लूक 16:1-8
लूक 16:1-8 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
येशूने त्याच्या शिष्यांना एक दाखला सांगितला, “कोणीएक श्रीमंत मनुष्य असून, त्याचा एक कारभारी होता. हा कारभारी तुमचे पैसे उधळतो, अशी तक्रार त्या श्रीमंत मनुष्याकडे करण्यात आली. म्हणून त्या श्रीमंत मनुष्याने कारभाऱ्याला आत बोलावून म्हटले, तुझ्याविषयी मी हे काय ऐकत आहे? तर आता तुझ्या कारभाराचा हिशोब दे, कारण यापुढे तुला कारभार पाहावयचा नाही. तेव्हा कारभारी स्वतःशी म्हणाला, माझे मालक माझे कारभाऱ्याचे काम काढून घेत आहेत तर मी आता काय करू? शेतात कष्ट करण्याएवढे बळ माझ्या अंगात नाही व भीक मागण्याची मला लाज वाटते. मला कारभाऱ्याच्या कामावरून ते काढून टाकतील तरीही लोकांनी मला त्यांच्या घरात घ्यावे यासाठी मी काय करावे हे मला माहिती आहे. मग कारभाऱ्याने त्याच्या मालकाच्या प्रत्येक कर्जदाराला बोलावले. पहिल्याला तो म्हणाला, तू माझ्या मालकाकडून किती कर्ज घेतले आहे जे तुला फेडायचे आहे. तो म्हणाला, तीन हजार लिटर तेल. त्याने त्यास म्हटले, ही तुझी हिशोबाची वही घे आणि लवकर बसून यावर दीड हजार मांड नंतर दुसऱ्याला म्हटले, तुला किती देणे आहे? तो म्हणाला, वीस हजार किलो गहू तो त्यास म्हणाला, ही तुझी हिशोबाची वही घे व सोळा हजार मांड. अन्यायी कारभाऱ्याने शहाणपण केले. यावरुन धन्याने त्याची वाहवा केली; कारण या युगाचे लोक आपल्यासारख्यांविषयी प्रकाशाच्या लोकांपेक्षा शहाणे असतात.
लूक 16:1-8 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
येशूंनी आपल्या शिष्यांना सांगितले: “एक श्रीमंत मनुष्य होता, त्याचा कारभारी संपत्तीचा दुरुपयोग करतो असा आरोप त्याच्यावर होता. त्याच्या धन्याने त्याला बोलावून विचारले, ‘तुझ्याबद्दल मी हे काय ऐकत आहे? तू तुझ्या कारभाराचा हिशोब कर, कारण आता तू कारभारी म्हणून राहणार नाहीस.’ “त्या कारभार्याने मनाशी विचार केला, ‘आता मी काय करावे? माझे महाराज माझ्याकडून कारभार काढून घेत आहे! खड्डे खणण्याची तर माझ्यात ताकद नाही, भीक मागण्याची मला लाज वाटते— मला समजले आहे की मी काय करावे, म्हणजे मला कारभारावरून काढले, तरी लोक त्यांच्या घरांमध्ये माझे स्वागत करतील.’ “मग त्याने आपल्या धन्याच्या प्रत्येक कर्जदाराला बोलाविले. त्याने पहिल्यास विचारले, ‘माझ्या धन्याचे तुझ्यावर किती कर्ज आहे?’ “तो म्हणाला, ‘नऊशे बथ जैतुनाचे तेल.’ ” यावर कारभारी म्हणाला, “हा तुझा सहीचा करारनामा घे आणि तो फाडून टाक, व दुसरा करारनामा घेऊन त्यावर चारशे पन्नास आकडा मांड. “नंतर त्याने दुसर्याला विचारले, ‘तुझ्यावर किती कर्ज आहे?’ “ ‘एक हजार पोती गहू,’ तो म्हणाला. “त्याने त्याला सांगितले ‘हा तुझा करारनामा घे आणि त्यावर फक्त आठशे पोती लिही.’ “त्या लबाड कारभार्याची ही धूर्तता पाहून धन्याने त्याची वाहवा केली. या जगाचे लोक त्यांच्यासारख्यांशी व्यवहार करताना फार धूर्ततेने वागतात. प्रकाशाच्या लोकांना मात्र तसे वागता येत नाही.
