लूक 18:24-30
लूक 18:24-30 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तो दुःखी झाला आहे हे जेव्हा येशूने पाहिले तेव्हा तो लोकांस म्हणाला, “ज्यांच्याजवळ धन आहे, त्या लोकांचा देवाच्या राज्यात प्रवेश होणे किती कठीण आहे! होय, श्रीमंत मनुष्याचे देवाच्या राज्यात प्रवेश करणे यापेक्षा उंटाने सुईच्या नाकातून जाणे सोपे आहे.” नंतर ज्या लोकांनी हे ऐकले, ते म्हणाले, “तर मग कोणाचे तारण होईल?” तो म्हणाला, “ज्या गोष्टी मनुष्यांना अशक्य आहेत त्या देवाला शक्य आहेत.” मग पेत्र म्हणाला, “बघा, आमच्याकडे जे होते, ते सर्व टाकून आम्ही तुमच्यामागे आलो आहोत.” येशूने त्यांना म्हटले, “मी तुम्हास खरे सांगतो, देवाच्या राज्याकरता ज्याने आपले घर, पत्नी, भाऊ, आई-वडील किंवा मुलेबाळ सोडली त्यांना या काळी पुष्कळ पटीने व येणाऱ्या युगात सार्वकालिक जीवन मिळणार नाही असा कोणी नाही.”
लूक 18:24-30 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
येशूंनी त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाले, “श्रीमंतांना परमेश्वराच्या राज्यात प्रवेश करणे किती कठीण आहे! एखाद्या श्रीमंत मनुष्याला परमेश्वराच्या राज्यात प्रवेश करणे यापेक्षा उंटाला सुईच्या नाकातून जाणे सोपे आहे.” ज्यांनी हे बोलणे ऐकले, त्यांनी विचारले, “मग कोणाचे तारण होऊ शकेल?” येशूंनी उत्तर दिले, “जे काही मानवाला अशक्य आहे, परंतु त्या सर्वगोष्टी परमेश्वराला शक्य आहेत.” तेव्हा पेत्र येशूंना म्हणाला, “आपणास अनुसरावे म्हणून आम्ही सर्वकाही सोडून दिले आहे!” “मी तुम्हाला निश्चित सांगतो,” येशूंनी म्हटले, “असे कोणी नाही की ज्यांनी परमेश्वराच्या राज्यासाठी आपले घर, भाऊ बहीण, आई, पिता, पत्नी, मुले, यांचा त्याग केला, त्याला या जगात अनेक पटीने दिले जाईलच पण येणार्या युगात सार्वकालिक जीवनही लाभेल.”
लूक 18:24-30 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तो अतिशय खिन्न झाला हे पाहून येशू म्हणाला, “ज्यांच्याजवळ धन आहे, त्यांचा देवाच्या राज्यात प्रवेश होणे किती बरे कठीण आहे! श्रीमंताने देवाच्या राज्यात प्रवेश करणे ह्यापेक्षा उंटाने सुईच्या नाकातून जाणे सोपे आहे.” ज्यांनी हे ऐकले ते म्हणाले, “तर मग कोणाचे तारण होणे शक्य आहे?” तो म्हणाला, “ज्या गोष्टी माणसांना अशक्य आहेत त्या देवाला शक्य आहेत.” तेव्हा पेत्र म्हणाला, “पाहा, आम्ही आपले घरदार सोडून तुम्हांला अनुसरलो आहोत.” त्याने त्यांना म्हटले, “मी तुम्हांला खचीत सांगतो, देवाच्या राज्याकरता ज्याने आपले घर, बायको, भाऊ, आईबाप किंवा मुलेबाळे सोडली आहेत, त्याला ह्या काळात पुष्कळ पटीने, व येणार्या युगात सार्वकालिक जीवन मिळणार नाही असा कोणी नाही.”
लूक 18:24-30 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
त्याच्याकडे पाहून येशू म्हणाला, “ज्यांच्याजवळ धनसंपत्ती आहे, त्यांचा देवाच्या राज्यात प्रवेश होणे किती कठीण आहे! श्रीमंताने देवाच्या राज्यात प्रवेश करणे, ह्यापेक्षा उंटाने सुईच्या नेढ्यातून जाणे सोपे आहे.” ज्यांनी हे ऐकले त्यांनी विचारले, “तर मग कोणाचे तारण होणे शक्य आहे?” त्याने उत्तर दिले, “जे माणसांना अशक्य आहे ते देवाला शक्य आहे.” पेत्र म्हणाला, “पाहा, आम्ही आमचे घरदार सोडून तुला अनुसरलो आहोत.” येशू त्यांना म्हणाला, “मी तुम्हांला निश्चित सांगतो, देवाच्या राज्याकरता ज्याने आपले घर, पत्नी, भाऊ, आईबाप किंवा मुलेबाळे सोडली आहेत, त्याला ह्या काळी पुष्कळ पटीने व येणाऱ्या युगात शाश्वत जीवन मिळेल.”