YouVersion लोगो
सर्च आयकॉन

लूक 18:18-28

लूक 18:18-28 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

एका यहूदी अधिकाऱ्याने त्यास विचारले, “उत्तम गुरुजी, सार्वकालिक जीवन मिळविण्यासाठी मी काय करू?” येशू त्यास म्हणाला, “मला उत्तम का म्हणतोस? देवाशिवाय कोणीही उत्तम नाही. तुला आज्ञा माहीत आहेत ‘व्यभिचार करू नको, खून करू नको, चोरी करू नको, खोटी साक्ष देऊ नको, तुझ्या आई-वडीलांचा मान राख.” तो अधिकारी म्हणाला, “या सर्व आज्ञा मी माझ्या तरुणपणासून पाळल्या आहेत.” जेव्हा येशूने हे ऐकले, तेव्हा तो त्यास म्हणाला, “तुझ्यामध्ये अजून एका गोष्टीची कमी आहे. तुझ्याजवळचे सर्वकाही विकून ते गरिबांना वाट, म्हणजे स्वर्गात तुला धन मिळेल. मग ये. माझ्यामागे चल.” पण जेव्हा त्या अधिकाऱ्याने हे ऐकले तेव्हा तो फार दुःखी झाला, कारण तो फार श्रीमंत होता. तो दुःखी झाला आहे हे जेव्हा येशूने पाहिले तेव्हा तो लोकांस म्हणाला, “ज्यांच्याजवळ धन आहे, त्या लोकांचा देवाच्या राज्यात प्रवेश होणे किती कठीण आहे! होय, श्रीमंत मनुष्याचे देवाच्या राज्यात प्रवेश करणे यापेक्षा उंटाने सुईच्या नाकातून जाणे सोपे आहे.” नंतर ज्या लोकांनी हे ऐकले, ते म्हणाले, “तर मग कोणाचे तारण होईल?” तो म्हणाला, “ज्या गोष्टी मनुष्यांना अशक्य आहेत त्या देवाला शक्य आहेत.” मग पेत्र म्हणाला, “बघा, आमच्याकडे जे होते, ते सर्व टाकून आम्ही तुमच्यामागे आलो आहोत.”

सामायिक करा
लूक 18 वाचा

लूक 18:18-28 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

एका शासकाने येशूंना विचारले: “उत्तम गुरुजी, सार्वकालिक जीवन हे वतन मिळावे म्हणून मी काय करावे?” येशूंनी उत्तर दिले, “तू मला उत्तम कशाला म्हणतोस? परमेश्वराशिवाय कोणी उत्तम नाही. तुला आज्ञा ठाऊक आहेत: ‘तू खून करू नको, तू व्यभिचार करू नको, तू चोरी करू नको, तू खोटी साक्ष देऊ नको, तुमच्या आई आणि वडिलांचा मान राख.’ ” तो म्हणाला, “मी लहान होतो, तेव्हापासूनच मी या सर्व आज्ञांचे पालन करीत आहे.” जेव्हा येशूंनी हे ऐकले, ते त्याला म्हणाले, “पण तू एका गोष्टीत उणा आहेस. तुझी सारी मालमत्ता विकून टाक आणि गरीबांना वाटून दे आणि तुला स्वर्गात संपत्ती मिळेल. मग ये व मला अनुसर.” जेव्हा त्याने हे बोलणे ऐकले, तेव्हा तो अतिशय खिन्न झाला, कारण तो फार श्रीमंत होता. येशूंनी त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाले, “श्रीमंतांना परमेश्वराच्या राज्यात प्रवेश करणे किती कठीण आहे! एखाद्या श्रीमंत मनुष्याला परमेश्वराच्या राज्यात प्रवेश करणे यापेक्षा उंटाला सुईच्या नाकातून जाणे सोपे आहे.” ज्यांनी हे बोलणे ऐकले, त्यांनी विचारले, “तर मग कोणाचे तारण होऊ शकते?” येशूंनी उत्तर दिले, “जे काही मानवाला अशक्य आहे परंतु परमेश्वराला सर्वगोष्टी शक्य आहेत.” तेव्हा पेत्र येशूंना म्हणाला, “आपणास अनुसरावे म्हणून आम्ही सर्वकाही सोडून दिले आहे!”

