विलापगीत 3:19-33
विलापगीत 3:19-33 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
माझे दुःख, कष्ट, कडू दवणा आणि विष ह्याचे स्मरण कर. मला माझ्या सर्व त्रासांची आठवण आहे. म्हणूनच मी माझ्यामध्ये नमलो आहे. पण हे मी माझ्या मनात विचार करतो म्हणून मला आशा वाटते. ही परमेश्वराची प्रेमदया आहे की आम्ही नाश नाही झालो. त्याची करुणा कधी न संपणारी आहे. ती प्रत्येक दिवशी नवीन होते; तुझे विश्वासूपण महान आहे. माझा जीव म्हणतो, “परमेश्वर माझा वतनभाग आहे. म्हणूनच मी त्याच्यावर आशा ठेवीन.” जे परमेश्वराची वाट पाहतात व जो जीव त्यास शोधतो, त्याला परमेश्वर चांगला आहे. परमेश्वरापासून येणाऱ्या तारणाची मुकाट्याने वाट पाहणे हे चांगले आहे. पुरूषाने आपल्या तरूणपणांत जू वाहावे हे त्यास फार चांगले आहे. ते परमेश्वराने त्याच्यावर ठेवले आहे म्हणून त्याने एकांती बसावे व स्वस्थ रहावे. त्याने आपले मुख धुळीत घातल्यास, कदाचित त्यास आशा प्राप्त होईल. एखाद्यास मारण्यासाठी खुशाल आपला गाल पुढे करून त्यास पूर्ण खजील करावे; कारण परमेश्वर त्यांचा कायमचा त्याग करणार नाही. जरी त्याने दुःख दिले तरी तो आपल्या दयेच्या विपुलतेनूसार करुणा करील. कारण तो आपल्या खुशीने कोणाचा छळ करत नाही आणि मनूष्य संतानास दुःख देत नाही.
विलापगीत 3:19-33 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
माझी विपत्ती व माझे भ्रमण, कडू दवणा व विष ह्यांचे स्मरण कर. माझा जीव त्यांचे स्मरण करीत राहतो म्हणून तो माझ्या ठायी गळला आहे. हे मी मनात आणतो म्हणून मला आशा आहे. आम्ही भस्म झालो नाही ही परमेश्वराची दया होय, कारण त्याच्या करुणेस खंड पडत नाही. ती रोज सकाळी नवी होते; तुझी सत्यता थोर आहे. “परमेश्वर माझा वतनभाग आहे”, असे माझा जीव म्हणतो; म्हणून त्याच्या ठायी मी आशा ठेवीन. जे परमेश्वराची आशा धरून राहतात त्यांना, जो जीव त्याला शरण जातो त्याला, परमेश्वर प्रसन्न होतो. परमेश्वरापासून येणार्या तारणाची वाट पाहणे आणि तीही मुकाट्याने पाहणे बरे आहे. मनुष्याने आपल्या तारुण्यात जू वाहावे हे त्याला बरे आहे. त्याने एकान्ती बसावे व स्वस्थ असावे, कारण त्याने त्याच्यावर हे ओझे ठेवले आहे. त्याने आपले तोंड मातीत खुपसावे, कदाचित अद्यापि आशा असेल. मारत्या इसमाकडे त्याने आपला गाल करावा; त्याने उपहास सोसावा. कारण प्रभू कायमचा त्याग करणार नाही; तो जरी दु:ख देतो तरी तो आपल्या दयेच्या वैपुल्यानुसार करुणा करतो. तो कोणास मुद्दाम पीडा करीत नाही, मानवपुत्रांना दु:ख देत नाही.