लूक 12:13-48
लूक 12:13-48 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
नंतर लोकसमुदायातील एकजण त्यास म्हणाला, “गुरुजी, माझ्या भावाला वतन विभागून माझे मला द्यायला सांगा!” परंतु येशू त्यास म्हणाला, “मनुष्या, मला तुमच्यावर मध्यस्थ किंवा न्यायाधीश म्हणून कोणी नेमले?” मग येशू त्यांना म्हणाला, “सांभाळा आणि सर्व प्रकारच्या लोभापासून स्वतःला दूर ठेवा कारण जेव्हा एखाद्या मनुष्याजवळ त्याच्या गरजेपेक्षा अधिक असते तेव्हा ती संपत्ती त्याचे जीवन होत असे नाही.” नंतर त्याने त्यास एक दाखला सांगितला, “कोणाएका धनवान मनुष्याच्या शेतजमिनीत फार उत्तम पीक आले. तो स्वतःशी विचार करून असे म्हणाला, ‘मी काय करू, कारण धान्य साठवायला माझ्याकडे जागा नाही?’ मग तो असे म्हणाला, ‘मी आता असे करतो, मी माझी धान्याची कोठारे पाडून मोठी बांधीतो, मी माझे सर्व धान्य व माल तेथे साठवीन’ आणि मी माझ्या जीवाला म्हणेन, ‘हे जीवा, आता तुझ्यासाठी अनेक वर्षे पुरतील अशा पुष्कळ चांगल्या गोष्टी साठवून ठेवलेल्या आहेत. आराम कर, खा, पी आणि मजा कर.’ पण देव त्यास म्हणतो, ‘अरे मूर्खा, जर आज तुझा जीव गेला तर तू साठवलेल्या गोष्टी कोणाला मिळतील?’ जो कोणी स्वतःसाठी संपत्ती जमा करतो परंतु देवाच्या दृष्टीने जो धनवान नाही, अशा मनुष्यासारखे हे आहे.” मग येशू त्याच्या शिष्यांना म्हणाला, “म्हणून मी तुम्हास सांगतो, स्वतःच्या जीवनाविषयी किंवा तुम्ही काय खावे याविषयी चिंता करू नका. किंवा तुमच्या शरीराविषयी म्हणजे कोणते कपडे घालावेत याविषयी चिंता करू नका. कारण अन्नापेक्षा जीव आणि कपड्यांपेक्षा शरीर महत्त्वाचे आहे. कावळ्यांचा विचार करा ते पेरीत नाहीत व कापणीही करीत नाहीत. त्यांना कोठार नाही व कणगीही नाही. तरीही देव त्याचे पोषण करतो. पक्ष्यांपेक्षा तुम्ही कितीतरी मौल्यवान आहात! चिंता करून तुम्हापैकी कोण स्वतःच्या आयुष्याची दोरी हातभर वाढवावयास कोण समर्थ आहे? ज्याअर्थी तुम्हीही सर्वात लहान गोष्ट करू शकत नाही, तर इतर गोष्टींविषयीची चिंता का करता? रानफुले कशी वाढतात याचा विचार करा. ती कष्ट करीत नाहीत व कातीत नाहीत. तरी मी तुम्हास सांगतो, शलमोनदेखील आपल्या सर्व वैभवात त्यांच्यातील एकासारखाही सजला नव्हता. तर, जे आज आहे व उद्या भट्टीत टाकले जाईल अशा त्या रानातील गवताला देवाने असा पोशाख घातला आहे, तर तुम्ही जे अल्पविश्वासू त्या तुम्हास तो कितीतरी अधिक चांगला पोशाख घालणार नाही काय! तुम्ही काय खावे व काय प्यावे याविषयी काळजीत असू नका आणि या गोष्टींविषयी चिंता करू नका. कारण परराष्ट्री हे मिळविण्याची खटपट करतात पण या गोष्टींची