लूक 12:41-59
लूक 12:41-59 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग पेत्र म्हणाला, “प्रभू, तुम्ही हा दाखला आम्हासच सांगत आहात की सर्वांना?” तेव्हा प्रभू म्हणाला, “प्रभू त्याच्या इतर नोकरांना त्यांचे धान्य योग्यवेळी देण्यासाठी ज्याची नेमणूक करील असा व विश्वासू कारभारी कोण आहे? त्याचा मालक येईल त्यावेळी असे करतांना जो नोकर त्यास आढळेल तो धन्य. मी तुम्हास खरे सांगतो, मालक त्यास त्याच्या सर्व मालमत्तेवर अधिकारी म्हणून नेमील. पण जर तो नोकर मनात म्हणतो, ‘माझा मालक येण्यास फार उशीर करत आहे,’ आणि मग तो त्याच्या स्त्री व पुरूष नोकरांना मारहाण करायला व खाण्यापिण्यास सुरुवात करतो व झिंगतो, तर तो नोकर वाट पाहत नाही त्यादिवशी आणि त्यास माहीत नाही तेव्हा त्याचा मालक येईल व त्यास कापून त्याचे तुकडे करील आणि अविश्वासू लोकांबरोबर त्याचा वाटा ठेवील. आपल्या मालकाची इच्छा माहीत असूनही जो नोकर तयार राहत नाही किंवा जो आपल्या मालकाच्या इच्छेप्रमाणे करीत नाही, त्या नोकराला खूप मार मिळेल. परंतु ज्याला माहीती नव्हते म्हणून त्याने मालकाला न आवडणारे असे कृत्य जर नोकराने केले असेल तर त्यास कमी मार बसेल. ज्या कोणाला पुष्कळ दिले आहे त्याच्याकडून पुष्कळाची अपेक्षा केली जाईल. ज्यांच्याजवळ जास्त ठेवले आहे त्यांच्याकडून जास्त मागितले जाईल.” “मी पृथ्वीवर आग लावण्यास आलो आणि जर ती अगोदरच पेटलेली असेल तर मग मला आणखी काय पाहीजे? मला बाप्तिस्मा घ्यावयाचा आहे आणि तो होईपर्यंत मी किती अस्वस्थ आहे! मी पृथ्वीवर शांतता प्रस्थापित करण्यास आलो आहे, असे तुम्हास वाटते का? नाही, मी तुम्हास सांगतो, मी तुमच्यात फूट पाडण्यासाठी आलो आहे. मी असे म्हणतो कारण आतापासून घरातील पाच जणात एकमेकांविरुद्ध फूट पडेल. तिघे दोघांविरुद्ध व दोघे तिघांविरुद्ध अशी फूट पडेल. त्यांच्यात पित्याविरुद्ध मुलगा व मुलाविरुद्ध पिता अशी फूट पडेल, आईविरुद्ध मुलगी व मुलीविरुद्ध आई अशी फूट पडेल, सासूविरुद्ध सून व सुनेविरुद्ध सासू अशी त्यांच्यात फूट पडेल. तो लोकसमुदायाला म्हणाला, जेव्हा पश्चिमेकडून ढग येताना पाहता तेव्हा तुम्ही लगेच म्हणता की, पाऊस पडेल आणि तसेच घडते. जेव्हा दक्षिणेकडचा वारा वाहतो, तेव्हा तुम्ही म्हणता उकाडा होईल आणि तसेच घडते. अहो ढोंग्यांनो! तुम्हास पृथ्वीवरील व आकाशातील चिन्हांची लक्षणे पारखता येतात, पण सध्याच्या काळाचा अर्थ तुम्हास का काढता येत नाही काय? आणि तुम्ही तुमच्यासाठी काय योग्य आहे ते तुम्ही स्वतःचे स्वतःच का ठरवीत नाही? तुम्ही तुमच्या वाद्याबरोबर न्यायालयात जात असता वाटेतच त्यांच्याशी समेट करा नाही तर तो तुम्हास न्यायाधीशासमोर नेईल आणि न्यायाधीश तुम्हास दंडाधिकाऱ्याच्या स्वाधीन करील आणि अधिकारी तुम्हास तुरुंगात टाकील. मी तुम्हास सांगतो, अगदी शेवटली दमडी न दमडी फेडीपर्यंत तुम्ही तेथून सुटणारच नाही.”
