YouVersion लोगो
सर्च आयकॉन

लूक 1:9-20

लूक 1:9-20 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

याजकांच्या रीतीप्रमाणे परमेश्वराच्या भवनात धूप जाळण्यासाठी चिठ्ठ्या टाकून त्याची निवड करण्यात आली. आणि लोकांचा सगळा जमाव धूप जाळण्याच्या वेळेस बाहेर प्रार्थना करीत उभा होता. तेव्हा परमेश्वराचा दूत, धूपवेदीच्या उजव्या बाजूला उभा असलेला त्याच्या दृष्टीस पडला. त्यास पाहून जखऱ्या भयभीत झाला. परंतु देवदूत त्यास म्हणाला, जखऱ्या भिऊ नको, कारण तुझी प्रार्थना ऐकण्यात आली आहे आणि तुझी पत्नी अलीशिबा हिच्याकडून तुला पुत्र होईल, तू त्याचे नाव योहान ठेव. तेव्हा तुला आनंद व उल्लास होईल आणि त्याच्या जन्माने पुष्कळ लोक हर्षित होतील. कारण तो परमेश्वराच्या दृष्टीने महान होईल आणि तो द्राक्षरस किंवा मद्य कधीच पिणार नाही व तो आईच्या गर्भात असतांनाच पवित्र आत्म्याने भरलेला असेल. तो इस्राएलाच्या संतानांतील अनेकांना, प्रभू त्यांचा देव याच्याकडे वळविण्यास कारणीभूत ठरेल. आणि देवासाठी सिद्ध झालेले असे लोक तयार करायला, वडिलांची अंतःकरणे मुलांकडे आणि आज्ञा न मानणार्‍यांना नीतिमानांच्या ज्ञानाकडे वळवून प्रभूसाठी तयार केलेली प्रजा उभी करावयाला तो एलीयाच्या आत्म्याने आणि सामर्थ्याने त्यांच्यापुढे चालेल. मग जखऱ्या देवदूताला म्हणाला, “हे घडणारच असे मी कशावरुन समजू? कारण मी वृद्ध मनुष्य आहे आणि माझी पत्नीसुद्धा उतारवयात आहे.” देवदूताने त्यास उत्तर दिले, “मी देवाच्या पुढे उभा राहणारा गब्रीएल आहे आणि तुझ्याशी बोलायला व तुलाही सुवार्ता सांगायला मला पाठविण्यात आले आहे. पाहा, हे घडेपर्यंत तुला बोलता येणार नाही व तू मुका राहशील कारण माझे शब्द जे योग्यवेळी पूर्णपणे खरे ठरणार आहेत त्या माझ्या शब्दांवर तू विश्वास ठेवला नाहीस.”

सामायिक करा
लूक 1 वाचा

लूक 1:9-20 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

परमेश्वराच्या मंदिरात जाऊन धूप जाळण्यासाठी याजकांच्या रितीप्रमाणे चिठ्ठ्या टाकून त्याची निवड करण्यात आली. आणि जेव्हा धूप जाळण्याची वेळ आली तेव्हा, जमलेले सर्व भक्तजन बाहेर प्रार्थना करीत होते. तेव्हा जखर्‍याच्या समोर प्रभुचा एक दूत प्रगट झाला, तो धूपवेदीच्या उजव्या बाजूला उभा राहिला. जेव्हा जखर्‍याने त्याला पाहिले तो चकित झाला आणि भयभीत झाला. पण देवदूत त्याला म्हणाला, “जखर्‍या भिऊ नकोस, कारण परमेश्वराने तुझी प्रार्थना ऐकली आहे. तुझी पत्नी अलीशिबा तुझ्यासाठी एक पुत्र प्रसवेल आणि तू त्याला योहान असे म्हणावे. तो तुला आनंद व उल्हास होईल आणि त्याच्या जन्मामुळे अनेकांना हर्ष वाटेल. तो प्रभुच्या दृष्टीने अतिमहान होईल. तो कधीही द्राक्षारस किंवा मद्य पिणार नाही आणि मातेच्या गर्भात असतानाच तो पवित्र आत्म्याने भरून जाईल. तो अनेक इस्राएल लोकांना आपल्या प्रभुपरमेश्वराकडे परत घेऊन येईल. तो एलीयाच्या आत्म्याने व सामर्थ्याने प्रभुच्या पुढे चालेल, आईवडिलांची हृदये त्यांच्या लेकरांकडे वळविल व अवज्ञा करणार्‍यांना नीतिमान लोकांच्या ज्ञानाकडे वळविल व लोकांना प्रभुच्या मार्गाप्रमाणे चालण्यासाठी तयार करील.” जखर्‍या देवदूताला म्हणाला, “मी याबद्दल खात्री कशी बाळगावी? मी वृद्ध मनुष्य आहे आणि माझ्या पत्नीचे वय होऊन गेले आहे.” यावर देवदूत म्हणाला, “मी गब्रीएल आहे. मी प्रत्यक्ष परमेश्वराच्या समक्षतेत उभा असतो आणि तुझ्याबरोबर बोलण्यास व ही आनंदाची बातमी तुला सांगण्यासाठी मला पाठविले आहे, आणि आता हे पूर्ण होईल त्या दिवसापर्यंत तू मुका होशील व तुला बोलता येणार नाही, कारण नेमलेल्या समयी माझे शब्द खरे होतील या माझ्या शब्दांवर तू विश्वास ठेविला नाही.”

