लेवीय 9:1-7
लेवीय 9:1-7 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आठव्या दिवशी मोशेने अहरोन, त्याचे पुत्र तसेच इस्राएलांचे वडील ह्यांना बोलावले. तो अहरोनाला म्हणाला, “पापार्पणासाठी एक निर्दोष गोऱ्हा व होमार्पणासाठी निर्दोष मेंढा आण आणि त्यांना परमेश्वरास अर्पण कर. आणि इस्राएल लोकांस असे सांग, ‘तुम्ही पापार्पणासाठी एक बकरा आणा व होमार्पणासाठी एक गोऱ्हा व एक कोकरु आणा; ही दोन्ही प्रत्येकी एक वर्षाची व निर्दोष असावीत; आणि परमेश्वरासमोर शांत्यर्पणे करण्यासाठी बली म्हणून एक बैल, एक मेंढा व तेलात मळलेले अन्नार्पण आणा कारण आज परमेश्वर तुम्हास दर्शन देणार आहे.” मग मोशेने आज्ञा दिल्याप्रमाणे सर्व लोक आले व त्यांनी ते सर्व दर्शनमंडपाच्या दारापाशी आणले मग सर्वजण येऊन परमेश्वरासमोर उभे राहिले. तेव्हा मोशे म्हणाला, “परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे तुम्ही सर्वकाही करावे; मग परमेश्वराचे गौरव तुम्हास दिसेल.” मग मोशेने अहरोनाला सांगितले, “जा व परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे सर्वकाही कर; वेदीजवळ जाऊन आपला पापबली व होमबली ह्यांचे अर्पण कर आणि स्वत:साठी व लोकांसाठी प्रायश्चित कर आणि लोकांकडील बलीही अर्पण करून त्यांच्यासाठी प्रायश्चित कर.”
लेवीय 9:1-7 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
आठव्या दिवशी मोशेने अहरोन आणि त्याचे पुत्र व इस्राएलच्या पुढाऱ्यांना बोलाविले. तो अहरोनाला म्हणाला, “तुझ्या पापार्पणासाठी व्यंग नसलेला एक गोर्हा व होमार्पणासाठी व्यंग नसलेला एक मेंढा घेऊन याहवेहसमोर अर्पण कर. मग इस्राएली लोकांना सांग: तुम्ही तुमच्या पापार्पणासाठी एक बोकड व होमार्पणासाठी एक गोर्हा व एक कोकरू निवडून घ्यावे. ही दोन्ही एका वर्षांची असून व्यंग नसलेली असावीत, आणि याहवेहसमोर शांत्यर्पणाचे बली म्हणून एक गोर्हा आणि एक मेंढा व अन्नार्पणासाठी तेल मिसळलेले अन्नबली आणावे. कारण याहवेह आज तुम्हाला दर्शन देणार आहेत.” म्हणून मोशेने दिलेल्या आज्ञेप्रमाणे लोकांनी सभामंडपापुढे सर्वकाही आणले आणि संपूर्ण मंडळी याहवेहसमोर येऊन उभी राहिली. तेव्हा मोशे म्हणाला, “हे करण्याची आज्ञा तुम्हाला याहवेहनी दिली आहे, जेणेकरून याहवेहचे गौरव तुम्हाला प्रकट व्हावे.” मोशेने अहरोनाला सांगितले, “वेदीजवळ ये आणि तुझे पापार्पण आणि तुझे होमार्पण यांचे अर्पण कर आणि स्वतःसाठी आणि लोकांसाठी प्रायश्चित्त कर; लोकांसाठी बलीचे अर्पण कर आणि त्यांच्यासाठी प्रायश्चित्त कर, याहवेहने आज्ञा दिली त्याप्रमाणे ते कर.”
लेवीय 9:1-7 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
आठव्या दिवशी मोशेने अहरोन, त्याचे मुलगे आणि इस्राएलांचे वडील ह्यांना बोलावले; आणि त्याने अहरोनाला सांगितले, ‘पापार्पणासाठी एक दोषहीन गोर्हा व होमार्पणासाठी एक दोषहीन मेंढा घेऊन परमेश्वरासमोर अर्पण कर; आणि इस्राएल लोकांना सांग की, तुम्ही पापार्पणासाठी एक बकरा आणा, आणि होमार्पणासाठी एक गोर्हा व एक कोकरू आणा, ही दोन्ही एका वर्षाची व दोषहीन असावीत; आणि परमेश्वरासमोर शांत्यर्पणे करण्यासाठी एक बैल, एक मेंढा आणि तेलात मळलेले अन्नार्पण आणा, कारण आज परमेश्वर तुम्हांला दर्शन देणार आहे.” मग मोशेने आज्ञा दिल्याप्रमाणे त्यांनी ते सर्व दर्शनमंडपाच्या दाराजवळ आणले आणि सर्व मंडळी जवळ येऊन परमेश्वरासमोर उभी राहिली. तेव्हा मोशे म्हणाला, “तुम्ही जे करावे म्हणून परमेश्वराने आज्ञा दिली ते हेच; आता परमेश्वराचे तेज तुमच्या दृष्टीस पडेल.” मोशेने अहरोनाला सांगितले, “वेदीजवळ जाऊन आपला पापबली व होमबली ह्यांचे अर्पण कर आणि स्वतःसाठी व लोकांसाठी प्रायश्चित्त घे; आणि लोकांकडचे बलीही अर्पण करून त्यांच्यासाठी प्रायश्चित्त कर; परमेश्वराने आज्ञा केल्याप्रमाणे हे कर.”