तुम्हास गरज आहे, हे तुमच्या स्वर्गीय पित्याला माहीत आहे. त्याऐवजी प्रथम त्याचे राज्य मिळविण्यासाठी झटा म्हणजे या गोष्टीही तुम्हास दिल्या जातील. हे लहान कळपा भिऊ नको, कारण तुम्हास त्याचे राज्य द्यावे यामध्ये स्वर्गीय पित्याला संतोष वाटतो. तुमची मालमत्ता विका आणि गरिबांमध्ये वाटा. जुन्या न होणाऱ्या व न झिजणाऱ्या अशा थैल्या स्वतःसाठी स्वर्गात बनवा. तेथे चोरही जाऊ शकणार नाही व कसरही त्याचा नाश करणार नाही. कारण जेथे तुमचे धन आहे तेथे तुमचे मनही लागेल. तुमच्या कंबरा बांधलेल्या आणि दिवे लागलेले असू द्या. लग्नाच्या मेजवानीवरुन परतणाऱ्या मालकाची वाट पाहणाऱ्या लोकांसारखे व्हा जेणेकरून, तो परत येतो व दरवाजा ठोकावतो तेव्हा त्याच्यासाठी त्यांनी ताबडतोब दरवाजा उघडावा. मालक परत आल्यावर जे नोकर त्यास जागे व तयारीत असलेले आढळतील ते धन्य. मी तुम्हास खरे सांगतो, तो स्वतः त्यांची सेवा करण्यासाठी कंबर कसेल, त्यांना मेजावर बसायला सांगून त्यांची सेवा करील. तो मध्यरात्री किंवा त्यानंतर येवो, जर ते नोकर त्यास तयारीत आढळतील तर ते धन्य. परंतु याविषयी खात्री बाळगा; चोर केव्हा येणार हे जर घराच्या मालकाला माहीत असते तर त्याने आपले घर त्यास फोडू दिले नसते. तुम्हीही तयार असा कारण तुम्हास वाटत नाही अश्या क्षणी? मनुष्याचा पुत्र येईल.” मग पेत्र म्हणाला, “प्रभू, तुम्ही हा दाखला आम्हासच सांगत आहात की सर्वांना?” तेव्हा प्रभू म्हणाला, “प्रभू त्याच्या इतर नोकरांना त्यांचे धान्य योग्यवेळी देण्यासाठी ज्याची नेमणूक करील असा व विश्वासू कारभारी कोण आहे? त्याचा मालक येईल त्यावेळी असे करतांना जो नोकर त्यास आढळेल तो धन्य. मी तुम्हास खरे सांगतो, मालक त्यास त्याच्या सर्व मालमत्तेवर अधिकारी म्हणून नेमील. पण जर तो नोकर मनात म्हणतो, ‘माझा मालक येण्यास फार उशीर करत आहे,’ आणि मग तो त्याच्या स्त्री व पुरूष नोकरांना मारहाण करायला व खाण्यापिण्यास सुरुवात करतो व झिंगतो, तर तो नोकर वाट पाहत नाही त्यादिवशी आणि त्यास माहीत नाही तेव्हा त्याचा मालक येईल व त्यास कापून त्याचे तुकडे करील आणि अविश्वासू लोकांबरोबर त्याचा वाटा ठेवील. आपल्या मालकाची इच्छा माहीत असूनही जो नोकर तयार राहत नाही किंवा जो आपल्या मालकाच्या इच्छेप्रमाणे करीत नाही, त्या नोकराला खूप मार मिळेल. परंतु ज्याला माहीती नव्हते म्हणून त्याने मालकाला न आवडणारे असे कृत्य जर नोकराने केले असेल तर त्यास कमी मार बसेल. ज्या कोणाला पुष्कळ दिले आहे त्याच्याकडून पुष्कळाची अपेक्षा केली जाईल. ज्यांच्याजवळ जास्त ठेवले आहे त्यांच्याकडून जास्त मागितले जाईल.”