लूक 12:41-59 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
पेत्राने विचारले, “प्रभुजी, तुम्ही हा दाखला आम्हाला उद्देशून सांगत आहात की सर्वांना?” यावर प्रभुजींनी उत्तर दिले, “प्रामाणिक व सुज्ञ असा कारभारी कोण ज्याला घरधनी सेवकांच्या अन्नाचे वेळेवर वाटप करण्याचे काम सोपवितो? धनी येईल, तेव्हा जो दास आपली कामगिरी बजावीत असताना त्याला आढळेल, तो धन्य होय. मी तुम्हाला निश्चित सांगतो की तो धनी आपल्या सर्व मालमत्तेवर त्याची नेमणूक करील. परंतु तो सेवक आपल्या मनात म्हणेल, ‘माझा धनी येण्यास पुष्कळ विलंब होत आहे,’ आणि तो सोबतीच्या दासांना व दासींना मारहाण करू लागेल आणि पिणार्यांबरोबर खाऊ आणि पिऊ लागेल. तर त्या दासाचा धनी, तो अपेक्षा करीत नाही त्या दिवशी आणि तो जाणत नाही त्या घटकेला येईल. तो त्या दासाला चाबकाने फोडून काढील व अविश्वासू लोकांबरोबर त्याला वाटा देईल. “मग त्या सेवकाला पुष्कळ फटके मारण्यात येतील, कारण धन्याची इच्छा माहीत असूनही त्याने तयारी केली नाही किंवा धन्याला जे पाहिजे ते केले नाही. परंतु ज्यांना माहीत नाही की त्यांनी शिक्षेस पात्र अशी कृत्ये केली आहेत त्यांना थोडेच फटके मारण्यात येतील. ज्या प्रत्येकाला भरपूर दिलेले आहे, त्याच्याकडून भरपूर मागणी केली जाईल आणि ज्याच्याकडे अधिक सोपविलेले आहे, त्याच्याकडून खूप अधिक मागण्यात येईल. “मी पृथ्वीवर आग आणली आहे, ती अगोदरच पेटली असती तर किती बरे झाले असते, मला एक बाप्तिस्मा घ्यावयाचा आहे. त्याची पूर्णता होईपर्यंत माझ्यावर कितीतरी दडपण आहे! मी जगाला शांती देण्यासाठी आलो आहे, असे तुम्हाला वाटते का? नाही, मी तर फूट पाडण्यासाठी आलो आहे. येथून पुढे एका कुटुंबात असलेल्या पाचजणांत एकमेकांविरुद्ध फूट पडेल, तिघांविरूद्ध दोघे आणि दोघांविरुद्ध तिघे असे होतील. ते विभागले जातील त्यांच्यामध्ये फूट पडेल, बापाविरुद्ध पुत्र आणि पुत्राविरुद्ध बाप, आईविरुद्ध कन्या आणि कन्येविरुद्ध आई, सासूविरुद्ध सून आणि सूनेविरुद्ध सासू.” ते लोकांना म्हणाले: “पश्चिमेकडे ढग जमलेले तुम्हाला दिसले, म्हणजे तुम्ही लगेच म्हणता, ‘आता पाऊस पडेल,’ आणि तो पडतो. आणि जेव्हा दक्षिणेकडील वारा वाहू लागतो, तेव्हा तुम्ही म्हणता, ‘आज उकडेल’ आणि तसे होते. ढोंगी जनहो! पृथ्वीवरील व आकाशात होणार्या बदलांचे अर्थ तुम्हाला कळतात, परंतु आताच्या काळाच्या चिन्हांचा अर्थ तुम्हाला का लावता येत नाही? “जे काही योग्य आहे, त्याविषयी तुम्हीच स्वतःसाठी न्याय का करीत नाही? ज्यावेळी तुम्ही शत्रूबरोबर न्यायालयात जाण्यापूर्वी एकत्रित असताना वाटेतच संबंध नीट करा, किंवा तुझा शत्रू तुला न्यायाधीशाकडे ओढून नेईल, न्यायाधीश अधिकार्याच्या हाती सोपवून देईल आणि अधिकारी तुम्हाला तुरुंगात टाकेल. मी तुम्हाला सांगतो, जोपर्यंत तुम्ही सर्व पैसे फेडणार नाही तोपर्यंत तुमची तुरुंगातून सुटका होणार नाही.”
