लूक 12:28-38
लूक 12:28-38 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तर, जे आज आहे व उद्या भट्टीत टाकले जाईल अशा त्या रानातील गवताला देवाने असा पोशाख घातला आहे, तर तुम्ही जे अल्पविश्वासू त्या तुम्हास तो कितीतरी अधिक चांगला पोशाख घालणार नाही काय! तुम्ही काय खावे व काय प्यावे याविषयी काळजीत असू नका आणि या गोष्टींविषयी चिंता करू नका. कारण परराष्ट्री हे मिळविण्याची खटपट करतात पण या गोष्टींची तुम्हास गरज आहे, हे तुमच्या स्वर्गीय पित्याला माहीत आहे. त्याऐवजी प्रथम त्याचे राज्य मिळविण्यासाठी झटा म्हणजे या गोष्टीही तुम्हास दिल्या जातील. हे लहान कळपा भिऊ नको, कारण तुम्हास त्याचे राज्य द्यावे यामध्ये स्वर्गीय पित्याला संतोष वाटतो. तुमची मालमत्ता विका आणि गरिबांमध्ये वाटा. जुन्या न होणाऱ्या व न झिजणाऱ्या अशा थैल्या स्वतःसाठी स्वर्गात बनवा. तेथे चोरही जाऊ शकणार नाही व कसरही त्याचा नाश करणार नाही. कारण जेथे तुमचे धन आहे तेथे तुमचे मनही लागेल. तुमच्या कंबरा बांधलेल्या आणि दिवे लागलेले असू द्या. लग्नाच्या मेजवानीवरुन परतणाऱ्या मालकाची वाट पाहणाऱ्या लोकांसारखे व्हा जेणेकरून, तो परत येतो व दरवाजा ठोकावतो तेव्हा त्याच्यासाठी त्यांनी ताबडतोब दरवाजा उघडावा. मालक परत आल्यावर जे नोकर त्यास जागे व तयारीत असलेले आढळतील ते धन्य. मी तुम्हास खरे सांगतो, तो स्वतः त्यांची सेवा करण्यासाठी कंबर कसेल, त्यांना मेजावर बसायला सांगून त्यांची सेवा करील. तो मध्यरात्री किंवा त्यानंतर येवो, जर ते नोकर त्यास तयारीत आढळतील तर ते धन्य.
लूक 12:28-38 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
जे आज आहे आणि उद्या आगीत टाकले जाते, त्या गवताला जर परमेश्वर असा पोशाख घालतात, तर अहो अल्पविश्वासी, ते तुम्हाला किती विशेषकरून पोशाख घालतील? तसेच, काय खावे, काय प्यावे याविषयी आपल्या मनात मुळीच काळजी करू नका. कारण जगीक लोक या गोष्टी मिळविण्याचा कसोशीने प्रयत्न करतात, पण तुमच्या स्वर्गीय पित्याला तुमच्या गरजा माहीत आहेत. परंतु तुम्ही त्यांचे राज्य मिळविण्यासाठी झटा म्हणजे या सर्व गोष्टीही तुम्हाला प्राप्त होतील. “हे लहान कळपा, तू भिऊ नकोस कारण तुम्हाला राज्य देण्यास पित्याला आनंद होतो. तुमची मालमत्ता विका आणि गरीबांना द्या. कधीही जीर्ण होणार नाही अशा थैल्या घ्या, वर स्वर्गामध्ये नष्ट न होणारा खजिना ठेवा, जिथे कोणी चोर येणार नाही की त्याला कसरही लागणार नाही. कारण जेथे तुमची संपत्ती आहे, तेथे तुमचे मनही असेल. “तुम्ही सेवेसाठी सज्ज व्हा व आपले दिवे जळत राहू द्या, अशा सेवकांसारखे असावे की, जे त्यांचा धनी लग्नाच्या मेजवानीवरून परत येईल म्हणून वाट पाहत आहेत, यासाठी की जेव्हा तो येतो आणि दार ठोठावतो त्याक्षणीच त्याच्यासाठी दार उघडावे. त्या सेवकांसाठी हे फारच चांगले असेल की, त्यांचा धनी येतो, तेव्हा ते जागे आहेत असे त्याला दिसून येते. मी तुम्हाला निश्चित सांगतो, तो धनी स्वतः त्यांची सेवा करण्यासाठी वस्त्रे घालेल आणि त्यांना मेजाभोवती मागे टेकून बसावयास सांगेल आणि तो येईल आणि त्यांना जेवण वाढेल. तो मध्यरात्री येवो किंवा पहाटे, पण एवढे मात्र निश्चित की तो केव्हाही आला, तरी त्याची वाट पाहत तयारीत असणार्या सेवकांना फार मोठा आशीर्वाद प्राप्त होईल.
