लूक 11:33-36
लूक 11:33-36 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
दिवा लावून तळघरात किंवा मापाखाली कोणी ठेवत नाही, तर आत येणार्यांना उजेड दिसावा म्हणून दिवठणीवर ठेवतो. तुझ्या शरीराचा दिवा तुझा डोळा होय; तुझा डोळा निर्दोष असला तर तुझे सर्व शरीर प्रकाशमय असते; सदोष असला तर तुझे शरीरही अंधकारमय असते. म्हणून तुझ्यामधील प्रकाश अंधार तर नाही ना, हे पाहा. तुझे सर्व शरीर प्रकाशमय असेल आणि त्याचा कोणताही भाग अंधकारमय नसेल, तर दिवा आपल्या उज्ज्वल ज्योतीने तुला प्रकाशमय करतो त्याप्रमाणे ते पूर्णपणे प्रकाशमय होईल.”
लूक 11:33-36 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
“कोणीही दिवा लावून तळघरात किंवा भांड्याखाली ठेवत नाहीत, तर आत येणाऱ्यांना प्रकाश दिसवा म्हणून तो दिवठणीवर ठेवतात. डोळा हा तुमच्या शरीराचा दिवा आहे. जर तुमचे डोळे चांगले आहेत, तर तुमचे शरीरही प्रकाशाने भरलेले आहे. पण ते जर वाईट आहेत तर तुमचे शरीर अंधकारमय आहेत म्हणून तुमच्यातला प्रकाश हा अंधार तर नाही ना, याची काळजी घ्या. जर तुमचे सर्व शरीर प्रकाशमय आहे आणि त्याच्यातील कोणताही भाग अंधकारमय नाही तर, जशी दिव्याची प्रकाशकिरणे तुला प्रकाश देतात, तसे ते तुला पूर्णपणे प्रकाशित करील.”
लूक 11:33-36 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“कोणी दिवा लावून त्याचा प्रकाश लपून राहील अशा ठिकाणी किंवा मापाखाली ठेवत नाही. उलट, दिवठणीवर ठेवतात यासाठी की आत येणार्यांनाही प्रकाश मिळावा. तुझा डोळा शरीराचा दिवा आहे. तुझे डोळे निर्दोष असले म्हणजे तुझे सर्व शरीरही प्रकाशमय होईल. पण जर ते निर्दोष नसतील तर तुझे शरीरही अंधकारमय असेल. म्हणून तुझ्यामध्ये जो प्रकाश आहे, तो अंधार तर नाही ना, याविषयी काळजी घे. यास्तव, जर तुझे सर्व शरीर प्रकाशाने भरलेले असले आणि कोणताही भाग अंधकारमय नसला, तर दिव्याचा प्रकाश तुझ्यावर पडेल तसे ते पूर्णपणे प्रकाशमय होईल.”
लूक 11:33-36 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
दिवा लावून तो लपवून ठेवला जात नाही किंवा धान्यमापाखाली ठेवला जात नाही तर आत येणाऱ्यांना उजेड मिळावा म्हणून दिवठणीवर ठेवतात. तुझा डोळा तुझ्या शरीराचा दिवा आहे, तुझे डोळे निर्दोष असतात, तेव्हा तर तुझे सर्व शरीर प्रकाशमय असते. तुझे डोळे सदोष असतात, तेव्हा तुझे शरीरही अंधकारमय असते. म्हणून तुझ्यामधील प्रकाश हा अंधार तर नाही ना हे पाहा. तुझे शरीर जर प्रकाशमय असेल म्हणजेच त्याचा कोणताही भाग अंधकारमय नसेल, तर सर्व काही उजळून निघेल - अगदी दिवा त्याच्या ज्योतीने तुला उजळून टाकतो तसा.”