लूक 12:19-32
लूक 12:19-32 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आणि मी माझ्या जीवाला म्हणेन, ‘हे जीवा, आता तुझ्यासाठी अनेक वर्षे पुरतील अशा पुष्कळ चांगल्या गोष्टी साठवून ठेवलेल्या आहेत. आराम कर, खा, पी आणि मजा कर.’ पण देव त्यास म्हणतो, ‘अरे मूर्खा, जर आज तुझा जीव गेला तर तू साठवलेल्या गोष्टी कोणाला मिळतील?’ जो कोणी स्वतःसाठी संपत्ती जमा करतो परंतु देवाच्या दृष्टीने जो धनवान नाही, अशा मनुष्यासारखे हे आहे.” मग येशू त्याच्या शिष्यांना म्हणाला, “म्हणून मी तुम्हास सांगतो, स्वतःच्या जीवनाविषयी किंवा तुम्ही काय खावे याविषयी चिंता करू नका. किंवा तुमच्या शरीराविषयी म्हणजे कोणते कपडे घालावेत याविषयी चिंता करू नका. कारण अन्नापेक्षा जीव आणि कपड्यांपेक्षा शरीर महत्त्वाचे आहे. कावळ्यांचा विचार करा ते पेरीत नाहीत व कापणीही करीत नाहीत. त्यांना कोठार नाही व कणगीही नाही. तरीही देव त्याचे पोषण करतो. पक्ष्यांपेक्षा तुम्ही कितीतरी मौल्यवान आहात! चिंता करून तुम्हापैकी कोण स्वतःच्या आयुष्याची दोरी हातभर वाढवावयास कोण समर्थ आहे? ज्याअर्थी तुम्हीही सर्वात लहान गोष्ट करू शकत नाही, तर इतर गोष्टींविषयीची चिंता का करता? रानफुले कशी वाढतात याचा विचार करा. ती कष्ट करीत नाहीत व कातीत नाहीत. तरी मी तुम्हास सांगतो, शलमोनदेखील आपल्या सर्व वैभवात त्यांच्यातील एकासारखाही सजला नव्हता. तर, जे आज आहे व उद्या भट्टीत टाकले जाईल अशा त्या रानातील गवताला देवाने असा पोशाख घातला आहे, तर तुम्ही जे अल्पविश्वासू त्या तुम्हास तो कितीतरी अधिक चांगला पोशाख घालणार नाही काय! तुम्ही काय खावे व काय प्यावे याविषयी काळजीत असू नका आणि या गोष्टींविषयी चिंता करू नका. कारण परराष्ट्री हे मिळविण्याची खटपट करतात पण या गोष्टींची तुम्हास गरज आहे, हे तुमच्या स्वर्गीय पित्याला माहीत आहे. त्याऐवजी प्रथम त्याचे राज्य मिळविण्यासाठी झटा म्हणजे या गोष्टीही तुम्हास दिल्या जातील. हे लहान कळपा भिऊ नको, कारण तुम्हास त्याचे राज्य द्यावे यामध्ये स्वर्गीय पित्याला संतोष वाटतो.