सामायिक करा
लूक 1 वाचा

लूक 1:9-20 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

याजकपणाच्या परिपाठाप्रमाणे प्रभूच्या पवित्रस्थानात जाऊन धूप जाळण्याचे काम त्याच्याकडे आले. धूप जाळण्याच्या वेळेस लोकांचा सर्व समुदाय बाहेर प्रार्थना करत होता. तेव्हा प्रभूचा दूत धूपवेदीच्या उजव्या बाजूस उभा राहिलेला त्याच्या दृष्टीस पडला. त्याला पाहून जखर्‍या अस्वस्थ व भयभीत झाला. देवदूताने त्याला म्हटले, “जखर्‍या, भिऊ नकोस, कारण तुझी विनंती ऐकण्यात आली आहे; तुझी पत्नी अलीशिबा हिच्यापासून तुला मुलगा होईल आणि तू त्याचे नाव योहान ठेव. त्याच्या जन्माने तुला आनंद होईल व उल्लास वाटेल आणि पुष्कळ लोक हर्ष करतील. कारण तो प्रभूच्या दृष्टीने महान होईल. तो ‘द्राक्षारस व मद्य कधीच प्राशन करणार नाही’; आणि आपल्या मातेच्या उदरापासूनच तो पवित्र आत्म्याने परिपूर्ण असेल. तो इस्राएलाच्या संतानांतील अनेकांना त्यांचा देव प्रभू ह्याच्याकडे वळवील. ‘बापाची अंतःकरणे मुलांकडे’, व आज्ञाभंजक लोकांना नीतिमान जनांच्या ज्ञानाकडे वळवून प्रभूसाठी सिद्ध प्रजा तयार करावी म्हणून तो एलीयाच्या आत्म्याने व सामर्थ्याने त्याच्यापुढे चालेल.” तेव्हा जखर्‍या देवदूताला म्हणाला, “हे मी कशावरून समजू? कारण मी म्हातारा आहे व माझी पत्नीही वयातीत आहे.” देवदूताने त्याला उत्तर दिले, “मी देवासमोर उभा राहणारा गब्रीएल आहे; आणि तुझ्याबरोबर बोलण्यास व ही सुवार्ता तुला कळवण्यास मला पाठवण्यात आले आहे. पाहा, हे घडेल त्या दिवसापर्यंत तू मुका राहशील, तुला बोलता येणार नाही; कारण यथाकाली पूर्ण होतील अशा माझ्या वचनांवर तू विश्वास ठेवला नाहीस.”

सामायिक करा
लूक 1 वाचा

लूक 1:9-20 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

याजकांच्या परिपाठाप्रमाणे वेदीवर धूप जाळण्यासाठी त्याची निवड चिट्ठ्या टाकून करण्यात आली होती. त्यानुसार तो प्रभूच्या मंदिरात गेला. त्या वेळेस संपूर्ण जनसमुदाय बाहेर प्रार्थना करीत होता. धूप जाळले जात असताना प्रभूचा दूत वेदीच्या उजव्या बाजूस उभा राहिलेला त्याच्या दृष्टीस पडला. त्याला पाहून जखऱ्या विस्मित व भयभीत झाला. परंतु देवदूताने त्याला म्हटले, “जखऱ्या, भिऊ नकोस! तुझी विनंती ऐकण्यात आली आहे. तुझी पत्नी अलिशिबा हिच्यापासून तुला मुलगा होईल. तू त्याचे नाव योहान असे ठेव. त्याच्या जन्माने तुला आनंद होईल व उल्हास वाटेल आणि पुष्कळ लोक हर्ष करतील! कारण तो प्रभूच्या दृष्टीने महान होईल; त्याने द्राक्षारस व मद्य कधीच प्राशन करायचे नाही; आईच्या उदरात असल्यापासून तो पवित्र आत्म्याने परिपूर्ण असेल. इस्राएलच्या संतानांतील पुष्कळ लोकांना तो प्रभू त्यांचा परमेश्वर ह्याच्याकडे वळवील. एलियाच्या मनोवृत्तीने व सामर्थ्याने तो परमेश्वरापुढे चालेल. वडील आणि मुले यांच्यामध्ये तो पुन्हा ऐक्य प्रस्थापित करील. आज्ञाभंग करणाऱ्या लोकांची विचारसरणी नीतिमान लोकांच्या विचारसरणीसारखी बदलून तो प्रभूसाठी प्रजा तयार करील.” जखऱ्या देवदूताला म्हणाला, “हे मी कशावरून समजू? कारण मी वयोवृद्ध आहे व माझी पत्नीही वयातीत आहे.” देवदूताने त्याला उत्तर दिले, “मी देवासमोर उभा राहणारा गब्रिएल आहे. तुझ्याबरोबर बोलायला व हे सुवृत्त तुला कळवायला मला पाठवण्यात आले आहे. पाहा, हे घडेल त्या दिवसापर्यंत तू मुका राहशील. तुला बोलता येणार नाही, कारण उचित समयी पूर्ण होतील अशा माझ्या वचनांवर तू विश्वास ठेवला नाहीस.”

सामायिक करा
लूक 1 वाचा