YouVersion लोगो
सर्च आयकॉन

लूक 1:26-37

लूक 1:26-37 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

अलीशिबेच्या गरोदरपणाच्या सहाव्या महिन्यात देवाने गब्रीएल दूताला गालील प्रांतातील नासरेथ नावाच्या गावी, एका कुमारीकडे पाठवले. तिची दाविदाच्या घराण्यातील योसेफ नावाच्या मनुष्याशी मागणी झाली होती आणि त्या कुमारीचे नाव मरीया होते. देवदूत तिच्याकडे येऊन म्हणाला, अभिवादन! तुझ्यावर कृपा झालेली आहे. प्रभू तुझ्याबरोबर आहे. परंतु ती त्याच्या शब्दाने अस्वस्थ झाली आणि या अभिवादनाचा अर्थ काय असावा याचे ती नवल करू लागली. देवदूत तिला म्हणाला, “मरीये, भिऊ नकोस, देवाने तुझ्यावर कृपा केली आहे. पाहा! तू गरोदर राहशील आणि तुला मुलगा होईल त्याचे नाव तू येशू ठेव. तो महान होईल व त्यास थोर देवाचा पुत्र म्हणतील आणि प्रभू देव त्यास त्याचा पिता दावीद याचे राजासन देईल. तो याकोबाच्या घराण्यावर सर्वकाळासाठी राज्य चालवील आणि त्याच्या राज्याचा अंत होणार नाही.” तेव्हा मरीया दूताला म्हणाली, हे कसे होईल? कारण मला पुरूष ठाऊक नाही. देवदूत तिला म्हणाला, पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि थोर देवाचे सामर्थ्य तुझ्यावर सावली करील आणि म्हणून जे पवित्र बाळ जन्मास येईल, त्यास देवाचा पुत्र म्हणतील. बघ, तुझी नातेवाईक अलीशिबा ही सुद्धा म्हातारपणात गरोदर असून तिला पुत्रगर्भ राहीला आहे आणि जिला वांझ म्हणले जाई तिला आता सहावा महिना आहे. कारण देवाला कोणतीही गोष्ट अशक्य नाही.

सामायिक करा
लूक 1 वाचा

लूक 1:26-37 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

अलीशिबेला गर्भवती होऊन सहा महिने झाले असताना, परमेश्वराने गब्रीएल दूताला गालील प्रांतातील नासरेथ गावात, एका कुमारीकडे पाठविले, जिचे लग्न दावीद राजाच्या वंशावळीतील योसेफ नावाच्या मनुष्याबरोबर ठरले होते. त्या कुमारीचे नाव मरीया होते. गब्रीएल देवदूत मरीयेपुढे प्रगट झाला आणि तिला म्हणाला, “हे कृपा पावलेल्या स्त्रिये, अभिवादन! प्रभू तुझ्याबरोबर आहे.” देवदूताच्या शब्दांनी मरीया फारच अस्वस्थ झाली आणि हे अभिवादन कशाप्रकारचे असावे याविषयी ती विचार करू लागली. देवदूत तिला म्हणाला, “मरीये; भिऊ नकोस. कारण परमेश्वराची कृपा तुझ्यावर झाली आहे. तू गर्भधारण करून पुत्राला जन्म देशील आणि तू त्याचे नाव येशू असे ठेवावे. ते परमथोर होईल आणि त्यांना परात्पराचा पुत्र म्हणतील आणि प्रभू परमेश्वर त्यांना त्यांचा पूर्वज दावीद, याचे सिंहासन देईल. ते याकोबाच्या संतानांवर सदासर्वकाळ राज्य करतील व त्यांच्या राज्याचा कधीच अंत होणार नाही.” मरीयेने देवदूताला विचारले, “हे कसे होईल? मी तर कुमारिका आहे!” यावर देवदूताने उत्तर दिले, “पवित्र आत्मा तुझ्यावर उतरेल आणि सर्वोच्च परमेश्वराचे सामर्थ्य तुझ्यावर छाया करील. त्यामुळे जो पवित्र पुत्र तुला होणार आहे त्यांना परमेश्वराचा पुत्र असे म्हणतील. तुझी नातलग अलीशिबा हिलासुद्धा तिच्या वृद्धापकाळात बाळ होणार आहे आणि जी गर्भधारणा करू शकत नव्हती, तिला आता सहावा महिना आहे. कारण परमेश्वराने दिलेले कोणतेही वचन पूर्ण होणे अशक्य नाही.”