लूक 12:13-48 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तेवढ्यात समुदायामधून एकजण म्हणाला, “गुरुजी, माझ्या भावाला मजबरोबर वतनाची विभागणी करण्यास सांगा.” परंतु येशूंनी त्याला उत्तर दिले, “मला न्यायनिवाडा करण्यासाठी कोणी तुम्हावर न्यायाधीश नेमले?” नंतर येशू त्यांना म्हणाले, “सावध राहा, सर्वप्रकारच्या लोभापासून दूर राहा, कारण पुष्कळ धनसंपत्ती मध्ये जीवन नसते.” नंतर येशूंनी एक दाखला सांगितला: “एका श्रीमंत माणसाच्या शेतामध्ये भरपूर पीक आले. तो मनाशी विचार करू लागला, ‘मी काय करू? माझ्याजवळ धान्य ठेवावयास जागा नाही.’ “तो म्हणाला, ‘मी असे करतो. मी माझी सगळी कोठारे पाडून टाकेन आणि यापेक्षाही मोठी बांधेन, म्हणजे मला धान्य साठविता येईल. आणि मी स्वतःस म्हणेन, “पुढे अनेक वर्षे पुरेल एवढ्या धान्यांचा तुझ्याकडे साठा आहे. आता विसावा घे; खा, पी आणि आनंद कर.” ’ “पण परमेश्वर त्याला म्हणाले, ‘अरे मूर्खा! आज रात्रीच जर तुझा जीव मागितला गेला तर; जे सर्व तू स्वतःसाठी तयार केले आहे ते कोणाचे होईल?’ “परमेश्वराच्या मोलवान आशीर्वादांची संपत्ती मिळविण्याऐवजी, जो मनुष्य स्वतःसाठी द्रव्याचा नुसता संचय करतो, त्याचीही अशीच गत होणार आहे.” तेव्हा येशू त्यांच्या शिष्यांना म्हणाले: “मी तुम्हाला सांगतो, तुम्ही काय खावे अशी तुमच्या जिवाबद्दल किंवा तुम्ही काय पांघरावे अशी तुमच्या शरीराबद्दल चिंता करू नका. अन्नापेक्षा जीव आणि वस्त्रांपेक्षा शरीर अधिक महत्त्वाचे नाही काय? कावळ्यांचा विचार करा; ते धान्य पेरीत नाही, कापणी करीत नाही, त्यांच्याकडे कोठार वा भांडार नसते, तरीही परमेश्वर त्यांना खायला घालतात आणि तुम्ही तर पक्ष्यांपेक्षा कितीतरी अधिक मोलवान आहात! शिवाय काळजी करून आयुष्यातील एक तास तरी कोणास वाढविता येईल काय? तुम्ही साध्या गोष्टी देखील करू शकत नाही तर इतर गोष्टीबद्दल काळजी का करता? “रानातील फुले कशी वाढतात याचा विचार करा. ती कष्ट करीत नाहीत किंवा कातीत नाहीत. तरी मी तुम्हाला सांगतो की शलोमोनदेखील आपल्या सर्व वैभवात त्यांच्याइतका नटला नव्हता. जे आज आहे आणि उद्या अग्नीत टाकले जाते, त्या गवताला जर परमेश्वर असा पोशाख घालतात, तर अहो अल्पविश्वासी, ते तुम्हाला किती विशेषकरून पोशाख घालतील! तसेच, काय खावे, काय प्यावे याविषयी आपल्या मनात मुळीच काळजी करू नका. कारण परकीय लोक या गोष्टींच्या मागे लागतात, पण तुम्हाला या गोष्टींची गरज आहे, हे तुमच्या पित्याला माहीत आहे. परंतु तुम्ही त्यांचे राज्य मिळविण्यासाठी झटा म्हणजे या सर्व गोष्टीही तुम्हाला प्राप्त होतील. “हे लहान कळपा, तू भिऊ नकोस कारण तुम्हाला राज्य देण्यास पित्याला आनंद होतो. तुमची मालमत्ता विका आणि गरिबांना द्या. कधीही जीर्ण होणार नाही अशा पिशव्या स्वतःसाठी घ्या, वर स्वर्गामध्ये नष्ट न होणारा खजिना ठेवा, जिथे कोणी चोर येणार नाही की त्याला कसरही लागणार नाही. कारण जिथे तुमची संपत्ती आहे, तिथे तुमचे मनही असेल. “तुम्ही सेवेसाठी