लूक 12:19-32 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
आणि मी स्वतःस म्हणेन, “पुढे अनेक वर्षे पुरेल एवढ्या धान्यांचा तुझ्याकडे साठा आहे. आता विसावा घे; खा, पी आणि आनंद कर.” ’ “पण परमेश्वर त्याला म्हणाले, ‘अरे मूर्खा! आज रात्रीच जर तुझा जीव मागितला गेला तर; जे सर्व तू स्वतःसाठी तयार केले आहे ते कोणाचे होईल?’ “परमेश्वराच्या मोलवान आशीर्वादांची संपत्ती मिळविण्याऐवजी, जो मनुष्य स्वतःसाठी द्रव्याचा नुसता संचय करतो, त्याचीही अशीच गत होणार आहे.” तेव्हा येशू त्यांच्या शिष्यांना म्हणाले: “मी तुम्हाला सांगतो, तुम्ही काय खावे अशी तुमच्या जिवाबद्दल किंवा तुम्ही काय पांघरावे अशी तुमच्या शरीराबद्दल, चिंता करू नका. अन्नापेक्षा जीव आणि वस्त्रांपेक्षा शरीर अधिक महत्वाचे नाही काय? कावळ्यांचा विचार करा; ते धान्य पेरीत नाही, कापणी करीत नाही, त्यांच्याकडे कोठार वा भांडार नसते, तरीही परमेश्वर त्यांना खाऊ घालतात आणि तुम्ही तर पक्ष्यांपेक्षा कितीतरी अधिक मोलवान आहात! शिवाय काळजी करून आयुष्यातील एक तास तरी कोणास वाढविता येईल काय? तुम्ही साध्या गोष्टी देखील करू शकत नाही तर इतर गोष्टीबद्दल काळजी का करता? “रानातील फुले कशी वाढतात, याचा विचार करा. ती कष्ट करीत नाहीत किंवा सूतही कातीत नाहीत. तरी मी तुम्हाला सांगतो की शलमोन देखील आपल्या सर्व वैभवात त्यांच्याइतका नटला नव्हता. जे आज आहे आणि उद्या आगीत टाकले जाते, त्या गवताला जर परमेश्वर असा पोशाख घालतात, तर अहो अल्पविश्वासी, ते तुम्हाला किती विशेषकरून पोशाख घालतील? तसेच, काय खावे, काय प्यावे याविषयी आपल्या मनात मुळीच काळजी करू नका. कारण जगीक लोक या गोष्टी मिळविण्याचा कसोशीने प्रयत्न करतात, पण तुमच्या स्वर्गीय पित्याला तुमच्या गरजा माहीत आहेत. परंतु तुम्ही त्यांचे राज्य मिळविण्यासाठी झटा म्हणजे या सर्व गोष्टीही तुम्हाला प्राप्त होतील. “हे लहान कळपा, तू भिऊ नकोस कारण तुम्हाला राज्य देण्यास पित्याला आनंद होतो.
लूक 12:19-32 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मग मी आपल्या जिवाला म्हणेन, हे जिवा, तुला पुष्कळ वर्षे पुरेल इतका माल ठेवलेला आहे; विसावा घे, खा, पी, आनंद कर.’ परंतु देवाने त्याला म्हटले, ‘अरे मूर्खा, आज रात्री तुझा जीव मागितला जाईल, मग जे काही तू सिद्ध केले आहेस, ते कोणाचे होईल?’ जो कोणी स्वतःसाठी द्रव्यसंचय करतो व देवविषयक बाबतीत धनवान नाही, तो तसाच आहे.” तेव्हा त्याने आपल्या शिष्यांना म्हटले, “म्हणून मी तुम्हांला सांगतो, आपण काय खावे अशी आपल्या जिवाची, अथवा आपण काय पांघरावे अशी आपल्या शरीराची चिंता करत बसू नका. कारण अन्नापेक्षा जीव आणि वस्त्रापेक्षा शरीर अधिक आहे. कावळ्यांचा विचार करा; ते पेरत नाहीत व कापणीही करत नाहीत; त्यांना कणगी नाही व कोठारही नाही; तरी देव त्यांचे पोषण करतो; पाखरांपेक्षा तुम्ही कितीतरी श्रेष्ठ आहात! तसेच चिंता करून आपल्या आयुष्याची दोरी हातभर वाढवण्यास तुमच्यामध्ये कोण समर्थ आहे? म्हणून अति लहान गोष्टदेखील जर तुमच्याने होत नाही तर इतर गोष्टींविषयी का चिंता करत बसता? फुले कशी वाढतात ह्याचा विचार करा; ती कष्ट करत नाहीत व कातत नाहीत; तरी मी तुम्हांला सांगतो, शलमोनदेखील आपल्या सर्व वैभवात त्यांतल्या एकासारखाही सजला नव्हता. जे गवत रानात आज आहे व उद्या भट्टीत टाकले जाते त्याला जर देव असा पोशाख घालतो, तर अहो अल्पविश्वासी जनहो, तो तुम्हांला किती विशेषेकरून पोशाख घालील! तसेच काय खावे किंवा काय प्यावे ह्याच्यामागे लागू नका अथवा मनात अस्वस्थ राहू नका. कारण जगातील राष्ट्रे ह्या सर्व गोष्टी मिळवण्याची धडपड करतात; परंतु तुम्हांला त्यांची गरज आहे हे तुमच्या पित्याला ठाऊक आहे; तर तुम्ही त्याचे राज्य मिळवण्यास झटा, म्हणजे त्याबरोबर ह्याही गोष्टी तुम्हांला मिळतील. हे लहान कळपा, भिऊ नकोस; कारण तुम्हांला ते राज्य द्यावे हे तुमच्या पित्याला बरे वाटले आहे.