सामायिक करा
लूक 1 वाचा

लूक 1:26-37 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

नंतर सहाव्या महिन्यात देवाने गालीलातील नासरेथ नावाच्या गावी एका कुमारीकडे गब्रीएल देवदूताला पाठवले. ती दाविदाच्या घराण्यातील योसेफ नावाच्या पुरुषाला वाग्दत्त होती; आणि त्या कुमारीचे नाव मरीया होते. देवदूत तिच्याकडे आत येऊन म्हणाला, “हे कृपा पावलेल्या स्त्रीये, कल्याण असो; प्रभू तुझ्याबरोबर असो.”1 ह्या बोलण्याने तिच्या मनात खळबळ उडाली आणि हे अभिवादन काय असेल ह्याचा ती विचार करू लागली. देवदूताने तिला म्हटले, “मरीये, भिऊ नकोस, कारण देवाची कृपा तुझ्यावर झाली आहे. पाहा, तू गरोदर राहशील व तुला पुत्र होईल. तू त्याचे नाव येशू ठेव. तो थोर होईल व त्याला परात्पराचा पुत्र म्हणतील; आणि प्रभू देव त्याला त्याचा पूर्वज दावीद ह्याचे राजासन देईल; आणि तो याकोबाच्या घराण्यावर ‘युगानुयुग राज्य करील’, व त्याच्या राज्याचा अंत होणार नाही.” मरीयेने देवदूताला म्हटले, “हे कसे होईल? कारण मला पुरुष ठाऊक नाही.” देवदूताने उत्तर दिले, “पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि परात्पराचे सामर्थ्य तुझ्यावर छाया करील; म्हणून ज्याचा जन्म होईल त्याला पवित्र, देवाचा पुत्र, असे म्हणतील. पाहा, तुझ्या नात्यातली अलीशिबा हिलाही म्हातारपणी पुत्रगर्भ राहिला आहे; आणि जिला वांझ म्हणत तिला हा सहावा महिना आहे. कारण ‘देवाला काहीच अशक्य होणार नाही.”

सामायिक करा
लूक 1 वाचा

लूक 1:26-37 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

अलिशिबेच्या गरोदरपणाच्या सहाव्या महिन्यात देवाने गालीलमधील नासरेथ नावाच्या गावी एका कुमारिकेकडे गब्रिएल देवदूताला पाठवले. तिचा दावीदच्या घराण्यातील योसेफ नावाच्या पुरुषाबरोबर वाङ्निश्‍चय झाला होता. तिचे नाव मरिया होते. देवदूत तिच्याकडे येऊन म्हणाला, “कृपापूर्ण स्त्रिये, नमस्कार, प्रभू तुझ्याबरोबर आहे.” परंतु ह्या बोलण्याने तिच्या मनात खळबळ उडाली आणि हे अभिवादन काय असेल, ह्याचा ती विचार करू लागली. देवदूताने तिला म्हटले, “मरिये, भिऊ नकोस. तुझ्यावर देवाची कृपा झाली आहे आणि पाहा, तू गरोदर राहशील व तुला पुत्र होईल. त्याचे नाव तू येशू असे ठेव. तो थोर होईल व त्याला परात्पराचा पुत्र म्हणतील. प्रभू परमेश्वर त्याला त्याचा पूर्वज दावीद ह्याचे राजासन देईल. तो याकोबच्या घराण्यावर युगानुयुगे राज्य करील व त्याच्या राज्याचा अंत होणार नाही.” मरियेने देवदूताला विचारले, “हे कसे शक्य आहे? मी तर कुमारिका आहे.’’ देवदूताने उत्तर दिले, “पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि परात्पराचे सामर्थ्य तुझ्यावर छाया धरील. ह्यामुळे तुला होणारे मूल पवित्र असेल व त्याला देवाचा पुत्र म्हणतील. तसेच पाहा, तुझ्या नात्यातली अलिशिबा हिला म्हातारपणी पुत्रगर्भ राहिला आहे. जिला वांझ म्हणत, तिला सहावा महिना लागला आहे. कारण देवाला काहीच अशक्य नाही.”

सामायिक करा
लूक 1 वाचा