सज्ज व्हा व आपले दिवे जळत राहू द्या, अशा सेवकांसारखे असावे की, जे त्यांचा धनी लग्नाच्या मेजवानीवरून परत येईल म्हणून वाट पाहत आहेत, यासाठी की जेव्हा तो येतो आणि दार ठोठावतो त्याक्षणीच त्याच्यासाठी दार उघडावे. त्या सेवकांसाठी हे फारच चांगले असेल की, त्यांचा धनी येतो, तेव्हा ते जागे आहेत असे त्याला दिसून येते. मी तुम्हाला निश्चित सांगतो, तो धनी स्वतः त्यांची सेवा करण्यासाठी वस्त्रे घालेल आणि त्यांना मेजाभोवती मागे टेकून बसावयास सांगेल आणि तो येईल आणि त्यांना जेवण वाढेल. तो मध्यरात्री येवो किंवा पहाटे, पण एवढे मात्र निश्चित की तो केव्हाही आला, तरी त्याची वाट पाहत तयारीत असणार्या सेवकांना फार मोठा आशीर्वाद प्राप्त होईल. पण एक गोष्ट नीट समजून घ्या की चोर केव्हा येणार ती घटका घरधन्याला आधी समजली असती, तर तो जागा राहिला असता आणि आपले घर फोडू दिले नसते. तुम्ही सदैव तयारीत राहा. कारण मानवपुत्र तुम्हाला कल्पना नसेल अशा घटकेला येईल.” पेत्राने विचारले, “प्रभूजी, तुम्ही हा दाखला आम्हाला उद्देशून सांगत आहात की सर्वांना?” यावर प्रभूजींनी उत्तर दिले, “प्रामाणिक व सुज्ञ कारभारी कोण आहे, ज्याच्यावर घरधनी त्याच्या सेवकांच्या अन्नाचे योग्य वेळी वाटप करण्याचे काम सोपवितो? धनी येईल, तेव्हा जो दास आपली कामगिरी बजावीत असताना त्याला आढळेल, तो धन्य होय. मी तुम्हाला निश्चित सांगतो की तो धनी आपल्या सर्व मालमत्तेवर त्याची नेमणूक करेल. परंतु जो सेवक आपल्या मनात म्हणेल, ‘माझा धनी येण्यास पुष्कळ विलंब होत आहे,’ आणि तो सोबतीच्या दासांना व दासींना मारहाण करू लागेल आणि पिणार्यांबरोबर खाऊ आणि पिऊ लागेल. तर त्या दासाचा धनी, तो अपेक्षा करीत नाही आणि तो सावध नाही अशा घटकेला येईल. तो त्या दासाचे तुकडे करेल व अविश्वासणार्यांबरोबर त्याला वाटा देईल. “मग त्या सेवकाला पुष्कळ फटके मारण्यात येतील, कारण धन्याची इच्छा माहीत असूनही त्याने तयारी केली नाही किंवा धन्याला जे पाहिजे ते केले नाही. परंतु ज्यांना माहीत नाही की त्यांनी शिक्षेस पात्र अशी कृत्ये केली आहेत त्यांना थोडेच फटके मारण्यात येतील. ज्या प्रत्येकाला भरपूर दिलेले आहे, त्याच्याकडून भरपूर मागणी केली जाईल आणि ज्याच्याकडे अधिक सोपविलेले आहे, त्याच्याकडून खूप अधिक मागण्यात येईल.
लूक 12:13-48 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
लोकसमुदायातील कोणीएकाने त्याला म्हटले, “गुरूजी, मला माझ्या वतनाचा वाटा देण्यास माझ्या भावाला सांगा.” तो त्याला म्हणाला, “गृहस्था, मला तुमच्यावर न्यायाधीश किंवा वाटणी करणारा कोणी नेमले?” आणखी त्याने त्यांना म्हटले, “सांभाळा, सर्व प्रकारच्या लोभापासून दूर राहा; कारण कोणाजवळ पुष्कळ संपत्ती असली तर ती त्याचे जीवन होते असे नाही.” त्याने त्यांना एक दाखला सांगितला, “कोणाएका धनवान मनुष्याच्या जमिनीला फार पीक आले. तेव्हा त्याने आपल्या मनात असा विचार केला की, ‘मी काय करू? कारण माझे उत्पन्न साठवण्यास मला जागा नाही.’ मग त्याने म्हटले, ‘मी असे करीन; मी आपली कोठारे मोडून मोठी बांधीन; आणि तेथे मी आपले सर्व धान्य व माल साठवीन. मग मी आपल्या जिवाला म्हणेन, हे जिवा, तुला पुष्कळ वर्षे पुरेल इतका माल ठेवलेला आहे; विसावा घे, खा, पी, आनंद कर.’ परंतु देवाने त्याला म्हटले, ‘अरे मूर्खा, आज रात्री तुझा जीव मागितला जाईल, मग जे काही तू सिद्ध केले आहेस, ते कोणाचे होईल?’ जो कोणी स्वतःसाठी द्रव्यसंचय करतो व देवविषयक बाबतीत धनवान नाही, तो तसाच आहे.” तेव्हा त्याने आपल्या शिष्यांना म्हटले, “म्हणून मी तुम्हांला सांगतो, आपण काय खावे अशी आपल्या जिवाची, अथवा आपण काय पांघरावे अशी आपल्या शरीराची चिंता करत बसू नका. कारण अन्नापेक्षा जीव आणि वस्त्रापेक्षा शरीर अधिक आहे. कावळ्यांचा विचार करा; ते पेरत नाहीत व कापणीही करत नाहीत; त्यांना कणगी नाही व कोठारही नाही; तरी देव त्यांचे पोषण करतो; पाखरांपेक्षा तुम्ही कितीतरी श्रेष्ठ आहात! तसेच चिंता करून आपल्या आयुष्याची दोरी हातभर वाढवण्यास तुमच्यामध्ये कोण समर्थ आहे? म्हणून अति लहान गोष्टदेखील जर तुमच्याने होत नाही तर इतर गोष्टींविषयी का चिंता करत बसता? फुले कशी वाढतात ह्याचा विचार करा; ती कष्ट करत नाहीत व कातत नाहीत; तरी मी तुम्हांला सांगतो, शलमोनदेखील आपल्या सर्व वैभवात त्यांतल्या एकासारखाही सजला नव्हता. जे गवत रानात आज आहे व उद्या भट्टीत टाकले जाते त्याला जर देव असा पोशाख घालतो, तर अहो अल्पविश्वासी जनहो, तो तुम्हांला किती विशेषेकरून पोशाख घालील! तसेच काय खावे किंवा काय प्यावे ह्याच्यामागे लागू नका अथवा मनात अस्वस्थ राहू नका. कारण जगातील राष्ट्रे ह्या सर्व गोष्टी मिळवण्याची धडपड करतात; परंतु तुम्हांला त्यांची गरज आहे हे तुमच्या पित्याला ठाऊक आहे; तर तुम्ही त्याचे राज्य मिळवण्यास झटा, म्हणजे त्याबरोबर ह्याही गोष्टी तुम्हांला मिळतील. हे लहान कळपा, भिऊ नकोस; कारण तुम्हांला ते राज्य द्यावे हे तुमच्या पित्याला बरे वाटले आहे. जे तुमचे आहे ते विकून दानधर्म करा; तसेच स्वर्गातील अक्षय धनाच्या जीर्ण न होणार्या थैल्या आपणांसाठी करून ठेवा; तेथे चोर येत नाही व कसर लागत नाही. कारण जेथे तुमचे धन आहे तेथे तुमचे मनही लागेल. तुमच्या कंबरा बांधलेल्या व दिवे लावलेले असू द्या; आणि धनी लग्नाहून येऊन दार ठोकील तेव्हा आपण त्याच्यासाठी तत्काळ उघडावे म्हणून, तो परत येण्याची वाट पाहत असलेल्या माणसांसारखे तुम्ही व्हा. आणि धनी आल्यावर जे दास जागृत असलेले त्याला आढळतील ते धन्य; मी तुम्हांला खचीत सांगतो की, तो आपली कंबर बांधून त्यांना जेवायला बसवील आणि येऊन त्यांची सेवा करील. तो रात्रीच्या दुसर्या किंवा तिसर्या प्रहरी येईल तेव्हा ते त्याला असे आढळतील तर ते धन्य आहेत. आणखी हे लक्षात घ्या की, अमक्या घटकेस चोर येईल हे घरधन्याला कळले असते तर तो जागा राहिला असता व त्याने आपले घर फोडू दिले नसते. तुम्हीही सिद्ध असा, कारण तुम्हांला वाटणार नाही त्या घटकेस मनुष्याचा पुत्र