YouVersion लोगो
सर्च आयकॉन

लूक 15:13-20

लूक 15:13-20 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

त्यानंतर काही दिवसानंतर लागलीच धाकट्या मुलाने आपले सर्व गोळा केले आणि तो दूरदेशी निघून गेला. तेथे त्याने त्याची सर्व संपत्ती चैनीत व मौजमजेचे जीवन जगून उधळून टाकली. त्याने सर्व पैसे खर्चून टाकले आणि मग त्या देशात भयंकर दुष्काळ पडला व त्यास गरज भासू लागली. त्या देशातील एका नागरिकाजवळ तो गेला आणि त्याचा आश्रय धरुन राहीला. त्या नागरीकाने त्यास आपल्या शेतात डुकरे चारावयास पाठवले. तेव्हा कोणी त्यास काहीही न दिल्याने, डुकरे ज्या शेंगा खातात त्या खाऊन तरी आपले पोट भरावे अशी त्यास फार इच्छा होई. नंतर तो शुद्धीवर आला व स्वतःशीच म्हणाला, माझ्या पित्याच्या घरी कितीतरी नोकरांना पुरुन उरेल इतके अन्न आहे आणि पाहा मी तर येथे भूकेने मरत आहे! आता, मी उठून आपल्या पित्याकडे जाईन आणि त्यास म्हणेन, बाबा, मी स्वर्गाविरुद्ध आणि तुमच्याविरुध्द पाप केले आहे. तुमचा मुलगा म्हणवून घेण्याच्या योग्यतेचा मी राहीलो नाही. मला आपल्या रोजंदारीवरील एखाद्या नोकरासारखे ठेवून घ्या. मग तो धाकटा मुलगा उठला व आपल्या पित्याकडे गेला. तो त्याच्या घरापासून दूर असतांनाच, त्याच्या पित्याने त्यास पाहिले आणि त्यास त्याचा कळवळा आला आणि धावत जाऊन त्याच्या गळ्यात पडला व त्याचे पुष्कळ मुके घेतले.

सामायिक करा
लूक 15 वाचा

लूक 15:13-20 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

“काही दिवस झाले नाही तोच, धाकट्या पुत्राने सर्वकाही जमा केले व दूर देशी निघून गेला तेथे आपला सर्व पैसा चैनबाजीत उधळून टाकला. सर्वकाही खर्च करून झाल्यानंतर, त्या संपूर्ण देशामध्ये कडक दुष्काळ पडला आणि त्याला गरज भासू लागली. तेव्हा तो गेला आणि स्वतःला मजुरीवर घेण्यासाठी त्या देशातील एका नागरिकाकडे गेला, त्याने त्याला त्याच्या शेतात डुकरे चारावयास पाठविले. शेवटी आपले पोट भरण्यासाठी, डुकरे खात असलेल्या शेंगा खाव्या असे त्याला वाटले, कारण त्याला कोणीच काही दिले नव्हते. “शेवटी तो शुद्धीवर आला आणि स्वतःशीच म्हणाला, ‘माझ्या बापाच्या घरी नोकर चाकरांनाही पुरून उरेल इतके अन्न असते, पण मी मात्र इकडे उपाशी मरत आहे. मी आता माझ्या बापाकडे जाईन आणि म्हणेन: बाबा, मी स्वर्गाविरुद्ध आणि तुमच्याविरुद्ध पाप केले आहे. आता तुमचा पुत्र म्हणवून घेण्‍यास लायक राहिलो नाही; मला एका चाकरांसारखे ठेवा.’ तेव्हा तो उठला आपल्या बापाकडे निघाला. “तो अजून दूर अंतरावर असतानाच वडिलांनी त्याला पाहिले आणि वडिलांचे हृदय कळवळले. ते धावत त्याच्याकडे गेले, त्याला मिठी मारून त्याचे चुंबन घेतले.

सामायिक करा
लूक 15 वाचा

लूक 15:13-20 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

मग फार दिवस झाले नाहीत तोच धाकटा मुलगा सर्वकाही जमा करून दूर देशी निघून गेला; आणि तेथे त्याने चैनबाजी करून आपली मालमत्ता उधळून टाकली. त्याने आपले सर्व खर्चून टाकल्यावर त्या देशात मोठा दुष्काळ पडला; तेव्हा त्याला अडचण पडू लागली. मग तो त्या देशातील एका रहिवाशाजवळ जाऊन त्याला चिकटून राहिला. त्याने त्याला आपल्या शेतांत डुकरे चारण्यास पाठवले. तेव्हा डुकरे खात असत त्यांतल्या शेंगा तरी खाऊन पोट भरावे अशी त्याला फार इच्छा होई; त्याला कोणी काही देत नसे. नंतर तो शुद्धीवर येऊन म्हणाला, ‘माझ्या बापाच्या कितीतरी मोलकर्‍यांना भाकरीची रेलचेल आहे! आणि मी तर येथे भुकेने मरतो आहे. मी उठून आपल्या बापाकडे जाईन व त्याला म्हणेन, बाबा, मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्याविरुद्ध पाप केले आहे; आता तुमचा मुलगा म्हणवून घ्यायला मी योग्य नाही; आपल्या एका मोलकर्‍याप्रमाणे मला ठेवा.’ मग तो उठून आपल्या बापाकडे गेला. तो दूर आहे तोच त्याच्या बापाने त्याला पाहिले. त्याला त्याचा कळवळा आला आणि धावत जाऊन त्याच्या गळ्यात गळा घालून त्याने त्याचे मुके घेतले.

सामायिक करा
लूक 15 वाचा

लूक 15:13-20 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

फार दिवस झाले नाहीत, तोच धाकटा मुलगा सर्व काही जमा करून दूर देशी निघून गेला, तेथे त्याने चैनबाजी करून आपली मालमत्ता उधळून टाकली. त्याने त्याच्याजवळ जे होते ते सर्व खर्च करून टाकल्यावर त्या देशात भीषण दुष्काळ पडला. त्याला अडचण भासू लागली. तो त्या देशातील एका रहिवाशाजवळ काम मागण्यासाठी गेला. त्याने त्याला आपल्या शेतात डुकरे चारायला पाठवले. डुकरे खात असत त्यातल्या शेंगा तरी खाऊन पोट भरावे, अशी त्याला फार इच्छा होई. कारण त्याला कोणी काही देत नसे. नंतर तो शुद्धीवर येऊन म्हणाला, ‘माझ्या वडिलांच्या किती तरी मोलकऱ्यांना अन्‍नाची रेलचेल आहे! आणि मी तर येथे भुकेने मरतो आहे. मी उठून माझ्या वडिलांकडे जाईन व त्यांना म्हणेन, बाबा, मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्याविरुद्ध पाप केले आहे. आता तुमचा मुलगा म्हणवून घेण्यास मी योग्य नाही. आपल्या एका मोलकऱ्याप्रमाणे मला ठेवा.’ तो उठून आपल्या वडिलांकडे गेला. तो दूर आहे तोच त्याच्या वडिलांनी त्याला पाहिले. त्यांना त्याचा कळवळा आला. धावत जाऊन त्याच्या गळ्यात गळा घालून त्यांनी त्याचे मुके घेतले.

सामायिक करा
लूक 15 वाचा