लूक 2:1-18
लूक 2:1-18 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
त्या दिवसात कैसर आगुस्तची आज्ञा झाली की, सर्व जगाची नावनोंदणी लिहिली जावी. ही पहिली नावनोंदणी होती जेव्हा क्वीरीनिय हा सिरीया प्रांताचा राज्यपाल होता. प्रत्येकजण नावनोंदणी करण्यासाठी आपापल्या गांवी गेले. मग योसेफसुद्धा गालील प्रांतातील नासरेथ गांवाहून यहूदीया प्रांतातील दाविदाच्या बेथलेहेम या गावी गेला कारण तो दाविदाच्या घराण्यातील व कुळातील होता. व नावनिशी लिहून देण्यासाठी, जिच्याशी त्याची मागणी झालेली होती त्या गरोदर मरीयेला त्याने बरोबर नेले. आणि असे झाले, ते तेथे असताच तिचे प्रसूतीचे दिवस पूर्ण होऊन, तिने तिच्या पहिल्या मुलाला जन्म दिला आणि तिने त्यास कापडात गुंडाळले व गव्हाणींत ठेवले कारण धर्मशाळेत उतरण्यासाठी त्यांना जागा मिळाली नाही. त्याच भागांत, मेंढपाळ रात्रीच्या वेळी रानात राहून आपले कळप राखीत होते. अचानक, देवाचा एक दूत त्यांच्यासमोर प्रकट झाला व प्रभूचे तेज त्यांच्याभोवती पसरले आणि ते खूप भ्याले. देवदूत त्यांना म्हणाला भिऊ नका; जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हास सांगतो. दावीदाच्या नगरात आज तुमच्यासाठी तारणारा जन्मला आहे! तो ख्रिस्त प्रभू आहे. तुमच्यासाठी ही खूण असेल की, बालक बाळंत्याने गुंडाळून गव्हाणीत निजवलेले तुम्हास आढळेल. मग एकाएकी आकाशातल्या सैन्यांचा समुदाय त्या देवदूताजवळ आला आणि देवदूत देवाची स्तुती करत म्हणाले, “परम उंचामध्ये देवाला गौरव आणि पृथ्वीवर ज्या मनुष्यांसंबंधी तो संतुष्ट आहे त्यांच्यामध्ये शांती.” मग असे झाले की देवदूत त्यांच्यापासून स्वर्गास गेले, तेव्हा मेंढपाळ एकमेकांना म्हणाले, चला, आपण बेथलेहेमापर्यंत जाऊ आणि घडलेली ही जी गोष्ट परमेश्वराने आम्हास कळवली ती बघू या. तेव्हा ते घाईघाईने गेले आणि त्यांना मरीया, योसेफ व गव्हाणीत ठेवलेले बाळ ही त्यांना दिसले. जेव्हा मेंढपाळांनी त्यास पाहिले तेव्हा त्या बाळाविषयी जे सांगितले होते ते त्यांनी सर्वांना जाहीर केले. मग ऐकणारे सर्व जन त्या मेंढपाळांनी सांगितलेल्या गोष्टीवरून आश्चर्यचकित झाले.