येईल.” तेव्हा पेत्राने म्हटले, “प्रभूजी, हा दाखला आपण आम्हांलाच सांगता की सर्वांना?” तेव्हा प्रभू म्हणाला, “आपल्या परिवाराला योग्य वेळी शिधासामग्री द्यायला धनी ज्याला नेमील असा विश्वासू व विचारशील कारभारी कोण? त्याचा धनी येईल तेव्हा जो दास तसे करताना आढळेल तो धन्य. मी तुम्हांला खरे सांगतो की, त्याला तो आपल्या सर्वस्वावर नेमील. परंतु ‘आपला धनी येण्यास उशीर लागेल’ असे आपल्या मनात म्हणून तो दास चाकरांस व चाकरिणींस मारहाण करू लागेल, आणि खाऊनपिऊन मस्त होईल, तर तो वाट पाहत नाही अशा दिवशी व त्याला ठाऊक नाही अशा घटकेस त्याचा धनी येऊन त्याला कापून टाकील, आणि अविश्वासू लोकांबरोबर त्याचा वाटा नेमील. आपल्या धन्याची इच्छा काय आहे हे माहीत असता ज्या दासाने तयारी केली नाही किंवा त्याच्या इच्छेप्रमाणे केले नाही त्याला पुष्कळ फटके मिळतील, परंतु ज्याने फटके मिळण्याजोगी कृत्ये माहीत नसता केली त्याला थोडे मिळतील. ज्या कोणाला पुष्कळ दिले आहे त्याच्याजवळून पुष्कळ मागण्यात येईल, आणि ज्याच्याजवळ पुष्कळ ठेवले आहे त्याच्याजवळून पुष्कळच अधिक मागतील.
लूक 12:13-48 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
लोकसमुदायातील एकाने येशूला म्हटले, “गुरुवर्य, मला माझा वतनाचा वाटा देण्यास माझ्या भावाला सांगा.” तो त्याला म्हणाला, “गृहस्था, तुमचा न्याय करण्यासाठी किंवा वाटणी करण्यासाठी मला कोणी नेमले?” आणखी त्याने त्यांना म्हटले, “सांभाळा, सर्व प्रकारच्या लोभापासून दूर राहा कारण कोणाजवळ पुष्कळ संपत्ती असली, तर ती त्याचे जीवन खऱ्या अर्थाने समृद्ध करील असे नाही.” नंतर त्याने त्यांना पुढील दाखला सांगितला:“एका धनवान मनुष्याच्या जमिनीत खूप पीक आले. त्याने मनातल्या मनात विचार केला, ‘मी काय करू? माझे उत्पन्न साठवायला माझ्याकडे पुरेशी जागा नाही.’ त्याने म्हटले, ‘मी असे करीन - मी माझी कोठारे मोडून मोठी बांधीन आणि तेथे मी माझे सर्व धान्य व माल साठवीन आणि मग मी स्वतःला म्हणेन, तुला पुष्कळ वर्षे पुरेल इतका भरपूर माल साठवलेला आहे. विसावा घे, खा, पी, मजा कर.’ परंतु देवाने त्याला म्हटले, ‘अरे मूर्खा, आज रात्री तुझा जीव मागितला जाईल. मग जे काही तू जमवून ठेवले आहे, ते कोणाचे होईल?’ जो कोणी स्वतःसाठी द्रव्यसंचय करतो, परंतु देवाच्या दृष्टीने धनवान नाही त्याचे असेच आहे.” त्याने आपल्या शिष्यांना म्हटले, “मी तुम्हांला सांगतो, उदरनिर्वाहासाठी ज्या अन्नाची तुम्हांला गरज आहे, त्याची वा शरीरासाठी ज्या कपड्यांची तुम्हांला आवश्यकता आहे, त्यांची चिंता करत बसू नका. अन्नापेक्षा जीव आणि वस्त्रांपेक्षा शरीर अधिक महत्त्वाचे आहेत. कावळ्यांचे निरीक्षण करा. ते पेरत नाहीत व कापणीही करीत नाहीत, त्यांचा कणगा नसतो व कोठारही नसते, तरी देव त्यांचे पोषण करतो. पक्ष्यांपेक्षा तुम्ही कितीतरी श्रेष्ठ आहात! आणि चिंता करून आपले आयुष्य थोडेफार वाढवायला तुमच्यामध्ये कोण समर्थ आहे? अशी ही अगदी छोटी गोष्टदेखील जर तुम्हांला