YouVersion लोगो
सर्च आयकॉन

लेवीय 15:19-33

लेवीय 15:19-33 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

एखादी स्त्री ऋतुमती झाली तर तिने सात दिवस दूर बसावे; जो कोणी तिला स्पर्श करेल त्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध रहावे; ती दूर असेपर्यंत ज्यावर ती झोपेल वा बसेल तेही अशुद्ध होय. जो कोणी तिच्या अंथरुणाला स्पर्श करेल, त्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने स्नान करावे व संध्याकाळपर्यंत अशुद्ध रहावे. ती ज्यावर बसली असेल त्यास जो कोणी स्पर्श करेल त्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने स्नान करावे व संध्याकाळपर्यंत अशुद्ध रहावे. तिच्या अंथरुणाला किंवा ज्यावर ती बसली असेल त्यास शिवणाऱ्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध रहावे. अशा स्त्रीबरोबर लैगिक संबंध केलेला पुरुषाने सात दिवस अशुद्ध रहावे व ज्या अंथरुणावर तो झोपेल तेही अशुद्ध समजावे. एखाद्या स्त्रीचा ऋतुकाल नसताना जर अनेक दिवस तिला रक्तस्राव होत असेल किंवा मुदतीच्या बाहेर ती ऋतुमती राहिली तर तिचे स्त्रावाचे सर्व दिवस तिच्या ऋतुकालाच्या दिवसाप्रमाणे समजावे. ती अशुद्ध होय. तिला स्त्राव होत असतानाच्या सर्व काळात ती ज्या अंथरुणावर झोपेल, ते अंथरुण तिच्या मासिक पाळीच्या वेळच्या अंथरुणाप्रमाणे समजावे. ती ज्यावर बसेल ती प्रत्येक गोष्ट तिच्या मासिक पाळीच्या काळात अशुद्ध असते. तशी अशुद्ध समजावी. जर कोणी त्या वस्तूंना स्पर्श करेल तर तो अशुद्ध होईल. त्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने स्नान करावे आणि संध्याकाळपर्यंत अशुद्ध रहावे. त्या स्त्रीचा स्त्राव बंद झाल्यावर तिने सात दिवस थांबावे; त्यानंतर ती शुद्ध होईल. मग आठव्या दिवशी तिने दोन होले किंवा पारव्याची दोन पिल्ले घेऊन दर्शनमंडपाच्या दारापाशी याजकाकडे जावे. मग याजकाने एकाचे पापार्पण व दुसऱ्याचे होमार्पण करावे. अशाप्रकारे याजकाने तिच्या अशुद्धतेकरिता परमेश्वरासमोर प्रायश्चित करावे. ह्याप्रकारे तुम्ही इस्राएल लोकांस अशुद्धतेबद्दल बजावून ठेवावे; नाहीतर ते माझा पवित्र निवासमंडप भ्रष्ट करतील आणि मग त्याच्याबद्दल त्यांना मरावेच लागेल! स्त्राव होऊन किंवा वीर्यपात होऊन जो पुरुष अशुद्ध होतो; आणि जी स्त्री ऋतुमती होते आणि जो कोणी पुरुष, ऋतुमती असल्यामुळे अशुद्ध झालेल्या स्त्रीशी लैंगिक संबंध करून अशुद्ध होतो, त्यांच्या संबंधीचे हे नियम आहेत.

सामायिक करा
लेवीय 15 वाचा

लेवीय 15:19-33 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

एखादी स्त्री ऋतुमती झाली तर तिने सात दिवस दूर बसावे; जो कोणी तिला शिवेल त्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे; ती दूर असेपर्यंत ज्यावर ती निजेल ते अशुद्ध होय; तसेच ज्यावर ती बसेल तेही अशुद्ध होय. जो कोणी तिच्या अंथरुणाला शिवेल त्याने आपले कपडे धुवावेत, पाण्याने स्नान करावे आणि संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे. ती ज्यावर बसली असेल त्याला जो कोणी शिवेल त्याने आपले कपडे धुवावेत, पाण्याने स्नान करावे आणि संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे. तिच्या अंथरुणाला किंवा ज्यावर ती बसली असेल त्याला शिवणार्‍याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे. तिच्याशी संभोग करताना पुरुषाला तिचा विटाळ लागला तर त्याने सात दिवस अशुद्ध राहावे व ज्या अंथरुणावर तो निजेल तेही अशुद्ध समजावे. एखाद्या स्त्रीचा ऋतुकाल नसताना जर अनेक दिवस तिला रक्तस्राव होत असला अथवा मुदतीच्या बाहेर ती ऋतुमती राहिली, तर तिचे स्रावाचे सर्व दिवस तिच्या ऋतुकालाच्या दिवसांप्रमाणे समजावेत. ती अशुद्ध होय. ती ऋतुमती असेल तितके सगळे दिवस ती ज्या अंथरुणावर निजेल ते तिच्या विटाळाचे अंथरूण समजावे; त्याचप्रमाणे ती ज्यावर बसेल ते तिच्या ऋतुकालाच्या विटाळाप्रमाणे अशुद्ध समजावे. जो कोणी त्या वस्तूंना शिवेल तो अशुद्ध होय. त्याने आपले कपडे धुवावेत, पाण्याने स्नान करावे आणि संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे. पण त्या स्त्रीने आपल्या स्रावापासून शुद्ध झाल्यावर मोजून सात दिवस थांबावे; त्यानंतर ती शुद्ध ठरेल. आठव्या दिवशी तिने दोन होले अथवा पारव्याची दोन पिले घेऊन दर्शनमंडपाच्या दाराशी याजकाकडे जावे. मग याजकाने एकाचे पापार्पण व दुसर्‍याचे होमार्पण करावे आणि तिच्या स्रावाच्या अशुद्धतेमुळे तिच्यासाठी परमेश्वरासमोर प्रायश्‍चित्त करावे. ह्या प्रकारे तुम्ही इस्राएल लोकांना त्यांच्या अशुद्धतेपासून दूर ठेवावे म्हणजे त्यांच्यामध्ये असलेले माझे निवासस्थान ते भ्रष्ट करणार नाहीत, आणि आपल्या अशुद्धावस्थेत मरायचे नाहीत.” स्राव होऊन किंवा वीर्यपात होऊन जो पुरुष अशुद्ध होतो, अथवा जी स्त्री ऋतुमती होते, तसेच ज्या पुरुषाला अथवा स्त्रीला स्राव होतो आणि जो कोणी पुरुष ऋतुमती स्त्रीशी संभोग करतो त्यांच्यासंबंधीचा हा नियम.

सामायिक करा
लेवीय 15 वाचा