सामायिक करा
लूक 18 वाचा

लूक 18:18-28 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

कोणाएका अधिकार्‍याने त्याला विचारले, “अहो उत्तम गुरूजी, काय केल्याने मला सार्वकालिक जीवन हे वतन मिळेल?” येशू त्याला म्हणाला, “मला उत्तम का म्हणतोस? एकावाचून म्हणजे देवावाचून कोणी उत्तम नाही. तुला आज्ञा ठाऊक आहेत : ‘व्यभिचार करू नकोस, खून करू नकोस, चोरी करू नकोस, खोटी साक्ष देऊ नकोस, आपल्या बापाचा व आईचा सन्मान कर.’ तो म्हणाला, “मी आपल्या तरुणपणापासून ह्या सर्व पाळत आलो आहे.” हे ऐकून येशूने त्याला म्हटले, “अद्यापि तुझ्यात एक गोष्ट उणी आहे; तुझे असेलनसेल ते विकून गोरगरिबांना वाटून टाक म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल; आणि चल, माझ्यामागे ये.” पण हे ऐकून तो अतिशय खिन्न झाला, कारण तो फार श्रीमंत होता. तो अतिशय खिन्न झाला हे पाहून येशू म्हणाला, “ज्यांच्याजवळ धन आहे, त्यांचा देवाच्या राज्यात प्रवेश होणे किती बरे कठीण आहे! श्रीमंताने देवाच्या राज्यात प्रवेश करणे ह्यापेक्षा उंटाने सुईच्या नाकातून जाणे सोपे आहे.” ज्यांनी हे ऐकले ते म्हणाले, “तर मग कोणाचे तारण होणे शक्य आहे?” तो म्हणाला, “ज्या गोष्टी माणसांना अशक्य आहेत त्या देवाला शक्य आहेत.” तेव्हा पेत्र म्हणाला, “पाहा, आम्ही आपले घरदार सोडून तुम्हांला अनुसरलो आहोत.”

सामायिक करा
लूक 18 वाचा

लूक 18:18-28 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

एका यहुदी अधिकाऱ्याने येशूला विचारले, “गुरुवर्य, आपण किती चांगले आहात! मी काय केल्याने मला शाश्वत जीवन वतन म्हणून मिळेल?” येशू त्याला म्हणाला, “मला चांगला का म्हणतोस? एकावाचून म्हणजे देवावाचून कोणी चांगला नाही. तुला आज्ञा ठाऊक आहेत:व्यभिचार करू नकोस; खून करू नकोस; चोरी करू नकोस; खोटी साक्ष देऊ नकोस; आपल्या वडिलांचा व आईचा सन्मान कर.” तो म्हणाला, “मी माझ्या तरुणपणापासून ह्या सर्व पाळत आलो आहे.” हे ऐकून येशूने त्याला म्हटले, “अद्यापि तुझ्यात एक उणीव आहे. तुझे असेल नसेल ते विकून गोरगरिबांना वाटून टाक म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल आणि नंतर येऊन माझे अनुकरण कर.” पण हे ऐकून तो अतिशय खिन्‍न झाला कारण तो फार श्रीमंत होता. त्याच्याकडे पाहून येशू म्हणाला, “ज्यांच्याजवळ धनसंपत्ती आहे, त्यांचा देवाच्या राज्यात प्रवेश होणे किती कठीण आहे! श्रीमंताने देवाच्या राज्यात प्रवेश करणे, ह्यापेक्षा उंटाने सुईच्या नेढ्यातून जाणे सोपे आहे.” ज्यांनी हे ऐकले त्यांनी विचारले, “तर मग कोणाचे तारण होणे शक्य आहे?” त्याने उत्तर दिले, “जे माणसांना अशक्य आहे ते देवाला शक्य आहे.” पेत्र म्हणाला, “पाहा, आम्ही आमचे घरदार सोडून तुला अनुसरलो आहोत.”

सामायिक करा
लूक 18 वाचा