लूक 2:1-18 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
त्या दिवसात कैसर औगुस्त याने सर्व जगातील रोमी लोकांची शिरगणती करावी असा हुकूम काढला. ही पहिली जनगणना क्विरीनिय हा सीरियाचा राज्यपाल असताना घेण्यात आली होती. तेव्हा प्रत्येकजण आपआपल्या गावी नोंदणी करण्यासाठी गेले. योसेफसुद्धा दावीदाच्या घराण्यातील व वंशातील असल्यामुळे, तो यहूदा प्रांतातील गालीलातील नासरेथ या दावीदाच्या गावी बेथलेहेम येथे वर गेला. नाव नोंदणीसाठी त्याने आपली होणारी वधू मरीया हिला बरोबर घेतले कारण तिला लवकरच बाळ होणे अपेक्षित होते. जेव्हा ते त्याठिकाणी होते, तेव्हा बाळाचा जन्म होण्याची वेळ आली, आणि तिने आपल्या प्रथम पुत्राला जन्म दिला. तिने त्याला गोठ्यातील गव्हाणीत ठेवले, कारण तेथे त्यांच्यासाठी विश्रांतीगृह उपलब्ध नव्हते. आणि त्या भागात मेंढपाळ रानात राहून, रात्रीच्या समयी त्यांचे कळप राखीत होते. इतक्यात त्यांच्यामध्ये प्रभुचा देवदूत प्रकट झाला आणि परमेश्वराचे गौरव त्यांच्याभोवती प्रकाशले आणि ते अत्यंत भयभीत झाले. परंतु देवदूत मेंढपाळांना म्हणाला, “भिऊ नका. मी तुमच्यासाठी एक शुभवार्ता आणली आहे, ज्यामुळे सर्व लोकांना मोठा हर्ष होईल. आज दावीदाच्या गावात तुमच्यासाठी तारणारा जन्मला आहे; तोच ख्रिस्त, प्रभू आहे. त्याची खूण ही आहे: बाळंत्याने गुंडाळलेले व गव्हाणीत निजविलेले असे बालक तुम्हाला सापडेल.” अचानक त्या दूताबरोबर स्वर्गदूतांचा एक मोठा समूह त्यांना दिसला, ते परमेश्वराची स्तुती करीत म्हणाले, “सर्वोच्च स्वर्गामध्ये परमेश्वराला गौरव, आणि पृथ्वीवर ज्यांच्यावर त्यांची कृपादृष्टी झाली आहे, त्यांना शांती असो.” देवदूत त्यांना सोडून स्वर्गात वर गेल्यानंतर, मेंढपाळ एकमेकांस म्हणू लागले: “चला, आपण बेथलेहेमला जाऊ आणि प्रभुने सांगितलेली ही जी घटना घडली आहे, ती प्रत्यक्ष पाहू.” ते घाईघाईने गेले आणि ज्या ठिकाणी ते बालक गव्हाणीत निजले होते तेथे त्यांनी मरीया आणि योसेफ यांना शोधून काढले. त्यांनी त्या बालकाला पाहिल्यानंतर, त्या बालकाविषयी त्यांना जे काही सांगण्यात आले होते, त्या सर्वठिकाणी विदित केल्या. मेंढपाळांनी जे सांगितले व ज्यांनी ऐकले ते सर्वजण आश्चर्यचकित झाले.
लूक 2:1-18 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
त्या दिवसांत असे झाले की, सर्व जगाची नावनिशी लिहिली जावी अशी कैसर औगुस्त ह्याची आज्ञा झाली. क्विरीनिय हा सूरियाचा सुभेदार असताना ही पहिली नावनिशी झाली. तेव्हा सर्व लोक आपापल्या गावी नावनिशी लिहून देण्यास गेले. योसेफ हा दाविदाच्या घराण्यातला व कुळातला असल्यामुळे तोही गालीलातील नासरेथ गावाहून वर यहूदीयातील दाविदाच्या बेथलहेम गावी गेला, व नावनिशी लिहून देण्यासाठी, त्याला वाग्दत्त झालेली मरीया गरोदर असताना तिलाही त्याने बरोबर नेले. ते तेथे असताना असे झाले की, तिचे दिवस पूर्ण भरले; आणि तिला तिचा प्रथमपुत्र झाला; त्याला तिने बाळंत्याने गुंडाळून गव्हाणीत ठेवले, कारण त्यांना उतारशाळेत जागा नव्हती. त्याच परिसरात मेंढपाळ रानात राहून रात्रीच्या वेळी आपले कळप राखत होते. तेव्हा प्रभूचा दूत त्यांच्याजवळ उभा राहिला, प्रभूचे तेज त्यांच्याभोवती प्रकाशले आणि त्यांना मोठी भीती वाटली. तेव्हा देवदूत त्यांना म्हणाला, “भिऊ नका; कारण पाहा, जो मोठा आनंद सर्व लोकांना होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हांला सांगतो; ती ही की, तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे. आणि तुम्हांला खूण ही की, बाळंत्याने गुंडाळलेले व गव्हाणीत ठेवलेले एक बालक तुम्हांला आढळेल.” इतक्यात स्वर्गातील सैन्याचा समुदाय त्या देवदूताजवळ अकस्मात प्रकट झाला आणि देवदूत देवाची स्तुती करत म्हणाले, “ऊर्ध्वलोकी देवाला गौरव, आणि पृथ्वीवर ज्यांच्यावर त्याचा प्रसाद झाला आहे त्या मनुष्यांत शांती.” मग असे झाले की, देवदूत त्यांच्यापासून स्वर्गात गेले, तेव्हा मेंढपाळ एकमेकांना म्हणू लागले, “चला, आपण बेथलेहेमापर्यंत जाऊ व झालेली ही जी गोष्ट प्रभूने आपल्याला कळवली आहे ती पाहू.” तेव्हा ते घाईघाईने गेले आणि मरीया, योसेफ व गव्हाणीत ठेवलेले बालक त्यांना सापडले. त्यांनी त्यांना पाहिल्यावर त्या बालकाविषयी त्यांना जे कळवण्यात आले होते ते त्यांनी जाहीर केले. मग ऐकणारे सर्व जण त्या मेंढपाळांनी सांगितलेल्या गोष्टींवरून आश्चर्यचकित झाले.
