YouVersion लोगो
सर्च आयकॉन

लूक 12:35-40

लूक 12:35-40 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

तुमच्या कंबरा बांधलेल्या आणि दिवे लागलेले असू द्या. लग्नाच्या मेजवानीवरुन परतणाऱ्या मालकाची वाट पाहणाऱ्या लोकांसारखे व्हा जेणेकरून, तो परत येतो व दरवाजा ठोकावतो तेव्हा त्याच्यासाठी त्यांनी ताबडतोब दरवाजा उघडावा. मालक परत आल्यावर जे नोकर त्यास जागे व तयारीत असलेले आढळतील ते धन्य. मी तुम्हास खरे सांगतो, तो स्वतः त्यांची सेवा करण्यासाठी कंबर कसेल, त्यांना मेजावर बसायला सांगून त्यांची सेवा करील. तो मध्यरात्री किंवा त्यानंतर येवो, जर ते नोकर त्यास तयारीत आढळतील तर ते धन्य. परंतु याविषयी खात्री बाळगा; चोर केव्हा येणार हे जर घराच्या मालकाला माहीत असते तर त्याने आपले घर त्यास फोडू दिले नसते. तुम्हीही तयार असा कारण तुम्हास वाटत नाही अश्या क्षणी? मनुष्याचा पुत्र येईल.”

सामायिक करा
लूक 12 वाचा

लूक 12:35-40 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

“तुम्ही सेवेसाठी सज्ज व्हा व आपले दिवे जळत राहू द्या, अशा सेवकांसारखे असावे की, जे त्यांचा धनी लग्नाच्या मेजवानीवरून परत येईल म्हणून वाट पाहत आहेत, यासाठी की जेव्हा तो येतो आणि दार ठोठावतो त्याक्षणीच त्याच्यासाठी दार उघडावे. त्या सेवकांसाठी हे फारच चांगले असेल की, त्यांचा धनी येतो, तेव्हा ते जागे आहेत असे त्याला दिसून येते. मी तुम्हाला निश्चित सांगतो, तो धनी स्वतः त्यांची सेवा करण्यासाठी वस्त्रे घालेल आणि त्यांना मेजाभोवती मागे टेकून बसावयास सांगेल आणि तो येईल आणि त्यांना जेवण वाढेल. तो मध्यरात्री येवो किंवा पहाटे, पण एवढे मात्र निश्चित की तो केव्हाही आला, तरी त्याची वाट पाहत तयारीत असणार्‍या सेवकांना फार मोठा आशीर्वाद प्राप्त होईल. पण एक गोष्ट नीट समजून घ्या की चोर केव्हा येणार आहे हे घरधन्याला अगोदरच समजले असते, तर तो जागा राहिला असता आणि त्याने चोराला घर फोडू दिले नसते. म्हणून तुम्ही सदैव तयारीत राहा. कारण मानवपुत्र तुम्हाला कल्पना नसेल अशा घटकेला येईल.”

सामायिक करा
लूक 12 वाचा

लूक 12:35-40 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

तुमच्या कंबरा बांधलेल्या व दिवे लावलेले असू द्या; आणि धनी लग्नाहून येऊन दार ठोकील तेव्हा आपण त्याच्यासाठी तत्काळ उघडावे म्हणून, तो परत येण्याची वाट पाहत असलेल्या माणसांसारखे तुम्ही व्हा. आणि धनी आल्यावर जे दास जागृत असलेले त्याला आढळतील ते धन्य; मी तुम्हांला खचीत सांगतो की, तो आपली कंबर बांधून त्यांना जेवायला बसवील आणि येऊन त्यांची सेवा करील. तो रात्रीच्या दुसर्‍या किंवा तिसर्‍या प्रहरी येईल तेव्हा ते त्याला असे आढळतील तर ते धन्य आहेत. आणखी हे लक्षात घ्या की, अमक्या घटकेस चोर येईल हे घरधन्याला कळले असते तर तो जागा राहिला असता व त्याने आपले घर फोडू दिले नसते. तुम्हीही सिद्ध असा, कारण तुम्हांला वाटणार नाही त्या घटकेस मनुष्याचा पुत्र येईल.”

सामायिक करा
लूक 12 वाचा

लूक 12:35-40 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

लग्नाहून परत येणाऱ्या धन्याची वाट पाहत असलेल्या नोकरांप्रमाणे तुमच्या कंबरा कसलेल्या व दिवे लावलेले असू द्या म्हणजे तो येऊन दार ठोठावील, तेव्हा तुम्ही त्याच्यासाठी तत्काळ दार उघडावे. धनी आल्यावर जे दास जागृत असलेले त्याला आढळतील ते धन्य. मी तुम्हांला खातरी पूर्वक सांगतो की, तो आपली कंबर कसून त्यांना जेवायला बसवील आणि येऊन त्यांची सेवा करील. तो मध्यरात्रीच्या सुमारास किंवा त्याहून उशीरा येईल तेव्हा ते त्याला असे आढळतील तर ते धन्य आहेत. आणखी हे लक्षात घ्या की, अमक्या घटकेस चोर येईल, हे घरधन्याला माहीत असते, तर त्याने आपले घर फोडू दिले नसते. तुम्हीही तयार राहा कारण तुमची अपेक्षा नाही अशा घटकेस मनुष्याचा पुत्र येईल.”

सामायिक करा
लूक 12 वाचा