लूक 1:31-38
लूक 1:31-38 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
पाहा! तू गरोदर राहशील आणि तुला मुलगा होईल त्याचे नाव तू येशू ठेव. तो महान होईल व त्यास थोर देवाचा पुत्र म्हणतील आणि प्रभू देव त्यास त्याचा पिता दावीद याचे राजासन देईल. तो याकोबाच्या घराण्यावर सर्वकाळासाठी राज्य चालवील आणि त्याच्या राज्याचा अंत होणार नाही.” तेव्हा मरीया दूताला म्हणाली, हे कसे होईल? कारण मला पुरूष ठाऊक नाही. देवदूत तिला म्हणाला, पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि थोर देवाचे सामर्थ्य तुझ्यावर सावली करील आणि म्हणून जे पवित्र बाळ जन्मास येईल, त्यास देवाचा पुत्र म्हणतील. बघ, तुझी नातेवाईक अलीशिबा ही सुद्धा म्हातारपणात गरोदर असून तिला पुत्रगर्भ राहीला आहे आणि जिला वांझ म्हणले जाई तिला आता सहावा महिना आहे. कारण देवाला कोणतीही गोष्ट अशक्य नाही. मरीया म्हणाली, खरोखर “मी प्रभूची दासी आहे, आपल्या म्हणण्याप्रमाणे मला होवो.” मग देवदूत तिच्यापासून निघून गेला.
लूक 1:31-38 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तू गर्भधारण करून पुत्राला जन्म देशील आणि त्याचे नाव येशू ठेवावे. ते परमथोर होतील आणि त्यांना परात्पराचा पुत्र म्हणतील आणि प्रभू परमेश्वर त्यांना त्यांचा पूर्वज दावीदाचे सिंहासन देतील. ते याकोबाच्या संतानांवर सदासर्वकाळ राज्य करतील व त्यांच्या राज्याचा कधीच अंत होणार नाही.” मरीयेने देवदूताला विचारले, “हे कसे होईल? मी तर कुमारिका आहे!” यावर देवदूताने उत्तर दिले, “पवित्र आत्मा तुझ्यावर उतरेल आणि सर्वोच्च परमेश्वराचे सामर्थ्य तुझ्यावर छाया करेल. त्यामुळे जो पवित्र पुत्र तुला होणार आहे त्यांना परमेश्वराचा पुत्र म्हणतील. तुझी नातलग अलीशिबा हिलासुद्धा तिच्या वृद्धापकाळात बाळ होणार आहे आणि जी गर्भधारणा करू शकत नव्हती, तिला आता सहावा महिना आहे. कारण परमेश्वराला कोणतेही वचन पूर्ण करणे अशक्य नाही.” मरीया म्हणाली, “मी प्रभूची दासी आहे, तुम्ही जे वचन मला दिले आहे त्याची पूर्तता होवो.” आणि मग देवदूत तिला सोडून गेला.
लूक 1:31-38 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
पाहा, तू गरोदर राहशील व तुला पुत्र होईल. तू त्याचे नाव येशू ठेव. तो थोर होईल व त्याला परात्पराचा पुत्र म्हणतील; आणि प्रभू देव त्याला त्याचा पूर्वज दावीद ह्याचे राजासन देईल; आणि तो याकोबाच्या घराण्यावर ‘युगानुयुग राज्य करील’, व त्याच्या राज्याचा अंत होणार नाही.” मरीयेने देवदूताला म्हटले, “हे कसे होईल? कारण मला पुरुष ठाऊक नाही.” देवदूताने उत्तर दिले, “पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि परात्पराचे सामर्थ्य तुझ्यावर छाया करील; म्हणून ज्याचा जन्म होईल त्याला पवित्र, देवाचा पुत्र, असे म्हणतील. पाहा, तुझ्या नात्यातली अलीशिबा हिलाही म्हातारपणी पुत्रगर्भ राहिला आहे; आणि जिला वांझ म्हणत तिला हा सहावा महिना आहे. कारण ‘देवाला काहीच अशक्य होणार नाही.” तेव्हा मरीया म्हणाली, “पाहा, मी प्रभूची दासी; आपण सांगितल्याप्रमाणे मला होवो.” मग देवदूत तिच्यापासून निघून गेला.
लूक 1:31-38 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
आणि पाहा, तू गरोदर राहशील व तुला पुत्र होईल. त्याचे नाव तू येशू असे ठेव. तो थोर होईल व त्याला परात्पराचा पुत्र म्हणतील. प्रभू परमेश्वर त्याला त्याचा पूर्वज दावीद ह्याचे राजासन देईल. तो याकोबच्या घराण्यावर युगानुयुगे राज्य करील व त्याच्या राज्याचा अंत होणार नाही.” मरियेने देवदूताला विचारले, “हे कसे शक्य आहे? मी तर कुमारिका आहे.’’ देवदूताने उत्तर दिले, “पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि परात्पराचे सामर्थ्य तुझ्यावर छाया धरील. ह्यामुळे तुला होणारे मूल पवित्र असेल व त्याला देवाचा पुत्र म्हणतील. तसेच पाहा, तुझ्या नात्यातली अलिशिबा हिला म्हातारपणी पुत्रगर्भ राहिला आहे. जिला वांझ म्हणत, तिला सहावा महिना लागला आहे. कारण देवाला काहीच अशक्य नाही.” तेव्हा मरिया म्हणाली, “पाहा, मी प्रभूची सेविका आहे, आपण सांगितल्याप्रमाणे माझ्या बाबतीत घडो.” मग देवदूत तेथून निघून गेला.