लूक 12:19-32 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
आणि मग मी स्वतःला म्हणेन, तुला पुष्कळ वर्षे पुरेल इतका भरपूर माल साठवलेला आहे. विसावा घे, खा, पी, मजा कर.’ परंतु देवाने त्याला म्हटले, ‘अरे मूर्खा, आज रात्री तुझा जीव मागितला जाईल. मग जे काही तू जमवून ठेवले आहे, ते कोणाचे होईल?’ जो कोणी स्वतःसाठी द्रव्यसंचय करतो, परंतु देवाच्या दृष्टीने धनवान नाही त्याचे असेच आहे.” त्याने आपल्या शिष्यांना म्हटले, “मी तुम्हांला सांगतो, उदरनिर्वाहासाठी ज्या अन्नाची तुम्हांला गरज आहे, त्याची वा शरीरासाठी ज्या कपड्यांची तुम्हांला आवश्यकता आहे, त्यांची चिंता करत बसू नका. अन्नापेक्षा जीव आणि वस्त्रांपेक्षा शरीर अधिक महत्त्वाचे आहेत. कावळ्यांचे निरीक्षण करा. ते पेरत नाहीत व कापणीही करीत नाहीत, त्यांचा कणगा नसतो व कोठारही नसते, तरी देव त्यांचे पोषण करतो. पक्ष्यांपेक्षा तुम्ही कितीतरी श्रेष्ठ आहात! आणि चिंता करून आपले आयुष्य थोडेफार वाढवायला तुमच्यामध्ये कोण समर्थ आहे? अशी ही अगदी छोटी गोष्टदेखील जर तुम्हांला जमत नाही, तर इतर गोष्टीविषयी का चिंता करत बसता? रानफुले कशी वाढतात, ह्याचा विचार करा. ती कष्ट करीत नाहीत व कातीत नाहीत, तरी मी तुम्हांला सांगतो, शलमोनदेखील त्याच्या सर्व वैभवात त्यांतल्या एकासारखा सजला नव्हता. जे गवत रानात आज आहे व उद्या भट्टीत टाकले जाते त्याला जर देव असा पोषाख घालतो, तर अहो, अल्पविश्वासी जनहो, तो किती विशेषकरून तुमची काळजी घेईल? तसेच काय खावे, काय प्यावे, ह्याच्यामागे लागू नका अथवा मनात अस्वस्थ होऊ नका. जगातील परराष्ट्रीय लोक ह्या सर्व गोष्टी मिळवण्याची धडपड करतात परंतु तुम्हांला त्यांची गरज आहे, हे तुमच्या पित्याला ठाऊक आहे. उलट, तुम्ही त्याचे राज्य मिळवण्यास झटा म्हणजे ह्या गोष्टी तुम्हांला मिळतील. हे लहान कळपा, भिऊ नकोस. तुम्हांला देवराज्य द्यावे, हे तुमच्या पित्याला उचित वाटले आहे.