लूक 2:1-18 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
सर्व रोमन साम्राज्याची जनगणना व्हावी, असे सम्राट औगुस्त ह्याने फर्मान सोडले. क्विरीनिय हा सूरियाचा राज्यपाल असताना ही पहिली नावनोंदणी झाली. सर्व लोक आपापल्या गावी नावनोंदणी करण्यासाठी गेले. योसेफ हा दावीदच्या घराण्यातला व कुळातला असल्यामुळे तोही गालीलमधील नासरेथ गावाहून यहुदियातील दावीदच्या बेथलेहेम गावी गेला, नावनिशी लिहून देण्यासाठी जाताना त्याची वाग्दत्त वधू मरिया हिला त्याने बरोबर नेले. ती गरोदर होती. ती तेथे असताना तिच्या बाळंतपणाची घटका आली. तिला तिचा प्रथम पुत्र झाला. त्याला तिने बाळंत्याने गुंडाळून गव्हाणीत ठेवले कारण त्यांना उतारशाळेत जागा नव्हती. त्याच परिसरात काही मेंढपाळ रानात राहून रात्रीच्या वेळी आपले कळप राखत होते. त्या वेळी प्रभूचा दूत त्यांच्याजवळ उभा राहिला. प्रभूचे तेज त्यांच्याभोवती उजळले. त्यांना फार भीती वाटली. परंतु देवदूत त्यांना म्हणाला, “भिऊ नका, ज्याच्यामुळे सर्व लोकांना अत्यानंद होणार आहे, असे सुवृत्त मी तुम्हांला सांगतो: तुमच्यासाठी आज दावीदच्या नगरात तारणारा जन्माला आला आहे. तो ख्रिस्त प्रभू आहे! तुम्हांला खूण ही की, बाळंत्यांत गुंडाळलेले व गव्हाणीत ठेवलेले बालक तुम्हांला आढळेल.” इतक्यात स्वर्गीय समुदाय त्या देवदूताजवळ अकस्मात प्रकट झाला आणि ते देवाची स्तुती करीत म्हणाले, “स्वर्गात देवाला गौरव आणि पृथ्वीवर त्याची ज्यांच्यावर कृपा झाली आहे, त्यांना शांती.” देवदूत स्वर्गात गेल्यानंतर मेंढपाळ एकमेकांना म्हणू लागले, “चला, आपण बेथलेहेम येथे जाऊ या. प्रभूने आपल्याला जी गोष्ट सांगितली आहे, ती प्रत्यक्ष पाहू या.” म्हणून ते त्वरेने निघाले व मरिया, योसेफ व गव्हाणीत ठेवलेले बालक हे त्यांच्या दृष्टीस पडले. त्यांना पाहिल्यावर त्या बालकाविषयी त्यांना जे सांगण्यात आले होते, ते त्यांनी मरिया व योसेफ ह्यांना सांगितले. मेंढपाळांनी सांगितलेल्या वृत्तान्तावरून ऐकणारे सर्व जण थक्क झाले.