लूक 12:41-59 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तेव्हा पेत्राने म्हटले, “प्रभूजी, हा दाखला आपण आम्हांलाच सांगता की सर्वांना?” तेव्हा प्रभू म्हणाला, “आपल्या परिवाराला योग्य वेळी शिधासामग्री द्यायला धनी ज्याला नेमील असा विश्वासू व विचारशील कारभारी कोण? त्याचा धनी येईल तेव्हा जो दास तसे करताना आढळेल तो धन्य. मी तुम्हांला खरे सांगतो की, त्याला तो आपल्या सर्वस्वावर नेमील. परंतु ‘आपला धनी येण्यास उशीर लागेल’ असे आपल्या मनात म्हणून तो दास चाकरांस व चाकरिणींस मारहाण करू लागेल, आणि खाऊनपिऊन मस्त होईल, तर तो वाट पाहत नाही अशा दिवशी व त्याला ठाऊक नाही अशा घटकेस त्याचा धनी येऊन त्याला कापून टाकील, आणि अविश्वासू लोकांबरोबर त्याचा वाटा नेमील. आपल्या धन्याची इच्छा काय आहे हे माहीत असता ज्या दासाने तयारी केली नाही किंवा त्याच्या इच्छेप्रमाणे केले नाही त्याला पुष्कळ फटके मिळतील, परंतु ज्याने फटके मिळण्याजोगी कृत्ये माहीत नसता केली त्याला थोडे मिळतील. ज्या कोणाला पुष्कळ दिले आहे त्याच्याजवळून पुष्कळ मागण्यात येईल, आणि ज्याच्याजवळ पुष्कळ ठेवले आहे त्याच्याजवळून पुष्कळच अधिक मागतील. मी पृथ्वीवर आग पेटवण्यास आलो आहे; ती आतापर्यंत पेटली असती तर किती बरे होते! मला बाप्तिस्मा घ्यायचा आहे व तो होईपर्यंत मी मोठ्या पेचात आहे. मी पृथ्वीवर शांतता करण्यास आलो आहे असे तुम्हांला वाटते काय? मी तुम्हांला सांगतो, नाही, तर फूट पाडण्यास; आतापासून एका घरातील पाच जणांत दोघांविरुद्ध तिघे व तिघांविरुद्ध दोघे अशी फूट पडेल. मुलाविरुद्ध बाप व ‘बापाविरुद्ध मुलगा,’ मुलीविरुद्ध आई व आईविरुद्ध मुलगी, ‘सुनेविरुद्ध सासू व सासूविरुद्ध सून’ अशी फूट पडेल.” आणखी तो लोकसमुदायांनाही म्हणाला, “जेव्हा तुम्ही ढग पश्चिमेकडून वर येताना पाहता तेव्हा तुम्ही लगेचच म्हणता, ‘पावसाची सर येत आहे,’ आणि तसे घडते. दक्षिणेचा वारा सुटतो तेव्हा ‘कडाक्याची उष्णता होईल,’ असे तुम्ही म्हणता आणि तसे घडते. अहो ढोंग्यांनो, तुम्हांला पृथ्वीवरील व आकाशातील लक्षणांचा अर्थ लावता येतो, तर ह्या काळाचा अर्थ तुम्ही का लावत नाही? आणखी जे यथार्थ आहे ते तुम्ही स्वतःच का ठरवत नाही? तू आपल्या वाद्याबरोबर अधिकार्याकडे जाताना वाटेतच त्याच्याशी तडजोड करण्याचा यत्न कर; नाहीतर कदाचित तो तुला न्यायाधीशाकडे ओढून नेईल; आणि न्यायाधीश तुला शिपायाच्या हाती देईल व शिपाई तुला तुरुंगात घालील. मी तुला सांगतो, अगदी शेवटली टोली फेडीपर्यंत तू तेथून सुटणारच नाहीस.”