लूक 16:1-8 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मग त्याने शिष्यांनाही म्हटले, “एक श्रीमंत मनुष्य होता व त्याचा एक कारभारी होता; त्याच्यावर, हा तुमची संपत्ती उडवतो, असा त्याच्याजवळ आरोप करण्यात आला. तेव्हा त्याने त्याला बोलावून म्हटले, ‘तुझ्याविषयी मी हे काय ऐकतो? तू आपल्या कारभाराचा हिशोब दे; कारण ह्यापुढे तुला कारभार पाहायचा नाही.’ मग कारभार्याने आपल्या मनात म्हटले, ‘माझा धनी माझ्यापासून कारभार काढून घेणार आहे, तर मी आता काय करू? खणण्याची मला शक्ती नाही; भीक मागण्याची लाज वाटते. तर कारभारावरून काढल्यावर लोकांनी मला आपल्या घरात घ्यावे म्हणून मी काय करावे हे आता मला सुचले.’ मग त्याने आपल्या धन्याच्या प्रत्येक देणेकर्यास बोलावले आणि पहिल्याला म्हटले, ‘माझ्या धन्याचे तुला किती देणे आहे?’ तो म्हणाला, ‘शंभर मण तेल.’ त्याने त्याला म्हटले, ‘हा तुझा रोखा घे आणि लवकर बसून ह्यावर पन्नास मांड.’ नंतर दुसर्याला म्हटले, ‘तुला किती देणे आहे?’ तो म्हणाला, ‘शंभर खंड्या गहू.’ तो त्याला म्हणाला, ‘हा तुझा रोखा घे व ऐंशी मांड.’ अन्यायी कारभार्याने शहाणपण केले. ह्यावरून धन्याने त्याची वाहवा केली; कारण ह्या युगाचे लोक आपल्या-सारख्यांविषयी प्रकाशाच्या लोकांपेक्षा शहाणे असतात.
लूक 16:1-8 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
नंतर येशूने आपल्या शिष्यांना एक दाखला सांगितला: ‘एक श्रीमंत मनुष्य होता व त्याचा एक व्यवस्थापक होता. हा व्यवस्थापक तुमच्या संपत्तीचा दुरुपयोग करतो, असा आरोप त्याच्या मालकाजवळ करण्यात आला. त्याने त्याला बोलावून म्हटले, ‘मी तुझ्याविषयी हे काय ऐकतो आहे? तू आपल्या कारभाराचा हिशेब दे, कारण ह्यापुढे तुला कारभार पाहायचा नाही.’ व्यवस्थापकाने आपल्या मनात म्हटले, ‘माझा धनी माझ्याकडून कारभार काढून घेणार आहे, तर मी आता काय करू? खणण्यासाठी मला शक्ती नाही, भीक मागण्याची मला लाज वाटते. तर कारभारावरून काढल्यावर लोकांनी मला त्यांच्या घरात घ्यावे म्हणून मी काय करावे, हे आत्ता मला कळते.’ त्याने आपल्या धन्याच्या कर्जदारांना बोलावले आणि पहिल्याला विचारले, ‘माझ्या धन्याकडून तू किती कर्ज घेतले आहे?’ तो म्हणाला, ‘शंभर मण तेल.’ त्याने त्याला म्हटले, ‘हा तुझा रोखा घे आणि लवकर बसून ह्यावर पन्नास लिही.’ दुसऱ्याला म्हटले, ‘तू किती परतफेड करायची आहे?’ तो म्हणाला, ‘एक हजार पोती गहू.’ तो त्याला म्हणाला, ‘हा तुझा रोखा घे व आठशे पोती लिही.’ अप्रामाणिक व्यवस्थापकाने चतुराई दाखवली. ह्यावरून धन्याने त्याची वाहवा केली; कारण ह्या युगाचे लोक त्यांच्या पिढीतल्या लोकांबरोबर व्यवहारात प्रकाशाच्या लोकांपेक्षा अधिक चतुर असतात.