लूक 12:28-38 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
जे गवत रानात आज आहे व उद्या भट्टीत टाकले जाते त्याला जर देव असा पोशाख घालतो, तर अहो अल्पविश्वासी जनहो, तो तुम्हांला किती विशेषेकरून पोशाख घालील! तसेच काय खावे किंवा काय प्यावे ह्याच्यामागे लागू नका अथवा मनात अस्वस्थ राहू नका. कारण जगातील राष्ट्रे ह्या सर्व गोष्टी मिळवण्याची धडपड करतात; परंतु तुम्हांला त्यांची गरज आहे हे तुमच्या पित्याला ठाऊक आहे; तर तुम्ही त्याचे राज्य मिळवण्यास झटा, म्हणजे त्याबरोबर ह्याही गोष्टी तुम्हांला मिळतील. हे लहान कळपा, भिऊ नकोस; कारण तुम्हांला ते राज्य द्यावे हे तुमच्या पित्याला बरे वाटले आहे. जे तुमचे आहे ते विकून दानधर्म करा; तसेच स्वर्गातील अक्षय धनाच्या जीर्ण न होणार्या थैल्या आपणांसाठी करून ठेवा; तेथे चोर येत नाही व कसर लागत नाही. कारण जेथे तुमचे धन आहे तेथे तुमचे मनही लागेल. तुमच्या कंबरा बांधलेल्या व दिवे लावलेले असू द्या; आणि धनी लग्नाहून येऊन दार ठोकील तेव्हा आपण त्याच्यासाठी तत्काळ उघडावे म्हणून, तो परत येण्याची वाट पाहत असलेल्या माणसांसारखे तुम्ही व्हा. आणि धनी आल्यावर जे दास जागृत असलेले त्याला आढळतील ते धन्य; मी तुम्हांला खचीत सांगतो की, तो आपली कंबर बांधून त्यांना जेवायला बसवील आणि येऊन त्यांची सेवा करील. तो रात्रीच्या दुसर्या किंवा तिसर्या प्रहरी येईल तेव्हा ते त्याला असे आढळतील तर ते धन्य आहेत.
लूक 12:28-38 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
जे गवत रानात आज आहे व उद्या भट्टीत टाकले जाते त्याला जर देव असा पोषाख घालतो, तर अहो, अल्पविश्वासी जनहो, तो किती विशेषकरून तुमची काळजी घेईल? तसेच काय खावे, काय प्यावे, ह्याच्यामागे लागू नका अथवा मनात अस्वस्थ होऊ नका. जगातील परराष्ट्रीय लोक ह्या सर्व गोष्टी मिळवण्याची धडपड करतात परंतु तुम्हांला त्यांची गरज आहे, हे तुमच्या पित्याला ठाऊक आहे. उलट, तुम्ही त्याचे राज्य मिळवण्यास झटा म्हणजे ह्या गोष्टी तुम्हांला मिळतील. हे लहान कळपा, भिऊ नकोस. तुम्हांला देवराज्य द्यावे, हे तुमच्या पित्याला उचित वाटले आहे. जे तुमचे आहे, ते विकून दानधर्म करा. जीर्ण न होणाऱ्या थैल्यांमध्ये आपणासाठी स्वर्गात अक्षय धन साठवून ठेवा. तेथे चोर येत नाहीत व कसर लागत नाही. अर्थात, जेथे तुमचे धन आहे, तेथे तुमचे मनही लागेल. लग्नाहून परत येणाऱ्या धन्याची वाट पाहत असलेल्या नोकरांप्रमाणे तुमच्या कंबरा कसलेल्या व दिवे लावलेले असू द्या म्हणजे तो येऊन दार ठोठावील, तेव्हा तुम्ही त्याच्यासाठी तत्काळ दार उघडावे. धनी आल्यावर जे दास जागृत असलेले त्याला आढळतील ते धन्य. मी तुम्हांला खातरी पूर्वक सांगतो की, तो आपली कंबर कसून त्यांना जेवायला बसवील आणि येऊन त्यांची सेवा करील. तो मध्यरात्रीच्या सुमारास किंवा त्याहून उशीरा येईल तेव्हा ते त्याला असे आढळतील तर ते धन्य आहेत.