासाठी की, त्याचे प्रभूला समर्पण करावे; (म्हणजे ‘प्रत्येक प्रथम जन्मलेला नर प्रभूसाठी पवित्र म्हटला जावा,’ असे जे प्रभूच्या नियमशास्त्रात लिहिले आहे त्याप्रमाणे करावे,) आणि प्रभूच्या नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे ‘होल्यांचा जोडा किंवा पारव्यांची दोन पिले’ ह्यांचा यज्ञ करावा. तेव्हा पाहा, शिमोन नावाचा कोणीएक मनुष्य यरुशलेमेत होता; तो नीतिमान व भक्तिमान मनुष्य असून इस्राएलाच्या सांत्वनाची वाट पाहत होता व त्याच्यावर पवित्र आत्मा होता. प्रभूच्या ख्रिस्ताला पाहण्याअगोदर तुला मरण येणार नाही, असे पवित्र आत्म्याने त्याला प्रकट केले होते. त्याला आत्म्याने मंदिरात आणले आणि नियमशास्त्राच्या विधीप्रमाणे करण्याकरता आईबाप येशूला आत घेऊन आले, तेव्हा त्याने त्याला आपल्या हातांत घेऊन देवाचा धन्यवाद करीत म्हटले : “हे प्रभू, आता तू आपल्या वचनाप्रमाणे आपल्या दासाला शांतीने जाऊ देत आहेस; कारण माझ्या डोळ्यांनी ‘तुझे तारण पाहिले आहे.’ ते ‘तू सर्व राष्ट्रांसमक्ष’ सिद्ध केले आहेस. ते परराष्ट्रीयांना प्रकटीकरण होण्यासाठी उजेड व तुझ्या ‘इस्राएल’ लोकांचे ‘वैभव’ असे आहे.” त्याच्याविषयी जे हे सांगण्यात आले त्यावरून त्याचा बाप व त्याची आई ह्यांना आश्चर्य वाटले.
लूक 2:21-33 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
आठवा दिवस म्हणजे सुंतेचा दिवस आल्यावर त्या बाळाचे नाव येशू ठेवण्यात आले. हे नाव तो उदरात संभवण्यापूर्वीच देवदूताने दिले होते. मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे शुद्धीकरणाचे दिवस जवळ आल्यावर बाळ प्रभूला समर्पित करावे म्हणून योसेफ व मरिया त्याला यरुशलेम येथे घेऊन गेले. म्हणजे ‘प्रत्येक प्रथम जन्मलेला नर प्रभूसाठी पवित्र म्हणून गणला जावा’, असे जे नियमशास्त्रात लिहिले आहे, त्याप्रमाणे त्यांनी करावे, तसेच प्रभूच्या नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे कबुतरांची जोडी किंवा पारव्यांची दोन पिले ह्यांचा यज्ञदेखील त्यांनी अर्पण करावा. त्या समयी शिमोन नावाचा एक मनुष्य यरुशलेममध्ये राहात होता. तो नीतिमान व भक्तिमान मनुष्य होता. तो इस्राएलच्या मुक्तीची वाट पाहत होता आणि पवित्र आत्मा त्याच्या सोबत होता. ‘प्रभूच्या वचनदत्त ख्रिस्ताला पाहण्याअगोदर तुला मरण येणार नाही’, असे पवित्र आत्म्याने त्याला प्रकट केले होते. पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने शिमोन मंदिरात आला. नियमशास्त्रानुसार विधी करण्याकरिता आईबाप येशूला आत घेऊन आले, तेव्हा त्याने येशू बाळाला आपल्या हातात घेऊन देवाचा गौरव करीत म्हटले, “हे प्रभो, तुझे वचन तू पाळले आहे. आता आपल्या दासाला शांतीने जाऊ दे; कारण माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी मी तुझे तारण पाहिले आहे. ते तू सर्व लोकांसमक्ष सिद्ध केले आहे. ते परराष्ट्रीयांना तुझी इच्छा प्रकट व्हावी म्हणून प्रकाश व तुझ्या इस्राएली लोकांचे वैभव आहे.” येशूविषयी जे हे सांगण्यात आले, त्यावरून त्याचे वडील व त्याची आई ह्यांना आश्चर्य वाटले.