लूक 12:41-59 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
पेत्राने म्हटले, “प्रभो, हा दाखला आपण आम्हांलाच सांगता की सर्वांना?” प्रभू म्हणाला, “आपल्या परिवारातील नोकरांना योग्य वेळी शिधासामग्री द्यायला धनी ज्याला नेमील, असा विश्वासू व विवेकी नोकर कोण? त्याचा धनी येईल, तेव्हा जो दास तसे करताना आढळेल तो धन्य. मी तुम्हांला खरे सांगतो की, त्याला तो आपल्या सर्वस्वावर नेमील. मात्र आपला धनी येण्यास उशीर लागेल, असे आपल्या मनात म्हणून तो दास चाकरांना व चाकरिणींना मारहाण करू लागेल आणि खाऊनपिऊन मस्त होईल, तर तो अपेक्षा करत नाही अशा दिवशी व त्याला ठाऊक नाही अशा घटकेस त्या नोकराचा धनी येऊन त्याला कठोर शिक्षा करील आणि त्याची गणती अविश्वासू लोकांमध्ये करण्यात येईल. आपल्या धन्याची इच्छा काय आहे, हे माहीत असता ज्या नोकराने तयारी केली नाही किंवा त्याच्या इच्छेप्रमाणे केले नाही, त्याला पुष्कळ फटके मिळतील. परंतु ज्याने फटके मिळण्याजोगी कृत्ये माहीत नसता केली, त्याला कमी शिक्षा मिळेल. ज्या कोणाला पुष्कळ दिले आहे, त्याच्याकडून पुष्कळ मागण्यात येईल आणि ज्याच्या स्वाधीन भरपूर केले आहे त्याच्याकडून अजूनही जास्त मागण्यात येईल. मी पृथ्वीवर आग पेटवायला आलो आहे. ती आत्तापर्यंत पेटली असती तर किती बरे झाले असते! मला बाप्तिस्मा घ्यायचा आहे व तो पूर्ण होईपर्यंत मी तणावाखाली आहे! मी पृथ्वीवर शांती प्रस्थापित करण्यास आलो आहे, असे तुम्हांला वाटते काय? मी तुम्हांला सांगतो, नाही, मी तर फूट पाडायला आलो आहे. आत्तापासून एका कुटुंबातील पाच जणांत दोघांविरुद्ध तिघे व तिघांविरुद्ध दोघे अशी फूट पडेल. मुलांविरुद्ध वडील व वडिलांविरुद्ध मुलगा, मुलीविरुद्ध आई व आईविरुद्ध मुलगी, सुनेविरुद्ध सासू व सासूविरुद्ध सून अशी फूट पडेल.” तो लोकसमुदायालाही म्हणाला, “जेव्हा तुम्ही ढग पश्चिमेकडून वर येताना पाहता, तेव्हा तुम्ही लगेच म्हणता, ‘पावसाची सर येणार’ आणि तसे घडते. दक्षिणेचा वारा सुटतो तेव्हा तुम्ही म्हणता, ‘कडाक्याची उष्णता होईल’ आणि तसे घडते. अहो ढोंग्यांनो, तुम्हांला पृथ्वीवरील व आकाशातील लक्षणांचा अर्थ लावता येतो, तर ह्या काळाचा अर्थ तुम्ही का लावत नाही? तसेच उचित काय आहे, हे तुमचे तुम्ही का ठरवत नाही? जर तुझा वादी तुला न्यायालयात नेत असेल, तर वाटेतच त्याच्याशी समेट करायचा प्रयत्न कर, अन्यथा कदाचित तो तुला न्यायाधीशाकडे ओढून नेईल. न्यायाधीश तुला अधिकाऱ्याच्या हाती देईल व तो तुला तुरुंगात टाकेल. मी तुला सांगतो, अगदी पैसा अन् पैसा फेडीपर्यंत तुझी तेथून मुळीच सुटका होणार नाही.”