जमत नाही, तर इतर गोष्टीविषयी का चिंता करत बसता? रानफुले कशी वाढतात, ह्याचा विचार करा. ती कष्ट करीत नाहीत व कातीत नाहीत, तरी मी तुम्हांला सांगतो, शलमोनदेखील त्याच्या सर्व वैभवात त्यांतल्या एकासारखा सजला नव्हता. जे गवत रानात आज आहे व उद्या भट्टीत टाकले जाते त्याला जर देव असा पोषाख घालतो, तर अहो, अल्पविश्वासी जनहो, तो किती विशेषकरून तुमची काळजी घेईल? तसेच काय खावे, काय प्यावे, ह्याच्यामागे लागू नका अथवा मनात अस्वस्थ होऊ नका. जगातील परराष्ट्रीय लोक ह्या सर्व गोष्टी मिळवण्याची धडपड करतात परंतु तुम्हांला त्यांची गरज आहे, हे तुमच्या पित्याला ठाऊक आहे. उलट, तुम्ही त्याचे राज्य मिळवण्यास झटा म्हणजे ह्या गोष्टी तुम्हांला मिळतील. हे लहान कळपा, भिऊ नकोस. तुम्हांला देवराज्य द्यावे, हे तुमच्या पित्याला उचित वाटले आहे. जे तुमचे आहे, ते विकून दानधर्म करा. जीर्ण न होणाऱ्या थैल्यांमध्ये आपणासाठी स्वर्गात अक्षय धन साठवून ठेवा. तेथे चोर येत नाहीत व कसर लागत नाही. अर्थात, जेथे तुमचे धन आहे, तेथे तुमचे मनही लागेल. लग्नाहून परत येणाऱ्या धन्याची वाट पाहत असलेल्या नोकरांप्रमाणे तुमच्या कंबरा कसलेल्या व दिवे लावलेले असू द्या म्हणजे तो येऊन दार ठोठावील, तेव्हा तुम्ही त्याच्यासाठी तत्काळ दार उघडावे. धनी आल्यावर जे दास जागृत असलेले त्याला आढळतील ते धन्य. मी तुम्हांला खातरी पूर्वक सांगतो की, तो आपली कंबर कसून त्यांना जेवायला बसवील आणि येऊन त्यांची सेवा करील. तो मध्यरात्रीच्या सुमारास किंवा त्याहून उशीरा येईल तेव्हा ते त्याला असे आढळतील तर ते धन्य आहेत. आणखी हे लक्षात घ्या की, अमक्या घटकेस चोर येईल, हे घरधन्याला माहीत असते, तर त्याने आपले घर फोडू दिले नसते. तुम्हीही तयार राहा कारण तुमची अपेक्षा नाही अशा घटकेस मनुष्याचा पुत्र येईल.” पेत्राने म्हटले, “प्रभो, हा दाखला आपण आम्हांलाच सांगता की सर्वांना?” प्रभू म्हणाला, “आपल्या परिवारातील नोकरांना योग्य वेळी शिधासामग्री द्यायला धनी ज्याला नेमील, असा विश्वासू व विवेकी नोकर कोण? त्याचा धनी येईल, तेव्हा जो दास तसे करताना आढळेल तो धन्य. मी तुम्हांला खरे सांगतो की, त्याला तो आपल्या सर्वस्वावर नेमील. मात्र आपला धनी येण्यास उशीर लागेल, असे आपल्या मनात म्हणून तो दास चाकरांना व चाकरिणींना मारहाण करू लागेल आणि खाऊनपिऊन मस्त होईल, तर तो अपेक्षा करत नाही अशा दिवशी व त्याला ठाऊक नाही अशा घटकेस त्या नोकराचा धनी येऊन त्याला कठोर शिक्षा करील आणि त्याची गणती अविश्वासू लोकांमध्ये करण्यात येईल. आपल्या धन्याची इच्छा काय आहे, हे माहीत असता ज्या नोकराने तयारी केली नाही किंवा त्याच्या इच्छेप्रमाणे केले नाही, त्याला पुष्कळ फटके मिळतील. परंतु ज्याने फटके मिळण्याजोगी कृत्ये माहीत नसता केली, त्याला कमी शिक्षा मिळेल. ज्या कोणाला पुष्कळ दिले आहे, त्याच्याकडून पुष्कळ मागण्यात येईल आणि ज्याच्या स्वाधीन भरपूर केले आहे त्याच्याकडून अजूनही जास्त मागण्यात येईल.